भगवान श्रीगणेशांना यथार्थरीत्या समजून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ग्रंथराज श्रीमद्मुद्गल महापुराण. नऊ खंड, ४२८ अध्याय आणि तब्बल २३१५० श्लोक इतका अफाट व्याप असलेला हा विशालकाय ग्रंथ.
केवळ संख्यात्मकदृष्टय़ाच नव्हे तर गुणात्मकरीत्याही अगाध, अथांग असे हे श्रीगणेशांचे शब्दरूप शिल्प. एकेका श्लोकाच्या विवरणार्थ स्वतंत्र एकेक पुस्तक प्रकाशित करावे अशा अक्षरश: शेकडो श्लोकांनी हा ग्रंथ ओतप्रोत भरला आहे.
सामान्यत: पुराणकथा म्हटले की अतिरंजित वर्णने, अतिशयोक्तीचा भडिमार, अतींद्रिय शक्तीचे चमत्कार, अकल्पनीय कथा अशीच काहीशी जनसामान्यांची प्रतिक्रिया असते. कथांना केवळ वरपांगी वाचल्यामुळेच ही प्रतिक्रिया निर्माण होते. केवळ वाच्यार्थालाच प्राधान्य देत वाचणाऱ्यांनी तयार केलेला हा ग्रह, तशाच स्वरूपात कथनही करणाऱ्यांनी अधिक दृढ केलेलाच आपणास पाहावयास मिळतो.
मात्र हे वास्तव नाही. पुराणकथा भाकड कथांचे भेंडोळे नाही तर हा अलौकिक वारसा आहे, हा सार्थ अभिमान जागृत करणारा ग्रंथराज आहे श्रीमुद्गलपुराण.
‘आध्यात्मिकता’ हा पुराणवाङ्मयाचा प्राण आहे. मात्र या ग्रंथात अद्वितीय, अलौकिक अध्यात्मविवेचना सोबतच समाजशास्त्रीय, नीतिशास्त्रीय, मनोवैज्ञानिक, मानव्य ़िवषयाची आणि अनेक जागी वैज्ञानिक विवेचनाची अद्वितीय रेलचेल आहे. अशा स्वरूपाच्या विवेचनांचे सूत्रबद्ध आणि तरीही सुस्पष्ट कथन करणाऱ्या अगणित कथा हे श्रीमुद्गलपुराणाचे वैभव आहे. मृत्यूनंतरच्या स्वर्गाकरिता नाही तर याच जीवनाला स्वर्ग करण्याचा राजमार्ग आहे श्रीमुद्गलपुराण.
आपल्या या आनंदी नसण्याला कारण काय? शास्त्र सांगते ‘आत्मविस्मृती.’ खरं तर आपले मूळ रूप ‘आनंद’च आहे. केवळ शाब्दिक खेळ नाही. आनंद हे आपले स्वरूप असल्यामुळेच त्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. दु:ख हे आपल्या स्वरूपाच्या विपरीत आहे आणि म्हणूनच ते टाळण्यासाठी आपण अखंड प्रयास करतो.
ही दु:खमयता, हे दैन्य, हा त्रास, ही पीडा, ही बेचैनी, ही अशांतता, हे असमाधान माणसाच्या वाटय़ाला का येते? याची नेमकी चिकित्सा करताना श्रीमुद्गलपुराणाने प्रजापती दक्षाची कथा सांगितली आहे.
अर्थात कोणतीही कथा अभ्यासण्यापूर्वी एक गोष्ट शांतपणे मनी ठसविणे अत्यावश्यक आहे की अभ्यास ‘कथेचा’ नव्हे ‘कथनीयाचा’ करायचा असतो.
हा सिद्धान्त व्यवस्थित समजून घेतला तर आणि तरच श्रीमुद्गलपुराण किंवा अन्य कोणतेही पुराण यथार्थरीत्या कळू शकेल. ‘कथा कशी आहे’ याचा अभ्यास पर्याप्त नसतो. अभ्यासासाठी एक दृष्टी हवी. ‘कथा कशी आहे’ पेक्षा ‘ती तशी का आहे’ याचे चिंतन घडल्यासच कथेचा गूढार्थ उलगडू शकतो.
पुराणाच्या बहुतांश कथा या रूपकात्मक प्रतीकात्मक कथा असतात तथा त्यांची कथनशैली ही अनेकदा ‘अन्योक्ती’ स्वरूपाची असते.
अन्योक्ती हा संस्कृत वाङ्मयाचा एक विशेष प्रकार आहे. कोणत्यातरी प्राण्याला, पक्ष्याला वा निर्जीव पदार्थालाही उद्देशून काव्य केले जाते. उदा. ‘गर्दभान्योक्ती’मध्ये गाढवाला उद्देशून काव्य असते. आता गाढवाला काव्य समजेलच कसे? ते समजत नाही म्हणूनच तर ते गाढव ना? पण तरी काव्य असते. गाढवाला काव्य समजत नाही, पण हे त्या कवीला समजत नसते का? तरी काव्य का केले जाते? कारण सरळ आहे- कविता गाढवासाठी नाही तर जे गाढवासमान आहेत त्यांच्यासाठी असते. न दुखावता वाचकांचे, श्रोत्यांचे दुर्गुण त्यांच्या गळी उतरवत त्यांच्या निरसणार्थ प्रोत्साहित करणारा हा वाङ्मय प्रकार आहे.
पुराणांची रचना अशी अन्योक्ती स्वरूपाची असते. श्रीमुद्गलपुराण ही अशाच रूपात ‘दक्षान्योक्ती’ आहे. राजा दक्षाला केलेला हा उपदेश आहे. राजा दक्षासमान असणाऱ्या सगळ्यांकरिता. कसा आहे राजा दक्ष. श्रीमुद्गलपुराण सांगते दक्ष ‘अज मस्तकधारी’ आहे. त्याचे डोके आहे ‘बोकडाचे’.
सगळ्याच पुराणात ही अजमस्तकाची कथा आली आहे. श्रीशंकरांचा अपमान सहन न झालेल्या दक्षकन्या सतीने आत्मदहन केले. त्या विरहाने क्रोधाग्नीतप्त श्रीशंकरांनी वीरभद्राद्वारे दक्षयज्ञाचा विनाश केला. वीरभद्राने दक्षाचे मस्तकच कापले आणि यज्ञकुंडात फेकले. शेवटी सर्वानी स्तुती केल्यावर श्रीशंकर प्रसन्न झाले आणि दक्षास बोकडाचे मस्तक बसविण्यात आले.
ही कथा प्रतीकात्मक आहे. बोकडाचा विचार करताना त्याच्या आवाजाला आधारभूत धरले आहे. बोकडाचा आवाज आहे ‘मे-मे.’ संस्कृतमध्ये ‘मे’ हे अस्मद् सर्वनामाचे चतुर्थी आणि षष्ठीचे एकवचन आहे. त्याचा मराठीत अर्थ आहे मला आणि माझे.
आपल्यातील बहुसंख्य लोक दिवसभर फक्त मला-मला आणि माझे-माझे असेच करत असतात. याचे संस्कृत भाषान्तर ‘मे-मे-मे-मे’ असेच होते. अशा रूपात जो अविरत ‘मेमे’ करीत राहतो. तो ‘बोकड.’ तो राजा दक्ष. अर्थात आपण सगळेच दक्ष. पर्यायाने आपल्यासाठी आहे श्रीमुद्गलपुराण. आत्मविस्तृत दक्षात आत्मज्ञान देण्याकरिता केलेला उपदेश आहे श्रीमुद्गलपुराण. पर्यायाने आपणास सगळ्यांस परम आनंदी होण्याची सुसंधी आहे श्रीमुद्गलपुराण.
या पुराणाची रचनाच मोठी अद्भुत आहे. यात नऊ खंड आहेत. पैकी आठ खंडांत आठ विनायकांच्या कथा प्रधानविवेचन विषय आहेत. ‘अष्टविनायक’ ही मूळ संकल्पना आहे श्रीमुद्गल पुराणाची. गंमत म्हणजे केवळ वरपांगी पाहाल तर आठही कथा समानच आहेत. एकसुरीच आहेत. पण या कथा वाच्यार्थाच्या नाहीतच हे सांगण्याकरिता या आठ खंडांतील केवळ राक्षसांची नावेही पर्याप्त आहेत.
आठ खंडांतील आठ असुर आहेत अनुक्रमे मत्सरासुर, मदासुर, मोहासुर, लोभासुर, क्रोधासुर, कामासुर, ममासुर, अहंकारासुर. केवळ नावे पाहताच आपणास ध्यानी येईल की हे पुराण काही ‘आगळेच’ आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा