सुनीता कुलकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाळेबंदीला आता जवळजवळ दीड महिना होत आला आहे. सुरूवातीला जड गेलेली टाळेबंदी आता अनेकांच्या अंगवळणी पडू लागली आहे. आपली आपणच करून घेतलेली नजरकैद नको-नकोशी असली तरीही ती काही काळासाठी तरी स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे बहुतेकांनी मान्य केले आहे. ज्यांना ते स्वीकारता येत नव्हते त्यांनी पोलिसांचे दंडुके खाऊन का होईना स्वीकारले आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता लोक आवश्यक कामांशिवाय एरव्ही बाहेर पडत नाहीत.

मग ते घरी काय करतात?

ज्यांचे कार्यालयीन काम घरी बसून होण्यासारखे आहे, त्यांना वेळ पुरत नाही. ज्यांचे कार्यालयीन काम घरून होण्यासारखे नाही, त्यांच्याकडे वेळच वेळ आहे. पण या दोन्ही प्रकारांमधल्या विशेषत: पुरूषांना घरकाम हे करावेच लागते आहे. स्वयंपाकात मदत, भांडी घासणे, केर-फरशी, कपडे धुणे, वाळत घालणे, त्यांच्या घड्या घालणे, घराची बाकीची साफसफाई, मुलांना सांभाळणे या सगळ्या कामात सध्या बऱ्याच घरांमध्ये पुरूषांची मदत होते आहे.

एक काळ असा होता की, घरकाम हे फक्त मुलींचं, स्त्रियांचं काम मानलं जायचं. मग काळ असा आला की घरकामाबरोबरच कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी स्त्रियांची नोकरीही गरजेची मानली जायला लागली. या दोन्ही गोष्टींची तारेवरची कसरत सांभाळणारीला मदत करण्याएवजी नकळत तिच्या मनात सुपर वुमन सिण्ड्रोम बिंबवला गेला. आजच्या मुली तो झिडकारून करिअरला प्राधान्य देताना दिसत असल्या तरी ते प्रमाण तुलनेत कमीच आहे.

मुली घरकाम ही आपली एकटीची जबाबदारी आहे हे ठामपणे नाकारायला लागल्या असल्या तरी ती आपलीही जबाबदारी आहे, हे स्वीकारायला मुलं- पुरूष फारसे तयार नाहीत. पण करोनाकाळाने ही संधी देऊ केली आहे. मुलगा असो वा मुलगी, स्त्री असो वा पुरूष, असं टाळेबंदीत रहायची वेळ आली, तर वर दिलेली घरातल्या घरात जगताना आवश्यक असलेली किमान कौशल्य आपल्यापुरती तरी प्रत्येकाला यायलाच हवीत. आपल्या पुढच्या पिढीला तरी ती शिकवून ठेवायला हवं. लष्कराच्या नाही, तरी स्वत:पुरत्या तरी भाकऱ्या भाजायला शिकवायला हवं.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What skills do you have in lock down aau