‘‘मला खऱ्या आणि कल्पनेतील अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी सांगायला आवडतात. त्यामध्ये माणसाच्या मनातील भीती, समज- गरसमज, कमतरता, त्रुटी सारे काही दडलेले असते. माझ्या कलाकृतीमध्ये तुम्हाला काही विषय पुन्हा पुन्हा येताना दिसतील कारण ते माझ्याच जीवनाशी निगडित आहेत. अगदी खरं सांगायचं तर ते विषय एखाद्या रेचकाप्रमाणे येतात. म्हणजे ते डोक्यात येतात, ते कलाकृतीचे रूप धारण करतात. कलाकृती पूर्ण होते तेव्हा माझा निचरा झालेला असतो.. माझ्या कलाकृती या वेगळ्या अर्थानं माझा निचराच आहेत.. तेव्हा मी पुन्हा मोकळी झालेली असते ’’ – हेमा उपाध्याय
हेमा उपाध्याय आणि तिचे वकील या दोघांचेही मृतदेह कांदिवलीला गटारामध्ये सापडल्यानंतर १३ डिसेंबरपासून तिच्या नावाची चर्चा भारतभरात सुरू झाली. ही चर्चा देशभरात होण्याचे कारण म्हणजे ती समकालीन कलावंतांच्या यादीत अगदी वरच्या फळीमध्ये होती. तिचा मृत्यू हा कलाक्षेत्रासाठी एक मोठा धक्काच होता. बडोद्याच्या एमएस विद्यापीठातून तिने ललित कला आणि िपट्रमेकिंग या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. समकालीन चित्र- शिल्पकारांमध्ये तिच्याकडून खूप अपेक्षाही होत्या. मात्र तिच्या हत्येमुळे आता देश एका चांगल्या समकालीन कलावंताला मुकला आहे. तिचा पती चिंतन उपाध्याय याला या प्रकरणी संशयित म्हणून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तो स्वतही एक चांगला कलावंत असून या दोघांनाही मिळून काही कलाकृतींवर एकत्रित काम यापूर्वी केले होते.
हेमाच्या कलाकृती या प्रामुख्याने शहरीकरण आणि त्याच्याशी संबंधित अनेकविध बाबींशी निगडित होते. २००१ साली तिने ‘द निम्फ, अॅण्ड द अॅडल्ट’ हे प्रदर्शन ऑस्ट्रेलियामध्ये सादर केले. त्यावेळेस तिच्यावर कौतुकाचा वर्षांव झाला. तिने तब्बल दोन हजार झुरळे साकारली होती आणि त्यांच्या मांडणीशिल्पातून एक गहनगंभीर असा विषय मांडला होता. विज्ञानाच्या अंगाने बोलायचे तर आजवर उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये जो प्राणी टिकून राहिला आणि त्याच त्याच्या क्षमतेमुळे तो जगाच्या अंतापर्यंतही टिकून राहणार, असे संशोधकांना वाटते तो म्हणजे झुरळ. तत्कालीन परिस्थितीमध्ये दक्षिण आशियात तणावाचे वातावरण होते. अणुस्फोटाने सारे काही खाक होणार आणि मग किरणोत्सारानंतर काहीच शिल्लक राहणार नाही.. एखाद्या लष्करी कारवाईने जागतिक शांतताही धोक्यात येईल, अशी शक्यता होती. कदाचित ती तिसऱ्या महायुद्धाची सुरुवातही ठरावी, असे बोलले जात होते. मग तसे प्रत्यक्षात झालेच तर कदाचित नरसंहार एवढा भीषण असेल की, शिल्लक राहणारी केवळ झुरळेच असतील हेच सांगण्यासाठी हेमाने हे मांडणीशिल्प साकारले होते. ही झुरळे संपूर्ण दालनात पसरलेली होती..
हेमाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे अनेक चित्र- मांडणीशिल्पांमध्ये तिने स्वतच्याच प्रतिमांचा (फोटोंचा- सेल्फ पोर्ट्रेटचा) वापर केला आहे. ती म्हणायची, त्याप्रमाणे ती तिचीच कथा आहे, पण कथेचा सूर ग्लोबल आहे. शहरामध्ये आपण ‘हायब्रीड ग्लोबल जीवन’ जगण्याचा प्रयत्न करतो, त्यातील ताण- तणाव कलाकृतींमध्ये दिसतात असे ती नेहमी म्हणायची. बडोद्यातून मुंबईत स्थायिक होण्यापूर्वीही ती इथे आली होती. पण मुंबईत आल्यानंतर तिला जाणावले ते स्थलांतरीतांचे प्रश्न, त्यांची जीवन, त्याच्या स्वतच्या नव्या परिचयाचा माणसाकडून, शहरात नव्याने घेतला जाणारा शोध, कधी त्या शहराने तुम्हाला स्वीकारणे तर कधी नाकारणे. शहरामध्येही सातत्याने बदल होत असतात. तेही त्या बदलांना सरावण्याचा प्रयत्न करत असत. त्याचेही परिणाम इथल्या जीवनावर वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात. त्या प्रक्रियेत काही गोष्टी कालबा होतात तर काहींची रूपे बदलतात. तर काही अंतर्बा बदलतात. साहजिकच असते की, त्या बदलांचा परिणामही इथल्या जीवनावर होत असतोच. या अशा एका भल्या मोठय़ा विषयाला भिडण्याचा प्रयत्न हेमाने तिच्या कलाकृतींमधून केला.
हारीने एकमेकांना खेटून उभ्या राहिलेल्या घरांची झोपडपट्टी. तिचे विविध स्तर, पदर. आणि शहराचा एक अविभाज्य भाग झालेले जेसीबी मशीन, असे सारे काही तिच्या मांडणीशिल्पांतून समोर येत होते. मग जेसीबीच्या हातामधून उचलल्या गेलेल्या झोपडय़ा, त्यांचे अनधिकृतपण, त्या अनधिकृत गोष्टींचा ढिगारा आणि त्याच्या आतमध्ये असलेले जीव या साऱ्याचा ताण तिच्या कलाकृतींमधून व्यक्त होत होता. अनेकदा धारावीच्या परिसरातून जाताना तिला छळलेल्या प्रश्नांचा मागोवा तिने तिच्या कलाकृतींमधून घेतला. शहर आणि तिथले आक्रसलेले अवकाश याचाही वेध तिने विविध पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला.
तिने नावीन्यपूर्ण पद्धतीने साधनांचा वापरही केला. ती खऱ्या अर्थाने मिक्स मीडियाचा वापर करणारी म्हणजेच अनेकविध साधनांचा माध्यम म्हणून वापर करणारी कलावंत होती. ‘स्पेस इन बिटवीन यू अॅण्ड मी’ मध्ये तिने जमिनीचाच वापर कॅनव्हॉस म्हणून केला. त्यावर पेरलेले उगवले त्या वेळेस लक्षात आले की, आईला लिहिलेल्या पत्राचा तो मायना असावा.. कारण त्यानुसार हिरवाईमध्ये अक्षरे दिसत होती. . त्यानंतर ती तिथून निघून गेल्यानंतर साहजिकच होते की, झाडांना पाणी कोण घालणार? म्हणजेच ती कलाकृती सुकून जाणार, त्यावर हेमा म्हणाली होती, यातूनही मला हे सारे अनित्य आहे.. हेच दाखवून द्यायचे आहे. कलाकृती नष्ट होणे हादेखील त्या कलाकृतीचा एक अपेक्षित प्रवासच होता. असा वेगळा विचार फार कमी कलावंत करताना दिसतात.
चिनी खेळण्याची आणि उत्पादनांची चलती सुरू झाली, त्या वेळेस ती व चिंतन दोघांनीही मिळून ‘मेड इन चायना’ हे मांडणीशिल्प साकारले. त्यात असंख्य चिनी वस्तू एका िभतीवर हारीने लटकवून ठेवलेल्या होत्या. वाढत्या चंगळवादाकडे लक्ष वेधण्याचा तो प्रयत्न होता. तर ‘लोको-फोटो-मोटो’ या कलाकृतीमध्ये तिने आगपेटीतील काड्यांच्या माध्यमातून चक्क मोठाली झुंबरे साकारली होती. ती इथल्याच (भारतीय) प्रतिमा, प्रतीके आणि साधने वापरते, असे तिच्या बाबतीत नेहमी म्हटले जायचे. या झुंबरांच्या प्रयोगानंतर ती म्हणाली होती की, यातून मी भारतीयत्वाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केलाय..
शहरीकरणाचा विचार तिच्या कलाकृतींमधून प्रामुख्याने आला पण अनेकदा असा विचार करताना केवळ माणसांचाच विचार केला जातो. पण तिच्या कलाकृतींमध्ये तिने या प्रक्रियेत पक्ष्यांचाही विचार केलेला दिसतो. बदलत्या शहरी वातावरणात कदाचित स्थलांतरीत पक्ष्यांचा मृत्यूच लिहिलेला असावा.. अशी तिची खंत होती. त्यामुळेच स्थलांतरीत पक्षीही तिच्या या कलाकृतीचा अविभाज्य घटक होते.
तिच्या एका प्रदर्शनात तांदळ्याच्या दाण्यांवर कलाकृती होती. संपूर्ण कॅनव्हासवर तांदळाचे दाणे चिकटवलेले.. त्यातील काही तांदळांवर तर काही अक्षरेही लिहिलेली होती. असे अनेक भन्नाट वाटतील असे प्रयोग हेमाने वारंवार केले.
सर्वसाधारणपणे महिलांचे प्रतिमांकन कलाकृतीमध्ये आले की, अनेकदा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. स्वतच्या कलाकृतीमध्ये स्वतच्याच प्रतिमेचा वापर करताना असा विषय वगळता कोणताही वेगळा दृष्टिकोन त्यात येणार नाही, याची कटाक्षाने काळजी हेमाने घेतली.
आजोबा किशूमल हिरानी यांच्यामुळे कला प्रवासाला बालपणीच नकळत सुरुवात झाली, असे ती सांगायची. बालपणी भेट दिलेल्या प्रदर्शनांमधील काही क्षण नेहमीच तिच्यासोबत असायचे. तिला असलेल्या दृश्यात्मक भानामुळे तिला बालपणीचे ते ठिकाण आठवायचेही नाही पण दृश्ये मात्र लक्षात होती.
खरेतर तिला व्हायचे होते हवाईसुंदरी. पण आतील कलाकाराची तीव्रता अधिक होती. मग १९९१ साली बडोद्यालाच कलेच्या अभ्यासाला अधिकृत सुरुवात झाली. इथेच दुसऱ्या तिसऱ्या वर्षांला असताना विविध कलासाधनांचा वापर करायला ती शिकली. ‘‘यापूर्वीही ही साधने पाहिली होती. पण याचा कला माध्यम म्हणून असा वापर करता येईल, अशा विचार कधीच केलेला नव्हता. तो कलाटणीचा क्षण होता. या माध्यमांचा वापर करून आपल्याला भावना नेमक्या व्यक्त करणे शक्य आहे, हे लक्षात आले. त्या माध्यमांना ती भाषा अवगत होती, ज्या भाषेतून मला व्यक्त व्हायचे होते!’’ असे सहज चर्चेत एकदा हेमाने सांगितले होते!
शहराचा विचार तिच्या डोक्यात सतत असायचा. ती नेहमीच्या गोष्टींकडेच वेगळेपणाने पाहायची. अशीच एकदा किनाऱ्यावर बसलेली असताना एका बाजूला उधाणलेला सागर आणि दुसरीकडे कोळीवाडय़ात सुकवायला ठेवलेली मासळी.. त्याखाली मन विषण्ण करणारी घाण.. या वातावरणात तिला वाटले की, ते सुकायला ठेवलेले निर्जीव मासेच अधिक उठावदार दिसताहेत.. आणि मग त्यातून जन्माला आले प्रदर्शन..
हे शहर तुम्हाला त्याच्याप्रमाणे विचार करायला लावतं. एवढंच नव्हे तर त्याच्याप्रमाणे विचार बदलायलाही लावतं, ती म्हणायची. म्हणून तर शहरवासीयांचे विचार ग्रामीण भागातल्या लोकांपेक्षा वेगळे आणि म्हणूनच कदाचित एकसारखेच असतात, ती सांगायची.
गेल्या काही वर्षांमध्ये मात्र ती कावली होती घटस्फोटामुळे. मग तेही तिच्या कलाकृतीमध्ये येऊन गेलं.. मेक अपचे नक्षीदार कपाट पण आतील सारे खण रिकामे!
किंवा मग ‘फ्रजाईल’ असे लिहिलेला एक मोठ्ठा लाकडी खोका आणि आजूबाजूला माकडे.. ‘ही माझीच स्वतची अर्कचित्रात्मक कलाकृती आहे. आयुष्यात जे सुरू आहे, त्यातून खूप काही शिकायला मिळाले. भावनिकदृष्टय़ा अतिशय संवेदनशील कालखंड होता. शहर, त्यातील राजकारण, समाज या विषयी नव्याने विचार करतेय. समाजातील ती माकडे माझ्या भावनांशी खेळताहेत.. माझ्या आयुष्यातील प्रसंगांची खिल्ली उडवताहेत कदाचित.. मग मी खूप काही सहन करतेय. ही कलाकृती माझा निचरा आहे!’’
..संवेदनशील कलावंत असलेली हेमा अखेरीस खूप चटका लावणारे वास्तव सांगून गेली!
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com
Twitter – @vinayakparab