लोकसभेच्या निवडणुकांच्या रणधुमाळीतील रणसंग्राम दिवसेंदिवस वाढत चाललेत. राज व उद्धव ठाकरे बंधूंमधील संबंधांचे ‘ब्लॉकेजेसही’वाढत चाललेले आपण पाहातोय. शरद पवार व गोपीनाथ मुंडे यांच्यातील फोडाफोडीचं राजकारणही वाढत चाललंय. ‘नमो’ किंवा ‘रागा’ यांना पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान झालेले पाहण्यासाठी तुम्ही आम्ही जणू काही अधीर झालोय. भ्रष्टाचार-महागाई-बलात्कारमुक्त कल्याणकारी स्थिर सरकाराद्वारे आपले कल्याण करून घेण्यासाठी सर्वाचीच घाई सुरू आहे. कल्याणकारी सरकार चालवणारे नेते कसे असतात, असावेत हे तो-तो पक्ष चालवणाऱ्या नेतृत्वाला व आपणा सर्वानाही चांगल्या प्रकारे माहीत असतेच. तरीही निवडणुकीच्या निमित्ताने त्याची उजळणी व्हावी व त्यातून कोणता बोध घ्यावा यासाठीचा हा जाहीरनामा.
खरं तर राजकारणी लोकांची तत्त्वे आणि नीतिनियम पूर्णत: भिन्न असतात. त्यांच्यातील मैत्र हे दीर्घकाळ टिकणारे नसते. मैत्रीला फारसा अर्थही नसतो आणि इतरांशी ठेवलेला नातेसंबंधदेखील फक्त व्यावहारितेकशी जोडले गेलेले असतात. राजकारणातील हेवेदावे ते वैयक्तिक संबंधांत येऊ देत नाहीत, तसेच वैयक्तिक आयुष्यातील ताणतणाव राजकीय व्यवहारात येऊ देत नाहीत. एकमेकांतील मतभेद वेळेनुसार विसरतात.
एखाद्याची भाकरी कशी आणि कधी फिरवायची, लोकांना कधी कामाला लावायचे, कुणाच्या पाठीवर कधी थाप टाकायची आणि कुणाच्या पाठीत (कुणाकडून) सुरा खुपसायचा, याचे प्रशिक्षण त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे घेतलेले असते व वेळोवेळी त्या प्रशिक्षणात ते भर घालत आपले हे कौशल्य वाढत कसे राहील यासाठी ते सदैव सज्ज असतात.
निवडणूक काळात आपल्या नावाचे, चिन्हाचे मार्केटिंग मतदारापर्यंत परिणामकारकरीत्या कसे करता येईल यासाठी वेगवेगळय़ा प्रकारच्या कल्पना यांच्या सुपीक डोक्यात घोळत असतात. त्यातूनच मग एखादा उमेदवार पैलवान मतदारांना आपले नाव, चिन्ह असलेली ‘लंगोटी’ देऊन तर कोणी स्त्री मतदारांना साडय़ा, ब्लाऊज, बांगडय़ा, घडय़ाळे (चायना), अंगठय़ा (पत्र्याच्या) अशा बाह्य परिधान वस्तूंवर आपली नावे, चिन्हे छापून पुरुष-स्त्री मतदारांना वाटून त्यांच्या तनामनावर आपले नाव-चिन्ह बिंबवून प्रचार केला जातो.
निवडणुकांआधी, प्रचारादरम्यान ‘योग्य वेळी’ तुम्हीच माझ्या राजकीय जीवनाचे ‘शिल्पकार’ कसे आहात आणि निवडणूक झाल्यावर ‘वेळोवेळी’ मीच तुमच्या संपूर्ण जीवनाचा शिल्पकार कसा आहे हे मतदारांना सतत पटवून देत असतात किंवा कमीत कमी तसा भास तरी करत असतात.
प्रचाराच्या रणधुमाळीत जनतेसमोर आश्वासने देत बोलताना, दुसऱ्यांचे उन्हेदुणे काढताना जरी जीभ घसरली, कंबरेखाली वार केला गेला, एखाद्याच्या/ एखादीच्या वैयक्तिक आयुष्यातील नाजूक प्रसंग, रंग-ढंग यावर शिंतोडे उडले गेले तर माझा तसे बोलण्याचा चुकूनही उद्देश नव्हता; परंतु जनतेने, प्रसारमाध्यमांनी त्याचा वेगळा अर्थ काढला असं पटकन एखाद्या मीडियाला ‘अर्थपूर्ण मुलाखत’ देऊन त्याचा खरा अन्वयार्थ कसा सांगायचा याचेही खास ट्रेनिंग अलीकडच्या ई-पुढाऱ्यांनी घेतले आहे, घेतले पाहिजे. एवढं सगळं रामायण-महाभारत करूनही जनता चुकीच्याच अर्थाशी एकनिष्ठ असल्यास दोन पावलं मागे सरकून माझं चुकलं असं म्हणून सुज्ञान जनताजनार्दनासमोर आपलं हसं करून घेण्याऐवजी ‘‘झाल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करून हा विषय इथेच संपवतो’’ असं सुसंस्कृतपणे म्हणण्याचे व्याकरण कौशल्यही अलीकडेच पुढारी दाखवून देतात. त्यामुळे नकारात्मक विचारांचा व्हायरस स्वत:च्या व इतरांच्या मनाला लागत नाही.
निवडणुका जवळ आल्यावर कधी शौचालयांच्या तर कधी देवळांच्या मुद्यावरून मतदारराजांच्या भावनांना-श्रद्धांना हात घालून, कधी ओल्या तर कधी कोरडय़ा दुष्काळाचे, कधी नेत्यांच्या ‘इनकमिंगचे’ तर कधी ‘आऊट गोईंगचे’, कधी एखाद्याच्या वयाचे तर कधी एखाद्याच्या ‘झालेल्या’ वयाचे, एखाद्याच्या टाळीचे तर कधी लघुशंकेचे, कधी शारीरिक उंचीचे तर कधी शारीरिक सौंदर्य- कुरूपतेचे व्यंगाचे, कधी एखाद्याच्या मफलरचे तर एखाद्याच्या सॉक्स एखादीच्या साडी-ओढणी-गॉगल-चपलांचं भांडवल करून प्रचारसभांत आपण राजकारणी, समाजसेवक असलो तरीही आपल्याकडेही विनोदबुद्धी असल्याचा निलाजरा, बूमरँगी प्रयत्न करण्यातही ही मंडळी मातब्बर असतात.
बंडखोरी, पाठीत सुरा खुपसून, या पक्षातून त्या पक्षात तर त्या पक्षातून पुन्हा याच पक्षात किंवा दुसऱ्याच नवीन पक्षात बेडूकउडय़ा मारून फोडाफोडी करून सत्ता मिळवा व राज्य करा (डिव्हाइड अ‍ॅण्ड रुल) या कूटनीतीचे कसब या मंडळींच्या अंगवळणी पडलंय. या बेडूकरावांची कातडी त्यामुळे होते गेंडय़ासारखी आणि रंग होतात रंगबदल्या सरडय़ासारखे.
वास्तविक आपण सामान्यजनांनी या राजकारण्यांकडून हे शिकायला हवं की, जेव्हा-जेव्हा, जशी-जशी, जिथे-जिथे गरज पडेल तसा आपल्या अहंकाराच्या आत्मराक्षसाचं विसर्जन करून हितसंबंधाला प्राधान्य देऊन नवा स्नेहबंध निर्माण करणे पुढाऱ्यांच्या चेतावणीखातीर आपल्याच एकमेकांची डोकी फोडणाऱ्या हातात असते. राजकारणी नेहमी म्हणत असतात, ‘‘राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही.’’ ‘‘आम्ही जातीपातीचे राजकारण करत नाही.’’ राजकारण्यांच्या व्यवहारचातुर्याला रास्तपणे आपण दाद देतो? बहुतेक नाहीच! कारण आपण सामान्य माणूस अहंकाराला स्वाभिमान समजतो, द्वेषभावना म्हणजे आपली अस्मिता मानतो, सुडाचे समाधान हे समस्येच्या समाधानापेक्षा, निराकरणापेक्षा श्रेष्ठ मानतो, कॉम्प्रमाईज करणे म्हणजे पराभव अशी आपली भावना. राजकारण्यांची नव्हे.
आपण ‘आम आदमी’ शर्टच्या बाह्य मागे सारून आयुष्यभर भांडतो आणि जन्मभर जळतो. दुसऱ्याला दु:खी बनवण्याच्या नादात स्वत:च वैफल्यग्रस्त होतो नि ‘सॅडिस्ट’ (दु:खी) माणसाप्रमाणे या क्लेषातच विकृतानंदी होतो. आपणा सामान्यांचा ‘इगो’ इतका फुसफुसत असतो की निर्माण झालेल्या रागामुळे, जवळची व्यक्ती आपल्याविरुद्ध वागल्याने आपण एवढे अपमानित होतो की एकमेकांकडे परतण्याचे पूल आपणच आपल्या हाताने उद्ध्वस्त करून टाकतो, आयुष्यभर क्षुद्र मनोवृत्तीने एकमेकांविरुद्ध कट-कारस्थाने करीत राहतो. एकमेकांचे थोबडही बघणार नाही अशी ‘भीष्मप्रतिज्ञा’ घेऊन अमलात आणतो न् सत्यानाश करून बसतो. याउलट कोणत्या गोष्टी ताणल्या तर प्रसरण पावतात व कोणत्या तुटतात याची तारतम्य बुद्धी पुढाऱ्यांजवळ असते. पण आपण सामान्य माणूस समाधानालाच साध्य मानून रागाला एखाद्या रानटी जनावरासारखा बेबंद करून ठेवत जपत राहतो तर राजकारणी आपल्या रागलोभादी पंचरिपूंना (काम हा रिपू सोडून) पाळीव प्राण्यासारखे पाळतो, पोसतो, जपत राहतो, वापरतो आणि त्यांनी केव्हा कुणावर कधी भुंकावं, चावावं आणि पट्टा आवळून त्याला परत पिंजऱ्यात कधी बंद करावं याची पुरेपूर जाण पुढाऱ्यांना असते. त्यामुळे येणाऱ्या काही काळानंतर राज व उद्धव यांच्या नात्यातील ‘ब्लॉकेजेस’ (जनतेच्याच भावनिक ट्रीटमेंटमुळे) अहंकाराचे विसर्जन झाल्याने ‘डिझॉल्व्ह’ होऊन ‘शिवमनसे’ या नवीनच पक्षाचा जन्म झालेला आपणाला दिसेल आणि या पक्षाच्या नेतृत्वाने दिलेल्या आदेशाने पुन्हा आपण सर्वसामान्य जनताच ‘खळ्खटय़ाक’ करत एकमेकांची टाळकी फोडू. तर दुसरीकडे शरद पवार व गोपीनाथ मुंडे असे दोघे मिळून उसाची मोळी हातात घेऊन एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगात पाहू. नमो आणि रागा ‘‘झाले गेले विसरून जावे पुढे..पुढे.. चालावे, जीवन गाणे,’’ असं म्हणत एकाच विशेष विमानात जवळजवळ बसून शासकीय परदेश दौरा करून आलेले ‘ब्रेकिंग न्यूज’द्वारे दिसेल. सोनिया व ममता ‘‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’’ म्हणत गळाभेट घेतलेलीही आपण पाहणार आहोतच.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Story img Loader