झेब्रा क्रॉसिंगपाशी मला नेहमी झेब््रय़ांचीच आठवण येते. आपण काही रोज झेब्रे बघत नाही. ‘आई, मला झेब्रा घेऊन दे’ म्हणून आपली मुलं झेब्रा मागत नाहीत. तरीही, जगाच्या पाठीवर कुठं तरी झेब्रे आहेत याचं एक समाधान असतं. झेब्रा कुणाचा गुलाम नाही. त्याचं ते स्वतंत्र, चट्टेरी पट्टेरी सौंदर्य उमद्या घोडय़ाला उभ्या जन्मात प्राप्त होणार नाही. घोडा आयुष्यभर घोडचुकांची शिक्षा भोगत उभाच असतो. झेब्र्याला कुणी सजा फर्मावू शकत नाही. माझा अमेरिकेतला भाऊ मला झेब्र्यासारखा वाटू लागतो. त्याच्या शांत, थंड बंगलीपुढे पोपटी रंगाचं छान लॉन आहे. कडेकडेला नावच नसलेली रानटी, रंगीत गवत फुलं उगवतात. मुक्त फिंच पक्षी जोडय़ा जमवतात नि नव्या वर्षांची नवी गाणी गातात. आमचा सख्खा झेब्रा असा सुखात आहे. त्याला हिरवंगार कुरणच मिळालंय. घाऱ्या डोळ्यांचे कंगाल चित्तेही अमेरिकेत आहेत, हे मला माहीत नव्हतं. त्यांना तिथलेच असून नोकरी नाही, म्हणून ते माझ्या या झेब्राभाऊवर हमला करू शकतात. झेब्रा, त्याची पत्नी, लहान, गोंडस मूल संध्याकाळनंर कुठंही जात नाहीत हे पत्रातून कळल्यावर मात्र मी अस्वस्थ झालो. जरा सुखात कुणी जगू लागलं, अधिक ऐश्वर्य, अधिक आनंद मागू लागलं की शिकारी त्या सुखाच्या वासावर येतात.
मला लहानपणी वाटायचं की, आपण झेब्राच असायला हवं. ता एक पट्टय़ापट्टय़ांचा शुभ्र शर्टही माझ्यापाशी होता. जुन्या कुठल्या जन्मी मी झेब्रा होऊन गेलो असेन असंही मनात यायचं. माझ्या आईनं झेब्र्यावर नि माझ्यावर एक कविताही लिहिली होती. त्या बडबड गाण्यातला झेब्रा म्हणतो.
‘आमचा बाळ अगदी वेडा
मलाच म्हणतो घोडा, घोडा’
मुलं खरोखरच असं करतात. मीही करत असेन. आपल्या मुलानं ‘शब्दाचीही चूक करू नये असं त्या प्रेमळ माऊलीला वाटलं असावं. म्हणून तिने ते मऊ बालगीत लिहिलं. पुढे मी बन‘चुका’ होत गेलो. मग घोडा, झेब्रा, बालगीत, बालपण सगळंच मागे पडलं. आयुष्याचा एकूण हिशोब ‘चुक’ता करू लागल्यावर आता वाटतं, आपलं मुक्त ‘झेब्रापण’ आपण सगळेच नोकरीत गमावून बसतो. रानटी खोडसाळपणा, मुक्त भटकेपणा, मुलखाचा काटकपणा, शृंगाराचा अनादी विवस्त्रपणा सगळंच आपण सोडून देतो आणि मुकाटय़ाने ‘घोडा’ बनतो. आपले तबेले कधी भाडय़ाचे, तर कधी मालकीचे असतात. आपले हक्कसुद्धा आपल्याला धड माहीत नसतात आणि रोज पोटासाठी उधळताना आपण किती गंदेगदळ होत जातो. घोडय़ाची ‘गाढवं’ होऊ शकतात, पण ‘झेब्रे’ होत नाहीत! आतेला मी ‘तेते’ म्हणायचो. तेतेला मीच सांगितलं, ‘फॅन्सी ड्रेस’मध्ये मला झेब्रा व्हायचंय.’ ती बिचारी माझ्या अंगावर पेंटपट्टे काढत बसली. खोटं शेपूट तर मला फारच भावलं. त्या वेशभूषा स्पर्धेत मोर झालेली वन्स‘मोर’ सुजाता पहिली आली नि माझा झेब्रा बापडा दुसरा! मोर राष्ट्रीय होता आणि झेब्रा मात्र विदेशी ठरला. खरं तर झेब्रा ग्लोबल आहे. त्याला लेबल लावूच नये. दुर्मीळ झेब्रे नामशेष होऊ नयेत म्हणून जपायला हवं. झेब्रा शांत असतो. ‘झेब्रा-दळ नसतं! शाळकरी निबंधात ‘माझा आवडता प्राणी’ झेब्राच होता. ओंगळ उंट मला कधीच आवडला नाही आणि हत्तीची भीती वाटायची. राणीच्या बागेत मी ‘भायखुळा’ अनवाणी फिरत होतो. मी झेब्रा बघतच राहिलो. कुंपण असूनही तोच फक्त मोकळा वाटत होता. झेब््रय़ासाठी पिंजरा नव्हता. मी इतका वेळ तिथे उभा राहिलो की, माकडं आणि कोल्हे बघायचेच राहून गेले. मोठेपणी मला भरपूर लबाड कोल्होबा भेटले, ते सोडून द्या.
चित्रवाणीच्या एका अरण्यवाहिनीवर झेब्रा नि झेब्रीची जोडी दिसली. तिच्या मागे लागलेला तो मुक्त, मोकाट झेब्रा आक्रमक झाला होता. त्याची जंगली ताकद तेव्हा आकर्षणापोटी आणि घर्षणासाठी धावत सुटली होती. उन्माद चढल्यागत केवळ काही क्षण, पशू देहमोहाची मौज अनुभवतो. नंतर पुन्हा उन्हात संथ, सैल होतो. आपण माणसं मात्र उखाच गुंतूनबिंतून पडतो.
घा‘ई’ मेल करतो. घालमेल करतो. गुलाबी चिठ्ठय़ा खरडतो. उत्तरं येतील म्हणून रखडतो. झेब्रे माणसांच्या या कारागिरीला हसतात. सेक्सवर माणूस जातीला इतकी बुकं लिहावी लागतात याचं सर्वच मोकळ्या प्राण्यांना नवल वाटत असावं. वाढलेल्या स्पंदनांचे गंधाळलेले काही क्षण तेवढे खरे असतात. त्यासाठी पुस्तकांचा इतका पालापाचोळा कशाला? असं पुरुषपठ्ठय़ा झेब्र्यांना वाटतं.
‘झेब्रा’ बाई असेल, तर तिला नुसतंच ‘ब्रा’ म्हणावं अशी आचरट कोटी मीच कॉलेजात केली होती. त्या वर्षी मी नापास झालो. मग मला जास्तच झेब्र्यासारखं वाटू लागलं. झेब्रा मस्तकात पुस्तकी ज्ञान भरत नाही. तो पदव्याही घेत नाही. तो डॉक्टरेट होत नाही. आपण निदान एखाद्या रासवट, रानवट स्वप्नात तरी रात्रभर ‘झेब्रा’ व्हावं. झेब्रा होण्याचं प्रशिक्षण कुठल्याच संस्थेत मिळत नाही. संस्थेची संस्थानं झाल्यानंतर खरं तर तिथं कसलंच शिक्षण धड मिळत नाही. मात्र, मैलावरच जंगल असतं नि आपण एकदा इमानदारीत झेब्रा झालो की, ते रान आपोआप जवळजवळ येऊ लागतं. माझ्या उशीच्या अभऱ्यावर मी झेब्रा विणून घेतलाय. उशाला झेब्रा घेऊनच मी ताणून देतो!
माधव गवाणकर response.lokprabha@expressindia.com