सध्याच्या काळात आपण किती व्हॉट्सअॅपच्या आहारी गेलो आहोत याचा प्रत्यय नुकताच मला आला. त्या दिवशी एक विद्यार्थिनी सांगत होती की, ‘आमचा ए.सी. कुलिंग करत नव्हता, म्हणून एसी रिपेअर करणाऱ्या माणसाला बोलावलं होतं. त्याने सगळा एसी उघडला तेव्हा त्यातून खारूताईची दोन छोटीशी पिलं बाहेर पडली. त्यांना चालताही येत नव्हतं. त्यांचे फोटो काढले व व्हॉट्सअॅपवर पोस्ट केले. नंतर बाबांनी केरसुणीनं ती पिलं सुपडी घेऊन खिडकीखाली फेकून दिली. पण, पोस्टला भरपूर कमेंट व लाइक आले.’ दुसरा प्रसंग होता लोकल ट्रेनमधल्या दोन कॉलेज तरुणी तिसरीविषयी बोलत होत्या. एक जण म्हणाली, ‘अगं तिच्याकडे व्हॉट्सअॅप नाहीये. तिला डाऊनलोड कर म्हटलं तर ती करत नाही.’ त्यावर दुसरी म्हणाली, ‘अनपढच आहे.’ दोन्ही प्रसंगांतून व्हॉट्सअॅपला आजच्या काळात किती महत्त्व आहे याचा विचार मी करू लागले. खरंच, आज नवनवीन तंत्रज्ञानाबरोबर आपणही चालणं आवश्यक आहे, पण त्या तंत्रज्ञानात आपण किती वाहावत जातोय याचे भान आपल्याला आहे का? स्वत:चा ‘सेल्फी’ काढण्यात आपले प्राण गमावण्यापर्यंत आपण या व्हॉट्सअॅपच्या विळख्यात सापडलो आहोत. छोटय़ा छोटय़ा सुंदर अशा प्रसंगांना आपण किती मुकत आहोत याचा विचार आपण करतो का? याचबरोबर आपल्या संवेदनाही किती बोथट व कोरडय़ा झाल्या आहेत? खारीच्या पिलांचे व्हॉट्सअॅपवर, फेसबुक फोटो टाकायचे. त्याला किती लाइक आले, काय काय प्रतिक्रिया आल्या, त्या पाहायच्या ही कसली संवेदना? आपण आपलं खासगी आयुष्य शांतपणे जगत नाहीच, पण खासगी म्हणून असं काही ठेवतही नाही. घरात काही खाद्यपदार्थ केले, अचानक पाऊस पडला, ट्रेन लेट झाली, रस्त्यात खड्डा दिसला, भाजी मंडईत गेलो, चाट खायला गेलो की काढा फोटो आणि करा पोस्ट. ही व्हॉट्सअॅपमुळे आलेली विचारशून्यताच नाही का?
हल्ली काही बातम्या कानावर येतात. अमकातमका वयाच्या तिशीतच हार्ट अटॅकने गेला. लगेच लोक म्हणतात काय करणार हल्लीच्या मुलांना स्ट्रेस खूप आहे. स्ट्रेस असेलही, पण काही वेळेस असे वाटते की, खरंच एवढा स्ट्रेस आहे? की तो ओढवून घेतला आहे? सतत २४७७ आपण या तंत्रज्ञानाच्या आहारी असतो. त्यापलीकडे आपल्या डोक्याला दुसरा खुराक असा नाहीच. दिवसभर काम केल्यावर किमान रात्रीची झोप शांतपणे घ्यावी तर त्यावेळीही फोन वाजतो. लगेच आम्ही कोणी काय पोस्ट केलंय ते पाहणार व त्याला किमान लाइक तरी करणार. नाही केलं तर समोरच्याला राग येईल. म्हणजे दिवसभरच्या परिश्रमानंतर रात्रीची झोपही शांतपणे नाही. मग हा स्ट्रेस जाणार कसा? ट्रेनमध्ये बसल्यावर मोबाइलवरच मालिका, सिनेमे पाहायचे, वर्तमानपत्र, पुस्तकंही त्यावरच वाचायची. पूर्वी लेडीज डब्यात बायका विणकाम करायच्या, एकमेकींना ते शिकवायच्या, गाणी म्हणत, एकमेकींचे सुख-दु:ख वाटत प्रवास करायच्या. आता मात्र व्हॉट्सअॅपवर कमेंट वाचायच्या आणि उगाचच एकटंच हसत सुटायचं, असा काहीसा वेडेपणाच म्हणावा लागेल नाही का?
घरातील लोकांशी संवाद साधायचा सोडून या व्हॉट्सअॅपच्या विळख्यात आपण गुरफटून घेतलं आहे. कुठेही बाहेरगावी फिरायला गेल्यानंतरही तिथले फोटो काढून ते पोस्ट करण्यातच आनंद मानला जातो. यामध्ये निसर्गाचा आस्वाद घेणंही जमत नाही. व्हॉट्सअॅपमुळे मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटीचे प्रसंग आता उरलेलेच नाहीत. माणसांनी माणसांशी प्रत्यक्षात बोलण्यापेक्षा व्हॉट्सअॅपवर गप्पा मारणं जास्त सोयीचं व आनंददायक वाटतं. ट्रेनमध्ये गाडीतून उतरतानाही मोबाइल वाजला तर कोणी, काय पोस्ट केलं आहे, हे पाहाणं जास्त महत्त्वाचं ठरतं.
नाही म्हणायला शालेय जीवनातील आपले मित्र-मैत्रिणी आपल्याला या माध्यमातून पुन्हा एकदा भेटतात. सेवानिवृत्त, वयोवृद्ध लोकांना घराच्या बाहेर पडता येत नसेल तर या माध्यमातून त्यांना आपल्या नातेवाईकांशी, मित्र-मैत्रिणींशी संवाद साधता येतो. हे स्तुत्यच आहे. परंतु सतत या व्हॉट्सअॅपच्या बालिशपणाच्या आहारी जाऊन आपण आपल्या भावना, विचार, संवेदना किती कोरडय़ा व बोथट करत आहोत, याचा विचार मात्र प्रत्येकानेच करण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञान तर हवेच पण त्याच्या वापरावरील मर्यादाही तितक्याच गरजेच्या आहेत. पण हा सारासार विवेक कुठे तरी हरवत चालला आहे एवढे मात्र नक्की.
आरती चंदन-भोजने – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा