लग्न म्हणजे जीवनातील महत्त्वाचा टप्पा. लग्नानंतरचे सहजीवन निकोप आणि शांततापूर्ण असले तरच जीवन आनंददायी ठरू शकते, नाहीतर हे लग्न म्हणजे जीवनातील दुखरी, ठसठसणारी जखमही ठरू शकते. तसे न होता विवाह हा आनंददायी ठरावा म्हणून प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विजय नागास्वामी यांनी विवाह करणाऱ्यांसाठी आणि विवाह झालेल्यांसाठी केलेले समुपदेशन म्हणजे ‘हॅपी लग्न डॉट कॉम भाग १ आणि भाग २’ ही पुस्तकं होय.
आज जग वेगाने बदलत आहे. त्याचप्रमाणे स्त्री-पुरुष संबंधांतही बदल होत आहे. स्त्रियांचे आर्थिक स्वातंत्र्य, एकुलती एक असणं अशा अनेक गोष्टी लग्नावर परिणाम करणाऱ्या ठरत आहेत. लग्न दोन कुटुंबाचं नव्हे तर सध्या दोन व्यक्तींचंच असतं. कारण त्यांनाच ते पुढे निभावून न्यायचं असतं. मग प्रेमविवाह असो की ठरवून केलेला विवाह.
लग्न म्हणजे जोखीम नव्हे की लग्न म्हणजे लॉटरीही नव्हे की लागली तर लागली नाहीतर.. वैवाहिक आयुष्य आनंदी व्हायचे असेल तर नवरा आणि बायको दोघांनाही त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्न लग्न ठरवण्यापासूनच केले गेले तर पुढील सहजीवन निकोप राहण्यासाठी मदतच होते. ‘हॅपी लग्न डॉट कॉम भाग १’ या भागात लेखकाने सहजीवनाची सुरुवात करण्यापूर्वी काय करायला हवं किंवा लग्न झाल्या झाल्या तो प्रवास निकोप आणि समृद्ध कसा राहील याबाबत समुपदेशन केलं आहे. ‘यशस्वी लग्नाचं अचूक सूत्र मी तुम्हाला देऊ शकणार नाही. तुमच्या सर्व वैवाहिक समस्या खात्रीने चुटकीसरशी सुटाव्यात याकरता झटपट अमलात येतील अशी सूत्रं देणं, हा या पुस्तकाचा हेतू नाही.’ असं लेखकानं सुरुवातीलाच नमूद केलं आहे.
आज मुलींनाही मनासारखा जोडीदार मिळाल्याशिवाय लग्न करायचं नसतं. त्यासाठी त्या वेळ घ्यायला आणि द्यायलाही तयार असतात. त्यामुळे लग्नाचं स्वरूप बदलत चाललंय. लेखकाने उदाहरणाद्वारे आज स्मार्ट जोडीदार, बदलती लग्न पद्धती, अनुरूप जोडीदार यांची निवड याविषयी मार्गदर्शन केलं आहे. त्यासाठी वापरलेली उदाहरणं ही आपल्या भोवताली घडणारीच असल्याने आपण आपल्या अनेक समस्यांसाठी त्यातून पर्याय शोधू शकतो.
विभक्त कुटुंब पद्धती, मुलं वाढवण्यात झालेला बदल, पर्यायाने मुलींनाही हवी असणारी स्पेस, मुलगा आणि मुलगी यांचं कुटुंब त्यांचे नातेसंबंध, मित्र, लग्नानंतरचे लैंगिक जीवन या सगळ्या गोष्टींचा गोषवारा या भागात येतो. लेखकाने म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत कोर्टिग पिरियड मोठा असावा या मताचा मी झालो आहे. म्हणजे साखरपुडा ते लग्न यांत जरा काही काल जाऊ दिलेला बरा! प्रेमविवाहासाठी हा काळ सहा महिन्यांचा असावा, तर ठरवून केलेल्या लग्नांसाठी तो नऊ ते बारा महिन्यांचा. त्यामुळे आपापल्या भावना अधिक स्पष्टपणे मांडता येतात. लेखक विजय नागास्वामी १९९७ पासून जोडपी, कार्पोरेट जगताशी निगडित समस्यांवर समुपदेशन करत असल्याने नवीन पिढीला जाणवणाऱ्या समस्यांवर ते अधिक विस्तृत आणि सहज सोप्या भाषेत मार्गदर्शन करतात. जे आज विवाहोत्सुक असणाऱ्या तरुण-तरुणींनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही उपयोगी ठरणारे आहे.
लग्न झाल्यावर अगदी क्षुल्लक कारणं काडीमोडपर्यंत पोहोचवतात. ही कारणं कळूनही अनेकदा त्यावर उपाय काय करायचे समजत नाही. खरं तर लग्न हे वाढत्या वर्षांप्रमाणे फुलणारं, बहरणारं, मुरत जाणारं नातं. जितकं निकोप तितकंच ते अधिकाधिक पारदर्शी होत गेल्यानं आनंददायी आणि पती-पत्नींना सर्वार्थानं समृद्ध करणारं नातं. पण त्याचीही जोपासना करावी लागते, निगा राखावी लागते हे अनेकांना समजत नाही. जर या नात्याला गृहीत धरलं गेलं तर त्यातील आनंद नाहीसा होऊन ते नीरस, रटाळ बनतं. त्यात तोच तोचपणा येतो. हे टाळण्यासाठी नक्की काय करायला हवं याबाबतची काही तत्त्वं, सूत्रं लेखकाने ‘हॅपी लग्न डॉट कॉम भाग २’ं मध्ये सांगितले आहे.
पती-पत्नीने आपल्या नात्यात, मैत्रीबाबत, विवाहपूर्व संबंधांबाबत किती पारदर्शी असावं, पालकांना, त्यांच्या समस्यांना नक्की किती महत्त्व द्यावं. संसार करतानाही पती-पत्नी म्हणून स्पेस जपतानाच स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्याची स्पेस जपण्याचं महत्त्व लेखकाने या भागात दिलं आहे. ‘गोष्टी बिनसलेल्या लग्नांच्या’ या विभागात क्रोधित, उदास, नियंत्रित, हिंसक, संशयी, दुर्लक्षित आणि सोयीच्या लग्नांच्या कथा म्हणा किंवा उदाहरणं त्यांच्या विश्लेषणासह दिली आहेत. ही उदाहरणं नक्कीच छोटय़ा छोटय़ा कुरबुरी असणाऱ्यांना समुपदेशन करणाऱ्या ठरतात. लग्न कायम ताजंतवानं ठेवण्यासाठी नक्की काय आवश्यक आहे ते लेखकानं इथे सांगितलं आहे. लेखकाने सांगितलेले उपाय जर लग्न झालेल्या आणि कुरबुरी नुकत्याच कुठे सुरू झालेल्या जोडप्यांनी अमलात आणले, त्याविषयी ते अंतर्मुख झाले तर त्यांचं नातं पुन्हा बहरेल, अधिक दृढ आणि आनंददायी बनेल यात शंकाच नाही.
या दोन्ही पुस्तकांचा अनुवाद वाचताना एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवते ती म्हणजे त्यातील भाषा. पुस्तकं वाचताना आपण अनुवाद वाचत आहोत, असं कुठेही वाटत नाही, नागास्वामी यांना काय म्हणायचं ते सोप्या आणि प्रवाही मराठीत मांडण्याचं काम शुभदा चौकर आणि माधवी खरे यांनी केलं आहे.
‘हॅपी लग्न डॉट कॉम भाग १ आणि भाग २’, लेखक – विजय नागास्वामी, अनुवाद – शुभदा चौकर, माधवी खरे, रोहन प्रकाशन, मूल्य – ३९० रुपये
लग्न म्हटलं की जेवढय़ा म्हणून अपरिहार्य गोष्टी डोळ्यासमोर येतात त्यातली एक असते, लग्नाचा आल्बम. लग्न झाल्या झाल्या नंतर सगळ्यांनी तो एकत्र येऊन बघण्यात गंमत असतेच, पण नंतर काही वर्षांनी तो आल्बम म्हणजे मधुर आठवणींचा खजिनाच होऊन जातो. ‘ही बघ तेव्हा कशी दिसायची’, ‘तो कसा होता ना तेव्हा आणि आता कसा झालाय’, ‘अगं ही साडी तुला किती सुंदर दिसत होती’, ‘ही चिनू बघ केवढीशी होती, आता केवढी मोठी झाली’, ‘अय्या हेपण आले होते लग्नाला, मला आठवतच नाही’, अशा नंतर काही वर्षांनी रंगणाऱ्या चर्चाची सगळी भिस्त लग्नाच्या आल्बमवरच असते. ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो, रंगीत फोटो आणि आता तर डिजिटल फोटो असा फोटोग्राफीचा प्रवास झाला असला तरी लग्नाचा आल्बम ही बऱ्याचदा फोटोग्राफर्ससाठी उरकून टाकायचीच गोष्ट असायची. मुळात लग्नाची फोटोग्राफीचं काम देतानाच आधी हौशी फोटोग्राफर शोधला जायचा. लग्नासाठी बाकी लाखो रुपये खर्च करणारे फोटोसाठी मात्र हात आखडता घ्यायचे. तर काही मोजकेच लोक लग्नाच्या फोटोग्राफीसाठी व्यावसायिक फोटोग्राफरना बोलवायचे. पण हे व्यावसायिक फोटोग्राफर म्हणजे कसे, तर कॅमेऱ्याच्या सर्व अंगांचा उत्तम अभ्यास असणारे, कॅमेरा कमालीच्या सफाईनं वापरू शकणारे. लग्नाच्या ठरावीक महत्त्वाच्या विधींचे, वधू किंवा वर ज्या पक्षाकडून फोटोग्राफर आला असेल, त्या पक्षाकडून सांगितल्या गेलेल्या माणसांचे फोटो पटापट काढले, की काम झालं अशा अविर्भावात असलेले.
पण लग्न म्हणजे फक्त काही विधी नव्हेत. जिव्हाळ्याची शेकडो माणसं जमलेली असतात. चांगले कपडे, ठेवणीतले दागिने घालून छान नटलेली, सजलेली असतात. काहीजण खूप दिवसांनी भेटत असतात. आनंद, उत्साह फसफसत असतो. लहान मुलं हुंदडत असतात. एकीकडे लेकीच्या विरहाचं दु:ख असतं. दुसरीकडे नवी नवरी घरी येणार याचा आनंद असतो. मानवी भावभावनांचा असा सतेज, रंगीबेरंगी कोलाज म्हणजे फोटोग्राफर्ससाठी केवढी मोठी संधी. पण ती घेतली जातेच असं नाही. कारण लग्नाचे फोटो काढणं हीसुद्धा एक कला आहे, याची जाणीव सगळ्याच फोटोग्राफरना असतेच असं नाही. तर लग्नाची फोटोग्राफी हीसुद्धा कला म्हणजे आटरेग्राफी कशी असते, लहानसहान गोष्टींचं आधीपासून नियोजन करून, थोडी जास्त मेहनत घेऊन लग्नाचे फोटो काढले तर त्या फोटोंचं सोनं कसं होतं, या सगळ्याबाबत एक वेगळीच दृष्टी देणारं हे पुस्तक आहे.
आटरेग्राफी, अर्चना देशपांडे-जोशी, डायमंड पब्लिकेशन, मूल्य- १३० रुपये, पृष्ठे- ९५.
कुणाच्याही घरी लग्न निघालं की लगीनघाई सुरू होते. हल्लीच्या काळात सरसकट बऱ्याच गोष्टींचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जात असलं तरी त्याशिवायही एक ना दोन अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्या सगळ्यांचा मेळ घालत, रोजचा व्याप सांभाळत लग्नाचा मुहूर्त गाठणं, ही मोठी जिकिरीची गोष्ट होऊन बसते. परदेशात वेडिंग प्लॅनर हा एक व्यवसाय तयार होऊन ते थोडं सोपं झालं आहे, पण आपल्याकडे तसं अजून तेवढं सोपं झालेलं नाही. लग्न म्हटलं की आजी-आजोबा, काका-मामा- मावशा-आत्या गोळा होतात, कामांना जमेल तेवढा हातभार लावतात. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधला एखादा नारायणही असतोच. पण तरीही एकदाचं लग्न उरकलं की प्रत्येकाला ‘लग्न पहावं करून’ ही उक्ती किती सार्थ आहे, याचा प्रत्यय येतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर लग्न करण्याचाच नव्हे तर उरकण्याचा, लावण्याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष घेऊनच बघा. तो आनंददायक दमछाक करणारा असतो खरा, पण थोडं नियोजन केलं तर सुरळीतही पार पाडता येतो. कसा ते ‘अस्सं लग्न सुरेख बाई’ या पुस्तकातून सांगितला आहे. लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंत सगळ्या बारीकसारीक तपशिलांचा त्यात विचार केला गेला आहे. ज्यांच्या घरात लग्न आहे, त्यांच्यासाठी हे एकप्रकारचं गाइडच आहे, असं म्हणता येईल.
अस्सं लग्न सुरेख बाई, प्राची गुप्ते, रफल्स पब्लिकेशन सव्र्हिस, मूल्य- १०० रुपये, पृष्ठे- १०३
रेश्मा भुजबळ – response.lokprabha@expressindia.com