lp65घर, संसार, मुलं यात रमलेल्या एका गृहिणीने एक दिवस सहज म्हणून कॅमेरा हातात घेतला आणि आपल्या गॅलरीतून दिसणाऱ्या पक्ष्यांचे फोटो काढायला, शूटिंग करायला सुरुवात केली. वर्षभराच्या या उद्योगानंतर तिच्याकडे निसर्गाचा मोठा खजिनाच जमा झाला आहे.

चेंबूरमध्ये हिरव्यागार झाडीत वसलेली आरसीएफची सुंदर वसाहत आहे. माझ्या पतीने, शेखरने आरसीएफची नोकरी सोडली आणि आम्ही ठाण्यात घोडबंदर रोडजवळील ब्रह्मांडसारख्या सुंदर वसाहतीत राहायला आलो.

घोडबंदर रोडवरून आत शिरताच ब्रह्मांडमधला स्वच्छ गारवा मनाला उल्हसित करतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची आंब्याची झाडे आपले स्वागत करतात. आमची फेज आठ म्हणजेच ब्रह्मांडचे शेवटचे टोक. इथे हे मस्त रान छोटय़ाशा जंगलाच्या रूपात आमच्या संकुलाला खेटून उभे असल्याप्रमाणेच भासू लागते. या धाकटय़ा रानाचे नशीब थोर की प्रत्यक्ष संरक्षण विभागाचे संरक्षण त्यास लाभले आहे. एका बाजूला संजय गांधी नॅशनल पार्कचे थोरले जंगल तर दुसऱ्या बाजूस उल्हास नदीची खाडी. यामध्ये, निसर्गरम्य ठिकाणी आमचे घर आहे. घरासमोरच काटेसावर, सोनमोहर, गुलमोहर, पळस, पांगारा अशी फुलोऱ्यांची झाडे आहेत.

पूर्वाभिमुख इमारत असल्यामुळे सूर्यनारायण उगवताना आकाशातील वेगवेगळ्या रंगांची ऋतुमानाप्रमाणे झालेली उधळण आपल्याला मंत्रमुग्ध करते. पहाटेपासून पक्ष्यांच्या किलबिलीने जागे झालेले जंगल उगवत्या lp69सूर्यप्रकाशाने उजळून निघते. निसर्गाचे हे लोभस रूप व पक्ष्यांच्या सहवास यांमुळे मन उल्हसित होते आणि दिवस आनंदाने सुरू होतो.

पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

माझ्या ‘विंडो बर्डिग’चा पहिला स्लाइड शो ठाण्यात काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात ‘ठाणे आर्ट गिल्ड’ (टॅग) या संस्थेत दाखविण्याची संधी मला चित्रकार विजयराज बोधनकर यांच्यामुळे मिळाली. आता ‘विंडो बìडग’चे दुसरे प्रदर्शन ठाण्यातल्या कापुरबावडीमधील कला भवन येथे २१,२२,२३ नोव्हेंबर २०१४ ला आयोजित केले आहे. या प्रदर्शनात तीसपेक्षा जास्त पक्ष्यांची जवळपास दोनशे छायाचित्रे पाहायला मिळतील.

आता एवढा सुंदर निसर्ग घरातून दिसतोय म्हटल्यावर तो निसर्ग टिपण्यासाठी शेखरने मुलांसाठी साधा डिजिटल कॅमेरा आणला. मग तो कॅमेरा कसा वापरावा, तो कसे काम करतो, हे तो मुलांना समजून सांगत होता, मुले मन लावून ऐकत होती. मुलांबरोबर माझ्या कानावरसुद्धा हा अभ्यास पडत होता. त्यांनी काढलेले फोटो कसे आलेत, त्यावर बाबांनी केलेले परीक्षण मी मनापासून एन्जॉय करत होते. तेव्हा माझी मुलगी म्हणाली, ‘‘आई, तू पण बघ ना फोटो काढून, तुलाही जमेल’’ तेव्हा शेखर अािण माझा मुलगा उत्सुकतेने माझ्याकडे बघत होते. चला सर्वानाच वाटतेय तर प्रयत्न तरी करून बघू म्हणून त्यांच्या बरोबर खिडकीत येऊन बसले. कॅमेऱ्यातून नक्की कसला फोटो घ्यायचा म्हणून, समोरील जंगलाकडे मी प्रथमच नीट

काळजीपूर्वक पाहू लागले. वसंतऋतू असल्यामुळे गुलाबी फुलांनी फुललेल्या काटेसावरीकडे माझे लक्ष गेले, तिथे एका फांदीवर काळ्या रंगाचा कोतवाल(ड्राँगो) हा पक्षी बसला होता.

पाहा फोटो गॅलरी

वा! कॅमेराच्या डोळ्यातून काटेसावरीची गुलाबी फुले आणि काळा ड्रँागो फारच सुंदर दिसत होते. मी कॅमेराचे बटन दाबले, तेवढीच माहिती त्या वेळी मला होती, फोटो काय आला आहे हे मी व मुले उत्सुकतेने पाहू लागलो गुलाबी फुलांनी बहरलेली काटेसावर दिमाखात फोटोमध्ये उभी होती, पण कोतवालसाहेब मात्र फोटोतून गायब झाले होते. अरेच्चा! हे असे कसे काय झाले म्हणत काटेसावरीकडे पाहिले, पण कोतवालसाहेब मजेत तिथेच बसले होते. तेवढय़ात हवेत उंच सूर मारत उडताउडता किडा टिपून पुन्हा ते त्याच फांदीवर येऊन बसले. अच्छा, असे झाले आहे तर! म्हणजेच, मी कॅमेराचे बटन दाबायला, कोतवालसाहेबांनी हवेत झेप घ्यायला एकच वेळ साधली होती. आता मात्र थोडा वेळ त्यांच्या उडय़ा मारण्याच्या प्रकारावर लक्ष केंद्रित करून, थोडा वेळ त्याचा अंदाज घेत कॅमेराचे बटन पुन्हा दाबले. आता मात्र कोतवालसाहेबांनी हवेत झेप घेतानाचा ‘रामभरोसे’ फोटो मला मिळाला. वा! आम्ही भलतेच खूश झालो, अशा प्रकारे त्या दिवशी माझ्या पक्ष्यांच्या फोटोग्राफीचा, खरे तर फोटोग्राफीचाच श्रीगणेशा झाला. शेखर व मुले आपापल्या उद्योगाला गेले की घराच्या खिडकीमध्ये बसून, समोरील झाडे व पक्ष्यांबरोबर माझी फोटोग्राफी सुरू व्हायची. फोटोग्राफीच्याच निमित्ताने वेगवेगळे पक्षी दिसायलाही लागले.

lp70

एके दिवशी पावसाळ्यात खाली रस्त्यावर चिमण्यांचा फारच गोंधळ चालला होता, सहज बघितले तर पांढऱ्या कानाचा बुलबुल तिथे पडलेले केळे खात होता, तो इथे नवीन पाहुणा असावा म्हणूनच चिमण्या गोंधळ करत होत्या. मग मी घरातील केळे खिडकीत आणून ठेवले, बघू, झाडावर आला तर त्याला दिसेल, आला तर आला! मनापासून केलेली इच्छा, काम फळते असे म्हणतात. खरेच हा पठ्ठय़ा समोरच्या सोनमोहराच्या झाडावरून केळे खायला खिडकीत हजर! भुकेमुळेच त्याने एवढे धाडस केले असावे. तेव्हापासून पावसाळा संपेपर्यंत हा नियमित केळे खायला येत होता. त्याच्या पिवळ्या बुडामुळे आम्ही त्याचे नाव पिवळ्या ठेवले. त्याने या मेजवानीची बातमी इतर जातभाईंनाही दिली असावी. मग लालबुडय़ा बुलबुल व शिपाई बुलबुलसुद्धा केळे lp66खायला यायला लागले. त्यांना आम्ही काळ्या व लाल्या म्हणू लागलो. २०१३ साल माझ्यासाठी असे लकी ठरले. एक चांगला छंद जोपासता आला, काटेसावर आणि कोतवालसाहेबांनी दिलेली साथ मनाची उभारी वाढवणारी ठरली. तेव्हापासून आजपर्यंत, वर्ष झाले आनंदाने हा छंद जोपासत आहे.

कावळा, चिमणी, कबूतर, साळुंखी, जास्तीत जास्त पोपट एवढीच पक्ष्यांबद्दल माहिती असणारी मी आता मात्र फक्त घराच्या एका खिडकीतून साठ प्रकारचे तरी पक्षी पाहिले आहेत. तसेच, चाळीस प्रकारच्या पक्ष्यांचे फोटो, त्यांच्या चलचित्रफितींचा वाढतच जाणारा ठेवा सांभाळून आहे. यांमध्ये नियमित दिसणारे जसे लालबुडय़ा, बुलबुल, शिपाई बुलबुल, ऋतुमानाप्रमाणे दिसणारे पांढऱ्या गालाचा बुलबुल, ताम्र हौंस, दुर्मीळ होत चाललेले जांभळी पाणकोंबडी, क्रेक असे हे बरेच पक्षी आपल्या या जंगलात पाहायला मिळतात. निसर्ग, प्राणी, पक्षी यांची आवड असल्यामुळे सतिष पांडे यांचे ‘दि बर्डस ऑफ वेस्टर्न घाट’ तर सलिम अली यांचे ‘दि बुक ऑफ इंडियन बर्डस’ अशी पुस्तके घरात होतीच, तरीसुद्धा विस्तारित माहिती मिळावी म्हणून , ग्रिमीट यांचे ‘बर्डस ऑफ दि इंडियन सबकॉन्टीनंट’ हे पुस्तकही शेखरने आणले. त्यामुळे नवीन पक्षी मिळाला की त्याची माहिती करून घ्यायला सोपे जाते. एवढे पक्षी आपल्या परिसरात दिसतात ही माहिती मैत्रिणींमध्ये शेअर करावी म्हणून तीस प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रिंट काढल्या. ब्रह्मांडमध्ये ‘मायबोली’ नावाचा फक्त स्त्रियांनीच चालवलेला एक ग्रुप आहे. तिथे मराठी साहित्यावर कार्यक्रम होत असतात. तिथल्या माझ्या मैत्रिणींना ते फोटो दाखवले, त्यांना हेच खरे वाटेना की आपल्याकडे एवढे पक्षी दिसतात व हे फोटो मी काढलेत ते! नंतर मात्र त्यांनी हळूहळू मान्य केले. एका मैत्रिणीने तर ब्रह्मांडमध्येच, त्यांच्या सोसायटीत २६ जानेवारीला या फोटोंचे प्रदर्शन लावण्यास सांगितले. दोन दिवसांमध्ये सर्व तयारी करायची होती, तरीसुद्धा मी लगेच हो म्हटले. कारण लहान-थोर सर्वामध्येच आपल्या सभोवतालाबद्दल जागृती निर्माण करण्याची ही नामी संधी होती. ते पक्ष्यांबद्दलचे माझे पहिले प्रदर्शन, सर्व फोटो एका खिडकीतूनच काढले म्हणून त्यास नाव दिले ‘विंडो बर्डिग’. हा अनुभव मजेशीर, पण सुंदर होता. प्रदर्शन lp67बघायला येणाऱ्यांमध्ये पहिले आश्चर्य हे होते की घरात बसून एवढे पक्षी पाहायला मिळतात! आपल्या परिसरात एवढे पक्षी आहेत हे आम्हाला माहीतच नव्हते!.

तर या पक्ष्यांसारखेच महत्त्व आहे ते काटेसावर, गुलमोहर, पांगारा आदी झाडांना. या झाडांचे व पक्ष्यांचे भारीच जमते! त्यासाठी ही झाडे आपापल्या सोसायटीत जगवायला हवीत. तर अशा झाडांसमोरच आमची खिडकी. मग काय मजाच, घरातली कामे उरकता उरकता, अधूनमधून कॅमेराही डोळ्याला लावायचा. इकडे स्वयंपाकाची धांदल तर तिकडे पक्ष्यांची, इकडे फोडणी घाईवर आलेली असते, तर समोर झाडाच्या शेंडय़ावर नेमका स्वर्गीय नर्तक बसलेला दिसतो. मग मसाल्याच्या डब्याशेजारी, कॅमेराही आता तयार असतो. सर्व आवरले की दुपारचे शांतपणे खिडकीत lp68बसायचे. मग समोरच्या गवताळ भागात कधी गवई चंडोल तर कधी पाणकोंबडी दिसते तसेच पर्पल मुरहेन, तर कधी क्रेक, असे दुर्मीळ होत चाललेले पक्षीही दिसत.

आता या पक्ष्यांचा आपल्या या खिडकीत काय गोंधळ चालला आहे हे पाहायला कोतवाल, शिRो, खाटीक, दयाळ, मुनिया हे पक्के जंगली पक्षीदेखील आपल्या या खिडकीच्या गजांवर बसून पाहून गेले. अगदी वटवाघूळही येऊन केळे उचलून घेऊन जाते. खिडकीतल्या खाऊची बातमी परिसरातील सर्व पक्ष्यांना कळते. अशा प्रकारे पिवळ्याच्या पंखामुळे समोरच्या जंगलानेच आपल्या या खिडकीत यायला सुरुवात केली आहे. या पक्ष्यांना जवळून पाहणे हा वेगळाच आनंददायी अनुभव आहे. दुपारच्या मालिका पाहण्यापेक्षा, खिडकीत बसून नितांतसुंदर पक्षी व निसर्गामध्ये रमणे केव्हाही चांगले. ब्रह्मांडच्या या पक्ष्यांनी आमच्या घराशी नाते जोडले.

मला या पक्ष्यांनी त्यांच्या प्रतिमा देऊ केल्या. त्यामुळे हे पक्षी प्रदर्शनामार्फत जनमानसात पोहचणार आहेत. त्यांचे फोटो काढताना मी त्यांचे चलचित्रणही केले. मग या पक्ष्यांवर एक माहितीपटही तयार झाला. अशा प्रकारे कळत-नकळत लागलेल्या या छंदाचा वेलू हळूहळू वाढू लागला, बाळसे धरू लागला आहे.

Story img Loader