हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरचा पंचगंगा नदीवरचा शिवाजी पूल ओलांडला की उजव्या हाताचं पहिलं वळण घेऊन वडणगेच्या रस्त्याला लागता येतं. दुतर्फा शेतीभाती, कौलारू आणि सिमेंटचा स्लॅब घातलेली दोन्ही प्रकारची घरं. नदीकाठचं गाव म्हणजे सुपीक जमीन. बडय़ा शेतकऱ्यांचा हा इलाका. वेळ भरदुपारची त्यामुळं रस्त्यावर तुरळक वाहनं आणि माणसं. गावं एकमेकांना लागून, त्यामुळं मोठय़ा शहरांमध्ये पत्ता शोधताना चुकायला होतं तसंच छोटय़ा गावांमध्येही होतं. एक गाव संपून दुसरं सुरू झाल्याचं कळतंच नाही. शिवाय शेतावरचं घर, गावातलं घर असेही फरक असतात. म्हणून कोपऱ्यावरच्या दुकानदाराला विचारलं, ‘‘पैलवान रेश्मा मानेचं घर कुठं आलं?’’ रेश्मा मानेनं कुस्तीत मिळवलेल्या नावामुळं तिच्या घराचा पत्ता सांगायला मिळणं गावकऱ्यांना मानाचं वाटतं. दुकानदाराच्या आधी त्याच्या गिऱ्हाईकानंच रेश्माचा तपशीलवार पत्ता सांगितला आणि आम्ही तिच्या घरासमोर पोहोचलो.
दुमजली दगडी, दणकट अशी ओळीनं, एकाला एक लागून अशी मानेंची भावकीतली सात घरं, त्यातलं दुसरं रेश्माचं. समोर छोटं अंगण आणि दारात थोडय़ा उंचीवर लांबरुंद असं कुस्तीगीर रेश्माचं गोल्ड मेडल गळ्यात मिरवणारं पोस्टर. दारात आम्हाला पाहून रेश्माचे बाबा अनिल सामोरे आले. तिची आजी, आई, काकी, आजोबा सगळेच जमले आणि रेश्माचं घडणं समजून घेण्याचा प्रवास सुरू झाला.
खरं तर कुस्तीचं मूळ वेड रेश्माच्या वडिलांच्या म्हणजे अनिल मानेंच्या डोक्यात भिनलेलं. कोल्हापूरची ‘कुस्तीपंढरी’ म्हणून आधीपासूनचीच ओळख. राजर्षी शाहू महाराजांनी अगदी गामा, गुंगापासून अनेक पैलवानांना कोल्हापुरात आणलं. कुस्त्या घडवून आणल्या. कुस्तीचं वेड मनामनात रुजवलं. १९१२ साली म्हणजे १०२ वर्षांपूर्वी कोल्हापुरातलं कुस्त्यांचं मैदान उभारण्यात आलं हे खरं असलं तरी त्याही आधीपासून बाजाराच्या दिवशी हमखास कुस्त्यांचा फड रंगायचा. तालमींची संख्याही खूप. मोतीबाग, गंगावेस, रंकाळा, बाबूजमाल, तटाकडील तालीम, शाहूपुरी, काळा इमाम अशा अनेक! आजही यांपैकी अनेक तालमींमध्ये सकाळ-संध्याकाळ पैलवानांचा शड्डू घुमतो. मोतीबागसारख्या तालमीत आजही १९६० साली ‘हिंदकेसरी’ पदाचा बहुमान पटकावलेले आणि ऑलिम्पिकमध्येही हजेरी लावलेले गणपतराव आंदळकरांसारखे पैलवान नव्या दमाच्या पैलवानांना घडवण्यासाठी परिश्रम घेताना पाहायला मिळतात.
१९५२ साली हेलसिंकीमध्ये खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक पटकावलं होतं. भारताला कुस्ती स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये मिळालेलं ते पहिलंवहिलं पदक. खाशाबा मूळचे कोल्हापूरचे नसले तरी पैलवानकीसाठीचा सराव त्यांनी खूप काळ कोल्हापुरात केला. श्रीपती खंचनाळे, दीनानाथसिंह, दादू चौगुले, लक्ष्मण वडार, सत्पालला एकदा नव्हे दोनदा अस्मान दाखवणारा युवराज पाटील, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा राम सारंग,
रुस्तुम-ए-िहद बनलेला हरिश्चंद्र बिराजदार अशा एकापेक्षा एक मातब्बर पैलवानांनी कोल्हापूरच्या मातीतच कुस्तीच्या तयारीसाठी घाम गाळला आणि इथल्या मैदानात विजयाची चव चाखली. आजही नवनाथ फरताडे, नंदू आबदार असे अनेक पैलवान कोल्हापुरातच सराव करीत कोल्हापूरच्या मातीशी आपलं नातं ठेवून आहेत. वडणग्यातील अनिल माने यांनी लहानपणापासून अनेक कुस्त्या पाहिलेल्या, मैदान मारल्यानंतर गुरूंनी शिष्याला डोक्यावर घेऊन व्यक्त केलेला आनंद अनुभवलेला. दुहेरी पट काढून किंवा ढाक लावून किंवा मोळी अथवा गदालोटसारखा डाव वापरून एखाद्या पैलवानानं समोरच्या गडय़ाला चीतपट केलं की अवघ्या मैदानात होणारा जल्लोष रोमारोमांत भिनलेला..
असा जल्लोष कधी तरी आपल्यासाठीही व्हावा अशी इच्छा मनात असली तरी घरातील परिस्थितीमुळं आणि इतरही काही अडचणींमुळं अनिल मानेंना स्वत:ला पैलवानकीत कारकीर्द करता आली नाही. तालमींमध्ये, कुस्त्यांच्या मैदानांमध्ये ये-जा सुरूच होती. दरम्यान, लग्न झालं. आपल्याला शक्य झालं नाही, पण आपल्या मुलांना पैलवान बनवायचंच असं मानेंच्या मनानं घेतलं. अनिल मानेंना स्वत:ला एकूण तीन मुलं, थोरला अतुल, मधली रेश्मा आणि धाकटा युवराज. भावाची हृषीकेश आणि नम्रता अशी दोन मुलं. अनिल आणि त्यांचा भाऊ दोघंही आपल्या व भावाच्या मुलामुलींमध्ये काहीच फरक न मानणारे. आपल्या मुलामुलींना कुस्ती शिकवायची हे मानेंचं वेड घरातल्या सर्वानाच परिचयाचं. त्यामुळं आपोआपच घराची नाही, कामांची वाटणी झाली. शेतीची कामं आणि कोल्हापूरच्या भवानी मंडपात असलेलं रसवंतीचं दुकान हे अनिल मानेंच्या वडिलांनी व भावानं सांभाळायचं आणि मुलामुलींचं जे काही असेल ते सगळं अनिल मानेंनी पाहायचं.
‘‘एकदा मनावर घेतलं, घर चॅम्पियन पैलवानांचं बनवायचं.. मग काय सुरूच केलं! वडणगे ते कोल्हापूर अंतर आठ किलोमीटरचं, पण मुलांना अगदी लहानपणापासून कुस्तीच्या, खेळाच्या वातावरणाचा सराव पाहिजे म्हणून मुलामुलींना तालमीत आणि कोल्हापुरातल्या शिवाजी, शाहू स्टेडियमवर घेऊन जायला लागलो. यात्रा-जत्रांमधल्या कुस्त्यांच्या दंगलींनाही न्यायला लागलो. मुलं पाच-सहा वर्षांची झाल्यानंतर शाळा निवडली तीदेखील मुद्दाम शाहू स्टेडिअम, शिवाजी स्टेडियम जवळ असणारी प्रायव्हेट हायस्कूल ही. भल्या पहाटे पाच वाजता मुलांना मोटरसायकलवरून घेऊन मी कोल्हापुरात पोहोचायचो, आजही जातो. उन्हाळा असो, पावसाळा की हिवाळा, यात कधी खंड पडू दिला नाही. पंचगंगेला महापूर आला तर वडणगे कोल्हापूर रस्ता बंद होतो, पण तरी सरावात खंड कधी पडू दिला नाही.’’ अनिल माने सांगत होते.
अनिल मानेंचं सांगणं त्यांच्या आई रत्नाबाई, पत्नी कल्पना, वहिनी संजीवनी असे सगळेच जण कौतुकानं
रेश्माची आजी रत्नाबाई यांना बोलतं केलं. नऊवारी हिरवी साडी, डोक्यावरून पदर, ठसठशीत कुंकू, आडवं मजबूत हाड, रापलेला वर्ण.. बाहेरच्या माणसांसमोर फार बोलण्याची सवय नाही, अशा रत्नाबाईंना मन मोकळं करायला सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आता तसं गावातलं कुणी काय वेडंवाकडं बोलत नाही खरं, सगळी प्रेमानंच बोलतात, पण सुरुवातीला आमाला वाटायचं, पोरीची जात आणि कुस्ती?.. कसं व्हायचं? पोरानं मनात घेतलं होतं, तो कुणाचंच काही ऐकत नव्हता. म्हणून त्याच्या हट्टापायी आम्ही तो म्हणंल तसं केलं. पोरांना कुठला खाना घालायला पाहिजे, कुठल्या येळंला घालायला पाहिजे, सगळं अनिलनं सांगितलं तसं करण्याच्या सूचना मी घरात दिल्या. पोरं सक्काळी चारला उठून पाचला व्यायामाला पोहोचायची. ती घरात येईपर्यंत त्यांच्यासाठी जे जे लागतं ते ते तयार ठेवायचं ही आता घराची सवयच झालीय. गावात कुस्ती झाली तेव्हा मी गेलो नव्हतो, पण गोकुळ दूध संघानं कुस्ती घेतली तेव्हा पहिल्यांदा मैदानात जाऊन कुस्ती बघितली. अनिल टीवीवर दाखवायचा तेव्हा आणि मैदानात पण बघताना काळीज लकलकायचं. पोरीला कुठं मार तर बसणार नाही ना, म्हणून जीव हलायचा. आजही हलतो. पोर्गी खेळायला बाहेर गेली असली की पोटात कसं तरी होतं, पण पोर्गी जिकली की डोळ्यांत पाणी उभं राहतं. धाडसीच आहे ती. कळत नसलेल्या वयापास्न तालमीत आणि पुरुषमाणसांत वावरलीय त्यामुळं इतक्या पुरुषमाणसांत आपण एकटं असं तिला काहीच वाटत नाही. पोरीसारखी वागतच नाही ती, आणि म्हणून तर एवढं नाव काढलं!’’
रेश्माला आणि तिच्या भावाबहिणींना तुम्ही खुराक काय आणि कसा देता, असं विचारल्यानंतर रेश्माची आई, काकी आणि वडील यांनी जे सांगितलं ते थक्क करणारं होतं. पैलवान बनवायचं तर मुलांना खायला काय द्यायला पाहिजे, त्यांचा व्यायाम काय असायला पाहिजे, त्यांना मसाज कशा पद्धतीनं करायला पाहिजे, हे सगळंच ज्ञान अनिल मानेंनी कुस्ती क्षेत्रातील तज्ज्ञांच्या जवळ वावरून, त्यांच्याशी सतत बोलून आत्मसात केलेलं. त्यातूनच त्यांनी रेश्मा आणि तिच्या भावंडांसाठी व्यायाम, खाणं, विश्रांती या सगळ्यांचं काटेकोर नियोजन केलं. मुलांना जितकं दूध लागेल तितकं विकत घ्यायची ऐपत नाही, मग मुलांसाठी म्हणून घरात पाच म्हशीच पाळल्या. मुलांना रासायनिक खतं घातलेलं नव्हे तर सकस अन्न मिळायला पाहिजे म्हणून शेतीत सेंद्रिय भाजीपाला पिकवणं सुरू केलं. कोंबडय़ा, त्याही देशीच. काकवी, उसाचा रस, सगळं घरचं. थंडाई बनवायची तीही घरातल्याच बायकांनी. यामुळं ना रेश्माची आई, काकी कधी गावाला जातात, ना त्यांनी कधी गेल्या पंधरा वर्षांत थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिलाय! सगळ्या घराचा ध्यास एकच. रेश्माला किंवा तिच्या भावंडांना बेकरीत तयार झालेली कुठलीही उत्पादनं किंवा फास्टफूड प्रकारात मोडणारं काही खायची परवानगीच नाही आणि तीही तसं कधी काही मागत नाहीत. हे वर्णन ऐकतानाच रत्नाबाई रात्री ‘मणका’ भिजत घालायच्या असं काय म्हणत होत्या हे कळलं. मणका म्हणजे त्यांना मनुका म्हणायचं होतं. मनुका, म्हाब्रा बी, जायदी खजूर, अक्रोड, मोसंबी व विविध फळांचे रस, खडकी कोंबडीचं मटण, अंडी, तुपातील आहार तसेच रोज प्रत्येकी किमान चार ते पाच लिटर दूध असा घरातल्या दोन मुली आणि तीन मुलं मिळून पाच जणांचा आहार. जास्तीत जास्त सकस आणि घरचं मुलांना मिळावं म्हणून सगळं घर राबत असलं तरीही या खुराकाचा खर्च दर महिन्याला चाळीस-पन्नास हजारांच्या घरात जाणारा. मुलांसाठी घेतलेले बूट किंवा पोशाख हेही महिन्या-दोन महिन्यांत खराब होतात. विशेषत: बूट नवीन नाही घेतले तर बोटं, गुडघे दुखायला लागतात. सरावात खंड पडू शकतो. म्हणून घरावर कितीही आर्थिक ताण आला तरी त्याबाबत मानेंचं घर तडजोड करीत नाही. दिवसातून पाच-सात तासांचा व्यायाम! सतत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये व्यग्र असणाऱ्या रेश्माला विशेषत: एका दिवसामध्ये ४०० जोर, ४०० सपाटय़ा आणि डिप्स मारणं, २००० हून अधिक दोरी उडय़ा, रोप चढणं, पायऱ्या चढणं-उतरणं, आठवडय़ातून एकदा १५ कि.मी. धावणं असा तगडा सराव करावा लागतो आणि असा व्यायाम करायचा तर खाणंही तसं हवंच!
रेश्माच्या निमित्तानं एकूणच पैलवानकीच्या क्षेत्रात महिला किती, याचा अंदाज घेण्याचा आणि भारतातील जुन्या महिला पैलवानांचा काही माग लागतो का, हे शोधण्याचा प्रयत्न केला तर गमतीदार माहिती समोर आली. झाशीची राणी आपल्याला योद्धा म्हणून माहिती आहे, पण तिची अंगरक्षक असणाऱ्या झलकारीबद्दल मात्र खूपच कमी माहिती आहे. काही ठिकाणी विश्वासार्ह संदर्भ मात्र मिळतो की, झलकारी मल्लविद्येत प्रवीण होती. याचा अर्थ मुलींनी मल्लविद्या शिकण्याची परंपरा तेव्हापासून किंवा त्याही आधीपासून
रेश्मा माने वयाच्या सहाव्या वर्षांपासून कुस्तीशी जोडली गेलेली. वयाच्या आठव्या वर्षी तिनं प्रत्यक्ष कुस्तीत पदार्पण केलं. त्याआधी एक वर्ष जिम्नॅस्टिकचं तर एक वर्ष जलतरणाचं कठोर प्रशिक्षण घेतलं. रोज पहाटे चारला उठायचं, वडिलांबरोबर कोल्हापूर गाठायचं, स्टेडियममध्ये पायऱ्यांचा चढउतार आणि इतर व्यायाम करायचे. सात-साडेसातपर्यंत घरी परतून नाश्ता, थोडी विश्रांती, तिथून पुन्हा शाळा. इतरांसाठी शाळा पाच-साडेपाचपर्यंत असली तरी रेश्मासाठी दुपारी चार वाजता शाळेबाहेर पडण्याची सवलत घेतलेली. तिथून पुन्हा व्यायाम, प्रशिक्षण या गोष्टी क्रीडा प्रबोधिनीत जाऊन सुरू. अशा चक्रातून रात्री साडेसात-आठ वाजेपर्यंत घरी पोहोचायचं आणि जेवण, शाळेचा अभ्यास करून झोपायचं. कसोशीनं हा दिनक्रम पाळणाऱ्या रेश्माला इयत्ता सहावीत असताना पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर रेश्मानं मागं वळून पाहिलं नाही. चाळीस किलो वजनी गटापासून बहात्तर किलो
‘म्हैसूर केसरी’सारखा सन्मान कर्नाटकात जाऊन जिंकलाय. राष्ट्रीय पातळीवर साधारण अठरा स्पर्धा ती खेळली आणि त्यांपैकी अकरा स्पर्धामध्ये ती विजेती ठरली. आंतरराष्ट्रीय पातळीवर आत्तापर्यंत ती तीन स्पर्धा खेळलीय आणि त्यामध्ये तिनं लक्षणीय यशही मिळवलंय. २०१२ मध्ये ‘द एशियन कॅडेट रेस्लिंग चॅम्पियनशिप’मध्ये ग्रीको-रोमन व फ्रीस्टाइलमध्ये, रेश्मा किरगिझस्तान या ठिकाणी कांस्यपदकाची मानकरी ठरली. त्याच वर्षी अझरबैजानमधील बाकू येथे ‘वर्ल्ड कॅडेट फ्रीस्टाइल’ कुस्ती स्पर्धेतही रेश्माने आपला लक्षणीय सहभाग नोंदवला आहे, तर मे २०१४ मध्ये थायलंडमध्ये झालेल्या एशियन चॅम्पियनशिप अॅण्ड एशियन क्वालिफायर फॉर यूथ ऑलिम्पिक गेम या स्पर्धेत रेश्मा मानेनं उपांत्य फेरी गाठून १६ ते २८ ऑगस्ट २०१४ या कालावधीत होणाऱ्या ‘यूथ ऑलिम्पिक’ गेममध्ये सबज्युनिअर गटात भारताची एकमेव महिला कुस्तीगीर बनण्याचा मान पटकावलाय…
कुटुंबाचं स्वप्न आपलं मानलंय
केसांचा बॉयकट, चमकदार गव्हाळ रंग, काळेभोर, आपल्याकडे थेट पाहणारे डोळे, ५.४ फूट उंची आणि हालचालीत मजबूतपणा जाणवणारी रेश्मा बोलायला लागली की अगदी निरागस. कुस्तीत डावपेच आणि प्रतिस्पध्र्याला माती चारण्यासाठी विविध तंत्रं वापरणारी ही मुलगी स्वभावानं मात्र अतिशय सरळ. कुस्ती ही गोष्ट तिच्यावर वडिलांनी किंवा कुटुंबानं लादलीय का, हे तपासून पाहायचा प्रयत्न केला तर लक्षात येतं की, आता कुस्ती खरंच तिच्या रक्तात भिनलीय. वडिलांचं आणि कुटुंबाचं स्वप्न तिनं आपलं मानलंय हे तिच्या बोलण्यातून कळत गेलं.
‘‘सुरुवातीला फार आवड नव्हती, कुस्ती खेळणारी मी एकटीच मुलगी.. पण एकदा मैदानात कुस्ती जिंकल्यानंतर शाळेत कौतुक झालं. बाहेरच्यांकडूनही कौतुक व्हायला लागलं आणि मग हळूहळू कुस्ती आवडायला लागली. मित्र-मैत्रिणींबरोबर भटकणं नाही, सिनेमे पाहाणं नाही किंवा जंक फूड खाणं नाही. फोनही वापरत नाही याचं इतरांना आश्चर्य वाटतं, पण मला आता याचं काही वाटत नाही. कुस्तीत करिअर करायचं तर हे सगळं करावंच लागेल. वर्षांतून फार तर एक-दोन दिवस मी मित्रमैत्रिणींसोबत काढते.’’
‘‘एकदा कुस्तीची आवड लागल्यानंतर मी खूप माहिती जमा केली. जुने मल्ल, कुस्तीचे प्रकार, नियम याबद्दल कुठं कुठं छापून आलेलं एकत्र करून त्याची शाळेत असताना चिकटवही तयार केली. वेगवेळ्या कुस्त्यांचं रेकॉर्डिग करून वडील घरी आणायचे तेव्हा ते बघतानाही खूप अभ्यास व्हायचा, होतो. आता तर काय, राम सारंगांसारखे प्रशिक्षक मला मनापासून मार्गदर्शन करताहेत. शारीरिक ताकद मी कमावलीय. तंत्रावर हुकमत मिळवणं सुरू आहे. मला आता माहितीय की समोरच्या खेळाडूच्या मानसिकतेचा विचार करूनच आपण आपले डावपेच ठरवावे लागतात. मन शांत ठेवून समोरच्यावर ताण आणायचा आणि वेळेचं गणित जमवून जास्तीत जास्त पॉइंट कसे मिळवता येतील या दृष्टीने दरवेळी नवी नीती ठरवायची. अजूनही तंत्रानुसार माझं कौशल्य थोडं कमी पडतंय याची जाणीव आहे, पण या कमतरतेवर मी नक्की मात करीन याची मला खात्री आहे. राष्ट्रीय पातळीवर खेळल्यानंतर मला इंडिया कॅम्प मिळाल्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जॉर्जियन व रशियन प्रशिक्षकांकडूनही शिबिरात काही शिकायला मिळालं. देशानुसार कुस्ती खेळण्याच्या तंत्रात कसा फरक असतो हे त्यांच्याकडून शिकल्यामुळं समजलं. परदेशात गेल्यानंतर भाषेची अडचण असतेच, पण अनेकदा अन्य खेळाडूंच्या तुलनेत आमचंच इंग्लिश बरं असतं. परदेशात इतरांचा सराव बघताना आपल्यापेक्षा नवं ते काय करतात, आधुनिक तंत्रं कोणती वापरतात, हे समजून घ्यायला मदत होते. तिकडं सराव करण्याचा आणि खेळण्याचा तो मोठा फायदा आहे. मातीवरची कुस्ती आणि मॅटवरची कुस्ती या दोन्ही मला अवगत असल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरचीच कुस्ती खेळावी लागत असली तरी मला स्वत:ला मातीतली कुस्ती अधिक आवडते. मातीत डावपेच करताना लागण्याची अजिबात शक्यता नसते. कारण मातीत पाय घट्ट बसतात, सटकत नाहीत. मॅटवर मात्र घामामुळं हातपाय निसटू शकतात. अडचणी आहेत, ताणतणावही आहेत, पण मी वडिलांचं आणि घराचं स्वप्न साकार करण्यासाठी माझ्याकडून कोणतीच कसर शिल्लक ठेवणार नाही.’’
सध्या रेश्माला व तिच्या वडिलांना चीनमध्ये होणाऱ्या या यूथ ऑलिम्पिक स्पर्धेचे वेध लागलेले आहेत. एकीकडे कसून सराव, दुसरीकडे आर्थिक मदत मिळवण्यासाठीची धडपड. खरं तर रेश्मा मानेसारख्या मुलीला कुस्तीगीर म्हणून कारकीर्द करण्यासाठी कोणी प्रायोजकत्व स्वीकारलं तर तिच्यावरचा, तिच्या कुटुंबावरचा काही ताण नक्कीच कमी होऊ शकतो, पण ना महाराष्ट्र शासनाने याबाबत काही पुढाकार घेतलाय, ना कोणी खाजगी कंपन्या अथवा उद्योगपतींनी.
एके काळी भारतातील कुस्ती ही जरासंधी कुस्ती, जांबुवंती कुस्ती, हनुमंती कुस्ती किंवा भीमसेनी कुस्ती म्हणून ओळखली जात असे. या प्रकारची कुस्ती लाल मातीतच खेळली जायची. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र सध्या ग्रीको-रोमन, फ्रीस्टाइल, ग्राप्लिंग, एमएमए व बीच कुस्ती असे प्रकार आहेत. यापैकी ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दोन प्रकारांचाच समावेश आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरची कुस्ती ही मुख्यत: मॅटवरच खेळली जाते, पण रेश्माला मातीतल्या आणि मॅटवरच्या अशा दोन्ही प्रकारच्या कुस्तीचा सराव आहे. दोन्ही प्रकारच्या कुस्तीचा सराव कसा काय, असं विचारल्यानंतर आणखीन एक थक्क करणारी बाब समजली. रेश्मा म्हणाली, ‘‘माझ्या कुस्तीच्या सरावात कोणत्याही कारणानं खंड पडू नये म्हणून घरच्यांनी आमच्या घराशेजारीच चाळीस बाय पन्नास फुटांच्या जागेत स्वत:ची तालीम उभी केली आहे. त्यात १५ बाय १५ फुटांचा मातीचा आखाडा आहे. त्यामुळं मॅटबरोबर मातीचाही सराव मला कायम आहे. त्यातच भाऊही कुस्ती खेळत असल्यामुळं कुणी बाहेरचे सरावासाठी नाही मिळाले तरी आम्ही आमच्या आखाडय़ात सराव करू शकतो.’’
स्वत:च्या पोरीला कुस्तीगीर बनवायचं म्हणून एखाद्या कुटुंबानं आपल्या घरालगत तालीम बांधून आखाडाच बनवायचा हे फारच आगळं उदाहरण! अनिल मानेंना त्याबाबत विचारलं तर ते म्हणाले, ‘‘झालं असं.. आता रेश्मा बारावीत आहे. लहानपणापासून मी तिला कोल्हापुरात तालमींमध्ये व क्रीडा प्रबोधिनीत नेत होतो, आजही नेतो, पण ती वयात आल्यानंतर एक दिवस कुणीतरी म्हणालं, इथं इतक्या मुलांमध्ये तुमची एकटीच मुलगी.. त्यातही वयात येत असलेली. कसं होणार? एकदाच कुणीतरी हा काळजीवजा नाराजीचा सूर ऐकवला आणि मनात आलं उद्या कुणी एकटीच मुलगी आहे म्हणून सरावाला आमच्या इथं येऊ नका म्हटलं तर? पोरीत गुण आहेत तर पोरीचा सराव थांबता कामा नये असं अख्ख्या कुटुंबानं ठरवलं. जागा होती, पण फार पैसे नव्हते. मग घरातल्या सर्वानीच पाया खणणं, विटा बनवणं, गवंडय़ाच्या हाताखाली काम करणं अशी कामं केली आणि आखाडा उभा केला. आता घरीच पर्यायी सोय आहे म्हटल्यावर
रेश्माचा कुस्तीगीर बनण्याचा प्रवास हा खरं तर एकटय़ा रेश्माचा प्रवास नाहीच आहे. तो अख्ख्या कुटुंबाचा प्रवास आहे. या घराला ध्यास कुस्तीचा आहे. या घराचा श्वास कुस्ती हाच आहे. रेश्माच्या वडिलांनी तर आपलं अवघं आयुष्य जणू यासाठी पणाला लावलंय. म्हणूनच सेंट्रल एक्साईजमध्ये काम करणारे त्यांचे एक जिवलग मित्र पांडुरंग पाटील गमतीनं म्हणतात, ‘‘रेश्मा तर घराचं, गावाचं, राज्याचं, देशाचं नाव काढेलच. पण त्यानंतर पुरस्कार द्यायचा तर तो एकटय़ा रेश्माला देऊन चालणार नाही. पुरस्कार तिच्या वडिलांना आणि तिच्या अख्ख्या कुटुंबाला मिळायला हवा!..’’
खरंच आहे, एखादा खेळाडू घडतो तेव्हा त्या खेळाडूची स्वत:ची मेहनत तर असतेच, पण त्याला घडवण्यासाठी गुरू आणि कुटुंबातील इतरांनीही असंख्य खस्ता खाल्लेल्या असतात.