सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
एक वर्ष सरून नवे सुरू होण्याच्या उंबरठय़ावर उभे असताना मनात कुतूहल असणे स्वाभाविकच आहे. विशेषत: दोन वर्षे सतत साथीच्या, अनिश्चिततेच्या आणि संकटांच्या सावटाखाली वावरल्यानंतर हे कुतूहल थोडे अधिक वाढणेही स्वाभाविकच. काही तरी सकारात्मक घडावे अशी आशा घेऊन आपण सर्व जण नव्य वर्षांत पदार्पण करणार आहोत.

खरे तर आत्मविश्वासच आपला खरा मित्र असतो. सकारात्मकता खूप महत्त्वाची ठरते आणि मग एखाद्या आव्हानात्मक घटनेकडे किंवा प्रसंगाकडे पाहताना आपल्याला नव्या संधींचा शोध लागतो. या वर्षांवर २ या अंकाचा प्रभाव आहे. या अंकावर चंद्राचे प्रभुत्व असते. त्यामुळे चंद्राचा हळवेपणा, मृदुलता, भावविवशता अशा भावना अधिक प्रकर्षांने जाणवतील. घटनांना शांतपणे सामोरे जाणे हिताचे ठरेल. विशेषत: या काळात मनाचे संतुलन साधण्यात जे यशस्वी ठरतील ते आपल्या कामात सहज पुढे जातील. २०२२ या सालातल्या अंकांच्या बेरजेचा एकांक २+०+२+२  = ६ आहे. ६ या अंकाचे प्रभुत्व शुक्राकडे आहे. त्यामुळे शुक्राची मोहकता, आकर्षकता, नेटकेपणा, कलात्मक दृष्टिकोन आणि स्नेहभाव यांना महत्त्व प्राप्त होणार आहे. भावनांना योग्य वेळी आवर घालता आला आणि मनाला व विचारांना योग्य दिशा मिळाली तर या वर्षांतील आव्हाने व्यवस्थित पार पडतील.

आरोग्यसंपन्न जीवन जगणे ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु या आरोग्यसंपन्नतेत मानसिक आरोग्याचाही समावेश असतो, हे विसरून चालणार नाही. चिडचिड होणे, राग येणे, एखाद्याचा द्वेष वा मत्सर वाटणे हे जसे इतरांना त्रासदायक आहे तसेच आपल्या स्वत:च्या आरोग्यासाठीही हानीकारक आहे, हे कित्येकांना ठाऊकच नसते. उदासीनता, नैराश्य, हतबलता याची झळ त्या व्यक्तीबरोबरच त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार, शेजारी यांनाही बसते आणि म्हणूनच शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.

२०२२वर चंद्र आणि शुक्राचा प्रभाव आहे. चंद्र आणि शुक्र हे दोन्ही स्त्री ग्रह असून भावनांशी निगडित आहेत. आपले भावविश्व या दोन्ही ग्रहांवर अवलंबून असते. त्यामुळे या वर्षभरात शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपणे, भावनिक संतुलन साधणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. शारीरिक आजारांसाठी जशी औषधे घेतली जातात तसेच मानसिक त्रास, भावनिक आंदोलने यांसाठीसुद्धा समुपदेशन किंवा औषधोपचार घेणे हे स्वत:च्या आरोग्याविषयी सजग असण्याचे लक्षण आहे, हे विसरू नये.

चंद्राची चंचलता कुतूहल निर्माण करते. चंद्र नवनिर्मितीला पोषक ठरतो. तसेच शुक्राचा प्रभाव रसायनांवर आहे. औषधांच्या निर्मितीचे कार्य, संशोधन आणि त्याचा उपयोग हेही या वर्षांतले लाभ असणार आहेत. साथीच्या आजारांची तीव्रता मर्यादेत राहील. उपचार मिळतील. वैद्यकीय क्षेत्र आणि तंत्रज्ञान यांचा मेळ जुळून येईल. हे वर्ष प्रगतिकारक, आरोग्यकारक आणि सुखकारक असेल, असे सूचित होत आहे.

ज्यांचे जन्मदिनांक १, १०, १९, २८, ४, १३, २२, ३१, ९, १८, २७ आहेत त्यांनी आपापल्या कामकाजात, उद्योग-व्यवसायात सावधपणे निर्णय घ्यावेत, आर्थिक व्यवहार जपून करावेत. ज्यांचे जन्मदिनांक २, ११, २०, २९, ७, १६, २५ आहेत यांनी आपले मानसिक स्वास्थ्य जपावे. टोकाचे निर्णय टाळावेत. ज्यांचे जन्मदिनांक ३, १२, २१, ८, १७, २६ आहेत यांना राजकारणात संधी चालून येतील. प्रसिद्धीचे योग येतील.

समाजकारण, राजकारण याविषयी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. जनतेच्या दृष्टीने गुरूचे पाठबळ कामी येईल. नैसर्गिक संकटे येतील. परंतु विकसित तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यातून होणारी हानी नियंत्रणात ठेवता येईल. जागरूक राहावे लागेल. अनपेक्षित चढाई करून आपल्या सुरक्षा यंत्रणेला आव्हान दिले जाईल. काळजी करू नका. मात्र काळजी घ्या. सतर्क राहा. ग्रहयोगांची साथ मिळू शकेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नव्या वर्षांचे स्वागत नव्या जोमाने, नव्या उत्साहाने करू या !

मेष  २१ मार्च ते १९ एप्रिल

आपला जन्म २१ मार्च ते १९ एप्रिल या दरम्यान झाला असेल तर या काळावर ९ अंकाचा म्हणजे मंगळाचा प्रभाव असेल. २०२२ या वर्षांचा एकांक २+०+२+२ = ६ आहे. यावर शुक्राचा प्रभाव असेल. त्यामुळे शुक्र मंगळाचे परस्परांमधील नाते भावनिकपणे जोडले जाईल. एका कठोर व साहसी व्यक्तिमत्त्वाला हळुवार भावनेची स्नेहरेषा प्राप्त होईल. वादविवाद, प्रक्षोभन यातून अंतिम निर्णय होत नाही तर शांतपणे विचारविनिमय करून मार्ग निघतात याची पुरेपूर जाणीव होईल. वर्षभर मिळणारा शुक्राचा स्नेह मेष राशीचा उत्कर्ष करेल आणि यशाच्या दिशेने वाटचाल होईल.

जानेवारी : लाभ स्थानातील गुरू आणि दशम स्थानातील शनी आपल्या प्रयत्नांना यश देईल. आर्थिक गणितं सुटतील. प्रवास योग येतील. आपल्या कामाचे कौतुक होईल. गुरू-शुक्राच्या लाभ योगामुळे मिळालेल्या संधीचे सोने कराल. अधिकार गाजवाल. आपली कौटुंबिक जबाबदारी नेटाने पार पाडाल.

फेब्रुवारी : भाग्य स्थानातील शुक्र मंगळामुळे मेहनत आणि यश यांचे समप्रमाण आढळेल. नातीगोती हळुवार जपाल. मित्रपरिवार मदत करेल. रवी मंगळाचा लाभ योग अधिकार व मानसन्मान देईल. कौटुंबिक समस्या सोडवाल. कामकाजाला वेग येईल. सहकारी वर्गाशी केलेल्या चर्चा फलदायी ठरतील.

मार्च : आपल्या राशीत राहू पदार्पण करणार आहे. कोणतेही काम करताना नियम , अटी तपासून घ्याव्यात. व्ययस्थानातील रवी मनस्ताप वाढवेल. लाभातील गुरूचा मात्र आधार मिळेल. अडचणीतून मार्ग निघेल. विचारांतीच निर्णय घ्यावा. कामकाजात लक्ष द्या. भावनांना आळा घालावा लागेल. नियम पाळावेत.

एप्रिल : लाभस्थानातील गुरू मंगळ आपणास नवी िहमत देईल. राहूसह बुध भ्रमण करत असल्याने कायद्याची कामे वेग घेतील. दशमातील शनीदेखील साहाय्यकारी ठरेल. जोडीदारासह चर्चा रंगातील. नाते दृढ होईल. राहूसह रवीचे भ्रमण काही अंशी संघर्षमय ठरेल. शब्दांवर ताबा ठेवावा लागेल. धीर सोडू नका.

मे : लाभ स्थानातील शनी आणि मंगळ या बलाढय़ ग्रहांमुळे विशेष िहमत मिळेल. कामाला गती येईल. व्ययातील उच्च राशीतील शुक्र मनपसंत गोष्टी करण्यास उद्युक्त करेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. नवा व्यवहार डोळसपणे कराल. नातेवाईकांच्या भेटी होतील. सरकारी नियमांचे पालन करणे अनिवार्य ठरेल.

जून : व्ययस्थानातील गुरू व्यावहारिक-दृष्टय़ा पूरक नसला तरी मनोबल वाढवणारा आहे. आध्यात्मिक प्रगती कराल. आत्मपरीक्षण कराल. लाभ स्थानातील शनी कष्टाचे चीज करेल. हर्षलसह मंगळ शुक्र यांचे भ्रमण प्रलोभनांना भुलण्याची शक्यता सूचित करते. आपल्या मित्रपरिवारात मर्यादा ओळखून वागावे.

जुलै : आपल्या राशीतील मंगळ, हर्षल आणि राहू यांचे भ्रमण आपणास अस्वस्थ करेल. निर्णय घेताना मन:स्थिती द्विधा होईल. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. पराक्रम स्थानातील बुध आत्मविश्वास आणि वाक्चातुर्य देईल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी शब्द जपून वापरा. ज्येष्ठ मंडळींच्या अनुभवातून शिकायला मिळेल.

 ऑगस्ट : रवीचे चतुर्थातील भ्रमण घरासंबंधित कामाला गतिमान करेल. रवी गुरूचा नवपंचम योग अडचणीतून मार्ग दाखवेल. धनस्थानातील मंगळ खर्चाचे प्रमाण वाढवेल. कामाच्या व्यापामुळे दमणूक अधिक होईल. आजूबाजूच्या घडामोडींमुळे अस्वस्थता वाढेल. डोकं शांत ठेवा. काही गोष्टी आपल्या नियंत्रणापलीकडच्या असतात.

सप्टेंबर : षष्ठ स्थानातील बुध आणि शुक्राचे भ्रमण हितशत्रूंवर मात करण्यास साहाय्यकारी ठरेल. आपल्या मर्यादेचे पालन करून नेमके शब्द वापराल. कौटुंबिक वातावरण उत्साही असेल. कामाचा मोबदला हक्काने मिळवावा लागेल. परदेशगमनाचे योग येतील. संधी सोडू नका. जबाबदारी नेटाने पार पाडाल.

ऑक्टोबर : तृतीयातील शत्रू राशीचा मंगळ आपणास वादविवादासाठी उद्युक्त करेल. हीच खरी परीक्षा समजा. संयम राखा. नवे करार करताना बारकाईने सर्व मुद्दे तपासून पाहावेत. बेजबाबदारपणा महागात पडेल. कौटुंबिक समस्या सोडवताना इतरांच्या मतांचा विचार कराल. सर्वाना जे रुचेल तेच कराल. तडजोड करावी लागेल.

नोव्हेंबर : रवीचे अष्टम स्थानातील भ्रमण तब्येतीच्या तक्रारी निर्माण करेल. रवी नेपच्यूनचा केंद्र योग हा मानसिक चंचलता वाढवेल. मनाप्रमाणे गोष्टी न घडल्यास चिडचिड होईल. गुरुचे अल्प साहाय्य कामी येईल. न समजलेल्या गोष्टी नीट समजून घेणे आवश्यक! निर्णय घेताना घाई नको! प्रिय व्यक्तींनाही परिणाम भोगावे लागतील.

डिसेंबर : व्दितीय स्थानातील वक्री मंगळाला व्यय स्थानातील गुरूची साथ मिळेल. तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग कराल. कौटुंबिक कारणांसाठी खर्चाचे प्रमाण वाढेल. फार लोभ बरा नाही हे ध्यानात असू द्यावे. नोकरी व्यवसायात मेहनतीला अपेक्षित असे फळ मिळाले नाही तरी नाराज होऊ नका. अन्यायाविरुद्ध लढाल.

वृषभ  २० एप्रिल ते २० मे

आपला जन्म २० एप्रिल ते २० मे या दरम्यान असेल तर त्या काळावर ६ अंकाचा म्हणजे शुक्राचा अंमल असतो. यंदाच्या वर्षांची बेरीजही २+०+२+२ = ६ येते. त्यामुळे शुक्रकृपा सहवास आपणास उत्तम लाभणार आहे. २०२२ या अंकात २ चे अस्तित्व ३ वेळा आढळते. त्यामुळे मानसिक स्थिती सांभाळून योग्य निर्णय घ्यावा. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यात वावरताना भावनेचा अतिरेक होऊ देऊ नका. नोकरी व्यवसायात आपले वर्चस्व राहील. कलाकारांना हे वर्ष विशेष लाभदायक ठरेल. शुक्राच्या स्नेहाला कलात्मकतेची आणि व्यवहार सांभाळण्याची जोड मिळाली तर आपल्या राशीचा उत्कर्ष आलेख वरवर जाईल.

जानेवारी : सप्तमातील स्वगृहीचा मंगळ आणि नवमातील स्वगृहीचा शनी यांच्या शुभयोगामुळे कामातील उत्साह वाढेल. मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड मिळेल. नातीगोती जपाल. महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक घ्याल. छंद जोपासाल. त्यामुळे ताणतणाव कमी करता येईल.

फेब्रुवारी : दशमातील रवी आपल्यातील नेतृत्वकलेला पोषक आणि पूरक ठरेल. रवीसह नेपच्यून आणि गुरूच्या अस्तित्वामुळे गरजवंताला उत्स्फूर्तपणे मदत कराल. सामाजिक कार्यात रस वाढेल. भाग्य स्थानातील उच्चीचा मंगळ नवी िहमत देईल. नवा संकल्प अमलात आणण्यास मित्र मदत करतील.

मार्च : भाग्यातील मंगळ शुक्र कला आणि क्रीडा क्षेत्रात वाव देतील. नोकरी व्यवसायात वाक्चातुर्य कामी येईल. कौटुंबिक स्नेहसंमेलनात, शुभ कार्यात नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जिव्हाळय़ाच्या विषयातील उत्तरे सकारात्मक मिळतील. आशावादी राहाल. उत्साह वाढेल.          

एप्रिल : व्ययस्थानातील रवी राहूचे भ्रमण मानसिक स्थिती बिघडवेल. परंतु भावनेच्या आहारी न जाता नवमातील शनी सावरून घेईल. गुरू, शुक्र, मंगळ यांचे दशमातील भ्रमण नोकरी व्यवसायात प्रगतिकरक ठरेल. कौटुंबिक मतभेद फार काळ टिकणार नाहीत. चर्चेने प्रश्न सोडवण्यास मदत होईल.

मे : लाभ स्थानात गुरुचा राशीप्रवेश आणि उच्चीचा शुक्र यांच्या शुभ योगामुळे मेहनत आणि जिद्द फळास येईल. मित्रमंडळींची साथ मिळेल. नोकरी व्यवसायात भरभराट होईल. आपल्यापाशी असलेल्या चौफेर दृष्टीचा उपयोग कराल. नव्या संधी उपलब्ध होतील. अशा संधीचे सोने कराल. वरिष्ठांचा मान राखाल.

जून : राशी स्वामी शुक्र आपल्या राशीत प्रवेश करेल. रवी बुधाचे साहचर्य नोकरी व्यवसायास चालना देईल. दशमातील शनी नेपच्यून भावनांचा उद्रेक होऊ देणार नाही. व्ययस्थानातील राहू शुक्रासह मंगळ असेल. त्यामुळे प्रलोभनांना बळी पडू नका. संयम फार गरजेचा आहे. कायद्याचे उल्लंघन नको.

जुलै : भाग्य स्थानात शनी वक्री गतीने प्रवेश करेल. कामे लांबणीवर पडतील. परंतु सातत्य सोडू नका. द्वितीय स्थानातील बुध वाक्चातुर्य आणि सादरीकरण यांच्या दृष्टीने बलवान ठरेल. मंगळही याला साहाय्यकारी ठरेल. वागणे बोलणे उठून दिसेल. महत्वाच्या मुद्दय़ांवर जोर दिल्याने सभा गाजवाल.

ऑगस्ट : रवी नेपच्यूनचा समसप्तम योग, पराक्रम स्थानातील रवी शुक्र आणि लाभ स्थानातील गुरू यांच्यातील शुभ योग कलात्मकतेला दुजोरा देईल. सादरीकरण, संवाद चांगले रंगतील. नातीगोती सांभाळाल. उत्साह वाढेल. अनपेक्षित संधी चालून येतील. अशा सुवर्ण संधीला योग्य न्याय द्याल.

सप्टेंबर : व्यय स्थानातील राहू हर्षल मनाविरुद्ध घटना घडवेल. पण रवी गुरूचा शुभ योग आपला समतोल राखेल. चतुर्थातील शुक्राचा अंमल स्नेहसंबंधाशी निगडित असेल. वादविवाद संपुष्टात येतील. नवे विचार, नव्या योजना यशकारक ठरतील. समाजोपयोगी कार्यात सहभागी झाल्याने उत्साह वाढेल.

ऑक्टोबर : पंचमातील स्वगृहीचा शुक्र आणि त्याच्यासह भ्रमण करणारा बुध आपल्या कलात्मक दृष्टीला व्यावहारीकतेची पुष्टी देईल. आर्थिक बाजू सावरली जाईल. तृतीय स्थानातील मंगळाचा स्पष्टवक्तेपणा वागण्या-बोलण्यात दिसून येईल. परंतु कोणाचे मन दुखावले जाईल असे बोलणे टाळा.

नोव्हेंबर : रवी-नेपच्यूनचा शुभ योग स्फूर्तिदायक घटना घडवेल. नव्या संधी उपलब्ध होतील. लाभ स्थानातील गुरुचे पाठबळ नोकरीबदलास पूरक ठरेल. सहकारी वर्गाकडून मदतीसाठी विचारणा होईल. व्यावसायिक संबंध टिकवून ठेवाल. नात्यांचे मोल आपण जाणताच. त्यामुळे माणुसकी जपली जाईल.

डिसेंबर : अष्टमातील रवी, शुक्र, बुध मनाची चंचलता वाढवतील. वाहनाच्या वेगावर ताबा ठेवणे महत्त्वाचे! व्ययस्थानातील राहू, हर्षल बऱ्या-वाईटाची पारख करण्यास सावध ठेवेल. नोकरी व्यवसायात अधिकार योग येतील. कायद्याची कामे होतील. सरकारी कामांमध्ये येणारे अडथळे दूर कराल.

मिथुन  २१ मे ते २० जून

आपला जन्म २१ मे ते २० जून या दरम्यान झाला असेल तर या काळावर ५ या अंकाचा म्हणजे बुधाचा प्रभाव असेल. या वर्षीच्या २०२२ या अंकाची एकांकी बेरीज ६ आहे. ६ या अंकावर शुक्राचा प्रभाव असल्यामुळे शुक्र-बुधाचे नाते विकसित होण्यास मदत होणार आहे. आपल्या बुद्धिमत्तेला कलात्मक दृष्टिकोनाची जोड मिळेल. फक्त व्यवहार आणि नफा-तोटा यांचा विचार न करता भावनिक गुंतवणूकही होणार आहे. बुद्धिवाद आणि युक्तिवाद यांच्यासह नातेसंबंधातील दृढता वाढीस लागणार आहे. शुक्राचा स्नेह आणि भावनिक बंध यांमुळे बुधाच्या खेळकर, उत्साही स्वभावाला या वर्षभरात चांगली साथ मिळेल.

जानेवारी : सप्तमातील रवी आपल्याला उत्साह देईल. नव्या कामातील बऱ्याच गोष्टी बारकाव्यांसह शिकून घ्याल. भाग्य स्थानातील गुरू आणि नेपच्यून उत्स्फूर्तता देईल. वाकचातुर्याचा योग्य उपयोग कराल. नातेसंबंधात भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. संयम राखा. नियम पाळा.

फेब्रुवारी : आरोग्यदायक रवीचे अष्टम स्थानातील भ्रमण तब्येतीच्या तक्रारी निर्माण करेल. रवीसह शनीचे सान्निध्य असल्याने सर्दी पडसे आणि सांधेदुखी बळावेल. ध्येय गाठण्यासाठी आगेकूच कराल. स्नेहसंबंध दृढ होतील. सामाजिक कार्य कराल. त्यातून मानसिक समाधान मिळेल. ओळखी वाढतील.

मार्च : भाग्य स्थानातील गुरूसह बुधाचे भ्रमण ज्ञानार्जनासाठी अतिशय लाभदायक ठरेल. शिक्षण, प्रशिक्षण घेऊन पुढील मार्गक्रमणा कराल. अष्टमातील शनी आणि मंगळाचा प्रभाव आपल्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. काळजी घ्यावी. पडणे, मार लागणे असे घडेल. हाडांची काळजी घ्यावी.

एप्रिल : व्ययस्थानातील रवी राहुचा योग अनपेक्षित प्रश्न उभे करेल. अशा वेळी गुरुची दृष्टी साहाय्यकारी होईल. प्रश्नांची उकल सापडेल. नोकरी व्यवसायात अधिक मेहनत घेतलीत तर यश आपलेच असेल. कुटुंबात उत्तम संवाद साधाल. सर्वाची मने जिंकाल. हुरूप वाढेल.

मे : दशम स्थानातील स्वगृहीचा गुरू आणि उच्चीचा शुक्र म्हणजे प्रगतीची आणि यशाची हमी! विचारांची धरसोड टाळल्यास विजय आपलाच आहे. शनीने नवम स्थानात प्रवेश केला आहे. कायदा, उच्चशिक्षण, परदेशगमन यात यश मिळेल. मेहनत आणि सातत्य यांचे हे फळ आहे.

जून : लाभ स्थानातील राहू, हर्षल आणि शुक्राच्या योगामुळे अनेक प्रलोभने मति गुंग करण्याचा प्रयत्न करतील. भावनांवर विचारांचे नियंत्रण ठेवणे आवश्यक भासेल. नोकरी व्यवसायात मेहनतीचे समाधान मिळेल. गुरुचे पाठबळ लाभेल. त्यामुळे वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांच्यातील संबंध दृढ होतील.

जुलै : लाभ स्थानातील स्वगृहीचा मंगळ आणि मिथुन राशीतील स्वगृहीचा बुध यांच्यातील शुभ योग आपली धडाडी वाढवेल. सादरीकरण प्रभावी ठरेल. मुद्देसूद संभाषण इतरांना आवडेल. शनीचा अष्टमातील मकर राशीत प्रवेश मानसिक अस्वस्थता दाखवतो. अशा स्थितीत कोणताही निर्णय घेणे उचित नाही.

ऑगस्ट : पराक्रम स्थानातील सिंहेचा रवी जबाबदाऱ्या सहज पेलेल. नवी आव्हाने स्वीकाराल. नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास योग येतील. शिक्षणात प्रगती कराल. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासह सामाजिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल. गरजवतांना मदत केल्याने मानसिक समाधान मिळेल.

सप्टेंबर : व्ययस्थानातील मंगळ खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा इशारा देईल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवण्यात आपला मोठा वाटा असेल. आपण नात्यांची किंमत जाणता. तडजोडीतून पेचप्रसंग सुटतील. शाब्दिक चकमकी टाळा. ज्येष्ठांचा मान ठेवाल. संस्कारांचे महत्त्व पटेल.

 ऑक्टोबर : चतुर्थातील बुध, शुक्र कला आणि छंद जोपासण्यास पूरक वातावरण निर्माण करतील. कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी आणि मित्रमंडळींची साथ मनाला उभारी देईल. कटू आठवणी प्रकर्षांने टाळा. भूतकाळ बदलणे आपल्या हाती नाही.

नोव्हेंबर : रवी नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे मनाजोगत्या घटना जुळून येतील. हितशत्रूंचा त्रास कमी होईल. त्वचेची काळजी घ्यावी. शुष्कता आणि उष्णताही वाढेल. नव्या योजनेत पैसे गुंतवताना पूर्ण विचार आणि चौकशीअंतीच निर्णय घ्यावा. आर्थिक व्यवहार जपून करा. कागदपत्रे तपासून घ्यावीत.

डिसेंबर : रवी हर्षलचा नवपंचम योग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मानाचा झेंडा फडकवेल. आपल्या चिकित्सक बुद्धीने महत्वाचे कार्य जबाबदारीने पूर्ण कराल. व्यवहारचातुर्य चांगले सांभाळाल. गुरू मंगळाचा लाभ योग परदेशवारीची वार्ता देईल. मनापासून आणि चोखपणे काम कराल.

कर्क  २१ जून ते २० जुलै

आपला जन्म २१ जून ते २० जुलै या दरम्यान झाला असेल तर या काळावर २ या अंकाचा म्हणजेच चंद्राचा प्रभाव असेल. या वर्षांच्या अंकाची बेरीज २+०+२+२ = ६ आहे. यावर शुक्राचा प्रभाव असेल. मनाचा कारक चंद्र आणि कलेचा, स्नेहाचा कारक शुक्र यांच्या समन्वयातून यंदा आपणास लाभदायक फळ मिळेल. भावनांवर विचारांचे नियंत्रण मात्र ठेवावेच लागेल. मानसिक स्थिती दोलायमान होऊ न देता मनोनिग्रह महत्त्वाची भूमिका बजावेल. २०२२ यात २ या अंकाचे अस्तित्व ३ वेळा आल्याने या वर्षांत चंद्राचे बळ प्रामुख्याने आढळेल.

जानेवारी : गुरूचे पाठबळ नसले तरी भावनेच्या आहारी न जाता तडकाफडकी निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. सबुरीने घ्यावे. सप्तमातील शनी आणि बुध ही जबाबदारी पेलतील. शनीची शिस्त आणि बुधाचे बुद्धीचातुर्य यांच्या साहाय्याने मार्ग निघेल. जे कराल ते सर्वाच्या हिताचेच असेल. सारासार विचार कराल.

फेब्रुवारी : लाभ स्थानातील बलवान राहू परीक्षेच्या प्रसंगाचा सामना करण्याची िहमत देईल. महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला उपयोगी ठरेल. आरोप-प्रत्यारोपापासून दूर राहावे. मैत्री व प्रेमात वाहवत जाऊ नका. परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणे महत्वाचे ठरेल.

मार्च : दशमातील हर्षलासह राहू मेष राशीत प्रवेश करेल. कामातील आव्हाने जबाबदारीने पेलावी लागतील. सप्तमातील स्वगृहीचा शनी आणि उच्चीचा मंगळ आपणास कर्तृत्व फुलवण्याचे बळ देईल. शुक्राची कला हळुवार जोपासाल. कौटुंबिक जबाबदारी पेलताना कर्तृत्व आणि स्नेहभाव यांची गरज भासेल.

एप्रिल : दशमातील राहूसह रवीचे भ्रमण कामकाजात अडथळे निर्माण करेल. गुरू भाग्य स्थानात प्रवेश करून साहाय्यकारी ठरेल. नातेवाईक आपल्या हळवेपणाचा लाभ घेऊ पाहतील पण हिमतीने पुढे जा. कामकाजात लक्ष केंद्रित केल्याने यश मिळवाल. कौटुंबिक पाठबळ मिळाल्याने उत्साहात भर पडेल.

मे : गुरू बुधाच्या लाभ योगाचा विशेष फायदा होईल. व्यावहारिक चातुर्य आणि शैक्षणिक ज्ञान यांचा योग्य उपयोग करून नोकरी व्यवसायात आगेकूच कराल. दशमातील रवीसह राहूचे भ्रमण अडचणी निर्माण करेल. पण धीर सोडू नका. सत्याची वाट धरलीत तर भिण्याचे कारण काय?

जून : लाभ स्थानातील रवी, बुध आणि नंतर प्रवेश करणारा शुक्र आशेचे किरण घेऊन येईल. न पेलणारी आश्वासने कोणालाही देऊ नका. महत्त्वाकांक्षेचा पाठपुरावा करावा. संधी शोधून नवीन कामाचे मार्ग आखाल. गुरू मंगळाची साथ मिळेल. गुरुच्या ज्ञानाला मंगळाच्या उत्साहाची जोड मिळेल.

जुलै : शनीचा वक्र गतीने सप्तमातील प्रवेश महत्त्वपूर्ण ठरेल. अविरतपणे मेहनत घेऊनही कामे लांबणीवर पडतील. व्यय स्थानातील बुध, शुक्र यांमुळे आकस्मिक खर्च पुढे येतील. गुरूच्या पाठबळाने आत्मविश्वासपूर्वक निर्णय घेण्यास मदत होईल. हिमतीची दाद मिळेल आणि कष्टाचे चीज होईल.

ऑगस्ट : शनी, मंगळाचा नवपंचम योग मेहनतीची तयारी दाखवेल. अपेक्षित यश प्राप्त कराल. धनस्थानातील रवी, बुध आर्थिक उलाढालीसाठी मार्गदर्शक ठरतील. वादविवादाला पूर्णविराम देऊन आपल्या शक्तीची आणि वेळेचीही बचत कराल. कला क्षेत्रात लाभ होईल. कलेतून मिळणारा आनंद हा निखळ आनंद असेल.

सप्टेंबर : द्वितीय स्थानातील शुक्राचा आपल्या बोलण्यावर विशेष प्रभाव असेल. स्नेहसंबंध दृढ होण्यास मदत होईल. परंतु भावनांचा अतिरेक होऊ देऊ नका. वेळेचे भान ठेवा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक कराल. सुजाण नागरिकाचे कर्तव्य पार पाडाल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. समाजाचे ऋण फेडाल.

ऑक्टोबर : व्ययस्थानातील मंगळ शब्दाने शब्द वाढवण्याचा प्रयत्न करेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. शुक्र, बुध आणि रवीचे तृतीय स्थानातील भ्रमण प्रवास योग देईल. आत्मविश्वास वाढेल. कलेच्या क्षेत्रातील कामे गतिमान होतील. भावंडांच्या गाठीभेटींचे आयोजन कराल. मन भूतकाळात रमेल. भावना उचंबळून येतील.

नोव्हेंबर : शुक्र, नेपच्यूनचा शुभ योग भावनांचा समतोल राखण्यास मदत करेल. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यासह विचारपूर्वक वागणे बोलणे ठेवल्यास आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जाणार नाही. आर्थिक व्यवहार जपून करावेत. कागदपत्रे पडताळा. तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक!

डिसेंबर : षष्ठातील रवी, बुध आणि शुक्र गैरसमज पसरवतील. गुरू, मंगळाचा पािठबा मिळाल्याने त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. पोटाचे विकार आणि त्वचा यांची काळजी घ्यावी. गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन कराल. भावना आणि विचारांमध्ये समतोल राखाल. दिलेला शब्द पाळाल. सचोटीने वागाल.

सिंह  २१ जुलै ते २० ऑगस्ट

आपला जन्म २१ जुलै ते २० ऑगस्टच्या दरम्यान झाला असेल तर आपल्यावर रवीचा प्रभाव असणार आहे. म्हणजेच १ या अंकाचे प्रभुत्व असेल. तर या वर्षांच्या २०२२ = २+०+२+२ = ६ या शुक्राच्या अंकाचाही अंमल वर्षभर असणार आहे. रवी आणि शुक्र यांच्या अंमलाखाली सिंह राशीच्या व्यक्ती येणार आहेत. रवीचे नेतृत्व, करारी स्वभाव, साहस, धैर्य या वैशिष्टय़ांसह शुक्राचे स्नेह, कलात्मकता आणि हळुवारपणा, आकर्षकता यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे नातेसंबंध दृढ होतील. मेहनतीने आपले गुणवर्धन केलेत तर यशाच्या दिशेने वाटचाल कराल.

जानेवारी : पंचम स्थानातील रवी आणि मंगळाचे भ्रमण उत्साहवर्धक घटनांचा संकेत देतील. रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. गुरू नेपच्यूनच्या साहाय्याने नोकरी व्यवसायात उत्तम कामगिरी पार पाडाल. तंत्रज्ञान आणि क्रीडाक्षेत्रात उत्कर्ष होईल. स्मरणशक्ती वाढवावी आणि लक्ष केंद्रित करावे.

फेब्रुवारी : षष्ठातील बुधाचा हितशत्रूंवर चांगला प्रभाव पडेल. त्यांची कुरघोडी, कारस्थाने उघडकीस आणाल. कायद्याची चौकट ओलांडू नका. कौटुंबिक जबाबदाऱ्या जोडीदाराच्या साथीने पार पडतील. मित्रमंडळींसह नातीगोती दृढ होतील. आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवाल. आनंदी रहाल.

मार्च : बुध, गुरू आणि नेपच्यूनचा योग बौद्धिक क्षेत्रात विकासाचा मार्ग दाखवेल. नेतृत्वाची उत्तम चुणूक दाखवता येईल. षष्ठ स्थानातील उच्चीचा मंगळ अधिकाराचा कारक ठरेल. बलवान राहूची साथ उल्लेखनीय असेल. वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवाल. नोकरी व्यवसायात स्वीकारलेली जबाबदारी पेलून दाखवाल.

एप्रिल : भाग्य स्थानातील रवी, राहू आणि बुध यांच्या प्रभावामुळे सरकारी कायद्यासंबंधित कामांमध्ये अडचणी आल्या तरी त्यांची उकल सापडेल. भावनेच्या भरात निर्णय न घेता सबुरीचा लाभ होणार आहे. मित्रमंडळींकडून मदत मिळेल. माणुसकीच्या नात्याची किंमत ओळखून वागाल.

मे : गुरूचा त्याच्या स्वराशीत प्रवेश आणि उच्चीचा शुक्र यांच्या अमलाखाली कामकाजातील अडथळे, अडचणी दूर करण्यास मदत होईल. कामानिमित्त प्रवास कराल. कामाच्या धावपळीत आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या नियोजनाचे कौतुक होईल. मोठी झेप घेताना असे नियोजन उपयोगी पडेल.

जून : दशमातील रवीचे भ्रमण कामकाजाच्या बाबतीत उपयुक्त ठरेल. त्याला शुक्राची जोड मिळाल्याने कर्तव्य आणि भावना यांच्यात समतोल राखणे सोपे होणार आहे. भाग्य स्थानातील मंगळ धैर्य देईल. कौटुंबिक जबाबदारी धीराने पार पाडाल. एकमेकांच्या बरोबरीने उभे राहिल्याने आधार मिळेल.

जुलै : शनीने वक्र गतीने षष्ठ स्थानात प्रवेश केला आहे. अडचणी, आजार यांमुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. कामकाजाचे नियोजन करून ठेवले तर नुकसान टळेल. नातेवाईक, मित्रपरिवार यांची साथ चांगली मिळेल. स्वत:साठी वेळ राखून ठेवाल. ताण तणाव कमी करण्यासाठी आपले छंद जोपासाल.

ऑगस्ट : राशीचा स्वामी रवी आपल्या राशीत प्रवेश करेल आणि योजलेली अनेक कामे मार्गी लागतील. नव्या जबाबदाऱ्या स्वबळावर पार पाडाल. जोखमीची कामे पूर्ण करताना शतावधानी असावे लागेल. तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीची क्षमता यांचा उत्तम मेळ जमेल. बौद्धिक क्षेत्रात काम करताना विशेष समाधान वाटेल.

सप्टेंबर : धन स्थानातील बुध आर्थिक प्रश्न सोडवेल. वाक्चातुर्य दाखवाल, विचारांचे सादरीकरण चांगले कराल. नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्या भेटीगाठी झाल्याने कामाचा ताण कमी होईल. समाजोपयोगी कला आणि छंद यांत मन आनंदी ठेवाल. इतरांसाठी काही तरी करणे हे तर आपले स्वप्न आहे.

ऑक्टोबर : रवी, बुध आणि शुक्राचा प्रभाव आपल्या कुटुंबावर दिसेल. स्नेहसंबंध दृढ होतील. आपुलकी वाढेल. नोकरी व्यवसायात हिमतीने पुढील आव्हान स्वीकाराल आणि त्याची पूर्तताही कराल. वादाचे मुद्दे चर्चेने मिटवणे गरजेचे ठरेल. शब्दाने शब्द वाढवू नये. दुसऱ्याचे ऐकून घेता आले पाहिजे.

नोव्हेंबर : पराक्रम स्थानात बलवान शुक्र नवे करार करण्यात साहाय्य करेल. नोकरीत बदल मात्र जोखीम ठरेल. बुध आणि राहूचा पािठबा मिळाल्याने कायदेशीर कारवाईला वेग येईल. सांधे, मणका यांची काळजी घ्यावी लागेल. कामाची धावपळ वाढेल. वेळेवर विश्रांती घेणे हा उत्तम उपाय ठरेल.

डिसेंबर : दशम स्थानातील वक्री मंगळाचा आपल्या कामावर प्रभाव पडेल. शंका- कुशंका दूर केल्या तरच पुढचा मार्ग सुकर होईल. पंचम स्थानातील बुध शुक्र नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचे सोने कराल. प्रशिक्षणाचा लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांच्या इच्छा पूर्ण कराल.

कन्या  २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर

आपला जन्म २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या काळातील असेल, तर आपल्यावर बुधाचा प्रभाव असणार आहे. बुधाचा अंक ५ आहे. यंदाच्या वर्षांची एकांकी बेरीज २+०+२+२ = ६ आहे. ६ हा शुक्राचा अंक असल्याने या वर्षांवर शुक्राचा प्रभाव असेल. बुधाची बौद्धिक पातळी आणि शुक्राची मानसिक, भावनिक पातळी यांचा समतोल साधणारे हे वर्ष असणार आहे. व्यावहारिक दृष्टिकोनाला कल्पकतेची आणि ममतेची जोड मिळणार आहे. परीक्षांमधून सहीसलामत बाहेर पडत, अनुभवाची शिदोरी अधिकाधिक संपन्न होईल. स्नेहसंबंध जपाल. एकंदर उन्नती होईल.

जानेवारी : चतुर्थ स्थानातील रवी, मंगळ आणि शुक्राचे साहचर्य स्थावर मालमत्तेबाबतचे काम गतिमान करण्यास मदत करेल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्याचे सामथ्र्य दाखवाल. नातेवाईक मंडळींशी बोलताना भावना आवराव्या लागतील. व्यवहार सांभाळावे लागतील. नोकरी-व्यवसायातील अनुभवांतून खूप काही शिकाल.

फेब्रुवारी : पंचम स्थानातील उच्चीचा मंगळ आणि स्वत:च्या राशीचा शनी यांच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती साधाल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेष प्रगती कराल. भाग्य स्थानातील बलवान राहू नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची बाजी मारेल. अधिकाराचा योग्य उपयोग कराल. नातेसंबंध जपाल.

मार्च : अष्टम स्थानात राहूचा प्रवेश झाल्याने कोणतेही काम हाती घेताना त्याच्या नियमावलीविषयी विशेष सतर्कता बाळगावी. फसगत होऊ देऊ नका. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागेल. पंचम स्थानातील शुक्र स्नेहसंबंध प्रस्थापित करेल. भावना व्यक्त करताना शब्द जपून वापरावे लागतील.

एप्रिल : षष्ठ स्थानातील गुरू, मंगळ आणि शुक्र यांचा नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम लाभ होईल. योजलेल्या कामांमध्ये यश मिळेल. करार लाभदायक ठरतील. नवी नाती जुळतील. काहीशा तडजोडीतून पेचप्रसंग सुटतील. मिळते जुळते घेण्याची वृत्ती उपयुक्त ठरेल.

मे : सप्तम स्थानात गुरूचा मीन राशीतील प्रवेश विवाहोत्सुक मंडळींसाठी आशादायक ठरेल. तसेच उच्चीचा शुक्र स्नेह, ममता आणि नात्यांची जोपासना करण्यात साहाय्यभूत ठरणार आहे. संवाद वाढल्याने गैरसमज दूर होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. या निर्णयांवर पुढच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.

जून : रवी गुरूचा लाभ योग उत्साह आणि उत्सुकता वाढवणारा आहे. मोठय़ांच्या ओळखी होतील. व्यावहारिक ज्ञान आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर नोकरी व्यवसायात उच्च पदाचा मान मिळवाल. मित्रपरिवाराकडून भावनिक आधार मिळेल. मैत्री म्हणजे आपली श्रीमंती आहे याची जाणीव होईल.

जुलै : पंचम स्थानात शनीचा वक्र गतीने प्रवेश होणार आहे. रखडलेली कामे आणखी लांबणीवर जातील. धीर आणि संयम राखणे गरजेचे ठरेल. रवी, बुधाच्या साथीने प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास फळास येईल. स्नेहपूर्ण नातेसंबंध केवळ कठोर शब्दांनी मोडू नका. शब्द दुधारी असतात. नेहमी जपून वापरावेत.

ऑगस्ट : व्यय स्थानातील बुध आपल्या हट्टापायी अतिरिक्त खर्च वाढवण्याची शक्यता आहे. यावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक बाजू सांभाळणे महत्त्वाचे! मंगळाचा कल अन्यायाविरुद्ध लढण्याकडे असेल. वाद न घालता संवाद साधता येणार असेल तिथे जरूर संवाद साधावा. ममतेने खूप काही जिंकू शकाल.

सप्टेंबर : आपल्या भावविश्वावर व्यय स्थानातील शुक्राचा अंमल असणार आहे. भावनिक चढउतार आल्यास खंबीरपणे तोंड द्यावे. खचून जाऊ नका. रवी बुधाच्या साथीने आप्त मंडळी पाठीशी उभी राहतील. नोकरी-व्यवसायात बढती मिळेल. कष्टाचे चीज होणे कठीण असले तरी अशक्य नाही.

ऑक्टोबर : दशम स्थानात मंगळाचा प्रवेश होईल. नोकरी व्यवसायात कर्तृत्वाला योग्य वाव मिळेल. आर्थिक गणिते सुटतील. नातेसंबंधातील स्नेह जपाल. गुरूचा पाठिंबा मिळाल्याने कामातील यश उल्लेखनीय असेल. ताणतणाव कमी होईल. अनोळखी व्यक्तींपासून सावधान! काळजी करत बसू नका. त्यापेक्षा योग्य ती काळजी घ्या.

नोव्हेंबर : धनस्थानातील शुक्र कौटुंबिक सुख देईल. तसेच आर्थिक व्यवहार आणि नियोजन उत्तम प्रकारे कराल. नवे विचार आणि संकल्पना यांना अधिकारी वर्गाकडून मान्यता मिळेल. सुख दु:खाचे क्षण मित्रमंडळींसह घालवाल. त्यांना धीर द्याल. ममता, आपुलकी आणि स्नेहभाव यात प्रचंड ताकद असते.

 डिसेंबर : वर्षअखेरीस कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. बुध-शुक्राची साथ मिळाल्याने आपली बुद्धिमत्ता आणि भावनिकता यांचा सामाजिक कार्यात सदुपयोग कराल. इतरांच्या सुखात आपणास सुख लाभेल. शनीचे साहाय्य असल्याने मेहनत आणि यश यांचे समप्रमाण राहील. सचोटीने स्वत:ला सिद्ध करून दाखवाल.

तूळ  २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर

आपला जन्म २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या काळातील असेल तर आपल्यावर शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. यंदाच्या वर्षांच्या अंकांची बेरीज ६असल्याने आपणावर शुक्राचा दुहेरी प्रभाव असणार आहे. शुक्र कलेचा, भावनांचा, स्नेहाचा, विरुद्ध िलगी मित्र परिवार यांचा कारक ग्रह असल्याने भावनांचा आवेग सांभाळा असा संदेश देत हे वर्ष आले आहे. उन्माद, राग वा नैराश्य अशा टोकाच्या भावनांचे हिंदोळे, हेलकावे सावरायला शिकणे आवश्यक ठरणार आहे. तसेच या वर्षांत २ हा चंद्राचा अंक ३ वेळा आला असल्याने भावनांचा उद्वेग आवरावाच लागेल. अन्यथा आपली भावनिक नौका भरकटत जाईल.

जानेवारी : चतुर्थ स्थानातील बलवान शनी घरासंबंधित प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साहाय्यकारक ठरेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. कामानिमित्त वा शिक्षणासाठी प्रवास कराल. नातेसंबंध जपाल. आपल्या कार्यक्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. व्यवहार सांभाळावा. फायदा-तोटय़ाचा विचार भविष्याच्या दृष्टीनेही करावा.

फेब्रुवारी : गुरू मंगळाचा लाभ योग आपणास व्यवहार ज्ञानाचे धडे देईल. भावनेच्या भरात वाहवत न जाता सर्वांच्या हिताचे निर्णय घेता येतील. पंचमातील गुरु, नेपच्यूनसह नवनिर्मितीचा आनंद लुटाल. आर्थिक गणितं पुन्हा नव्याने मांडाल. कामानिमित्त नव्या ओळखी होतील. यातूनच आपल्याला प्रेरणादायी दृष्टिकोन सापडेल.

मार्च : सप्तमातील राहूचा प्रवेश सावधगिरीचा इशारा देणारा असेल. करार करताना अतिशय दक्ष आणि सतर्क राहायला हवे. छुप्या अटी, नियम यांचा बारकाव्यांसह अभ्यास कराल. चतुर्थातील शनी मंगळ स्थावर मालमत्तेबाबतच्या कामाला गती देतील. त्यासंबंधीत संधी उपलब्ध होतील. प्रयत्न करावेत.

एप्रिल : राहू, बुधाचा प्रभाव वकिली कारवाईवर असेल. कायदेविषयक कामे समजून घ्यावीत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती होईल. संशोधक वृत्तीला प्रोत्साहन मिळेल. माणसांची पारख योग्य प्रकारे कराल. स्नेह संबंध जपण्यासाठी मोठे मोल द्यायची तयारी दाखवाल. नात्यातील विश्वास हाच खरा पाया आहे.

मे : गुरूचा मीन राशीतील प्रवेश स्पर्धा परीक्षांसाठी लाभदायक ठरेल. मिळालेल्या संधीचे सोने कराल. शनीचा पंचमातील प्रवेशही उपयुक्त ठरेल. मित्रमंडळींच्या सर्व गोष्टी आपल्याला रुचतीलच असे नाही. भावनांवर नियंत्रण ठेवा. नाती जपणेही महत्त्वाचे आहे! कुटुंबाकडून पाठिंबा मिळाल्यास आपली हिंमत वाढेल.

जून : कर्तव्यदक्ष असूनही काही गोष्टी हातून निसटतील. मानसिक त्रास करून न घेता नव्या जोमाने पुन्हा कामाला लागा. षष्ठ स्थानातील उच्चीचा शुक्र आणि गुरू हितशत्रूंचा बंदोबस्त करतील. नातेवाईकांचे बोलणे फारसे मनावर घेऊ नका. कलेला वाव मिळेल. त्यासाठीचे पोषक, पूरक वातावरण निर्माण कराल.

जुलै : भाग्य स्थानातील रवी-शुक्राच्या साथीला बुध असल्याने व्यापारी तत्त्वांचा अवलंब लाभदायक ठरेल. चतुर्थ स्थानात शनी वक्री गतीने प्रवेश करेल. घरासंदर्भातील निर्णय रखडतील. निराश न होता कामातील बारकावे अभ्यासाल. निरीक्षण आणि परीक्षण क्षमतेचा योग्य उपयोग कराल. सर्वसमावेशक विचार कराल.

ऑगस्ट : सप्तमातील राहू हर्षल आणि अष्टमातील मंगळ यामुळे सावध राहावे लागेल. मोठी जोखीम स्वीकारू नका. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवाल. कौटुंबिक बाबी चर्चेने सोडवताना एकमेकांचे स्नेहसंबंध जपाल. नोकरी व्यवसायातील अडचणी दूर कराल. उपाय शोधणे, मार्ग काढणे आपल्याला चांगले जमेल.

सप्टेंबर : व्यय स्थानातील रवी बुध अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढवेल. मित्रपरिवारासह झालेल्या भेटीगाठी आनंद देऊन जातील. भावनेच्या भरात अशक्य किंवा कठीण गोष्टींची हमी देऊ नका. कौटुंबिक जबाबदारीचे भान कायम राखाल. नातेवाईकांना मदत कराल. परंतु आपल्या मर्यादा आपणच ठरवाव्यात.

ऑक्टोबर : कला, स्नेहबंध आणि मैत्री यांची जपणूक कराल. आवडत्या व्यक्तींसाठी विशेष मेहनत घ्याल. विचारांची देवाणघेवाण होईल. नव्या संकल्पना मांडून त्याची अंमलबजावणी कराल. स्वत:बरोबर इतरांच्या आरोग्याची काळजी घ्याल. शुक्राचा प्रभाव आल्हाददायक असेल. कलात्मक दृष्टीने पाहताना व्यवहारही सांभाळाल.

 नोव्हेंबर : द्वितीय स्थानातील रवी, बुध, शुक्र कौटुंबिक पाठबळ देतील. नवी उमेद निर्माण होईल. नोकरी व्यवसायात योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळाल्याने प्रगतीच्या दिशेने आगेकूच कराल. आरोग्याची काळजी घेणे चांगले! नियम पाळलेत तर रोगप्रतिकार शक्ती साथ देईल. आत्मविश्वासाचा अतिरेक करू नका. जपून रहा.

डिसेंबर : मंगळ, शुक्राचा योग आहे. प्रलोभनांच्या आहारी जाऊ नका. कल्पनेच्या विश्वात दंग राहू नका. वास्तवाचे भान ठेवा. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. आपल्यातील कलागुणांना वाव मिळेल. संधीचे सोने कराल. शैक्षणिक प्रगती होईल. कामकाजातील गतिमानतेचा अंदाज घेऊन पुढे जाल.

वृश्चिक  २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर

आपला जन्म २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या काळात झाला असेल तर आपल्यावर मंगळाचा प्रभाव असणार आहे. आपले व्यक्तिमत्त्व ९ या अंकाच्या प्रभावाखाली असते. या वर्षांत २०२२ या अंकाची एकांकी बेरीज २+०+२+२ = ६ आहे. ६ या अंकावर शुक्राचा प्रभाव असल्याने या वर्षभराच्या काळावर शुक्राचा अंमल असणार आहे. एकंदरीत मंगळ आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव असणारे हे वर्ष असणार आहे. मंगळाचे धाडस, कर्तृत्व आणि शुक्राचा स्नेह, त्याची ममता यांचे एकत्रित परिणाम दिसून येणार आहेत. भावभावना आणि मानसिकता यांचा समतोल साधलात तर वर्षभरात प्रगती कराल.

जानेवारी : धनस्थानातील मंगळ खर्चाचे प्रमाण वाढवेल. शब्द जपून वापरावेत. शांत डोक्याने आपले विचार मांडणे गरजेचे आहे. चतुर्थातील गुरू स्थावर मालमत्तेशी संबंधित कामाला गती देईल. कोणतेही धाडसी काम करताना कुटुंबीयांना विश्वासात घेणे आवश्यक! त्यांचा पाठिंबा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे.

फेब्रुवारी : गुरू-शुक्राचा लाभ योग आहे. नातेवाईक, गुरुजन यांच्याप्रति आदर व्यक्त कराल. तृतीय स्थानातील उच्चीचा मंगळ आणि स्वगृहीचा शनी यांच्या उपस्थितीत आत्मविश्वास वाढेल. हिमतीने पुढे जाल. स्नेहसंबंधात आपला हेका न ठेवता नात्याचा मान राखा. निरपेक्ष प्रेमाची किंमत, मोल आपण जाणताच!

मार्च : चतुर्थ स्थानातील रवी-बुधाचा योग शैक्षणिक प्रगतीस कारण ठरेल. कुटुंबातील सदस्यांना समजून घ्याल. मोठे आव्हान पेलताना गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल. अतिभावुक होऊ नका. षष्ठ स्थानात राहूने प्रवेश केला आहे. हितशत्रूंचा त्रास नियंत्रणात राहील. आपल्यातील कमतरतांवर मात करण्याचा प्रयत्न कराल.

एप्रिल : राहूसह रवी आणि हर्षल यांचे भ्रमण नोकरी-व्यवसायात अडीअडचणी निर्माण करेल. परंतु निर्णय घेताना घाई करू नका. जवळच्या व्यक्तींचे मन जपा. समाजाचे आणि आपले नाते दृढ कराल. सामाजिक कार्यात मन रमेल. महत्त्वाची खरेदी कराल. खरेदीतील चोखंदळपणामुळे नवलाईमध्ये बाधा आणू नका.

मे : गुरूचा पंचम स्थानात प्रवेश झाला आहे. नोकरी व्यवसायातील प्रश्न सुटतील. अधिकारपद भूषवाल. शनीचे भ्रमण आता चतुर्थ स्थानातून होत आहे. उष्णतेचे विकार बळावतील. काळजी घ्यावी. कौटुंबिक बाबींवर विचार करून आपले मत मांडावे. घाईघाईने निर्णय घेऊ नका. काही निर्णय बदलता येत नाहीत, हे ध्यानात ठेवा.

जून : षष्ठ स्थानातील राहूसह शुक्र भ्रमण करत आहे. प्रलोभनांना बळी पडू नका. नातेसंबंध विश्वासावर टिकतात हे लक्षात ठेवा. शंका-कुशंका दूर कराल. सप्तम स्थानातील रवीमुळे करार, लिखित स्वरूपातील कागदपत्र यांच्या बाबतीत जागरूकता बाळगावी. गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल.

जुलै : षष्ठातील राहू, हर्षल आणि मंगळ सावधानतेचा इशारा देत आहेत. अष्टमातील रवी, बुध आरोग्यविषयक गोष्टींचा विचार करायला लावतील. आपला आहार, विहार, पथ्य चांगले पाळावे. इतरांच्या मदतीला खंबीरपणे उभे राहाल. सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून द्याल. मानसिक समाधान मिळेल. समाज ऋण फेडाल.

ऑगस्ट : भाग्य स्थानातील रवी आणि बुधाचे भ्रमण नव्या ओळखी होण्यास साहाय्यकारी ठरेल. गुरुजनांचे आशीर्वाद पाठीशी असतील. मेहनत आणि सातत्याचे फळ फार चांगले असेल. कौटुंबिक समस्यांवर चर्चेतून उपाय शोधाल. भावनिक आणि वैचारिक गोंधळ दूर करा. मुद्दा भरकटत नेऊ  नका. शांतपणे विचार करावा.

सप्टेंबर : दशमातील शुक्र कलात्मकतेला वाव देईल. नव्या संकल्पना राबवाल. लाभ स्थानातील बुधामुळे व्यावहारिक दृष्टिकोन निर्माण होईल. सुखदु:खाच्या क्षणी नातेवाईकांचा आधार महत्त्वाचा वाटेल. आपले वागणे, बोलणे यात तफावत निर्माण होऊ देऊ नका. गरज पडल्यास आपली बाजू लिखित स्वरूपात तयार ठेवा.

ऑक्टोबर : तृतीयातील बलवान शनी आणि पंचमातील बलवान गुरू आपल्याला साहाय्य करतील. पेचप्रसंगातून मार्ग निघेल. सत्कर्म कराल. परिस्थिती बदलल्याने तणाव कमी होईल. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात असे नाही. सांभाळून घ्यावे लागेल. कामकाजातील लक्ष विचलित होऊ देऊ नका.

नोव्हेंबर : रवी-नेपच्यूनचा नवपंचम योग आध्यात्मिक प्रगतीसाठी पूरक ठरेल. नव्या विषयांचे अध्ययन कराल. कर्तृत्व आणि उत्साहाला बहर येईल. मित्रपरिवारासह वावरताना शब्द जपून वापरावेत. कोणाचे मन दुखावेल, असे कटू सत्य बोलणे टाळावे. शेवटी एकमेकांना जपणे हे महत्त्वाचे आहे.

डिसेंबर : द्वितीय स्थानातील बुध आणि शुक्र आर्थिकदृष्टय़ा उत्तम असणार आहेत. परिस्थितीवर समर्पक कृती करून हिमतीने मात कराल. तुमच्या भावनांवर विचारांचा ताबा असेल, तर तुम्ही भावनेच्या भरात वाहून जाणार नाही. प्रत्येक गोष्टीला बरी वाईट बाजू असणारच. साकल्याने विचार करता एकेक बाब स्पष्ट होईल.

धनू  २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर

आपला जन्म २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत झाला असेल तर आपल्यावर गुरूचा प्रभाव असणार आहे. ३ या अंकाचे आपल्यावर प्रभुत्व असते. यंदाचे हे वर्ष शुक्राच्या आधिपत्याखाली असणार आहे, कारण २०२२ या वर्षांवर शुक्राचा अंमल आहे. यावरून असे स्पष्ट होते की आपल्यावर गुरू आणि शुक्र या दोन ग्रहांचा प्रभाव असणार आहे. गुरूची प्रगल्भता, उदारता आणि प्रामाणिकपणा या गुणांसह शुक्राचा उत्साह, मोहकता आणि स्नेहभाव यांचा अनुभव आपणास येईल. शैक्षणिक आणि कलेच्या क्षेत्रात चांगली प्रगती कराल. अतिभावूक न होता पांडित्याचा योग्य उपयोग कराल.

जानेवारी : द्वितीय स्थानातील शनी आणि बुध यांचा प्रभाव आपल्या नेमक्या आणि मुद्देसूद बोलण्यावर असेल. कायदेविषयक कामे अचूक कराल. गुरूचा पाठिंबा आपला आत्मविश्वास वाढवेल. भावना आणि व्यवहार यात भावनांना अधिक महत्त्व द्याल. नाती जपाल आणि जोपासाल. मित्रमंडळींच्या सहवासात रममाण व्हाल.

फेब्रुवारी : तृतीय स्थानातील रवी, नेपच्यून आणि गुरू नव्या संकल्पना अमलात आणण्यास मदत करतील. लोकप्रियतेबरोबरच जबाबदारी देखील वाढेल. खंबीर राहा. भावनाविवश न होता परिस्थितीचा साकल्याने विचार करा. नोकरी व्यवसायात बदलाचे योग आहेत. प्रयत्नांना फळ मिळेल. संधीचे सोने कराल.

मार्च : स्वगृहीच्या शनीसह उच्चीचा मंगळ कामातील अडथळे दूर करेल. उत्साहवर्धक वातावरणात महत्त्वाचे निर्णय घ्याल. पंचमातील राहूचा प्रवेश औषध, संशोधन या क्षेत्रात प्रगतीला पूरक ठरेल. नातेवाईक, आप्तजन यांच्या सहकार्याने कौटुंबिक समस्या सुटतील. दृष्टिकोन बदलल्याने तणाव कमी होईल.

एप्रिल : पंचमातील उच्चीच्या रवीला राहूचे साहचर्य बाधित करेल. महत्त्वाच्या वेळी कामात दिरंगाई किंवा लहानशी चूक होण्याचा संभव आहे. विशेष दक्षता घ्यावी. स्नेहसंबंधामध्ये समज गैरसमज दूर करावेत. मनमोकळेपणाने बोलून, चर्चा करून अनेक समस्या सोडवता येतील. प्रश्नांची उत्तरे सापडल्याने प्रगतीची वाट धराल.

मे : चतुर्थात गुरूने स्वराशीत प्रवेश केला आहे. शुक्रही उच्च राशीत आला आहे. घरासंबंधीची कामे वेग घेतील. कौटुंबिक सुख मिळाल्याने मनाला शांतता लाभेल. मित्रपरिवार आपल्यासह असेल. त्यांचा आधार मोलाचा वाटेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक घटना घडतील. वरिष्ठांचा विश्वास खरा करून दाखवाल. समाधान वाटेल.

जून : चतुर्थातील मंगळासह नेपच्यूनचा योग मन शांत ठेवण्यासाठी उपयोगी असणार आहे. एखाद्या गोष्टीकडे वरवर पाहून त्यातील गांभीर्य समजणार नाही. सखोल अभ्यास करूनच आपले मत मांडावे. स्नेहभाव आणि संबंध बिघडू देऊ नका. नोकरी-व्यवसायात अधिकार गाजवाल. ज्ञानाचा उपयोग व्यवहारात केल्याने लाभ मिळतील.

जुलै : शनी वक्र गतीने पुन्हा द्वितीय स्थानात प्रवेश करेल. राहू, मंगळ आणि शनीच्या केंद्र योगामुळे आर्थिक ओढाताण होईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. डोळ्यांचा त्रास दुर्लक्षित करू नका. सामाजिक कार्यात , आपत्ती निवारण कार्यात हिरिरीने सहभागी व्हाल. जनसेवा हीच ईश्वरसेवा याचा आपणास प्रत्यय येईल.

ऑगस्ट : अष्टमातील रवी शुक्राचा आरोग्यावर प्रभाव दिसेल. रवी शनीचा प्रतियोग आर्थिकदृष्टय़ा अडचणी निर्माण करेल. गुरूचे साहाय्य मिळाल्याने मोठय़ा व्यक्तींकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. कामातील ताण हलका करण्यासाठी कुटुंबातील सदस्य मदत करतील. यातूनच नात्यांचे धागे अधिक दृढ होतील.

सप्टेंबर : दशम स्थानातील रवी आणि बुध अधिकारपद देतील. नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवाल. कुटुंबातील प्रेमाचे बंध आणखी दृढ होतील. एकमेकांच्या कामात साहाय्य कराल. नोकरीनिमित्त प्रवासयोग येतील. जाणूनबुजून कोणाचे मन दुखवू नका. आपल्या मनातील उदारता चांगल्या प्रकारे जोपासली जावी.

ऑक्टोबर : सप्तम स्थानातील मंगळ नवे करार करताना सावधानतेचा इशारा देईल. नातेसंबंध टिकवणे गरजेचे आणि महत्त्वाचे वाटेल. नोकरी व्यवसायात प्रगती कराल. आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल. राहू, हर्षल यांच्या योगामुळे कलात्मकतेचे सादरीकरण चांगले कराल. समाजाकडून आपल्या कार्याची दखल घेतली जाईल.

नोव्हेंबर : व्यय स्थानातील रवी, बुध आणि शुक्राचा आपल्या भावविश्वावर प्रभाव पडेल. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. नोकरी व्यवसायात मेहनतीला पर्याय नाही. आर्थिक बाजू सावरून धराल. आपली मते प्रभावीपणे मांडा. परंतु ती इतरांवर लादू नका. विचारस्वातंत्र्य प्रत्येकाला असते याची जाण असावी.

डिसेंबर : गुरू मंगळाचा लाभ योग अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल. इतरांच्या समस्या आपल्या मानून त्यावर उपाय शोधाल. शब्द जपून वापरा. शनीचा अंमल असल्याने कामे राखडण्याची शक्यता आहे. मोठय़ा ओळखीचा लाभ होईल. नाती आणि स्नेहसंबंध जोपासाल. आपले भावविश्व नात्यांच्या परिपूर्णतेने समृद्ध कराल.

मकर  २१ डिसेंबर ते २० जानेवारी

आपला जन्म २१ डिसेंबर ते २० जानेवारी या दरम्यान झाला असेल तर या काळावर शनीचा अंमल आहे. शनीचा अंक ८ आहे. यंदाच्या २०२२ या वर्षांची एकांकी बेरीज २+०+२+२ = ६ आहे. ६ हा शुक्राचा अंक आहे. एकंदरीत या वर्षभराच्या काळात शनी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आपल्यावर असणार आहे. शनीची जिद्द, चिकाटी या बरोबरच शुक्राची कल्पकता, नवनिर्मिती क्षमता याचा आपणास खूप चांगला लाभ मिळेल. स्नेहभाव जपाल. भावनेच्या भरात वाहवत न जाता शनीची शिस्त नियंत्रण ठेवेल. तसेच कामाच्या व्यापातून शुक्राची स्नेहपूर्ण सुखद झुळूक आनंदाचे क्षण देईल.

जानेवारी : आपल्या राशीतील शनिसह रवीचे भ्रमण विचारांचा गोंधळ निर्माण करेल. परंतु द्वितीय स्थानातील गुरूकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. मित्रमंडळी साहाय्य करतील. चाकोरीबद्ध जीवनक्रमात स्नेहभाव भरल्याने उत्साह वाढेल. ध्येयाकडे वाटचाल कराल. ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी दर्शवाल.

फेब्रुवारी : उच्चीचा मंगळ आणि बलवान शनी यांमुळे शनीच्या चिकाटीला मंगळाच्या धाडसाची जोड मिळेल. बलवान राहू शैक्षणिक प्रगतीला पूरक ठरेल. एखाद्या गोष्टीचा अट्टहास न करता त्याचा स्वीकार करणे उचित ठरेल. भावना चांगल्या प्रकारे व्यक्त कराल. इतरांचे प्रेम मिळवाल. प्रेम-स्नेहभाव यांची देवाणघेवाण आनंददायी असेल.

मार्च : चतुर्थ स्थानात राहूचा राशी प्रवेश झाला आहे. मनाची चलबिचल वाढेल. भावनांचे आवेग सांभाळा. शुक्राच्या प्रभावाने शिस्तीला सौम्यपणा येईल. चारचौघांत मिसळून सामाजिक कामात मन रमेल. नोकरी व्यवसायातील नवे पेच सहज सोडवाल. लोकांची मने जिंकाल. मनावर ताबा मिळवल्यास कामे सुलभ होतील.

एप्रिल : चतुर्थातील राहूसह बुध आणि रवीचे भ्रमण कायद्याच्या बाबतीतील कामांना गती देईल. सरकारी कामे मात्र रखडतील. मित्रमंडळींना आपला आधार वाटेल. विश्वासाचे नाते दृढ होईल. कामाव्यतिरिक्त विरंगुळा म्हणून समाजोपयोगी छंद जोपासाल. मेहनत आणि परोपकार हे तर आपले विशेष गुण आहेत.

मे : गुरूचा तृतीय स्थानातील मीन राशीत प्रवेश झाला आहे. नवे करार लाभदायक ठरतील. उत्साह वाढेल. नवे स्नेहसंबंध जुळतील. नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या सहवासात आनंद मिळेल. नोकरी, व्यवसायात कामानिमित्त लहान मोठे प्रवास योग येतील. लाभ होतील. आपले ज्ञान आणि कामातील अनुभव यांचा मेळ जमेल.

जून : पंचम स्थानातील बुध आणि रवीमुळे ज्येष्ठ व्यक्तींचा सहवास लाभेल. अविस्मरणीय घटना घडतील. जिद्द आणि चिकाटीने चिकित्सा कराल. त्यामुळे फसवणूक टळेल. कुटुंबीयांचा आधार मिळेल. मोठी झेप घ्याल. मनातील विचारांना योग्य वळण द्याल. विचारांची ताकद जबरदस्त असते याची प्रचिती येईल.

जुलै : पंचमातील बलवान शुक्राचा अंमल आपल्या सादरीकरणावर असेल. प्रभावी संभाषण, कामाची आकर्षक मांडणी, आखणी यामुळे कामाला उठाव येईल. शनीचे वक्री भ्रमण आपल्या राशीत होत आहे. महत्त्वाच्या कामातील अडथळे धीराने दूर कराल. सचोटीने काम कराल. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराल. मानसिक समाधान मिळेल.

ऑगस्ट : सप्तम स्थानातील रवी शुक्राची आपणास कामाची पुढची आखणी करण्यासाठी मदत होईल. गुरूच्या पाठबळाने मोठय़ा जबाबदाऱ्या हिमतीने पेलाल. मित्रपरिवार आपल्या मदतीची मागणी करेल. मदत जरूर करा परंतु आपल्या मर्यादा ओळखून शब्द द्या. भावना आणि व्यवहार योग्य प्रकारे सांभाळाल.

सप्टेंबर : भाग्य स्थानातील बुध पेचप्रसंगातून मार्ग काढेल. बुद्धिचातुर्य कामी येईल. नवे-जुने संबंध कसे टिकवता येतील याचा विचार कराल. भावनिक आणि मानसिक पातळीवर विशेष लक्ष द्याल. फक्त पैसा उपयुक्त ठरत नसतो; नातीदेखील मोलाची असतात याची प्रचीती येईल. माणुसकीच्या नात्याने मोठी जबाबदारी स्वीकाराल.

ऑक्टोबर : ग्रहमान पूरक असल्याने केलेला निश्चय पूर्ण कराल. आर्थिक ओढाताण जाणवेल. आत्मविश्वास ढळू देऊ नका. नोकरी- व्यवसायात नव्या संधी खुणावतील. अशा संधीचे सोने कराल. सामाजिक बंधने पळून स्नेहभाव जपाल. कौटुंबिक पाठिंबा खूप मोलाचा ठरेल. कलात्मकता जोपासण्याचा प्रयत्न कराल.

नोव्हेंबर : दशम आणि लाभ स्थानातील रवीचे भ्रमण यशकारक आहे. प्रयत्नशील रहाल. एखादी गोष्ट पूर्णत्वाला जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा कराल. शिस्तीसह आपल्या प्रेमाचा, मायेचा ओलावा आपल्या जवळच्या व्यक्तींना हवाहवासा वाटेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. पित्त प्रकोप व डोकेदुखी यांवर उपचार घ्यावेत.

डिसेंबर : रवी गुरूचा नवपंचम योग असल्याने धडाडीचे कर्तृत्व करून दाखवाल. नोकरी- व्यवसायात सातत्य आणि चिकाटीचे फळ मिळेल. स्थावर इस्टेटीसंबंधित कामे लांबणीवर पडतील. शांत डोक्याने सद्य:स्थितीचा विचार करा. आर्थिक व्यवहारात सावध राहा. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला विशेष फलदायी ठरेल.

कुंभ  २१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी

आपला जन्म २१ जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान झाला असेल तर आपल्यावर ८ या अंकाचा प्रभाव आहे. ८ हा अंक शनीचा असल्याामुळे आपल्यावर शनी ग्रहाचा प्रभाव असणार आहे. यंदाच्या वर्षांची एकल अंकांची बेरीज ६ आहे. ६ हा अंक शुक्राचा आहे. नाव, प्रसिद्धी, यश यांसह कलात्मकता आणि प्रेमभाव निर्माण करणारा असा हा शुक्र आहे. परिणामत: यंदाच्या वर्षी शनी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आपल्यावर असणार आहे. संशोधनात्मक अभ्यास, सखोल ज्ञान यांचा व्यावहारिक दृष्टीने चांगला लाभ होईल. स्नेहबंध नव्याने निर्माण होतील. नातीगोती जपाल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.

जानेवारी : आपल्या राशीतील गुरू आणि नेपच्यूनमुळे अंत:स्फूर्ती जागरूक होईल. नव्या संकल्पना इतरांपुढे मांडाल. चाकोरीबद्ध दिनक्रमही आनंदाने जगाल. नोकरी-व्यवसायात ओळखीतून कामे मार्गी लागतील. मित्रपरिवार आणि नातलग यांच्या भेटी मनाला सुखावतील. आपसातील वैचारिक मतभेद बाजूला ठेवाल.

फेब्रुवारी : लाभ स्थानातून भ्रमण करणारा मंगळ आपला आत्मविश्वास वाढवेल. एखादे ध्येय निश्चित केले असल्यास त्याच्या पूर्णतेकडे वाटचाल कराल. शनीची चिकाटी तर आपल्यात आहेच. त्यात शुक्राची कोमलता मिळाल्याने कामाचे स्वरूप आखीवरेखीव होईल. कामाचा ताण न जाणवता उत्साह वाढेल.

मार्च : भावनांवर नियंत्रण ठेवणे आपण जाणताच. त्यातच तृतीयातील राहुचा राशीप्रवेश आपली हिंमत वाढवेल. नवी आव्हाने लीलया स्वीकाराल आणि नेटाने पेलाल. नोकरी-व्यवसायात काही ना काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील. त्यावर अधिक विचार करू नका. अतिविचाराने दमणूक होईल. काही गोष्टी आहेत तशा स्वीकाराव्यात.

एप्रिल : तृतीय स्थानातील राहूसह रवीचे या स्थानातील आगमन काही अंशी विचारांवर मळभ आणेल. अशा वेळी गुरूचा विशेष आधार वाटेल. बऱ्या-वाईटाची चांगली पारख कराल. आपल्या ज्ञानाचा समाजाला लाभ कसा होईल याचा विचार कराल आणि असा एखादा प्रकल्प अमलात आणाल. यासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींची साथ लाभेल.

मे : द्वितीय स्थानातील गुरू, मंगळ आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास साहाय्य करतील. प्रभावी वक्तव्य आणि सादरीकरण वरिष्ठांना पसंत पडेल. नव्या संधी उपलब्ध होतील. नातेवाईकांच्या भावनांचा मान ठेवाल. कौटुंबिक प्रगतीच्या दृष्टीने आपला आधार मोलाचा ठरेल. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने नवे पाऊल उचलाल.

जून : तृतीय स्थानात राहू आणि हर्षलासह शुक्राने राशीप्रवेश केला आहे. सावधानतेचा इशारा देणाऱ्या या ग्रहमानाचा विचार करावा. भावनेच्या भरात कोणताही लहान-मोठा निर्णय घेऊ नका. शनीची संयमी वृत्ती आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवेल. कामकाजावर लक्ष केंद्रित करावे. एकाग्रता आणि सुनियोजन हा तर आपला स्थायीभावच आहे.

जुलै : पंचमातील बलवान बुध आणि चतुर्थातील शुभ शुक्र यांचा आपल्या शैक्षणिक प्रगतीवर चांगला प्रभाव पडेल. ग्रहणशक्ती वाढेल. महत्त्वाच्या कामातील बारकावे लक्षपूर्वक टिपाल. नोकरी-व्यवसायात आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींशी चांगले नाते निर्माण होईल. ओळख वाढेल. विचारांची देवाणघेवाण होईल.

ऑगस्ट : व्यय स्थानात शनीने वक्री गतीने प्रवेश केला आहे. पुढील काळात लाभदायक ठरतील अशा योजनांची आखणी कराल. आपल्यातील कमतरतांवर मात करून स्वत:ची उन्नती कराल. कौटुंबिक पाठबळ मिळाल्याने हिमतीने पुढे जाल. सचोटीचे कौतुक होईल. संयम पाळल्याने, परिस्थितीला धीराने सामोरे जाता येईल.

सप्टेंबर : सप्तम स्थानातील रवी-शुक्राचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडणार आहे. स्वत:सह इतरांच्या हिताचा विचार कराल. कलागुणांना वाव मिळेल. विरोधकांना समर्पक आणि खरमरीत उत्तरे द्याल. नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्याशी असलेली नाती दृढ होतील. सहवासाने प्रेम वाढेल, जिव्हाळा निर्माण होईल .

ऑक्टोबर : बुध-शुक्राचा योग ‘आरोग्य-विषयक काळजी घ्यावी’ अशी सूचना देत आहे. मानसिक आरोग्य जपल्याने कामाचा ताण कमी होऊन अधिक उत्साहाने कामे पूर्ण कराल. सामाजिक जबाबदारीचे भान राखाल. शिक्षण, प्रशिक्षण यात बाजी माराल. ज्येष्ठ व्यक्तींच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आपल्यासाठी मोलाच्या ठरतील.

नोव्हेंबर : भाग्य स्थानातील रवी नीच राशीतून भ्रमण करत असला तरी त्याला बुध आणि शुक्राची चांगली साथ मिळत आहे. नव्या जोमाने कार्यक्षेत्रात उतराल. आपल्या गुणांचा सामाजिक कार्यात उपयोग कराल. गुरुजनांचे आशीर्वाद मिळाल्याने ध्येय गाठाल. प्रगतीचा प्रवास खडतर परंतु आनंददायी असेल.

डिसेंबर : तृतीय स्थानातील रवी, बुध आणि शुक्राचा अंमल आपल्या कामकाजावर दिसेल. आत्मविश्वासपूर्वक केलेल्या कामाला वरिष्ठांकडून दाद मिळेल. कौटुंबिक नातीगोती, स्नेहभाव यांची जपणूक कराल. कर्तृत्व आणि कुटुंब यांच्यातील समतोल उल्लेखनीय असेल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल.

मीन  २० फेब्रुवारी ते २० मार्च

आपला जन्म २० फेब्रुवारी ते २० मार्च यादरम्यान झाला असेल तर आपल्यावर गुरू ग्रहाचा प्रभाव असणार आहे. गुरूचा अंक ३ आहे. त्यामुळे ३ या अंकाचा आपल्याशी संबंध प्रस्थापित होणार आहे. यंदाच्या २०२२ या वर्षांचा एकांक २+०+२+२ = ६ आहे. ६ या अंकावर शुक्राचा अंमल असतो. त्यामुळे एकंदरीत आपल्या या वर्षभराच्या काळावर गुरू आणि शुक्र या शुभ ग्रहांचा प्रभाव असणार आहे. गुरूची प्रगल्भता, अभ्यासू वृत्ती आणि उदारता यांच्यासह शुक्राचा उत्साह, कलात्मक दृष्टी आणि स्नेहपूर्ण भाव आपल्या ठिकाणी दिसून येतील. विचार आणि आचार यांची सांगड घातल्यास उन्नतीकडे वाटचाल कराल.

जानेवारी : दशम आणि लाभ स्थानातून रवी भ्रमण करत आहे. कामकाजातील गोष्टींकडे बारीक लक्ष द्याल. त्यामुळे आपली फसवणूक टळेल. हवामानातील बदलाची दखल घेणे आवश्यक ठरेल. नव्या जबाबदाऱ्या लांबणीवर पडतील. कौटुंबिक पाठबळ मिळाल्याने हुरूप वाढेल. प्रतिस्पध्र्याच्या बोलण्याचा रोख समजून घ्याल.

फेब्रुवारी : लाभ स्थानातील उच्चीचा मंगळ आणि बलवान शनी नोकरवर्गाकडून कामे करून घेईल. वेळेचे भान ठेवणे फारच महत्त्वाचे असेल. आळस झटकून टाका. आपल्यातील सकारात्मकता पणाला लावाल. नोकरी-व्यवसायात पेचप्रसंग आले तरी डगमगू नका. सत्याची वाट धरा. न्यायाने वागा.

मार्च : द्वितीय स्थानात राहू राशीप्रवेश करणार आहे. आर्थिक गणिते बदलतील. व्यावहारिक दृष्टिकोन निर्माण होईल. नुकसान टाळण्यासाठी वेगवेगळ्या वाटांचा अवलंब कराल. सरकारी कामे रेंगाळतील. धीर धरा. शनी, शुक्र आणि मंगळाच्या प्रभावाने मित्रांकडून मदत मिळेल. भावविवश व्हाल. आठवणींना उजाळा मिळेल.

एप्रिल : राहूसह रवी आणि बुध यांच्या भ्रमणामुळे स्वभावात आग्रहीपणा येईल. जिद्द चांगली असेल, पण अट्टहास केल्यास परिणामी मानसिक तणाव वाढेल. भावनांच्या आहारी ना जाता विवेक आणि वैचारिक बैठक भक्कम करावी. आर्थिकदृष्टय़ा मोठी जोखीम पत्करू नका. आपल्या क्षमतेपलीकडे झेप घेताना विचार करावा.

मे : स्वराशीत गुरूचा प्रवेश झाल्याने भावनिक स्थिरता तर येईलच. त्याचबरोबर समोर उभी असलेली आव्हाने हिमतीने स्वीकाराल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. निराशेतून बाहेर पडाल. नोकरी-व्यवसायातील बारकावे लक्षपूर्वक टिपाल. उष्णतेचे विकार बळावतील. वैद्यकीय सल्ला घेण्यात दिरंगाई करू नका.

जून : तृतीय स्थानातील रवी आणि बुधाचा अंमल आपल्या सादरीकरणावर दिसून येईल. चर्चेचे मुद्दे आत्मविश्वासपूर्वक मांडाल. मित्रपरिवार आपल्याकडून मदतीची अपेक्षा ठेवेल. शक्य नसलेल्या गोष्टींची ग्वाही देऊ नका. भलतीच भीड नको. अडचणींची मालिका खंडित कराल. सारासारविचार करून निर्णय जाहीर कराल.

जुलै : तृतीय स्थानातील शुक्र आपल्यातील गुणांना वाव देण्यास साहाय्यभूत ठरेल. आपल्या संकल्पना प्रभावीपणे मांडाल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. शनीचे वक्र गतीने पुन्हा लाभ स्थानात भ्रमण होईल. भावना आणि कर्तृत्व यात संघर्ष होईल. वैचारिक गोंधळ बाजूला सारून सद्यस्थितीचा विचार करावा.

ऑगस्ट : पंचम स्थानातील रवी आणि शुक्र यांमुळे आपली ग्रहणशक्ती बळावेल. नव्या विषयांचे आकलन सहज होईल. नोकरी-व्यवसायात नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. इतरांसाठी उपयुक्त असे प्रकल्प हाती घ्याल. उत्साह वाढेल. क्रियाशील व्हाल. व्यस्त दिनक्रमातही आनंदाचे क्षण अनुभवाल.

सप्टेंबर : द्वितीय स्थानातील राहू-हर्षल आणि तृतीय स्थानातील मंगळ यांच्या साथीने आत्मविश्वास वाढेल. आपला मुद्दा प्रभावीपणे मांडाल. भावविश्वात अडकून न पडता समाजाप्रति आपले काही कर्तव्य आहे, याची जाण ठेवाल. कुटुंबातील सदस्य पाठबळ देतील. घडून गेलेल्या घटनांचा अतिविचार करू नका.

ऑक्टोबर : सप्तमातील कमजोर शुक्राला बलवान बुधाचा पाठिंबा मिळेल. रवीच्या साथीने आधीच्या चुका सुधाराल. एखाद्या गोष्टीची नव्याने सुरुवात कराल. स्वत:ला सावरणे खूप महत्त्वाचे ठरेल. नोकरी-व्यवसायात चांगला जम बसेल. सत्याचा मार्ग स्वीकाराल. माणसांची पारख चांगल्या प्रकारे कराल. उन्नती होईल.

नोव्हेंबर : रवी-गुरूचा नवपंचम योग प्रगतीच्या मार्गातील मोठा आणि महत्त्वाचा टप्पा असेल. कष्टाचे चीज झाल्याचा आनंद होईल. भविष्यातील योजना आत्ताच आखून ठेवाल. भावनांवर नियंत्रण ठेवल्याने महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. मित्रमंडळींची मदत उल्लेखनीय असेल. धीर येईल. आर्थिक समस्या सुटतील.

डिसेंबर : ग्रहयोगांनुसार बरे-वाईट अनुभव खूप काही शिकवतील. प्रगतिपथावर पुढे जाताना कटू अनुभवांचा त्रास करून घेऊ नका. त्यातून नेमक्या गोष्टी शिकाल. ‘अनुभव हा माणसाचा खरा गुरू आहे’ याची प्रचीती येईल. दशम स्थानातील रवीमुळे कामकाजात भरारी घ्याल. आता मागे वळून पाहणे नाही. पुढे चला.