वारी हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर दरवर्षी नेमाने पंढरीला जाणारे वारकरी येतात. पण या वर्षी जून महिन्यात अकोला ते पंढरपूर अशी तरुणांची एक वेगळीच वारी गेली. तीही सायकलवरून आणि माणुसकीचा संदेश घेऊन..
पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा सांगणाऱ्या काही तरुणांनी नुकतीच अकोला ते पंढरपूर सायकल अशी सायकल वारी करून ‘प्रवास माणुसकीचा.. युवा शक्तीच्या समर्पणाचा’ नारा दिला. त्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्य़ातून तरुण सहभागी झाले होते. समर्पण प्रतिष्ठान, अकोला आणि वेध ट्रस्ट, आळंदी (देवाची) या दोन संस्थांनी ही ६४४ किलोमीटरची सायकल वारी आयोजित केली होती. त्यात राज्याच्या विविध जिल्ह्य़ांतून ५६ पेक्षाही जास्त तरुण सहभागी झाले होते. नऊ मुलीही होत्या. ६४४ किलोमीटरचा हा सालकल प्रवास १२ मुक्कामांसह १२ दिवसांत पूर्ण करायचा होता. त्याकरिता दररोज सरासरी ७० किलोमीटरचा सायकल प्रवास करायचा होता. १६ जूनला अकोल्यातील स्वराज भवनापासून प्रवासाला सुरुवात झाली.
या तरुणांना प्रवासादरम्यान सामान्यांचे जगणे, त्यांच्या वेदना संवेदना जाणून घ्यायचे होते. शिवाय वाटेत येणाऱ्या गावांमध्ये मशाल मोर्चा, व्यसनाधिनता, स्त्रीभ्रूणहत्या, पाणीटंचाई, प्लास्टिकचा वाढता वापर, वाढता भ्रष्टाचार या विषयांवर पथनाटय़ सादर करणं असाही कार्यक्रम होता. या उपक्रमाबद्दल समर्पणचे अमोल मानकर, सुदर्शन गावंडे, सुरज देशमुख यांनी संवाद साधला. ते म्हणतात, या उपक्रमात सामील होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांला मोफत सायकली पुरविण्यात आल्या. या सर्व सायकली उपक्रमानंतर शेतकऱ्यांची मुले, सामाजिक संस्था, आदिवासी बांधव, अनाथालयातील मुले, शाळकरी मुली, वंचितांची मुले यांना देण्यात आल्या. या सायकली डॉक्टर्स, वकील, शिक्षक, इंजिनीयर, शासकीय अधिकारी आदींनी विकत घेऊन समर्पणला दिल्या होत्या. या उपक्रमात सहभागी होणारी तरुण मंडळी १६ ते ४० या वयोगटातील होती. या प्रवासात खामगाव, बुलढाणा, जालना, अंबड, गेवराई, आर्वी, परांडा, खर्जा, कुर्डूवाडी व पंढरपूर आदी ठिकाणी मुक्काम करण्यात आला. माणुसकीच्या शोधात निघालेल्या या तरुणाईने वाटेत लागणाऱ्या अनाथालय, वृद्धाश्रम आदींना भेटी दिल्या. ज्यामध्ये गेवराईतील सहारा अनाथालय, एच.आय.व्ही बाधित लहान मुलांचा निवारा असणारी पंढरपूर शहरातील पालवी संस्था या होत्या. या सायकल वारीत अकोल्यातूनच सहभागी झालेले वाशीम जिल्ह्य़ातील कामरगाव जि.प. शाळा कारंजा लाडचे तरुण शिक्षक गोपाल खाडे, तसंच प्रज्ञा माळी (पुणे), जयश्री भुतेकर (जालना) या इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांनी आपली मतं मांडली. ते सांगतात, आमच्या प्रवासाची सुरुवात ही १६ जूनला अकोल्यातूनच झाली होती. १६ जूनच्या रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने प्रवासाचं काय होईल असं आम्हाला वाटलं होतं, पण पावसात सायकली चालवताना खूपच मजा आली. असे वाटत होते की जणू हा पाउसपण आमच्या सोबत वारीला येतोय की काय..! गोपाल खाडे म्हणाला, आमचं पहिलं पथनाटय़ निमकर्दा गावात झालं. गावकऱ्यांनी या पथनाटय़ाला दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. रोज सायकल प्रवास, गावात घोषणा, गाणी, पथनाटय आणि मशाल रॅली असा प्रवास सुरू होता. प्रवासादरम्यान सामान्य लोकांशी व विद्यार्थ्यांशी आम्ही बोलत होतो. गोदेगावचे लक्ष्मणराव वाघ, धामणगावच्या पुष्पा मावशी सुरवसे, केळी विकणारे बागवान रियाज तांबोळी अशी सर्व जातीधर्माची माणसे आम्हाला भेटली. माणुसकीच्या शोधात असलेल्या आम्हाला अनेक संवेदनशील लोक भेटले. त्यांचा, आमच्याशी काहीच परिचय नव्हता. एकमेकांकडे काहीही काम नव्हतं, पण आमचं सगळ्यांचं माणुसकीच नातं तेवढं पक्कं होतं. अकोल्यातून प्रवासाला हिरवा झेंडा दाखविणारा पाऊस पुढे मात्र हळूहळू गायब आणि नंतर नंतर तर उन्हाच्या तडाख्याने आम्ही पुरते त्रासलो होतो. पण त्यातही आमची हास्ययात्रा कायम होती. बुलढाणा जिल्हयातून प्रवास करताना वाटेत तहान लागली असताना देऊळगाव मही येथे पाच पाण्याच्या बाटल्यांचे पसे न घेणारं एक अफलातून व्यक्तिमत्त्व आम्हाला भेटले. नाव विचारले असता ते म्हणाले, ‘माणुसकीच्या प्रवासातील मीसुद्धा एक सहप्रवासी.’ ते ऐकून आम्हा सगळ्यांना गहिवरून आलं. जिथे लोक परिचीत माणसांबरोबर देखील पाण्याचा व्यापार करताना मागेपुढे पाहत नाहीत तेथे हा माणुसकीचा देवदूत आम्हाला भेटला होता. प्रवासात पुढे पुढे घाट आणि चढच जास्त होता. डांबरी सडकेसोबतच काळया, पिवळया आणि लाल मातीवरूनही आम्ही प्रवास केला. चढ आणि घाट जास्त असल्यामुळे आमची कसोटी लागायची मग मधेच कुठे उतार आला की मनाला हायसं वाटायचं. प्रवासात एकदा जयश्री, श्रीपाद, शुभम, सोमेश्वर, मुकेश व मी (गोपाल खाडे) असे आम्ही सहा जण रस्ता विसरलो शेवटी आर्वीचा रस्ता विचारत विचारत आम्ही प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. सर्व मंडळी समोर निघून गेलेली. तहान व भूक प्रचंड लागलेली. शिवाय निमगाव ते आर्वीपर्यंत मधे कुठलेही गाव नव्हते. एका शेतात दुरून काही मंडळी दिसली. त्या शेतात भुईमुगाची पेरणी सुरू होती. त्या ठिकाणी आम्ही पाणी प्यायलो. त्यावेळी तेथील वृद्ध स्त्रीने पेरण्यासाठी आणलेले शेंगदाणे माझ्या दोन्ही हातावर ओंझळभर ठेवले त्यावर मला असे वाटले की, हे शेंगदाणे सहा जणांत वाटून खाऊ पण त्या आजीने प्रत्येकाला ओंजळ भरून भरून शेंगदाणे खायला दिले. पेरणीसाठी आणलेल्या शेंगदाण्यातून त्यांनी आम्हाला ते दिले होते. त्यानंतर त्या आजीने आमच्या गालावरून मायेने फिरवलेले ते हात आम्ही कधीच विसरू शकत नाही. नकळत मनात विचार यायला लागला की विदर्भ, मराठवाडयात शेतकऱ्यांच्या जगण्याचं संकट गहिरं असतानादेखील ही दानत बघून मनात विचार यायला लागला की दुसऱ्यांची एवढी काळजी करणारा शेतकरी स्वत: मात्र आत्महत्या करण्यास मजबूर का असावा.. ?
या प्रवासाला आणखी एक किनार होती ती ही का हा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राला जोडणारा होता. अकोला ते पंढरपूर या प्रवासात विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्र आदी जोडत पूर्ण करायचा होता. त्यामुळे प्रदेश बदलला की भाषा बदलायची, माणसं बदलायची पण माणुसकी मात्र पावलोपावली तीच राहायची. प्रदेश बदलला की भाषा बदलते या गोष्टीचा एक किस्सा पथनाटय़ाच्या वेळी आमची धमाल उडवून गेला. हगणदारी मुक्तीवरच पथनाटय़ होतं. विदर्भातून बहुतेक मंडळी असल्यामुळे उघडयावरची विधी उरकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डब्याला ‘टमरेट’ हा शब्द उच्चारल्यावर लोकांना कळायचं नाही तेव्हा आमच्यातीलच या भागातील काही सहभागी मंडळींनी इकडे याला ‘भांडं’ म्हणतात असं सुचवलं. त्यामुळे बदललेला प्रदेश त्यातून बदललेली भाषा व त्या भाषेने आमचा झालेला घोळ व यावरून आमची पुरतीच धमाल उडाली.
या प्रवासात आयुष्याची पुंजी म्हणून जपून ठेवावी असे अनेक किस्से अनुभवले. त्या सगळ्यांची मांडणी करणे इथे शक्य नाही. पण या प्रवासाने आम्हाला खूप काही दिले. माणसांनी माणसांशी जोडणारा हा प्रवास वेदनेपासून संवेदनेपर्यंत हे ब्रीद अगदी सार्थक ठरवणारा होता. या प्रवासाने आम्हाला माणसं वाचण्याची संधी दिली. त्यांचे जगणे समजवून घेता आले. माणुसकी वाढवण्याचा आमचा हा अल्पसा प्रयत्न आयुष्यभराची संपत्ती ठरला आहे.
संतोष विणके – response.lokprabha@expressindia.com