स्वातंत्र्य हे प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आनंदासाठी मिळालेलं आहे. पण हेच स्वातंत्र्य दुसऱ्याला दु:ख, त्रास, वेदना देऊन अनुभवलं तर त्याचं समाधानही मिळत नाही आणि आनंदही. वर कायदेशीर किंवा इतर कारवायांना सामोरं जावं लागतं. स्वातंत्र्याची सोपी व्याख्या अशी करता येईल की, जी गुलामगिरी नाही ते म्हणजे स्वातंत्र्य. पण अलीकडे आपल्याकडे स्वातंत्र्याची व्याख्या बदलताना दिसतेय. आपलं स्वातंत्र्य उपभोगताना इतरांचा विचार केला जात नाही, ही वृत्ती सध्या प्रकर्षांने जाणवत आहे.
आपल्या देशाच्या राज्यघटनेत नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये सांगितली आहेत. त्यांनी काय करायला हवं, ते काय टाळू शकतात याबद्दलची माहिती त्यात आहे. तसंच मार्गदर्शक तत्त्वंही त्यात नमूद केली आहेत. पण या सगळ्याचा जो तो, त्याला हवा तसा अर्थ लावण्यात मश्गूल झाला आहे. त्यात असलेल्या अधिकारांचा पुरेपूर वापर केला जातो. कर्तव्य मात्र बंधनकारक वाटून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. या सोयीने घेतलेल्या अर्थामुळे आज सगळीकडे गोंधळ पाहायला मिळतोय. काहीही करायचं स्वातंत्र्य आहे, असं समजलं जातंय. बुद्धीचा वापर करून, तारतम्य बाळगून मिळालेल्या स्वातंत्र्याचा वापर केला तर त्याचा खरा अनुभव घेता येईल. पण आज पूर्ण विरुद्ध परिस्थिती दिसून येत आहे. आपल्याला हवं तसं बोलण्या-वागण्याचं स्वातंत्र्य आहे, असं समजलं जातं आणि तसंच आचरणातही आणलं जातं. मग त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास झाला तरी चालेल, अशी धारणा आता अनेकांची झाली आहे.
कुठेही नोकरी करताना त्या-त्या कंपनीचे नियम, अटी कोणत्याही कर्मचाऱ्याला पाळाव्याच लागतात. त्यांच्या धोरणांनुसार तुम्हाला कामाची रूपरेषा ठरवली जाते. त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार तुमच्या कामाचं स्वरूप ठरतं. जिथे काम करता त्यानुसारच वागावं लागतं, हे अगदी स्वाभाविक आहे. तसंच सरकारी नोकरीचं आहे. इथेही काही नियम, कायदे असतात. ते पाळावेच लागतात. त्यामुळे सरकारी नोकरी करणाऱ्यांचे अधिकार काम करण्याच्या वेळेमध्ये मर्यादित करून त्यांच्यावर काही बंधनं घातली जातात. पण काही वेळा वरिष्ठांपैकी काही जण चुकीच्या ऑर्डर्स देत असतात. त्यासाठी मात्र आपल्याकडे कायदा आहे की, कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कोणतीही बेकायदेशीर सूचना केली तर ती पाळणे बंधनकारक नाही. त्यामुळे इथे बेकायदेशीर काम न करण्याचं स्वातंत्र्य आहे. अशा कामाला ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार सरकारी नोकरीत असणाऱ्यांना आहे.
आपल्या आनंदासाठी दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार सभोवताली दिसतो. मग ते ट्रेनमध्ये मोबाइलवर मोठमोठय़ाने गाणी ऐकणं असो, घरात मोठय़ाने टीव्ही लावणं असो, मुद्दाम कोणाला तरी मानसिक त्रास देणं असो. या सगळ्यात एक गोष्ट अधोरेखित करता येईल. सण-समारंभांमध्ये मोठय़ाने लावला जाणारा लाऊडस्पीकर. खरं तर याची काही गरज नसते. हा लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा उत्तम उपाय असतो, असाच काहींचा समज आहे. पण ज्यांना मनापासून तिथे जायची इच्छा असते, ते योग्य वेळी तिथे जातीलच, ही गोष्ट लक्षात का येत नाही? काही सार्वजनिक ठिकाणी ठरावीक वेळी मोठय़ाने विशिष्ठ आवाज केला जातो. आवाजाने त्या सभोवतालचे लोक तिथे यावेत ही त्यामागची भावना असते. पण मुळात याची गरज काय? हा आवाज काहींना त्रासदायक ठरू शकतो, ही अत्यंत महत्त्वाची बाब दुर्लक्ष करून चालणार नाही. भारतीय राज्यघटनेने आपल्याला स्वातंत्र्य दिले आहे. त्याचा गैरवापर करण्याचा परवाना दिलेला नाही. त्यातल्या अधिकाऱ्यांचा वापर करता येतो. पण कर्तव्यांचं काय? ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपलीच आहे. स्वातंत्र्याचा आनंद घेणं हा तुमचा अधिकार आहे पण तो अनुभव घेतानाच इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे.
वाय. सी. पवार
शब्दांकन : चैताली जोशी