३१ डिसेंबर२०१३च्या मध्यरात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर साठावं मिनिट संपेल आणि दिनदर्शिका बदलेल. तेव्हा मंगळ-बुधाची रास कन्येमध्ये, शनी देव राहू या मित्र ग्रहासोबत असतील, तर शुक्राची रास तुळेमध्ये, रवी आणि बुधाची युती चंद्रासोबत होणार आहे. गुरूची रास धनूमध्ये व शुक्रदेव वक्री होऊन शनीची रास मकरमध्ये, केतू-मंगळाची रास मेषमध्ये आणि वक्री बृहस्पती रास मिथुनमध्ये गतिशील होईल़
सध्या विक्रम संवत २०७०मध्ये पराभव संवत्सर सुरू आह़े याचा राजा गुरू आणि मंत्री शनी आहेत़ ३१ मार्च २०१४ अर्थात गुढीपाडव्यापासून श्री संवत २०७१ म्हणजेच ‘प्लवंग’ संवत्सराचा प्रारंभ होत आह़े ज्याचा राजा आणि मंत्री चंद्रदेव आह़े तर सस्येश गुरू आहे, तसेच दुर्गेश सूर्य, धनेश बुध, रसेश शनी, धान्येश मंगळ, निरसेश बुध, फलेश सूर्य आणि मेघेश रवी असणार आहेत़ ग्रंथनिर्देशांनुसार, ‘प्लवंग’ संवत्सर देशोदेशी अंतर्गत तणाव, द्वंद्व, राजकारण्यांमधील वैमनस्य आणि परिवर्तनासाठी ओळखले जात़े त्यातच या संवत्सराचे राजेपद चंद्राकडे असल्यामुळे या वर्षी पावसाचे योग चांगले आहेत़ मात्र हा पाऊस पुराचे रूपही धारण करू शकतो़ यात नवीन राजा किंवा शासकांचा उदय होऊ शकतो, तसेच या काळात जनतेच्या रोग आणि दु:ख निवारणाच्या योजना बनविल्या जातील़चंद्रदेवच मंत्रिपदावरही विराजमान झाल्यामुळे आवश्यक अन्नधान्याचे उत्पादन होईल़ मात्र मनाचा स्वामी चंद्र हाच मंत्रिपदी असल्यामुळे हे वर्ष चुकीच्या राजकीय निर्णयांसाठीही ओळखले जाईल़ सस्येश गुरू असल्यामुळे रसाळ पदार्थाचे या वर्षी अधिक उत्पादन होईल़ मंगळ धनेश असल्यामुळे नफेखोरी वाढणार आह़े गहू, मोहरी, मूग, उडीद आणि तिळाच्या किमती चढय़ा राहतील़ जनता या वर्षी दु:खी-कष्टी असेल, सर्वसामान्यांच्या वाटय़ाचे आंबे कोणी दुसराच खाईल आणि जनतेला कोयीच चोखत बसावे लागेल़
रवी मेघेश पदी असल्याने पिकाला हानी पोहोचण्याची शक्यता आह़े दहशतवाद डोके वर काढेल़ सर्वसामान्य भयग्रस्त असतील़ रसेश पदावर शनी विराजमान असल्याने रसाळ पदार्थाचे उत्पादन झाल्यानंतरही त्यांचा नाश होण्याचा योग आह़े दुधाची कमतरता असेल, दुग्धजन्य पदार्थ महाग होतील़ आधी दुष्काळ आणि मग अतिवृष्टी अशा दुहेरी संकटांनी सामान्य जनतेची ससेहोलपट होईल़ रोगराईही वाढेल.
निरसेश पदावर बुध असल्यामुळे वस्त्र, छायाचित्रण, रंग, चंदन आणि साखरेच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आह़े धनेश पदावर बुध असल्याने साठा करणाऱ्यांना लाभ मिळेल़ कृषी क्षेत्रात अनेक प्रयोग होतील़ या वेळी शनी तूळ राशीत गतिशील आह़े त्यामुळे ऑक्टोबपर्यंतचा काळ काही विशेष लोकांसाठी चांगला असणार नाही़ गेल्या वर्षांप्रमाणेच या वर्षीही वर्षांचा पूर्वार्ध काही विशेष लोकांना सर्वसामान्यांच्या पातळीवर आणून ठेवण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही़ मस्तवालांची ऐट काहीशी कमी होईल़
नवीन शक्तीचा उदय होईल़ मोठय़ा लोकांसाठी तणावाचा काळ असेल़ गगन भराऱ्या घेणाऱ्यांची संकटे वाढतील़ येत्या वर्षांत राजकीय नेत्यांना प्रकृती स्वास्थ्यामुळे चिंतित व्हावे लागेल़ बाजारात पैशाची कमतरता असेल आणि व्याजदरातही वाढ होऊ शकत़े
तुळेत शनीचा प्रवेश झाल्यामुळे बलात्कारांच्या वाढलेल्या घटनांना ऑक्टोबरनंतर काही अंशी चाप बसेल़ पुढच्या तीन वर्षांत मोठे भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि खून- रक्तपातासारख्या घटनांच्या शक्यतांचे संकेत मिळत आहेत़
उद्योगधंदे –
उद्योगधंद्यांची स्थिती सामान्य राहील़ नफेखोरीची प्रवृत्ती याही वर्षी वाढेल़ खाद्य पदार्थ थोडे स्वस्त होऊन पुन्हा महाग होतील़ वस्त्रोद्योग, साखर, मनोरंजन, ग्राहकोपयोगी वस्तू, दागिने या क्षेत्रांमध्ये वर्षभर अनेक उतार-चढाव आल्यानंतर शेवटच्या टप्प्यात काही सुवार्ता ऐकायला मिळतील़ शेअर बाजारही नवे उच्चांक गाठून पुन्हा कोसळेल़ शेअरची चाल आधी लोभ आणि मग भीती निर्माण करेल. ऑटोमोबाइल क्षेत्रातही सुरुवातीचे महिने विशेष चांगली बातमी येणार नाही़ रियल इस्टेट क्षेत्रातील तेजी या वर्षी संपुष्टात येईल़ मालमत्ता बाजार एका दुष्टचक्रात अडकल्याचे दिसून येईल़ सध्या लगेच मालमत्तेच्या किमती कमी होवोत अथवा न होवोत, पण २०१४मध्ये या क्षेत्रात मोठी पडझड पाहायला मिळेल़ मालमत्तांची विक्री करणे अवघड होईल़ येती तीन वष्रे या क्षेत्रासाठी खूपच कष्टकारक असतील़
सोन्यात थोडय़ाफार तेजीनंतर वर्षांअखेर जग मोठय़ा मंदीच्या दिशेने जाताना दिसत आह़े सोन्याच्या किमती त्याच्या प्रक्रिया शुल्कापेक्षाही कमी होतील़ सोन्याच्या भावाबरोबरच उत्पादनातही कमतरता असेल़ वर्षांच्या शेवटी साखर क्षेत्रासाठी चांगले वृत्त येईल़ वस्त्रोद्योग खाली आपटून पुन्हा सावरला जाईल आणि शेवटच्या महिन्यांमध्ये नव्याने जोर धरेल़
चित्रपट आणि मनोरंजन –
२०१४च्या सुरुवातीच्या काही महिन्यांपर्यत कमी खर्चाच्या चित्रपटांचा डंका वाजत राहील़ मोठय़ा बजेटच्या चित्रपटांच्या यशासाठी मात्र अध्र्याहून अधिक वर्ष संदिग्ध असेल. काही मोठय़ा बजेटचे चित्रपट चांगला, परंतु अपेक्षेपेक्षा कमी व्यवसाय करतील़ वर्षांअखेरचे काही महिने मोठय़ा बजेटच्या चित्रपटांसाठी चांगले असतील़ येत्या वर्षांत चित्रपट चित्रीकरणादरम्यान अपघात होण्याचाही योग आह़े
राजकारणाच्या कवडशातून –
२०१३च्या डिसेंबरमध्ये उठलेली राजकीय वादळे या वर्षीही घोंघावत राहतील़ सत्तांतरासाठी ओळखला जाणारा तुळेचा शनी, येत्या काळात शासन बदलण्याचे स्पष्ट संकेत देत आह़े ३ नोव्हेंबर २०१४ ला जेव्हा शनी वृश्चिक राशीत प्रवेश करेल, तेव्हा राजकीय साठमारीला विशेष वेग येईल़ नेत्यांना तर त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याची काळजी करावी लागेलच़ परंतु, त्यातही एखाद्या मोठय़ा नेत्याबद्दलची वाईट बातमी अस्वस्थता निर्माण करणारी ठरेल़ कट-कारस्थानांना ऊत येईल, नव-नवी राजकीय षड्यंत्रं आखली जातील़ प्रामाणिक व्यक्तींना लांछित भासविण्याचे प्रयत्न होतील़ राजकीय खटल्यांमध्ये वाढ होईल़ लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आह़े राजकीय सारीपाटावरून येत्या तीन वर्षांत बडे आणि नामवंत चेहरे हळूहळू बदलले जातील़ ही तीन वष्रे राजकीयदृष्टय़ा धामधुमीची अथवा राष्ट्रांतील युद्ध प्रसंगाची शक्यता दर्शवितात.
येत्या वर्षांच्या पोटात काय दडलंय?
३१ डिसेंबर२०१३च्या मध्यरात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर साठावं मिनिट संपेल आणि दिनदर्शिका बदलेल. तेव्हा मंगळ-बुधाची रास कन्येमध्ये, शनी देव राहू या मित्र ग्रहासोबत असतील, तर
आणखी वाचा
First published on: 27-12-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the interesting points in coming years