ओंकार ओतारी, गणेश तसेच चंद्रकांत माळी या कुरुंदवाडमधल्या तरुणांनी कॉमनवेल्थ स्पर्धामध्ये घवघवीत यश मिळवून आपल्या गावाचे नाव जगाच्या नकाशावर नेऊन पोहोचवले आहे.
एक खेळ, एक प्रशिक्षक, एक गाव अन् एकाच स्पध्रेत एकसारखेच बक्षीस असा एकसमान धागा जुळला आहे तो कुरुंदवाडमधील तिघा खेळाडूंमध्ये. गणेश माळी, ओंकार ओतारी व चंद्रकांत माळी या तिघांच्याबाबतीत ही एकवाक्यता दिसते. पण तिघांचे वैयक्तिक जीवन मात्र वेगळ्या वाटांनी जाणारे आहे. गणेश माळी व ओंकार ओतारी यांच्या घरची परिस्थिती आत्यंतिक हलाखीची असतानाही केवळ प्रशिक्षकांच्या सर्व प्रकारच्या साहाय्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पध्रेत ते चमकू शकले. चंद्रकांत माळी याच्या घरी मात्र गोकुळ नांदते आहे. विभक्त कुटुंब सर्वत्र पाहायला मिळत असताना चंद्रकांतच्या कुटुंबात मात्र चाळीस जण हातात हात घालून मार्गक्रमण करताना दिसतात.
राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत गणेश, ओंकार व चंद्रकांत या तिघांनी वेटलििफ्टग या क्रीडा स्पध्रेत कांस्य पदकांची कमाई केली. या यशाने कृष्णाकाठच्या कुरुंदवाडचे नाव सर्वतोमुखी झाले. प्रशिक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या त्रिमूर्तीच्या यशाने कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा परंपरेची पताका आणखी उंचावली आहे. तिघांचेही यश कौतुकास्पद आहे. पण त्यामागे त्यांनी घेतलेली मेहनत उल्लेखनीय ठरली आहे. विशेषत: गणेश व ओंकार या सामान्य कुटुंबातील खेळाडूंचे यश प्रेरणादायी आहे. नातलगांनी केलेल्या आग्रहामुळे हे दोघेही वेटलििफ्टगकडे वळले आणि सातत्यपूर्ण सराव करीत त्यांनी धवल यश प्राप्त केले.
गणेश माळी याची कौटुंबिक परिस्थिती बेताची. वडील चंद्रकांत हे इमारतींना रंग देण्याचे काम करतात. तर आई अनिता शेतामध्ये मोलमजुरी करून कुटुंबाची गुजराण करते. गणेशचा चुलत भाऊ रवींद्र याला वेटलििफ्टगची आवड होती. त्याने गणेशमधील या खेळातील गुण हेरले. त्यातूनच रवींद्रने गणेशला प्रशिक्षक प्रदीप पाटील यांच्या हक्र्युलस जिममध्ये नेले. रवींद्रला या खेळात प्रगती साधायची होती. पण त्याची इच्छा अपुरी राहिली. अधुरी राहिलेली इच्छा रवींद्रने गणेशच्या रूपात साकार करून घेतली आहे. गणेशची आíथक स्थिती बिकट असल्याने त्याच्या प्रशिक्षणासह अन्य खर्चाचा भार प्रदीप पाटील यांनी उचलला. यामुळे गणेशवरील दडपण दूर झाले. या खेळाचा तो कसून सराव करीत राहिला आणि त्याचे अत्युच्च फळ म्हणजे स्कॉटलंड राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत ५६ किलो वजनी गटात त्याने मिळविलेले कांस्यपदक. गणेशच्या यशामुळे आई-वडील दोघेही सुखावले आहेत. तो या क्षेत्रात आणखी उज्ज्वल कामगिरी करेल अशी आशा उभयतांना आहे.
गणेशप्रमाणेच ओंकार ओतारीची परिस्थितीही हलाखीचीच. तो मूळचा चिपळूणचा. तिसरीमध्ये असताना आईसमवेत तो कुरुंदवाडला राहायला आला. आई साडीला पिको-फॉलचे काम करायची. तो आठ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. मामाकडे राहत असतानाच त्याला वेटलििफ्टगची आवड निर्माण झाली. मामेभाऊ पंकज ओतारी हा प्रदीप पाटील यांच्या जिममध्ये सराव करण्यासाठी जात होता. सात-आठ वर्षांपूर्वी जखमी झाल्यामुळे त्याने हा खेळ बंद केला. पण ओंकारला मात्र खेळात प्रगती करण्याचा सल्ला देताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. मामी व आत्या यांच्या मार्गदर्शनामुळे ओंकार वेटलििफ्टगमध्ये प्रगती करीत राहिला. पण त्याच्या या प्रगतीच्या मार्गात आणखी एक अडथळा बनला. त्याची आई तीन वर्षांपूर्वी कर्करोगाने मृत्यू पावली. या धक्क्यामुळे गणेशने खेळाकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला. त्याचा रोजचा सराव पूर्णपणे थंडावला. अशा स्थितीत त्याला प्रशिक्षक व कुटुंबीयांनी धीर दिला. त्यांच्या बोलण्याने ओंकारला आत्मविश्वास गवसला. पुन्हा खेळाकडे लक्ष पुरवत त्याने प्रगती साधण्यास सुरुवात केली. अल्प कालावधीत त्याने गवसलेला फॉर्म पुन्हा प्राप्त केला. गणेशपाठोपाठ ओंकारनेही राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत कांस्यपदक पटकावत कुटुंबीयांचा विश्वास सार्थ ठरविला. खेळामध्ये अडचणी जरूर येतात, पण नेटाने व धर्याने उभे राहिलो तर आपले यश कोणी रोखू शकत नाही असे मत व्यक्त करीत ओंकार ओतारी याने आíथक अडचण ही तुमच्या प्रगतीतील अडसर होऊ शकत नाही असे म्हटले आहे.
गणेश व ओंकार यांच्या घरची परिस्थिती सामान्य तर चंद्रकांत माळी याचे घर म्हणजे नांदते गोकुळच. तेरवाड या छोटय़ा गावात माळी यांचा कुटुंबकबिला राहतो. विभक्त कुटुंब ही आजची अपरिहार्य स्थिती बनत चालली आहे. पण तेरवाडच्या माळी कुटुंबातील चाळीस जणांनी एकत्रित राहत आजही एकत्र कुटुंब उत्तमपणे नांदू शकते याचा वस्तुपाठच घालून दिला आहे. एक छत, एक चूल अशा परिस्थितीत वाढलेल्या चंद्रकांत याला वेटलििफ्टगचा छंद लागला. त्याची खेळातील गती पाहून कुटुंबातील साऱ्यांनीच याच क्षेत्रात पुढे जाण्याचा एकमुखाने सल्ला दिला. पहाटे उठून सायकलने कुरुंदवाड गाठायचे. तेथे सराव करून घरी परतायचे. तेथून पुन्हा दप्तर घेऊन शाळा गाठायची. शाळा संपली की पुन्हा प्रदीप पाटील यांच्या जीममध्ये जाऊन रात्री उशिरापर्यंत सराव करायचा असा चंद्रकांतचा अनेक वष्रे दिनक्रम ठरला होता.
अनेक स्पर्धामध्ये चंद्रकांतने यश मिळवले आहे. राष्ट्रीय पातळीवरील अनेक क्रीडा स्पर्धामध्ये तो सातत्याने चमकत राहिला. गत राष्ट्रकुल स्पध्रेवेळी तो बक्षिसापासून वंचित राहिला. हुकलेली संधी पुन्हा साध्य करायची हे ध्येय त्याने उराशी बाळगले होते. त्याच्या ध्येयाला माळी कुटुंबीयांचे पाठबळ होते. कुटुंबीयांनी तर आधी लग्न राष्ट्रकुलच्या पदकाशी अन् मग तुझे अशा शब्दातच बजावले होते. कुटुंबीयांची अपेक्षा सार्थ ठरवत चंद्रकांतनेही राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत कांस्यपदक पटकविले. त्याच्या या यशामुळे माळी कुटुंबीयांना इतका आनंद झाला की त्यांनी हत्तीवरून साखर-पेढे वाटून आनंद व्यक्त केला. आणि आता माळी कुटुंबीय चंद्रकांतचे हात पिवळे करण्याच्या तयारीला लागले आहेत. माळी कुटुंब म्हणजे एक सेवा सोसायटीच आहे. त्याचे वडील दादू माळी सांगतात, विविध कार्यकारी सेवा सोसायटीप्रमाणे आमचे काम चालते. रोज रात्री एकत्र येऊन दुसऱ्या दिवसाच्या कामाचे नियोजन करतो. एकदा कामाची विभागणी करून दिली की सारे जण ठरल्याबरहुकूम आपली कामे व्यवस्थित पार पाडतात. कोणीही कोणाच्या कामात हस्तक्षेप करीत नाहीत. म्हणूनच आमच्या कुटुंबातील सर्वाचा सूर जुळलेला आहे, अशा शब्दात ते कुटुंबाच्या कामाचे वर्णन करतात.
तीन कुटुंबांतील तीन तऱ्हा असतानाही कुरुंदवाडमधील गणेश, ओंकार व चंद्रकांत या तिघा खेळाडूंनी मिळविलेले यश खचितच गौरवास्पद आहे. अडचणीवर मात करीत पुढे कसे जायचे आणि यशाला गवसणी कशी घालायची हे गणेश व ओंकार यांनी दाखवून दिले. तर महाकुटुंबात असतानही आपले स्वप्न कसे साकार करायचे हे चंद्रकांतने दाखवून दिले आहे. या तिघांच्या कामगिरीने कृष्णाकाठच्या सुजलाम सुफलाम भूमीला क्रीडा क्षेत्रातील यशाचे नवे स्वप्न पडले आहे.