आम्हीही माणूसच आहोत…
साधारण तीन वर्षांपूर्वी आमची एका संस्थेच्या कार्यक्रमात भेट झाली. सोशल नेटवर्किंगमुळे ओळख वाढत गेली. भेटणे, बोलणे वाढत गेले. आम्हाला एकत्र राहण्याची गरज भासू लागली. आमचं असं एकत्र राहणं रूढ समाजाच्या चौकटीला मान्य होणार नव्हतं. मात्र आम्ही निर्णय घेतला. तीन वर्षांपासून आमचे नाते जुळून आले. तीन वर्षांपासून जरी आमचे संबंध असले तरी, दोन वर्षांपासून आम्ही एकत्र राहात आहोत. स्त्री-पुरुष नात्यापेक्षा आमचे नाते वेगळे असले तरी एखाद्या लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणेच आमचे घरातील वातावरण आहे. एकमेकातील गुणधर्म ओळखून भाजी आणणे, स्वयंपाक करणे, घराची स्वच्छता राखणे अशी घरातील कामे आम्ही वाटून घेतली आहेत. आमची भांडणेदेखील भरपूर होतात, पण ती लगेच मिटतातदेखील.
आम्ही भाडय़ाच्या घरात राहात असल्यामुळे आम्हाला आमची ओळख लपवणे गरजेचे वाटते. शेजाऱ्यांच्या नजरेत आम्ही दोन अविवाहित मुलेच आहोत. कायदा असो वा नसो आपला समाज अजून अशी नाती स्वीकारण्यास तयार नाही, त्यामुळे समाजाच्या दृष्टीने काही प्रमाणात तडजोड ही करावीच लागते, पण त्यामुळे आमच्या खासगी आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही. आमच्या जवळच्या मित्रमंडळींना आमच्या नात्याबद्दल माहीत आहे. आम्ही समलिंगी आहोत हे आमच्या आईवडिलांनादेखील माहीत आहे. मात्र आम्ही एकमेकांबरोबर नात्यात राहतो आहोत हे अजून सांगितले नाही. आम्ही आज जरी तिशीच्या आसपास असलो तरी फार काळ असे एकत्र राहणे समाजाच्या नजरेतून त्रासदायक ठरू शकते. दोन अविवाहित मुलं एकत्र राहात आहेत म्हटल्यावर राहायला जागादेखील मिळणे अवघड होऊ शकते.
समलिंगी व्यक्तींबद्दल बोलताना सर्वसाधारणपणे समाजाचा दृष्टिकोन हा सेक्स, सेक्स आणि सेक्स हाच असतो. आमच्याकडे सेक्स मॅनिक म्हणून पाहिले जाते. खरे तर आमचे प्रश्न केवळ शारीरिक नाहीत. त्यापलीकडे जाऊन मानसिक पातळीवरून याकडे पाहण्याची गरज आहे. शारीरिक फरक, लैंगिकतेतील फरक जरी असला तरी त्याही पलीकडे आम्ही माणूस आहोत. आम्हाला आवडीनिवडी आहेत, भावनिक, मानसिक गरजा आहेत. त्या आमच्या नात्यात आम्ही मिळवू पाहात आहोत. न्यायालयाने निर्णय देताना माणूस म्हणून आमच्या या गरजांचा विचार करायला हवा होता. केवळ सेक्ससाठी एकत्र येणारे जोडपे ही भावना यातून वगळून याकडे पाहणे गरजेचे होते. देशाच्या प्रत्येक नागरिकाला मिळणारी साधी वागणूकदेखील आम्हाला मिळत नाही. आम्हाला मिळते ती नागरिकत्वाची दुय्यम वागणूक, हेच आमचे खरे दु:ख आहे.
(सुरक्षेच्या कारणास्तव नावे दिलेली नाहीत.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा