विचार
येत्या १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १५० वी जयंती आहे. भारतीय संस्कृतीची अस्मिता आणि तिचे स्वत्त्व पाश्चात्त्य जगाला पटवून देण्यात त्यांचा मोठा हातभार असला तरी त्यांच्या विचारांमागचा, प्रेरणांचा मूळ स्रोत बौद्ध धर्मात सापडतो अशी मांडणी या लेखात केली गेली आहे.
स्वामी विवेकानंद हे भारतमातेचे थोर सुपुत्र होते. दुर्दैवाने त्यांना ३९ वर्षांचे अल्प आयुष्य लाभले, परंतु या अल्पस्वल्प कालपटलावरही त्यांनी जे कार्य केले ते लक्षवेधक ठरले. इतिहासाच्या आसमंतात अचानक वीज चमकावी तसे ते चमकले आणि बघता बघता अस्तंगत पावले. भारतीय समाजसंस्कृतीवर लादल्या व रुजल्या गेलेल्या परकीय धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय गुलामगिरीच्या पाश्र्वभूमीवर स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला. आधी मुस्लीम धर्म आणि त्यांची राजसत्ता, त्यापाठोपाठ ख्रिश्चन धर्म आणि त्यांची राजसत्ता यांच्या सहा-सातशे वर्षांच्या सलग अमलामुळे भारतीय संस्कृतीची अस्मिता आणि तिचे स्वत्त्व पार धुळीला मिळाले होते. हे स्वत्त्व आणि ही अस्मिता आधुनिक भारताच्या इतिहासात पहिल्यांदा चैतन्यमय आणि आभाळभर केली ती स्वामी विवेकानंदांनी!

त्या काळात परकीयांकडून भारतीय संस्कृतीला सरसकटपणे हिंदू संस्कृती किंवा हिंदू धर्म म्हटले जात असे. या हिंदू धर्मसंस्कृतीचा गौरव करण्याचा आणि त्याद्वारे भारतीयांचा लयाला गेलेला आत्मविश्वास पुनश्च फुलविण्याचा पहिलावहिला प्रयोग स्वामी विवेकानंदांनी केला. अर्थात, हे करत असताना त्यांच्या ठायी असलेली चिकित्सक वृत्ती नेहमीच जागी राहिली. अंधश्रद्धाळूपणाने त्यांनी हिंदू धर्मसंस्कृतीचा उदोउदो केला नाही. ते महात्मा गांधींच्या अगोदर जन्माला आले आणि त्यांच्या मृत्यूअगोदर मृत्यू पावले. त्यांनी जगभर केलेल्या भाषणांचा, प्रसंगपरत्वे लिहिलेल्या लेखांचा, शिष्यांना तसेच मित्रमैत्रिणींना पाठविलेल्या असंख्य पत्रांचा, किंबहुना त्यांच्या एकूणच जीवनाचा आढावा घेतला तर काही गोष्टी अगदी निर्विवादपणे (आणि खरे म्हणजे आश्चर्यकारकपणे) समोर येतात. त्यातल्या अनेक गोष्टी प्रचलित समजुतींना धक्का देणाऱ्या आहेत. ज्या हिंदू धर्मसंस्कृतीचा ते गौरव करत होते, ती धर्मसंस्कृती नेमकी कशी आहे, तिच्यात नेमके चांगले काय आहे इत्यादींचे विश्लेषण करण्याची त्यांची स्वत:ची खास पद्धत आहे. ते काही तत्त्वमूल्ये महत्त्वाची मानतात आणि त्या निकषांवर चांगले-वाईट ठरवितात. हिंदूंच्या सगळ्याच गोष्टी निरपवादपणे चांगल्या आहेत असे ते म्हणत नाहीत. त्यांनी हिंदू धर्मातल्या अनेक बाबींवर अक्षरश: निकराचे हल्ले चढविले आहेत. त्यामुळे त्यांना नक्की काय म्हणायचे होते वा काय करायचे होते, हे काळजीपूर्वक तपासावे लागते. खरे तर विवेकानंद म्हणजे एक प्रकारचा गुंता होय! त्यांचे आकलन करून घेताना त्यांच्या भाषेला भुलल्यास हमखास फसगत होते. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी जे कृतिशील विचार मांडले, त्या विचारांमागच्या प्रेरणांचा, या प्रेरणांमागे लपलेल्या मूलस्रोतांचा शोध घेणे अटळ ठरते.
विवेकानंद ज्या वेळी हिंदू हा शब्द वापरतात, त्या वेळी ते हिंदुस्तानच्या (इथे हा शब्द हेतुपुरस्सर योजला आहे. कारण परकीय लोक भारताच्या संदर्भात हिंदुस्तान हाच शब्द वापरत आणि हिंदुस्तानातील सर्वाना एकाच मापाने मोजत!) भूमीवर उदयाला आलेल्या सर्वच धर्माचा आणि संप्रदायांचा समावेश त्यात करतात. ही दृष्टी किंवा भूमिका निश्चितपणे पाश्चिमात्यांची होती. आज हिंदू धर्माचा ज्याप्रमाणे बौद्ध, जैन, शीख इत्यादींना वगळून विचार केला जातो, तसा त्या वेळी केला जात नसे. वास्तविक, भारतीय भूमीवर जे विविध धर्म उदयाला आले ते एकाच समाजातून निर्माण झालेले असले तरी ते एकच आहेत वा एकाच धर्माचे भाग-उपभाग आहेत असे समजणे चूक ठरेल. कारण धर्म म्हणजे निश्चित विचार आणि विशिष्ट श्रद्धा, विश्वास व आचारसरणी! एकाच समाजाचे भाग असणे म्हणजे एकाच धर्माचे भाग असणे नव्हे! वैदिक विचार-आचार आणि बौद्ध, जैन, शीख इत्यादी विचार-आचार एकमेकांशी फारसे कुठे जुळत नाहीत. त्यामुळे ते एकाच धर्माचे पंथ आहेत असा निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही. हे सारे धर्म एकाच भू-सांस्कृतिक अवकाशातले आहेत एवढय़ा एका कारणामुळे ते एकाच पारडय़ात टाकता येत नाहीत! ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम हेही एकाच समाजात जन्माला आलेले धर्म असले, एवढेच नव्हे तर, एकाच पुस्तकातून त्यांचा उगम झालेला असला (अहल-ई-किताब), तरीही त्यांना वेगवेगळे धर्म समजले जाते. भारतात मात्र वैदिक, बौद्ध, जैन, शीख आदी धर्माना हिंदू नावाने एक समजण्याचे व एकत्र बांधण्याचे प्रयत्न होत असतात. हे प्रयत्न बाहेरचे लोक करतात त्या वेळी ते प्रादेशिक भूमिकेतून करतात. (म्हणजे सिंधू नदीच्या प्रदेशात रहिवास असणारे ते सिंधू! ‘स’ चा उच्चार ‘ह’ याप्रमाणे ‘सिंधू’चा उच्चार हिंदू’! पश्चिमेकडून जे जे लोक येत, केवळ तेच भारतीय भूमीला ‘हिंदुस्ताँ’ संबोधत! इथले कुणीच स्वत:ला हिंदुस्तानी म्हणवून घेत नसत. आजही कोल्हापूर असो, कलकत्ता असो, म्हैसूर असो की तिरुपती, यापैकी कुठलाच माणूस ‘मी हिंदुस्तानी आहे’ असे म्हणत नाही!) या हिंदुस्ताँ’मध्ये राहणाऱ्या सर्वाना हिंदू नावाने ‘एक’ (म्हणजे एका छत्राखालचे) समजण्याचे प्रयत्न इथले वैदिक करतात त्या वेळी मात्र ते फार धूर्तपणे केलेले असतात. सर्वसमावेशकतेच्या व सामावून घेण्याच्या उदात्त भावनेने ते असे करतात असे बऱ्याच जणांना वाटते. (किंबहुना,  बहुतेकांचा असाच भाबडा गैरसमज आहे!) परंतु त्यात उदात्त वगैरे काही नाही. उलट, त्यात कुटिल राजकारण आहे.

EY India , Infosys, employee , work culture,
शहरबात : ‘आयटीनगरी’ची कथा अन् व्यथा : ईवाय इंडिया ते इन्फोसिस…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!

भारतीय समाजव्यवस्थेत जे जे चांगले घडलेले आहे, ते ते सारे आमचेच, असे सांगत प्रत्येक चांगल्या गोष्टीचे श्रेय स्वत:कडे घ्यायचे हे वैदिक धर्ममरतडांचे नेहमीचे धोरण होते. त्यासाठी ‘आम्ही सारे एकच’ असे सर्वसमावेशकतेचे सोंग आणणे आवश्यक होते. ‘आम्ही वेगवेगळे आहोत’ असे ते सांगत राहिले असते तर प्रत्येकाचे माप ज्याच्या त्याच्या पदरात टाकणे क्रमप्राप्त झाले असते आणि मग कोण किती पाण्यात उभे आहे हे जगाला दिसले असते. हे दाखवायचे नव्हते म्हणूनच तर वर म्हटल्याप्रमाणे ‘आम्ही सारे एक’ ही उद्घोषणा वारंवार करणे भाग होते. बाहेरच्यांसमोर ‘बौद्ध वगैरे आमचेच आहेत’, अशी साळसूद मांडणी करायची आणि प्रत्यक्षात मात्र, बौद्ध आणि अन्य अवैदिक परंपरा नष्ट करण्यासाठी क्रूर कारस्थाने करायची, असा व्यवहार होत राहिला. पण याच्यात, बौद्धांनी पुरस्कारलेले विचार हे त्यांचे नसून आमचे आहेत, असे उघडपणे कसे सांगायचे, ही अडचण होती! त्यासाठी काहीएक आडपडदा वा आडोसा हवा होता.

आणखी वाचा – धर्म नाही, कुटिल राजकारणच जबाबदार!

इथल्या इस्लामपूर्व समाजाला उद्देशून पर्शियनांनी वापरलेल्या हिंदू या शब्दाने आडोशाची ही गरज भागवली. आपला हिंदू धर्म फार उच्च, उदात्त, सहिष्णु, सर्वसमावेशक आहे असे ‘जनरल’ विधान करून त्यातले नक्की चांगले काय आहे याची वाच्यता टाळायची आणि असे करत करत हळूहळू, हिंदू धर्म चांगला आहे याचा अर्थ त्यातला वैदिक प्रवाह हाच चांगला, मुख्य व सत्ताधारी प्रवाह आहे, आपली सर्वाची संस्कृती ही वैदिक संस्कृती आहे, बौद्ध, जैन वगैरे प्रवाह इथलेच असले तरी त्यांना आपली संस्कृती समजता कामा नये, असा समज इथल्या समाजमनावर िबबवायचा, हा प्रकार सुरू झाला. परिणामी, आपली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती हा संस्कार सर्वावरच झाला. आजही हाच संस्कार आपल्या एकूण समाजावर आहे. बहुजन समाजातला सामान्य माणूस, की ज्याचा वैदिक धर्माशी आणि धर्मशास्त्रांशी काहीही संबंध नाही, त्यालाही वैदिक संस्कृती हीच आपली संस्कृती आहे असेच वाटते. या संस्काराचा परिणाम इतका व्यापक आणि प्रभावी होता, की त्यातून विवेकानंदांसारखे प्रज्ञावंतही सुटू शकले नाहीत. अखेरच्या काळात त्यांना सत्य क्रमाक्रमाने समजू लागले, पण तेवढय़ात त्यांचे निर्वाण झाले.

या पाश्र्वभूमीवर विवेकानंदांचे विचार, त्यांना अभिप्रेत असलेले समाजपरिवर्तन, त्या दृष्टीने त्यांनी आखलेले प्रत्यक्ष कृतिकार्यक्रम आणि या कार्यक्रमांचे आशयस्वरूप यांचा विचार करावा लागतो. या टप्प्यावर विवेकानंदांच्या तोंडी असलेली हिंदू धर्माचे गौरवीकरण करणारी भाषा आणि त्या भाषेचा शब्दफुलोरा जरा बाजूला काढला तर ते सरळसरळ बुद्धिझमचा पुरस्कार करत आहेत, त्यांच्या कृतिकार्यक्रमांची पावले तिकडे पडताहेत हे स्पष्ट होऊ लागते! ज्या वेळी विवेकानंद हिंदू धर्माचा गौरव करतात, त्या वेळी ते हिंदू धर्माच्या वैदिक अंगाचा गौरव करत आहेत असे आपल्याला वाटत राहते. प्रत्यक्षात, जरा बारकाईने पाहिल्यास, वेगळेच चित्र समोर येते. भाषणाच्या ओघात वेदान्ताचे ते करत असलेले उदात्तीकरण आणि प्रत्यक्ष त्यांच्या कार्यातले आग्रह यांचा सुसंगत मिलाफ कुठेच होताना दिसत नाही. अज्ञानाने, अनारोग्याने, दारिद्रय़ाने गांजलेले देशवासीय पाहिल्यावर ते प्रचंड अस्वस्थ होत असत. दलित, पीडित, शोषित यांच्याबद्दल त्यांच्या मनात अपार कणव होती आणि त्यांच्यासाठी काहीही करायची तयारी इतकी असे की, अशा वेळी ते सारे वेदान्त निर्दयपणे झुगारून देण्याची भाषा बोलत! त्यांच्या अंतर्मनात एका बाजूला वेद-वेदान्त आणि दुसऱ्या बाजूला समता, न्याय, नीती, विवेक, सेवाभाव ही मूल्ये, अशा प्रकारचे द्वंद्व ज्या ज्या वेळी निर्माण होत असे, त्या त्या वेळी ते अगदी नि:संदिग्धपणे समतेचा, विवेकाचा व सेवाभावाचा मार्ग पुरस्कारत! वेदप्रामाण्याऐवजी विवेकप्रामाण्याकडे त्यांचा स्पष्ट कल होता. आता हे उघडच आहे की, वेद-वेदान्त हा हिंदू धर्माचा गाभा होता, तर समता, न्याय, नीती, विवेक, करुणा, सेवाभाव हा बौद्ध धर्माचा! मग विवेकानंदांच्या प्रतिपादनाचा आंतरिक प्रेरणास्रोत कोणता म्हणायचा?

विवेकानंद अमेरिकेत सर्वधर्म परिषदेला गेले, तिथे जमलेल्यांना उद्देशून ‘ब्रदर्स अँड सिस्टर्स’ म्हणाले आणि त्यानंतर त्यांच्या नावाचा सर्वदूर गाजावाजा झाला. त्यांनी ‘ब्रदर्स अँड सिस्टर्स’सारखे जे चांगले विचार मांडले, त्याची प्रेरणा हिंदू धर्मात नसून बौद्ध धर्मात असल्याचे स्पष्टपणे दिसते. समतेची-बंधुत्वाची-मित्रतेची म्हणजेच ‘ब्रदर्स अँड सिस्टर्स’ची भूमिका हिंदू धर्माने कधीही मांडलेली नाही. त्यामुळे स्वामीजी हिंदू धर्माचे नव्हे तर समतेची-बंधुत्वाची-मित्रतेची भूमिका मांडणाऱ्या बौद्ध धर्माचे वारसदार ठरतात. त्यांनी सेवाभावी वृत्तीचा धरलेला आग्रह हा हिंदू धर्माचा वारसा नसून बौद्ध धर्माचा आहे. त्यासाठी प्रसंगी ते हिंदू धर्माचा वेद व वेदान्त हा पायाही नाकारतात. ३० मे १८९७ ला अल्मोरा येथून त्यांनी प्रेमदादास मित्र यांना एक पत्र पाठवले. त्यात ते लिहितात, ‘मला एक सत्य जाणवले आहे ते असे की, परोपकार हाच धर्म होय.

आणखी वाचा – ‘अनुभवच आपला गुरु’ हे सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांची जयंती

काही वेळा विवेकानंदांनी बौद्ध धर्मावरही टीका केली त्यामुळे विवेकानंद बौद्ध धर्माच्या विरुद्ध होते असा सूर आळवला जातो. परंतु स्वामी विवेकानंदांनी बौद्ध तत्त्वज्ञानावर टीका केलेली नसून अनेक कारणांनी मधल्या काळात बौद्धधर्माला जे स्वरूप प्राप्त झाले त्यावर ताशेरे ओढलेले आहेत.

विधिअनुष्ठाने इत्यादी गोष्टी म्हणजे निव्वळ खुळेपणा आहे. इतकेच नव्हे तर, स्वत:च्या मुक्तीची इच्छा बाळगणे हेही चूक आहे. जो समाजासाठी सर्वस्वाचा त्याग करतो तोच मुक्त होतो. उलट, जे लोक ‘माझी मुक्ती’, ‘माझा मोक्ष’ असा अहोरात्र जप करतात ते नुसतेच भटकत असतात.’ (अशीच टीका बुद्धानेही केली होती.) अशा तऱ्हेने स्वामीजींनी वेद (म्हणजे कर्मकांड) आणि वेदान्त (म्हणजे उपनिषदे) दोन्ही मोडीत काढले आणि बुद्धाच्या लोकसेवेच्या पाऊलवाटेवर पाय ठेवला. मात्र ‘आपण वैदिक हिंदू आहोत’ ही जाणीव परंपरेने/जन्माने प्राप्त झालेली असल्यामुळे ‘वैदिक हिंदू असण्याचा’ मानसिक वारसा ‘बाय डिफॉल्ट’ त्यांच्या पदरात पडलेला होता. त्यामुळे त्याच चौकटीतून ते आपले विचार मांडत राहिले. (हाच तो गुंता!) बुद्ध हा सर्वश्रेष्ठ महामानव असल्याचे त्यांनी अनेक वेळा म्हटले आहे. परंतु तरीही त्याचा प्रवाह वेगळा आणि आपला प्रवाह वेगळा, असा ‘आपपरभाव’ मनात सतत कुठेतरी वावरत राहिला. (जसा आज बहुसंख्य हिंदूंच्या मनात असतो!) वर उल्लेख केलेल्या संस्काराचा हा परिपाक होता हे उघड आहे. परिणामी, म्हणताना हिंदू धर्माला महान म्हणायचे, परंतु विचारांच्या आणि कृतीच्या पातळीवर त्या धर्माच्या मार्गाने न जाता, ज्या बुद्धिप्रामाण्यवादी मार्गाने बुद्ध गेला त्या मार्गावरच्या विचारांची/ कार्यक्रमांची समाजाला आवश्यकता आहे असे सांगायचे (कारण त्याशिवाय पर्यायच नाही), अशी कसरत करणे भाग पडले. या कसरतीत विसंगती आहे याची जाणीव विवेकानंदांना होऊ लागली होती. त्यांची वक्तव्ये याची साक्ष देतात.

आद्य शंकराचार्याना हिंदू धर्माचे संस्थापक मानण्यात येते. गंमत म्हणजे हिंदू धर्माच्या या संस्थापकालाच ‘छुपा बौद्ध’ म्हटले जात असे! विशेष म्हणजे असे म्हणण्याची प्रथा वैदिक परिवारात होती, बौद्ध परंपरेत नव्हे! शेकडो वर्षे चालत आलेल्या या वैदिक प्रथेचा सरळ अर्थ ‘शंकराचार्यानी बऱ्याच गोष्टी बुद्धिझममधून शिकल्या’ असा होतो, हे अगदी स्पष्ट आहे. शंकराचार्य, त्यांचे गुरू आणि या गुरूंचे गुरू हे सर्वजण बौद्ध तत्त्वज्ञानाच्या परंपरेत शिकूनच पुढे आले हे ऐतिहासिक सत्य आहे. नंतरच्या काळात त्यांनी ज्या प्रकारे बौद्ध धर्माच्या विरोधात रणिशग फुंकून वैदिक परंपरा संघटित केली त्यावरून ‘बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठीच हिंदू धर्म अस्तित्वात आला’ हेही सिद्ध होते. बौद्ध धर्माच्या वैचारिक वातावरणात प्रारंभीची जडणघडण होऊनही त्यांनी त्याच्याविरुद्धच पवित्रा घेतला. तात्त्विक पातळीवर वेदवेदान्ताबद्दलची निष्ठा प्राणपणाने जपली आणि प्रत्यक्ष व्यवहारात चातुर्वण्र्याचा, जातीव्यवस्थेचा आणि अस्पृश्यतेचा कडवा पुरस्कार केला! म्हणूनच शंकराचार्याबद्दल विवेकानंदांचे मत चांगले नव्हते. आपल्या शिष्यांशी संवाद करताना एकदा शंकराचार्याचा विषय निघाल्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले, ‘‘शंकराचार्याची बुद्धी वस्तऱ्याच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण होती. ते खूप वादकुशल होते. पण त्यांचे विचार उदार नव्हते. त्यांचे हृदयही त्यामुळे तसेच असण्याची शक्यता आहे. ब्राह्मण्याचाच नव्हे, तर ब्राह्मण असण्याचाही त्यांना खूप अभिमान होता. ब्राह्मणेतर जातींना ब्रह्मज्ञान होणार नाही ही गोष्ट वेदान्तसूत्र भाष्यात काय ठामपणे मांडली आहे त्यांनी! हे सारे सिद्ध करावयास त्यांनी दिलेली कारणे तर भयानकच आहेत. विदुराचा उल्लेख करून त्यांनी लिहिले आहे, की त्यांना ब्रह्मज्ञान झाले. कारण पूर्वजन्मी ते ब्राह्मण होते! मी विचारतो, आज जर अशा प्रकारे कोणाही शूद्राला ब्रह्मज्ञान झाले तर तुमच्या शंकराचार्याच्या मताप्रमाणे मत देऊन असे म्हणावे, की पूर्वजन्मी तो ब्राह्मण होता म्हणून झाले ब्रह्मज्ञान!.. त्यांचा अिहसक मानवतावादी दृष्टिकोन असा, की वादात हरवून कितीतरी बौद्धश्रमणांना त्यांनी जाळून मारले!.. शंकराचार्याच्या या कार्याला पाशवी म्हणावे लागेल. याउलट, बुद्धदेवाच्या हृदयाची श्रीमंती पाहा. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे तर आहेच, पण एखाद्या सामान्य बकऱ्याचा जीव वाचविण्यासाठीदेखील आपले प्राण पणाला लावायची त्यांची तयारी असायची. अशी उदारता हवी. अशी दया हवी.. त्यामुळे जिवांचे केवढे कल्याण झाले ते ध्यानात घ्या. किती आश्रम बांधण्यात आले. किती शाळा-विद्यालये स्थापन करण्यात आली. किती सार्वजनिक दवाखाने, पशुशाळा अस्तित्त्वात आल्या. स्थापत्य, शिल्पादी विद्यांचा केवढा विकास झाला. बुद्धदेवांच्या पूर्वी होते तरी काय या देशात? भुर्जपत्रावर लिहून ठेवलेली काही धर्मतत्त्वे आणि ती सारी फक्त निवडक मूठभर लोकांनाच काय ती माहीत असलेली!.. एका अर्थी तेच तर खऱ्या वेदान्ताची स्फुरणमूर्ती होते.’

आणखी वाचा – स्वामी विवेकानंद सर्वव्यापी धर्मविचार!

किती विस्मयकारक घटना आहे ही! ज्या वेदान्त तत्त्वज्ञानाचा गौरव विवेकानंद करत आहेत, त्या तत्त्वज्ञानाच्या प्रेरणास्थानी ते बुद्धाला मानत आहेत! अर्थात, विवेकानंदांचे हे शब्द जसेच्या तसे घेता कामा नयेत. कारण बुद्ध तत्त्वज्ञानापेक्षा वेदान्त तत्त्वज्ञान खूपच वेगळे आहे. वेदान्त हे कल्पनाविलासावर आधारलेले पारलौकिक तत्त्वज्ञान आहे, तर बुद्धिझम हे अनुभवप्रामाण्यावर अधिष्ठित असलेले ऐहिक तत्त्वज्ञान आहे. मृत्यूनंतर माणसाला मोक्ष मिळेल की नाही याची चिंता वेदान्त करते. बौद्ध तत्त्वज्ञान माणसाला मृत्यूपर्यंतच्या आयुष्यात (व्यक्ती व समष्टी या दोहोंच्या) दु:खाचा निरास करत करत आनंददायी जीवन कसे जगता येईल यासंबंधी दिग्दर्शन करते! विवेकानंदांच्या विवेचनाचा मथितार्थ एवढाच की, ते भारतीय संस्कृतीच्या उभारणीत बुद्धाच्या आद्य योगदानाला इतर कुणाहीपेक्षा सर्वात महत्त्वपूर्ण व मूलभूत मानत होते.

काही वेळा विवेकानंदांनी बौद्ध धर्मावरही टीका केल्याचे आढळते. बरेच लोक ही टीका निदर्शनास आणतात आणि विवेकानंद बौद्ध धर्माच्या विरुद्ध होते (म्हणजेच ते हिंदू धर्माचे हीरो होते!) असा सूर आळवतात. परंतु या संदर्भात खोलात गेल्यास वेगळीच माहिती मिळते. खरी गोष्ट अशी आहे की, स्वामी विवेकानंदांनी बौद्ध तत्त्वज्ञानावर टीका केलेली नसून अनेक कारणांनी मधल्या काळात बौद्धधर्माला जे स्वरूप प्राप्त झाले त्यावर ताशेरे ओढलेले आहेत.

अमेरिकन शिष्या श्रीमती ओली बूल यांना ५ मे १८९७ रोजी कलकत्त्याहून पाठवलेल्या पत्रात स्वामीजी लिहितात, ‘..माझी अगदी पूर्ण खात्री झालेली आहे की, लोक ज्याला आजचा हिंदू धर्म म्हणतात तो म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून अवकळा प्राप्त झालेला बौद्ध धर्मच आहे. हिंदूंना हे स्पष्टपणे समजलं पाहिजे. तसं झालं म्हणजे फारशी खळखळ न करता तो टाकून देणं त्यांना सोपं जाईल. बुद्धांनी उपदेशिलेला पूर्वीचा जो बौद्ध धर्म होता त्याच्याबद्दल आणि स्वत: बुद्धाबद्दल मला अत्याधिक आदर आहे.’

आणखी वाचा – विवेकानंदांचा ‘ईश्वरवाद’

मृत्यूपूर्वी दोन वर्षे अगोदर, २९ मे १९०० रोजी सनफ्रान्सिस्को येथे झालेल्या भाषणात विवेकानंद म्हणतात, ‘..राजांनी जरी उपनिषदे शोधून काढली वा रचली तरी ती पुरोहितांच्या हातात होती. मात्र उपनिषदांचे असे फारच थोडे राज्य होते. त्यातून राजे व पुरोहित यांचा संघर्ष अटळ होता. या संघर्षांत बौद्धधर्माचे बीज आहे. बौद्ध धर्माने सगळ्या जाती, सगळे पंथ निकालात काढले. त्याने राजा आणि पुरोहित यांनी निर्माण केलेल्या जनतेच्या शृंखला तोडून टाकल्या. अशा प्रकारे भारतात महान धार्मिक कल्पना अस्तित्वात आली. परंतु अद्यापि त्याचा प्रचार व प्रसार व्हावयाचा आहे. हा प्रसार झाल्याशिवाय काहीही हित व्हावयाचे नाही..’

आणखी एका ठिकाणी विवेकानंद लिहितात, ‘बुद्धदेवांच्या जीवनाचे अनुशीलन केल्यास हे स्पष्टपणे प्रतीत होते की, एखाद्याचा ईश्वरावर मुळीच विश्वास नसला, कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाकडे त्याचा ओढा नसला, त्याने कोणत्याही संप्रदायाची कास धरलेली नसली किंवा तो कोणत्याही मंदिरात देवदर्शनार्थ जात नसला, फार काय पण तो जरी बाह्य़त: नास्तिक वा जडवादी वाटत असला, तरीही तो ती चरम अवस्था प्राप्त करून घेण्यास समर्थ होऊ शकेल यात काहीच संदेह नाही.. त्यांच्या अपूर्व हृदयाचा एक लक्षांशही मला लाभला असता, तर मी स्वत:ला धन्य मानले असते.’
या सर्व चर्चेवरून कोणता निष्कर्ष काढावा? विवेकानंद खरोखर आणि मनोमन कुणाचा वारसा चालवीत होते? वैदिक हिंदू धर्माचा की बौद्ध धम्माचा?

Story img Loader