गेल्या १५ वर्षांमध्ये एकूणच भारतीयांच्या हाती खेळू लागलेल्या पैशांमध्ये वाढ झाली असून पूर्वी वर्षांतून एकदा देवाधर्मासाठी बाहेर पडणारी अनेक कुटुंबे आता थेट युरोप- अमेरिकाच नव्हे, तर इतर खंडांमधील अनेकविध फारशा माहीत नसलेल्या आगळ्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यास प्राधान्य देताना दिसताहेत. पर्यटनाची कल्पनाच आता आमूलाग्र बदलते आहे, तशीच वीकेण्डची कल्पनाही आता स्थिरावली आहे. पाच दिवसांच्या आठवडय़ाला सुरुवात करणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रापासून सुरू झालेला हा प्रवास आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही संकल्पनाही चांगलीच रुजलेली असेल. अलीकडे तर वीकेण्डसाठी मलेशिया किंवा थायलंडला जाणाऱ्या उच्चमध्यमवर्गीय भारतीयांची संख्या वाढली आहे. विदेशात पर्यटन हा महसूल मिळवून देण्यासाठीचा राजमार्ग म्हणून या क्षेत्राकडे पाहिले जाते. आपल्याकडे मात्र आजही सरकारी अनास्थेचाच अनुभव पदोपदी येतो.
निसर्गाने आपली श्रीमंती मुक्तहस्ते उधळलेला देश असे भारताचे वर्णन नेहमीच केले जाते. प्रत्यक्षात त्या श्रीमंतीचा उपयोग आपण पर्यटनाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर महसूल मिळविण्यासाठी फारसा केलेलाच नाही. केरळसारख्या एक- दोन राज्यांचाच काय तो अपवाद. एरवी ७०० आणि ७५०० किमी.ची किनारपट्टी अशा बाता आपण अनुक्रमे महाराष्ट्र आणि भारताच्या बाबतीत मारत असतो. मात्र आपण ना या किनारपट्टय़ांची काळजी घेत ना, कल्पक पर्यटनासाठी त्यांचा वापर करत.
विदेशात मात्र अगदी लहानशा किनारपट्टय़ांचा वापरही अनेक देशांनी अतिशय कल्पकतेने केलेला दिसतो. अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनामुळे जगातील महत्त्वाची म्हणून नोंदली गेली आहे. आपल्या देशात काय नाही? वाळवंट आहे, बर्फाळ हिमालय आहे, निळाशार समुद्र अर्थात प्रचंड मोठ्ठी किनारपट्टी आहे. हा तोच देश आहे, ज्याचा उल्लेख सोन्याचा धूर येणारा देश असा केला जायचा. भारतात सोन्याच्या खाणी नाहीत. हे सोने जलमार्गे केलेल्या व्यापारातून भारतात आले, ही इसवीसन पूर्व शतकातील बाब आहे. आजही जलमार्ग हाच सर्वात स्वस्त मार्ग असल्याने ८२ टक्केजागतिक व्यापार जलमार्गे होतो. मात्र आपण आपले जलमार्ग बाद केले आणि विकासाचे हमरस्ते स्वीकारले. छत्रपती शिवाजी महाराजांनाही हे लक्षात आले की, स्वराज्यात येणाऱ्या महसुलातील ७५% भाग हा सागरीमार्गे होणाऱ्या व्यापारातून येतो, म्हणून त्यांनी राजधानी घाटमाथ्यावर रायगडावर आणली. मात्र इतिहासातून आपण काहीच शिकलो नाही. आता संरक्षणासाठी भारतीय नौदल आहे आणि तटरक्षक दलदेखील. काळही बदलला आहे. या सुरक्षित किनाऱ्यांचा वापर पर्यटनासाठी खासकरून सुखासीन पर्यटनासाठी व्हायला हवा. विदेशी पर्यटक कोकणातील निसर्ग पाहून हरखून जातात. निळे पाणी आणि हिरवी धरित्री हे त्यांचे स्वप्न असते. मात्र कोकणच्या विकासाचा कॅलिफोर्निआ तर दूरच, इथे अद्याप आपण व्यावसायिक पर्यटनापासून कोसो दूर आहोत. न्याहारी निवास ही संकल्पनाही आता जुनी झाली. मात्र आपण आजही त्याच संकल्पनेच्या आजूबाजूला घुटमळतो आहोत. आता जगभरात पारंपरिक वारसा लाभलेल्या पर्यटनस्थळांचा वेगळा ट्रेण्ड आहे. पण आपण मात्र अजूनही अजिंठा- वेरुळच्या बाहेर पडायलाही तयार नाही. बरं, अजिंठा- वेरुळही आपण खरोखरचं जागतिक दर्जाच्या सोयी असलेले केले आहे का? याचेही पूर्ण उत्तर सकारात्मक देता येत नाही. मग आपण एवढा काळ केले काय? तर आपण फक्त वेगवेगळ्या नावांनी, शीर्षकांखाली निमित्त साजरे करण्यात वेळ घालवला आणि दर्शन घडवले ते आपल्याला कल्पनेचेही वावडे आहे, याचेच! आता या कल्पनादारिद्रय़ापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे!
@vinayakparab
vinayak.parab@expressindia.com