विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
‘‘यवतमाळच्या टिपेश्वर वाइल्डलाइफ सँक्चुअरीमध्ये वाघाच्या शोधात होतो.. एकूण तीन गाडय़ा आणि त्यामध्ये बसलेले १२ जण असा सगळा जामानिमा होता. दोन गाडय़ा पुढे आणि एक मागे. मागे असलेल्या गाडीमध्ये मी होतो. पुढे गेलेल्या दोन गाडय़ांमधील सर्वानाच वाघांचे खूप छान दर्शन झाले. त्यांनी भराभर फोटोही टिपायला सुरुवात केली होती.. खूप वाईट वाटले कारण आमची गाडी खूप मागे होती आणि त्यांना जेवढे चांगले फोटो मिळत होते, तेवढे आम्हाला शक्यच नव्हते.. तेवढय़ात गाडीचा चालक व गाइड म्हणाला की, या वाघांच्या वर्तनावरून असे दिसते आहे की, ५०० मीटर्स पुढे गेल्यानंतर ते उजवीकडे वळतील. मग मी त्याला गाडी पुढे घ्यायला सांगितली. वाघ मागे सोडून आमची गाडी पुढे आली आणि उजवे वळण घेऊन आम्ही थांबलो. गाइडने सांगितलेले खरे ठरले, त्या वाघांनी तेच उजवे वळण घेतले आणि आम्ही फोटो टिपायला सुरुवात केली. त्याच वेळेस अचानक वेगवान हालचाल झाली आणि त्यातल्या एका वाघाने आक्रमक होत दुसऱ्यावर चढाई केली… आता ते दोन्ही वाघ समागमाच्या स्थितीत होते. सर्वानाच तो क्षण लक्षात राहणारा होता. जंगलात वाघ टिपता येणे यासारखा आनंद नाही. त्यातही समागम करणारी जोडी सापडली तर सोन्याहून पिवळे आणि तो क्षण कायम लक्षात राहणारा.. आम्ही सारे त्या क्षणांना सामोरे जात ते कॅमेऱ्यात बंद करत होतो. सुमारे तीनेकशे तरी फोटो टिपलेले असतील.. सर्वजण हॉटेलवर परत आले वाघांचा समागम टिपल्याच्या आनंदामध्ये. पण मला सतत काहीतरी खटकत होते. म्हणून मी फोटो पुन्हा पाहिले. माझी शंका खरी होती. ते समागमाच्या स्थितीत होते. पण तो समागम नव्हता आणि महत्त्वाचे म्हणजे दोन्ही वाघ नर होते. सोबत असलेल्या मित्रालाही हे लक्षात आणून दिले. दोघेही चाट पडलो होतो. अखेरीस प्राणीशास्त्राची अभ्यासक असलेल्या मुलीला, सलोनीला फोन लावला. ती म्हणाली, तज्ज्ञ प्राध्यापकांशी बोलून घेते. तिचा उत्तरादाखल फोन आला. त्यातून उलगडा झाला. समागमाच्या वयात येणाऱ्या नर वाघांचे हे विशिष्ट वर्तन असते. त्याला ‘माऊंटिंग बिहेविअर ऑफ अ टायगर’ असे म्हणतात. वयात आलेल्या नर वाघासाठी तो एक प्रकारचा सरावच असतो. एरवी समागम टिपता येणे ही तशी दुर्मीळ अशीच बाब. त्यातही ‘माऊंटिंग’ टिपता येणे ही अतिदुर्मीळ बाब. ते यानिमित्ताने टिपता आले, हा प्रसंग सदैव लक्षात राहणारा असाच आहे..’’ – छायाचित्रकार हेमंत सावंत सांगत होता. त्याने टिपलेल्या वाघांच्या जीवनशैलीतील अशा अनेक आगळ्या क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी रसिकांना मिळणार आहे ती येत्या २३ ते २९ नोव्हेंबर या कालखंडामध्ये मुंबईच्या जहांगीर कलादालनात! या कालावधीत हेमंतचे ‘टायगर सफारी’ हे प्रदर्शन सुरू असेल!
खोडय़ा करत आईबरोबर फिरणारे चार बछडे असे बांधवगढमध्ये टिपलेले छायाचित्रही गमतीशीर आहे. तो क्षण नेमका टिपण्यात हेमंतला यश आले. एकाच फ्रेममध्ये दोन-तीन वाघ म्हणजे खूपच. इथे तर तब्बल पाच जणांचे कुटुंबच एकत्र बागडते आहे. बांधवगडला असताना एकदा माकडांचे चीत्कार ऐकू आले. हे चीत्कार म्हणजे वाघ जवळपास आहे, याचा संकेत असतो संपूर्ण जंगलासाठी. १५-२० मिनिटांनी गाडय़ांच्या चालकांचे संकेत आले आणि वाघ जवळच असल्याचे कळले. चालकांच्या सांकेतिक भाषेत त्याला कूकी मारणे (शिट्टीसारखाच प्रकार) म्हणतात. गाडय़ा अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर एक गाडीवाला म्हणाला की, तुम्ही गाडी का हलवली? माताजी तर त्याच दिशेने नाला पार करून आताच गेली. म्हणजे तुमच्या गाडीसमोरच आली असती ती नेमकी या वेळेस.. हेमंतला वाईट वाटले. बांधवगडला हत्तीही आहेत. त्यांच्यावर स्वार होत तुम्ही व्याघ्रदर्शन अगदी जवळून घेऊ शकता. ज्या दोघांनी हत्तीच्या स्वारीसाठी त्यांना पाचारण केले होते त्यांनी हत्तीवर चढून मोक्याच्या जागा पकडल्या. ज्यांनी हत्ती मागवले होते त्यांचेच ऐकून माहूतदेखील त्यांना व्यवस्थित छायाचित्रे टिपता येतील अशा प्रकारे हत्तींना नियंत्रित करत होते. हत्तीवर बसणारी मंडळी अनेकदा एकमेकांच्या पाठीला पाठ टेकवून बसतात तोल साधण्यासाठी. पाठीमागचा छायाचित्रकार व्यवस्थित छायाचित्रे टिपत होता. पण हेमंतला काही संधी मिळत नव्हती. अखेरीस त्याने त्याच्याकडून दोन मिनिटांचा अवधी घेत, त्या सहकाऱ्याच्याच खांद्याचा ट्रायपॉडसारखा वापर करत एक फ्रेम कशीबशी टिपली.. त्यानंतर ती फ्रेम पाहण्यासाठी रिव्ह्य़ू बटन दाबले आणि त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.. पाच जणांचे बागडणारे कुटुंब हाच तो नेमका दुर्मीळ क्षण साधला गेला होता..
मुंबईत गिरगावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या हेमंत सावंतला शाळेच्याच वाटेवर असलेल्या झारापकर स्टुडिओमध्ये डोकावण्याचा छंद होता. कॅमेऱ्याचे आकर्षण अगदी तेव्हापासूनच होते. हजारीमल सोमाणी कॉलेजमध्ये बीएस्सीला असताना त्याने पहिला यशिका इलेक्ट्रो ३५ एमएम कॅमेरा घेतला. कॅमेरा हा त्यावेळेस श्रीमंतांचा छंद होता, त्या काळात लहान-मोठी घरगुती उपकरणे दुरुस्तीची कामे करून हेमंतने छायाचित्रणाच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि त्याच वर्षीच्या मल्हार कॉलेजफेस्टमध्ये त्याला छायाचित्रणाचे तिसरे पारितोषिक मिळाले. घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये वारंवार अडकावे लागल्याने मधल्या काळात हा छंद काहीसा मागे पडला. मात्र नंतर व्यवसायाच्या निमित्ताने मिनी लॅब्स, प्रिंटिंग, फोटो प्रोसेसिंग आदींमध्ये त्याने कौशल्य प्राप्त केले.
या संपूर्ण प्रवासात आयुष्यात अनेक गोष्टी आल्या आणि गेल्याही मात्र कॅमेरा नेहमीच सोबत राहिला. अगदी सुरुवातीस केवळ श्रीमंतांनाच परवडणारा कॅमेरा भाडय़ाने घेऊन हेमंतने काम केले. तर कधी कुणा मोठय़ा छायाचित्रकाराचा मदतनीस होत, त्याने कॅमेऱ्याशी दोस्ती केली. आयुष्यात विकत घेतलेल्या पहिल्या कॅमेऱ्यानेच आयुष्याला कलाटणी दिली, असे हेमंतला आजही वाटते. शब्दांशिवाय आपल्याला आवडलेल्या गोष्टी टिपत व्यक्त होण्याची ही कला त्याला प्रचंड आवडली.
त्यानंतर निमित्त ठरले ते २०११ हे वर्ष धाकटय़ा मुलीला केबी१० हा कॅमेरा हाती दिला आणि त्याचे धडे देण्यास सुरुवात केली, त्यावेळेस त्याची छायाचित्रणाची दुसरी खेळी सुरू झाली. यावेळेस मात्र विषय बदललेला होता.. लग्न-जाहिराती यांच्या चित्रणाकडून तो निसर्गाकडे वळला होता. मग लॉकडाऊनमध्ये मालवणला जाऊन तिथेच सहा महिने अडकलेल्या बाप-लेकीने पशू-पक्ष्यांशी कॅमेऱ्याच्याच माध्यमातून दोस्ती करत त्यावर एक छोटेखानी फिल्मही तयार केली आणि ती खूप व्हायरलही झाली. २०१६ साली त्याने मुलगी सलोनीसोबत जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये पहिली टायगर सफारी केली. पहिले दोन्ही दिवस वाघाचे पुसटसेही दर्शन न झाल्याने दोघेही नाराज होते पण तिसऱ्या दिवशी पहिल्या वाघिणीचे दर्शन झाले. .. ऐटदार चाल, करारी डोळे, समोरच्याची नजर खिळवून ठेवण्याची एक जबरदस्त ताकद तिच्यामध्ये होती. हेमंतला वाटतं, त्या पहिल्या भेटीतच वाघांसोबतच्या नात्याला सुरुवात झाली. नंतर एकापाठोपाठ एक करत ताडोबा, पेन्च, बांधवगड, रणथंबोर अशा व्याघ्र सफारी नित्याच्याच झाल्या. हेमंत म्हणतो, दर खेपेस वाघ नव्याने समजत गेला. त्याच्या प्रत्येक सवयींचा बारीकसारीक अभ्यासही हेमंतने केला. दरखेपेस नवीन गोष्टी कळायच्या, समजायच्या.
हेमंतच्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन म्हणजे केवळ वाघांच्या फोटोंचे प्रदर्शन नाही तर यात बरेच काही शिकण्यासारखे, समजून घेण्यासारखे आहे. अनेक छायाचित्रांच्या मागे काही कहाण्याही आहेत. वाघांची जीवनशैली समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल असे हे प्रदर्शन आहे. प्रदर्शनातील एका छायाचित्रात वाघ धुळीची अंघोळ करत असावा असे सकृतदर्शनी वाटू शकते. जवळ जाऊन त्या आडव्या लोळत पडलेल्या छायाचित्राकडे निरखून पाहिल्यानंतर लक्षात येते की, ती धूळअंघोळ नाही तर तो वाघ जमीन चाटतो आहे.. अधिक बारीक नजरेने पाहिल्यावर त्याच्या जवळ पडलेली विष्ठा दिसते. सोबत हेमंत असेल तर मग तो अधिक माहिती देतो.. रणथंबोरला टिपलेले हे छायाचित्रदेखील वाघांच्या वेगळ्या वर्तनाचाच एक वेगळा नमुना आहे. असे अनेक क्षण उलगडण्यासाठी जहांगीरला भेट द्यावी लागेल आणि हेमंतशी संवादही साधावा लागेल! हेमंतच्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन २३ ते २९ नोव्हेंबर दरम्यान जहांगीर कलादालनात सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाहता येईल.