मेष तुमच्या कामामध्ये आणि पर्यायाने दैनंदिनीमध्ये जे अडथळे आले असतील ते निपटून काढण्यात तुमची बरीच शक्ती आणि वेळ खर्च होणार आहे. अतिविचार करत न बसता, जे तुम्हाला योग्य वाटेल ते करण्यावर तुम्ही भर ठेवता. या गुणाचा तुम्हाला आता उपयोग होणार आहे. व्यापार उद्योगात योग्य व्यक्तींशी संपर्क झाल्यामुळे लांबलेली कामे गती घेतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचा झालेला गैरसमज तुम्ही चांगले काम करून दूर कराल. घरामध्ये कठीण समस्येवर सर्वानुमते तोडगा काढला जाईल.

वृषभ एखादी समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर त्याच्यावर काहीतरी मार्ग शोधून काढणे हे तुमचे मुख्य उद्दिष्ट असेल. कदाचित ही गोष्ट तुमच्या दृष्टीने वेळ घेणारी आणि खर्चीक असेल. पण तुमचा नाइलाज होईल. व्यापार उद्योगात पूर्वी कोणाला पैसे देण्याचे आश्वासन दिले असेल तर त्याची तरतूद होईल. तुमचा जीव भांडय़ात पडेल. नोकरीमध्ये विनाकारण लांबलेली कामे वरिष्ठांच्या आग्रहामुळे हातात घ्यावी लागतील. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या गैरसमजामुळे वादविवाद झाला असेल तर त्यात समेट घडेल.

मिथुन ‘मानलं तर समाधान’ अशी तुमची स्थिती असेल. एकीकडे रोजचे खर्च वाढण्याची नांदी होईल. पण दुसरीकडे तुमची इच्छा-आकांक्षा स्वस्थ बसू देणार नाही. व्यापार उद्योगामध्ये आर्थिकदृष्टय़ा चांगल्या योजना राबवण्यामध्ये काही अडचणी आल्या असतील तर त्या तुम्ही दूर करू शकाल. ज्या व्यक्तींनी साथ द्यायचे मान्य केले होते त्यांच्याकडून ठोस पाऊल उचलले जाईल. नोकरीमध्ये बदल करणाऱ्यांना तातडीने हालचाल करणे आवश्यक आहे. घरामध्ये कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरतील.

कर्क ज्या गोष्टी तुम्ही करायच्या ठेवल्या होत्या त्यामध्ये काहीना काही कारणाने अडथळे येत गेले. या आठवडय़ात हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणणे हेच तुमचे मुख्य उद्दिष्ट असेल. व्यापार उद्योगात नवीन कामे मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आकार घेऊ लागतील. नोकरीमध्ये वरिष्ठांनी तुम्हाला दिलेली आश्वासने लांबली असतील तर त्यासंबंधी त्यांना आठवण करून द्या. घरामध्ये एखाद्या समस्येवर उत्तर मिळाल्यामुळे सर्वाना हायसे वाटेल. तरुणांचे विवाह जमतील.

सिंह तुमच्या कामात काहीना काही कारणामुळे अडथळे निर्माण झाले असतील तर त्यातून मार्ग काढणे हेच मुख्य उद्दिष्ट असेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या तत्त्वाचा उपयोग केला तर त्याचा फायदा होईल. व्यवसाय उद्योगामध्ये पैशासंबंधी जी कामे हातातोंडाशी येऊन लटकलेली होती त्यात हळूहळू गती येईल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी तुमच्या प्रगतीसंबंधी एखादे आश्वासन देऊन ते काही तांत्रिक कारणामुळे लांबले असेल तर त्याला आता वेग मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. घरामध्ये एखाद्या शुभकार्यासंबंधी विचार होईल.

कन्या ज्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागले होते त्यातून बाहेर पडणे हेच तुमच्या पुढले सगळ्यात मोठे उद्दिष्ट असेल. आता ग्रहस्थिती सुधारत असल्यामुळे मुंगीच्या पावलांनी त्यामध्ये प्रगती दिसू लागेल. व्यवसाय उद्योगामध्ये कायदे व्यवहार किंवा कोर्टव्यवहारामध्ये सुधारणा होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी गोडीगुलाबीने राहून तुम्ही काम पूर्ण करू शकाल. नवीन नोकरीच्या कामात विलंब होईल. घरामध्ये एकेका सदस्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये तुमची शक्ती आणि वेळ खर्च होईल. विद्यार्थ्यांची उमेद वाढेल.

तूळ सध्याचे ग्रहमान जणू काही तुमच्या विरोधातच आहे. तुमच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर कामे करा. व्यापार उद्योगात गेल्या काही महिन्यांत जी परिस्थिती विस्कळीत झालेली आहे ती पूर्ववत कराल. मात्र पैशाचे गणित जमणे कठीण वाटेल. नोकरीमध्ये ज्या गोष्टी मनाविरुद्ध घडत होत्या त्या कमी झाल्यामुळे दिलासा लाभेल. घरामध्ये तुमचे न पटलेले विचार बरोबर होते असे इतरांना वाटेल. त्यांच्याकडून थोडे का होईना सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांनी कोणाचीही कॉपी न करता स्वत:च्या पद्धतीने केलेला अभ्यास उपयोगी पडेल.

वृश्चिक तुमची स्थिती कळतं पण वळत नाही अशी झाली होती, त्यातून आता बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागल्यामुळे तुमच्यामध्ये आशेचा एक किरण निर्माण होईल. त्या जोरावर तुम्हाला बरेच काम करायचे आहे. व्यापार धंद्यामध्ये तुमचे बेत सफल करण्याकरिता पैशाची कुमक निर्माण करावी लागेल. बँक अथवा हितचिंतक तुम्हाला काही प्रमाणात मदत करतील. नोकरीमध्ये तुमच्या मागण्या वरिष्ठांचा मूड बघून त्यांच्यासमोर मांडा. घरामध्ये एखादा शुभकार्यक्रम किंवा प्रवासाचे बेत ठरतील.

धनू कर्तव्य आणि मौजमजा याचा समन्वय घडवून आणणारा हा सप्ताह आहे. दोन्ही गोष्टींना सारखेच प्राधान्य असेल. व्यापार उद्योगात नेहमीच्या कामामध्ये गरजेपुरतेच लक्ष घालाल. नोकरीमध्ये कामाच्या वेळेला काम आणि इतर वेळेला आराम करण्याचा तुमचा इरादा असेल. घरातील व्यक्तींसमवेत वेगवेगळे काम कराल. प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्याचा विचार मनात डोकावेल. कलाकार आणि खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात चांगली मागणी राहील. आवडत्या छंदामध्ये थोडा वेळ घालवाल.

मकर घरामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील तर त्याचे निराकरण होण्याची आशा निर्माण होईल. उद्योग व्यवसायाच्या कामात जर शिथिलता आली असेल तर आता त्यामध्ये हळूहळू गती येईल. सरकारी कामे व कोर्टव्यवहार अशा कामांना वेग द्याल. प्राप्तीचे प्रमाण वाढण्याची चिन्हे दिसू लागतील. नोकरीमध्ये ज्या कामात तुम्ही आळस केला होता त्यामध्ये लक्ष घालण्याची इच्छा होईल. परंतु प्रमाणाबाहेर काम करण्याचे तुम्ही टाळाल. घरामध्ये सर्वाच्या संमतीनुसार एखादा चांगला कार्यक्रम ठरेल.

कुंभ ज्या ग्रहांची तुम्हाला साथ हवी होती ती मिळाल्यामुळे परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ लागेल. तुमचा हुरूप वाढेल. व्यवसाय उद्योगात नवीन आर्थिक वर्षांकरिता जे बेत तुम्ही आखून ठेवले होते, पण ज्यामध्ये काहीना काही अडथळे आले होते त्यावर तोडगा निघेल. योग्य व्यक्तींचा सल्ला आणि सक्रिय मदत तुम्हाला मिळू शकेल. नोकरीमध्ये ज्या चांगल्या संधींनी तुम्हाला हुलकावणी दिली होती त्याचा तुम्ही पाठपुरावा कराल. तरुणांच्या जीवनात बहार येईल. खरेदीचे बेत पार पडतील.

मीन तुमचा काहीही दोष नसताना ज्या प्रश्नांमध्ये तुमचा विनाकारण वेळ किंवा शक्ती खर्च झाली होती त्यातून बाहेर पडायला ग्रहमान चांगले आहे. सभोवतालच्या व्यक्तींची काहीही गरज असो पण तुम्ही आता मात्र जीवनाचा आस्वाद घ्यायचा ठरवाल. नोकरीमध्ये एखादे किचकट आणि कंटाळवाणे काम संपण्याची चिन्हे दिसू लागतील. घरामध्ये विरंगुळा देणारे आणि करमणूक करणारे काही कार्यक्रम सर्वानुमते ठरतील.

Story img Loader