मथितार्थ
भारत हा एक अफलातून देश आहे. या एकाच देशात आपल्याला जगभरातील सर्व प्रकारचे हवामान अनुभवता येते. म्हणजे इथे थरचे वाळवंटही आहे आणि वर्षांतील १२ महिने बर्फाचा जाडसर थर वागवणारी हिमालयातील शिखरेदेखील. वर्षांचे १२ महिने आणि दिवसाचे २४ तास पाऊस पडणारे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाणही आहे आणि मानवी वस्ती असलेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक थंड (उणे ६३ अंश सेल्सियस )अर्थात अतिशीत असे वातावरण असलेले ठिकाणही आहे. एवढे सारे वैविध्य एकाच देशात पाहायला मिळणे तसे कठीणच. पण भारतात हे सारे आहे. शिवाय नदी- नाले, पर्वतरांगा तर आहेतच. इथल्या पर्वतरांगाही आगळ्या आहेत. ईशान्य भारतातील पर्वतरांगांमधून फिरताना एरवी जगभरातील इतर पर्वतरांगांमधून निर्धास्त फिरलेली मंडळीही आपली नांगी टाकतात. या पर्वतरांगांमधून सफाईदारपणे आपली लढाऊ विमाने चालविणारे आणि हेलिकॉप्टर्स नेणारे भारतीय हवाईदल हे जगातील अशा प्रकारचे एकमात्र हवाई दल आहे. प्रचंड वैविध्य असलेल्या या अशा देशाचे खडा पहारा देत रक्षण करणे हे तर त्याहूनही कठीण असे काम आहे. मात्र भारतीय संरक्षण दले खासकरून लष्कर हे काम नित्यनेमाने कोणताही खंड न येता सुखरूप पार पाडते. त्या कामाचा गवगवा कुठेही होत नाही ना त्या कामाची फारशी कुठे चर्चा होते.
भारतीय संरक्षण दलांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ज्या नानाविध प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये त्यांना काम करावे लागते त्याच विविध भौगोलिक परिस्थितींमधून त्यांचे जवानही आलेले असतात. कुणी राजस्थानच्या वाळवंटातून आलेला तर कुणी बर्फाचीच सोबत राहिलेल्या हिमालयातील एखाद्या गावातून. कुणी अशा ईशान्य भारतातून आलेला असतो की, त्याने समुद्र केवळ सिनेमामध्येच पाहिलेला तर कुणी मुंबईसारख्या ठिकाणाहून आलेला की ज्याला पहाडी प्रदेश म्हणजे नेमके काय हे ठाऊक नाही. पण हेच सारे जवान भारताच्या कानाकोपऱ्यात सर्व भौगोलिक परिस्थितींमध्ये विनातक्रार काम करत असतात. केवळ देशांच्या सीमांचे रक्षण करणे एवढेच त्यांचे काम नाही. तर अनेकविध बाबींसाठी आपण हक्काने त्यांचा वापर करतो. देशातील कोणत्याही भागात परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी शक्यता निर्माण झाली की, त्यांना पाचारण केले जाते. दहशतवादी हल्ल्याच्या वेळेसही आपल्याला त्यांची आठवण येते मग ‘ताज’मध्ये ते पोहोचले की, आपला आत्मविश्वास दुणावतो. ते कोणत्याही कठीण परिस्थितीला पुरून उरणारच आणि अंतिम विजय आपल्या जवानांचाच असणार हे आपण गृहीतच धरलेले असते. भीषण दुष्काळ पडल्यानंतरही मदत कार्यासाठी आपण त्यांना पाचारण करतो आणि एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही त्यांनाच मदतीसाठी बोलावतो. मग तो मुंबईमध्ये आलेला २६ जुलैचा महापूर असो किंवा अगदी अलीकडची म्हणजे गेल्याच आठवडय़ात घडलेली उत्तराखंडमधील केदारनाथ सारखी भीषण नैसर्गिक दुर्घटना असो. जवान त्या ठिकाणी पोहोचले की, आपला जीव भांडय़ात पडतो. त्यांचे अस्तित्त्व हे आपल्यासाठी आपण परिस्थितीवर मात केल्याचे निदर्शक असते. तेवढा विश्वास या भारतीय जवानांनी संपूर्ण देशातील सर्व नागरिकांमध्ये त्यांच्या कर्तृत्वाने आणि कामाने निर्माण केला आहे. या विश्वासामुळेच तर आपला जीव भांडय़ात पडतो. ज्या भारतीय जवानांनी हा विश्वास देशवासीयांमध्ये निर्माण केला, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यामध्ये भारतीय नागरिकांचा किती वाटा आहे? दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागते. त्यांनी नागरिकांना दिलेल्या विश्वासाच्या बदल्यात आपण त्यांना त्यांचे आयुष्य, त्यांचे कुटुंबीय यांच्याबद्दल देशवासीयांमध्ये सांभाळणुकीची भावना असल्याचा विश्वास आजतागायत आपल्याला म्हणजे नागरिकांना देता आलेला नाही. आज स्वातंत्र्याच्या एवढय़ा वर्षांनंतरही परिस्थिती अशीच राहणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.
आपल्या मनात आपल्या जवानांविषयी सुपरमॅनची भावनाच असावी बहुधा. कारण त्यामुळेच आपण माणूस म्हणून त्यांचा विचार करताना दिसत नाही. सध्या उत्तराखंडमध्ये भीषण परिस्थिती ओढवलेली आहे. हजारोंच्या संख्येने नागरिक अडकून पडले आहेत. गेले अनेक दिवस पाऊसपाण्याला न घाबरता सतत २४ तास अव्याहतपणे भारतीय सैन्यदलांचे मदतकार्य सुरू आहे. २४ तास काम करणाऱ्या या जवानांच्या विश्रांतीचे काय? जवानांना लागणाऱ्या मदतीचे काय? त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी कोण घेतो? त्यांची काळजी बहुतांश वेळेस तेच स्वत घेतात. अनेकदा असेही होते की, जवानांना अव्याहतपणे काम करताना पाहून स्थानिक नागरिकांना त्यांच्याविषयी आस्था वाटू लागते आणि मग ते नागरिक त्यांच्या मदतीसाठी येतात. पण असे मदतीसाठी येणारे नागरिक नेहमीच संख्येने कमी असतात. आपल्याला या जवानांविषयी फार कमी प्रश्न पडतात. कारण तीही माणसेच आहेत, याचा विसर आपल्याला पडलेला असतो.
म्हणजे सध्या उत्तराखंडमध्ये ज्या परिस्थितीत लष्कराचे मदतकार्य सुरू आहे, ती परिस्थिती एकूणच माणसांसाठी भयावह आहे. पहिल्या दोन दिवसांनंतरच तिथे रोगराईला मोठय़ा प्रमाणावर सुरुवात झाली आहे. खास करून दूषित पाण्यामुळे होणाऱ्या विकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रोगराईच्या जीवजंतूंसाठी तिथे पोषक वातावरण आहे. ही रोगराई फक्त सामान्यांनाच होते आणि जवानांना होत नाही, असे नाही. रोगराईच्या जंतूंसाठी सामान्य काय आणि जवान काय दोन्ही माणसेच. पण रोगराईच्या बातम्यांमध्ये कुठेही जवानांमध्ये काय स्थिती आहे, याचा उल्लेख कधीच कुठेच नसतो. त्या परिस्थितीचा त्रास त्यांनाही होतोच. पण त्याचा उल्लेख कुठेच नसतो.
एका बाजूला अशी परिस्थिती असताना दुसरीकडे देशात काय सुरू असते. तर देशातील अनेक वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांना चिंता असते ती सिद्धदोष गुन्हेगार असलेल्या संजय दत्तची. तो त्याची पत्नी असलेल्या मान्यताला म्हणे दररोज प्रेमापोटी एक पत्र लिहितो आणि त्या पत्राला तीही न चुकता दररोज उत्तर देते. देशभरातील अनेक वाहिन्या आणि वर्तमानपत्रांसाठी ही बातमी उत्तराखंडपेक्षाही मोठी असते, हे या देशाचे दुर्दैवच म्हणायला हवे.
सुमारे पाच वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. देशाच्या सीमारेखांवर पुन्हा एकदा कारगिल सदृश परिस्थिती निर्माण होते की, काय अशी अवस्था होती. कारगिल आणि त्या परिसरात त्यावेळेस शिखरांवरचे तापमान उणे २०च्या आसपास होते. या परिसरातील शिखरांवर त्या तापमानात एकदा बंकरमध्ये जाऊन बसले की, किमान सहा महिने तिथेच काढावे लागतात. कितीही काही झाले तरी बाहेर येता येत नाही. हवामान अतिशय खराब असते आणि बाहेर जाण्या- येण्याची कोणतीही सोय नसते. तुफान हिमवर्षांव होत असतो. त्या परिस्थितीत कारगिलसारखी अवस्था पुन्हा ओढवू नये म्हणून जवान डोळ्यात तेल घालून होते. भारत- पाक संबंधांमध्ये आलेला तणाव सीमेवर कोणत्याही क्षणी बाहेर येईल, अशी स्थिती होती. कारगिलनंतर भारतीय जवानांच्या अवस्थांकडे थोडे लक्ष देण्यास सरकारने सुरुवात केली. त्याचा फायदा असा झाला की, बंकरमध्ये सलग सहा महिने राहणे ही वाटते तितकी सोपी बाब नाही, याची जाण सरकारला झाली. लहानसा बंकर आणि बाहेर वातावरण उणे २० आणि चार सहकाऱ्यांबरोबर सहा महिने त्याच वातावरणात काढायचे हा प्रकार मानसिक ताण वाढवणारा आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. म्हणून मग तिथे सौरऊर्जा आणि पवनऊर्जेचा आधार घेत प्रायोगिक तत्त्वावर एक टीव्हीसेट बसविण्यात आला. दिवसातून अर्धा तास तो पाहता येईल एवढीच ऊर्जा मिळणार होती. पण त्या अध्र्या तासाच्या रंजनाने मनावरचा ताण हलका होऊन जवान ताजेतवाने होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात झाले वेगळेच. कारण सीमेवर तणाव होता, कोणत्याही क्षणी युद्धसदृश परिस्थिती निर्माण होईल, अशी अवस्था होती. आणि त्यावेळेस जवानांपैकी एकाने सहज टीव्ही लावून देशभरातील चॅनल्स लावून पाहिली.. त्यानंतर सर्वाचाच संताप अनावर झाला आणि त्यानंतर त्यांनी तो टीव्ही बंदच ठेवणे पसंत केले. असे काय सुरू होते त्या देशभरातील सर्व चॅनल्सवर? सीमेवर तणाव होता, त्याचवेळेस देशाला चिंता लागून राहिली होती ती काळवीट शिकार प्रकरणात अटक झालेल्या सलमान खानची आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील अटक झालेल्या संजय दत्तची. त्यांना अटक झाल्यापासून कोणत्या जेलमधील कोणत्या बरॅकमध्ये ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांना काल रात्री काय खायला मिळाले, कोणते कपडे त्यांनी परिधान केले इथपासून ते कालची रात्र त्यांची कशी गेली इथपर्यंत सारे काही सुरू होते. फक्त त्यांनी कोणती अंतर्वस्त्रे वापरली तेवढेच सांगणे चॅनल्सनी बाकी ठेवले होते. देशासमोरची परिस्थिती कोणती आणि देशात काय सुरू आहे हे सारे पाहून जवान व्यथित झाले होते. आपण प्राणांची ही बाजी कुणासाठी लावतो?, असा प्रश्न त्यांना पडला होता.
मदतकार्यात प्रसंगी काही जवानांचेही बळी जातात. त्यांची दखल कुणीच का घेत नाही. त्या जवानांच्या कुटुंबीयांचे काय? तो आपला कुणीच नसतो का? मग त्याच्या कुटुंबीयांसाठी कोण करणार? त्याचा मृत्यू युद्धात न झाल्याने ‘शहीद’ असेही त्याच्या नावामागे लागत नाही. त्यामुळे कोणतीच विशेष मदत त्याच्या कुटुंबीयांना मिळत नाही. ना कुणाचे लक्ष त्याच्या त्या निधनाकडे जाते. खरे तर तोही याच देशाच्या कामी आलेला असतो, शहीद झालेला असतो. अशा शहिदांसाठी आपले प्राण केव्हा तळमळणार?
जवानांसाठी प्राण केव्हा तळमळणार?
<span style="color: #ff0000;">मथितार्थ</span><br />भारत हा एक अफलातून देश आहे. या एकाच देशात आपल्याला जगभरातील सर्व प्रकारचे हवामान अनुभवता येते.
First published on: 04-07-2013 at 12:21 IST
TOPICSउत्तराखंडUttarakhandपावसाळाMonsoonपूरFloodभारतीय वायुसेनाIndian Air Forceभारतीय सैन्यदलIndian |Armyलोकप्रभा आर्टिकल्स
+ 2 More
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will we start caring about our jawans