मराठी माणसाला दोनच तुकाराम माहीत होते. एक सोळाव्या शतकात देहूमध्ये राहणारा, नाठाळाचे माथा हाणू काठी असा रोखठोक व्यवहार करणारा.. दुसरा तुकाराम म्हणजे संत तुकाराम चित्रपटातला विष्णूपंत पागनीसांचा तुकाराम.. त्यात आता भर पडली आहे, चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या तुकाराम चित्रपटातील जितेंद्र जोशी यांनी साकारलेल्या तुकारामाची…
तुकाराम म्हणजे एक संत इतकेच लहानपणापासून शिकवले गेले होते आणि हे जे िबबवले गेले होते तेवढेच मला माहीत होते. इतपतच तुकाराम माझ्यासाठी मर्यादित होता. शाळेत तुकारामाचे, ज्ञानेश्वराचे अभंग शिकताना हे अभ्यासासाठी आहे असेच सांगणारे शिक्षक भेटले. त्यामुळे पाच मार्काला त्याचा अभंग शिकवला जायचा. मग तो पूर्णपणे समजायचा नाही (खरे तर ते समजण्याचे वयही नसायचं किंवा ते शिक्षकांना समजवता येत नसायचं). मग तुकाराम ऑप्शनलाच टाकला जायचा. आपल्याकडे अनेक ठिकाणी प्रवचनं होतात, भागवत सप्ताह, ज्ञानेश्वरी सप्ताहदेखील होतात. पण तुकारामाचा सप्ताह कधी कोठे आयोजित केलेला माझ्या पाहण्यात तरी आला नव्हता. पण ज्ञानोबा माउली तुकाराम या गजरातून तो जाणवायचा. ज्ञानेश्वरांचे दाखले दिले जातात. ज्ञानेश्वरी लिहिली, िभत चालवली, रेडय़ाच्या तोंडून वेद वदवले वगरे. पण तुकारामाचा उल्लेख आला की आठवतो तो तुकारामावरील पूर्वीचा चित्रपट. त्यामध्ये तुकाराम कसे दानशूर होते आणि पुष्पक विमान कशा पद्धतीने आले आणि घेऊन गेले, त्यांनी गाथा बुडवली आणि ती वर कशी आली यावरच केंद्रित झाला होता. या व्यतिरिक्त तुकाराम काय आहे तो तसा फारसा पाहिला-ऐकला जायचा नाही आणि िबबवलादेखील गेला नाही.
माझे घर काही वारकरी संप्रदायातलं नाही. त्यामुळे माझ्यापर्यंत तुकाराम पोहोचला नव्हता. पण माझ्याकडे अध्यात्म होतं का? तर होतं. घरचे संस्कार होते. आईचे वडील भजन रचायचे. आजी राममंदिरात जायची. मीदेखील जायचो. राममंदिरानंतर विठ्ठल मंदिरात जायचो. प्राजक्ताची फुलं वेचणं आणि विठ्ठलाच्या चरणी अर्पण करणं इतपतच ते होतं. पुण्यात आमचं घर वारीच्या मार्गावर होतं. मध्यमवर्गीय म्हणावं अशीदेखील आमची परिस्थिती नव्हती. तरीदेखील घरी वारीच्या आधीपासून महिना दोन महिना पसे साठवले जात असत. वारीसाठीचं ते बजेटच होतं म्हणा ना. छोटेखानी असेल पण ते होतं. २५ वर्षांपूर्वी २५ रुपयेदेखील खूप होते. मग या पशातून वारी पुण्यात आली की राजगिरा चिक्की, केळी आणली जायची. वारी आमच्या घरावरून जात असे तेव्हा मामा आणि मी वारकऱ्यांना ते द्यायचो. काही वारकरी येऊन मागून घ्यायचे. पण आमची धडपड असायची ती भजन करत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या झोळीत हे नेऊन टाकण्याची. कारण ते लोक आपल्या भजनात मग्न असायचे. ती न मागणारी माणसं होती. त्यातून जे काही संस्कार होत गेले ते सारे आपसूकच झाले. वारीबाबत जी आपापल्या परीने काही तरी मदत करायची परंपरा होती, त्या भावनेतून हे होत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा