हे मंदिर कोणी बांधले याची माहिती उपलब्ध नसली तरी त्याचे स्थापत्य आणि नक्षीकाम, शिल्प आणि मंदिराशी असलेली परंपरा त्याचे प्राचीनत्व सुचवतात. मंदिराला साक्षात शिवाजी महाराजांनी वर्षांसन लावून दिलेले होते, त्यावरून हे मंदिर शिवपूर्व काळातील आहे, एवढे निश्चितपणे सांगता येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साताऱ्यापासून ३५ कि.मी. आग्नेयेला वाई हे एक छोटेसे नगर आहे. जीवनदात्री कृष्णा नदी ज्या गावातून वाहते, सातवाहन काळातील बौद्ध गुंफा गावाच्या अगदी जवळ असलेले आणि आज मात्र फक्त महाबळेश्वरच्या वाटेवरील एक छोटे निसर्गरम्य गाव ढोल्या गणपतीसाठी आणि कृष्णाबाईच्या उत्सवासाठीच प्रसिद्ध आहे. या गावाजवळील िलब, किकली ही अपरिचित वारसा स्थळे या गावाजवळ असूनही उपेक्षित आहेत. पण या सर्वावर कळस म्हणजे खुद्द वाईमध्ये ब्राह्मणशाही नावाच्या भागात असलेले धुंडिविनायक मंदिर. खरं तर वाई म्हटलं की ढोल्या गणपती तसेच कृष्णेच्या घाटावरची इतर मंदिरे आठवतात. वाईमध्ये आलेले सगळे पर्यटक या मंदिरांना भेटी देतात. मेणवली, धोमेश्वर यासारखी प्रसिद्ध ठिकाणेही पर्यटकांची गर्दी खेचतात. पण खरे पहिले तर वाईमधील सर्वात जुने असे उभे असलेले मंदिर म्हणजे धुंडिविनायक मंदिर मात्र खुद्द वाईकरांनाही फारसे महत्त्वाचे वाटत नाही. परंपरेने या मंदिराचा सांभाळ साबणे कुटुंबीय करत आहेत. हे मंदिर कोणी बांधले याची माहिती उपलब्ध नसली तरी त्याचे स्थापत्य आणि नक्षीकाम, शिल्प आणि मंदिराशी असलेली परंपरा त्याचे प्राचीनत्व सूचित करतात.

हे मंदिर नदीच्या काठावरती एका पीठावर बांधले आहे. त्यावर बा भागावर काही शिल्पे कोरली आहेत. त्यामध्ये हनुमान, काही योगी, पायामध्ये हत्ती पकडलेले वाघ अशी शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रवेशाच्या दरवाज्यावरच्या ललाटबिंबावर शेषशायी विष्णूचे शिल्प कोरलेले आहे. त्या शिल्पाच्या खालच्या बाजूला गणपतीचेही शिल्प कोरलेले आहे. दाराच्या उंबरठय़ावर कीíतमुख कोरले आहे. मंदिराच्या मंडपात टेकून बसण्यासाठी कक्षासने आहेत. मंडपात दगडी स्तंभ आहेत. संपूर्ण बांधकाम हे मोठय़ा दगडातच केले आहे. गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे; परंतु त्याचे वाहन उंदीर मात्र त्याच्या समोर नसून जरा बाजूला िभतीपाशी ठेवला आहे. मूळ मंदिरापेक्षा उशिराच्या काळातली एक नरस्िंाहाची मूर्तीही गाभाऱ्यात आहे आणि तशीच पण जरा जुनी वाटणारी एक मूर्ती मंदिराच्या अंगणातील एका दगडी देवळीतसुद्धा ठेवली आहे. या मंदिराचे शिखर विटांचे असून त्याची वेळोवेळी डागडुजीही झालेली आहे.

या मंदिराच्या आवारात सहा संन्याशांच्या समाध्याही आहेत. त्यांची नावे जरी माहीत नसली तरी त्या संन्याशांच्या आहेत हे लोकांना माहीत आहे. तसेच मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेल्या िभतीवरील साधना करणाऱ्या योग्याचे शिल्प आहे. त्यामुळे या मंदिराचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे हे लक्षात येते. या मंदिराच्या संबंधी एक मोडी कागद साबणे दप्तरामध्ये होता. तो डॉ. ग. ह. खरे यांनी वाचला होता. त्यांनी त्यावरून सांगितले होते की, या मंदिराला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षांसन लावून दिले होते आणि ते आम्ही पुढे चालवत आहोत, असा छत्रपती शाहू महाराजांचा एक आदेश होता. तसेच त्यांनतर इंग्रज सरकारनेही तेच वर्षांसन पुढे सुरू ठेवले असेही कागद विश्वस्तांकडे आहेत. त्यामुळे या मंदिराचे बांधकाम शिवपूर्व काळातील आहे हे स्पष्ट होते. वाईमधील इतर मंदिरांचे बांधकाम हे पेशवाईतील असल्यामुळे त्यामध्ये हे सर्वात प्राचीन ठरते. यादवकाळ ते शिवकाळ यांमधल्या काळातील फारशी मंदिरे सापडत नाहीत त्यामुळे या मंदिराचे महत्त्व अपरंपार आहे; परंतु हा वाईमधील वारसा मात्र संपूर्णपणे उपेक्षित आहे. त्याची स्थानिकांनी आणि पर्यटकांनी दखल घेणे आवश्यक आहे.

खिंडीतला गणपती

आशुतोष बापट

शिवछत्रपतींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आणि नंतर पेशवाईमध्ये भरभराटीला आलेल्या पुण्यात शिवकालीन आणि पेशवेकालीन गणपतीची स्थाने आजही पाहायला मिळतात. त्यात ग्रामदैवत कसबा गणपती, शनिवारवाडय़ाच्या बाहेरचा गणपती, गुंडाचा गणपती, त्रिशुंड गणपती, पर्वतीच्या पायथ्याचा रमणा गणपती यांचा समावेश होतो. या गणपतींना तत्कालीन राज्यकर्त्यांनी आíथक पाठबळ पुरवल्याचे पुरावेसुद्धा उपलब्ध आहेत. याच पंक्तीत आणि तितकाच प्राचीन गणपती पुण्याच्या शिवेवर वसला आहे. तो आहे गणेशखिंडीत असलेला पार्वतीनंदन गणपती किंवा खिंडीतला गणपती हा होय.

शिवकाळापूर्वीपासून हे मंदिर अस्तित्वात असावे. या गणपतीशी खूप साऱ्या आगळ्यावेगळ्या कथा निगडित आहेत. राजमाता जिजाबाई यांना साक्षात्कार झाल्यामुळे हे मंदिर बांधण्यात आले, असेही सांगितले जाते. जिजाबाई या एका श्रावणी सोमवारी पालखीमधून पाषाणच्या सोमेश्वराच्या दर्शनाला निघाल्या होत्या. त्या वेळी खिंडीतल्या या मंदिरात एक ब्राह्मण अनुष्ठानात मग्न होता. सत्पुरुषांचे आशीर्वाद आणि देवाचे दर्शन या दुहेरी हेतूने त्यांनी झाडीतील या गजाननाचे दर्शन घेतले. कसबा गणपतीसारखीच हीपण पुरातन मूर्ती असल्याचा साक्षात्कार जिजाबाईंना झाला आणि त्यांनी इथे सुघड मंदिर बांधले.

काळाच्या ओघात या मंदिराची पडझड झाली. नंतर पाषाण भागात राहणारे शिवरामभट्ट चित्राव यांनी या मंदिराची दैनावस्था पाहिली आणि जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेतले. इथल्या विहिरीची साफसफाई करीत असताना त्यांना विहिरीत मोठेच गुप्तधन सापडले. चित्राव ते धन घेऊन शनिवारवाडय़ावर गेले; परंतु ते देवाचे धन आहे त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही असे सांगून बाजीराव पेशव्यांनी ते धन घेण्याचे नाकारले. त्याऐवजी त्या धनाचा वापर देवस्थानांसाठी करावा असा सल्ला बाजीराव पेशव्यांनी चित्रावांना दिला. त्यानुसार त्या धनाचा वापर करून शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर आणि खिंडीतल्या या पार्वतीनंदन गणेशाचे मंदिर उभारले गेले.

या मंदिरात गणेशाची सिंदूरचर्चित चार फूट उंचीची मूर्ती आहे. मूर्ती बठी असून सोंड डावीकडे वळलेली आहे. पुढील दोन हात मांडीवर असून मागील दोन हातात परशू आणि अंकुश आहे. सभामंडपाच्या सुरुवातीला एका दगडावर लाडू हातात धरलेला मूषक आहे. श्रीमंत बाजीराव पेशव्यांप्रमाणे इतर पेशवेसुद्धा मोहिमेवर जाताना या िखडीतल्या गणपतीचे दर्शन घेत असत. राक्षसभुवनच्या मोहिमेवेळी थोरल्या माधवराव पेशव्यांनी याचे दर्शन घेतले होते. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने पुत्रप्राप्तीसाठी या गणपतीपुढे दक्षिणा ठेवल्याची नोंद आढळते.

अजून एक महत्त्वाची घटना या गणेशाबाबत घडली ती १८९७ साली. रॅण्डच्या खुनापूर्वी चाफेकर बंधूंची खलबते याच मंदिरात होत असत. निर्दयी रॅण्डचा खून केल्यावर दामोदर हरी चाफेकरांनी या खिंडीतला गणपती नवसाला पावला असा सांकेतिक निरोप खंडेराव साठे यांच्यामार्फत लोकमान्य टिळकांना पाठवला होता. सेनापती बापट भूमिगत असताना याच मंदिरात वास्तव्याला होते. अशा या अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या पार्वतीनंदन गणपतीचे दर्शन मुद्दाम घ्यायला हवे.

response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wai dhundi vinayak ganpati temple