वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com
कोणत्याही अघटिताच्या वेदनांचं ओझं हलकं करण्याचा त्यातल्या त्यात सोपा उपाय म्हणजे वाईटातून चांगलं काही तरी शोधण्याचा प्रयत्न करणं. माणसं बहुतेकदा तेच करत असतात. करोनाची महासाथ हे २०२० मधलं अघटित. एकटय़ादुकटय़ा माणसाने, एखाद्या कुटुंबाने, एखाद्या संस्थेने, शहराने, राज्याने, देशाने नव्हे तर सगळ्या जगाने अनुभवलेलं असं हे संकट. एका सूक्ष्म विषाणूने आपल्या प्रतापांनी सगळं जग वेठीला धरलं. एकाच वेळी जवळपास सगळ्या जगातले व्यवहार ठप्प होण्यासारखा अभूतपूर्व प्रकार बहुतेकांच्या आठवणीत पहिल्यांदाच घडला. आरोग्याच्या तसंच आर्थिक पातळीवर हाहाकार माजला. अनेकांना आपल्या प्रियजनांना अखेरचा निरोपही देता आला नाही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांनी कामधंदे गमावले. जगण्याच्या पातळीवरची सगळी गणितं उलटीपालटी झाली. गमावण्यासारखंदेखील काही उरतंय की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. गेले नऊ महिने हे सगळं होत असताना नुकसानीचा सतत हिशोब मांडला गेला. होणाऱ्या गोष्टी आपण थोपवू शकत नाही, आपण काहीही करू शकत नाही, ही हतबलताही सगळ्यांनी अनुभवली. माणसाने कितीही वैज्ञानिक प्रगती केली, जगणं सुलभ करण्याचा प्रयत्न केला तरी एखादा विषाणू त्याच्या नाकात दम आणू शकतो, त्याचं जगणं असह्य़ करू शकतो हे ओझं पाठीवर घेऊनच यापुढच्या काळात जगावं लागणार आहे. मग या वाईटातून चांगलं काय घडलं, हा विचार करून त्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न का करू नये?
करोना महासाथीमुळे अचानक टाळेबंदी झाली. सगळे व्यवहार ठप्प झाले. वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक अशा सगळ्याच पातळ्यांवर त्याचे परिणाम झाले. आता मागे वळून बघताना जाणवणारा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे जगणं ‘स्लोडाऊन’ होऊ शकतं याची सगळ्यांनाच झालेली जाणीव. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे, दळणवळणातील आधुनिकतेमुळे गेली काही र्वष सगळं जगच पायाला चाकं लावल्यासारखं सतत धावत होतं. प्रत्येक गोष्टीची सगळ्यांना घाई झाली होती. प्रचंड स्पर्धा, चढाओढ, हवी असलेली प्रत्येक गोष्ट ओरबाडून घेण्याची घाई, हवी असलेली प्रत्येक गोष्ट पैसा फेकला की सहज मिळते हा समज आणि मग त्यासाठी शक्य त्या प्रत्येक मार्गाने पैसा मिळवण्याची धडपड हे बहुतेकांचं जगणं झालं होतं आणि या सगळ्याला अचानक ब्रेक लागला. कुणाला कितीही घाई असली, कितीही धावायचं असलं तरी तसं करताच येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. हे स्लोडाऊन खरं तर नको होतं, पण ते आलं. प्रत्येकाला थांबावं लागलं. कुणी थांबून थोडं मागे वळून बघितलं, कुणी वर्तमान नीट जगून घेतला, कुणी पुढचा विचार केला. हे लादलं गेलेलं स्लोडाऊन किती गरजेचं, हवंहवंसं होतं, ते प्रत्यक्ष अनुभवल्यावरच जाणवलं.
टाळेबंदीच्या सकारात्मक परिणामांपैकी सगळ्यात पहिला परिणाम वैयक्तिक, कौटुंबिक स्वरूपाचा होता. या काळात सगळ्यांनाच घरी बसून राहावं लागलं. घरापासून लांब असणारेही आपापल्या ठिकाणी, पण एकाच जागी होते. हातात अचानक सगळेच्या सगळे २४ तास मिळाले होते. सगळेच जण घरात आणि करायचं काहीच नाही या परिस्थितीमुळे घरातल्या माणसांना एकमेकांशी संवाद साधायला कधी नव्हे तो वेळ मिळाला. एरवी, आई, जाऊ नको ना ऑफिसला, असं म्हणणाऱ्या लहान मुलांना आईवडील २४ तास मिळायला लागले. तरुण मंडळींनी समोर बसून आपल्याशी चार शब्द बोलावेत असं वाटणाऱ्या घरातल्या ज्येष्ठांना तरुणांचा सहवास मिळाला. घरातले कॅरम बोर्ड, पत्ते बाहेर निघाले. सगळ्यांनी घरात एकत्र बसून नवेजुने सिनेमे बघितले. सतत बाहेर जेवणाऱ्या लोकांनी घरचं अन्न खाल्लं. त्यामुळे अनेक पदार्थ घरीसुद्धा करता येतात आणि ते घरी करूनसुद्धा छान होऊ शकतात हे अनेकांना समजलं. एकमेकांना मदत करत अगदी जिलेबी, केक असे जे एरवी विकतच आणले जातात असे पदार्थ घरी तयार केले. घरी केलेल्या पदार्थाची छायाचित्रं समाजमाध्यमांवर अपलोड करण्याचे प्रकार इतके वाढले की, अशा लोकांना चिमटा काढण्यासाठी आपल्याला पृथ्वीवरून करोना संपवायचा आहे, किराणा नाही, असे विनोदही व्हॉट्सअप विद्यापीठामधून फिरले. मुख्य म्हणजे बाहेरचे पदार्थ खाणं कमी झाल्यावर वजन कमी झालं असाही साक्षात्कार अनेकांना झाला.
रोजच्या रामरगाडय़ातून आपले छंद जोपासायला वेळच मिळत नाही अशी अनेकांची तक्रार असायची. त्यांना त्यासाठी वेळ मिळाला. मग कुणी चित्रं काढली, तर कुणी वाद्य शिकायला घेतलं. कुणी वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाइन कोर्स केले. कुणी घरी बसून आपापल्या जवळच्या माणसांशी फोनवरून का होईना, पण शांतपणे आणि मनसोक्त गप्पा मारल्या. भेटता येत नाही याची रुखरुख असणाऱ्यांनी व्हिडीओ कॉल करून एकमेकांना बघून ती कमतरता भरून काढली. कुणालाच कसलीच धावपळ नव्हती. आत्ता बोलायला वेळ नाही, असं कुणीच कुणालाच म्हणत नव्हतं. उलट वेळ आहेच तर आजवर राहिलेलं बोलून घेऊ या असंच अनेकांना वाटत होतं. टाळेबंदीमुळे अनेक सोसायटय़ांमध्ये रोज येणाऱ्या घर-मदतनीसांनाही मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी असं झालं की, घरातली सगळी कामं घरीच करायची होती. ती घरातल्या सभासदांनी वाटून घेतली. करोनाच्या महासाथीमुळे स्वच्छतेचं महत्त्व नव्याने समजलं होतंच. त्यामुळे घरातली मंडळीच घराची साफसफाई करायला लागली. सगळेच जण घरी असल्यामुळे घरातल्या स्त्रीवरचा कामांचा ताण वाढला. अनेक ठिकाणी स्त्रियांना वर्क फ्रॉम होम होतंच. मग वर्क फ्रॉम होम करणाऱ्या घरातल्या पुरुषांनीही घरकामात मदत करायला सुरुवात केली. त्यामुळे घरकामाची विभागणी काही काळापुरती तरी बदलली. घरकाम करणाऱ्या पुरुषांचे विनोद त्या काळात समाजमाध्यमांमधून फिरत होते.
सगळ्यात मोठा विनोद म्हणजे मोबाइल बाजूला ठेव आणि अभ्यासाला बस, असं मुलांना दटावणाऱ्या आयांवर मोबाइल घे आणि अभ्यासाला बस, असं सांगायची वेळ आली होती. मोबाइल बाजूला ठेव आणि शाळेत जा, असं सांगत होतीस ना, आता बघ शाळाच मोबाइलमध्ये येऊन बसली आहे, असं मिश्कीलपणे सांगणारं एका छोटय़ा मुलाचं व्यंगचित्र त्या काळात एकमेकांना पाठवलं गेलं. आयांसाठी यापेक्षा काव्यगत न्याय तो काय? पण त्यामुळे घराघरांमधली चिमुरडी मोबाइल वापरण्यात अधिकच वाकबगार झाली आहेत. नवी पिढी अधिक वेगाने तंत्रकुशल होत असते. मुलांच्या हातात मोबाइल दिले की, आईवडिलांपेक्षा किती तरी अधिक सफाईने तो वापरतात. आता तर ती त्यात आणखी माहीर झाली आहेत. दोन-तीन इयत्ता एकत्र करून एका शाळेचा चौथीचा वर्ग सुरू होता. प्रचंड कलकलाट सुरू होता. प्रत्येक मुलाला काही तरी बोलायचं होतं. शिक्षिकेला तो आटोक्यात आणता येईना. शेवटी एक-दोन मुलांनीच तिला सांगितलं की, म्युट ऑल हा पर्याय वापरा म्हणजे तुम्हाला आमचा आवाज ऐकू येणार नाही. आणखी एका वर्गात शिक्षिकेला एका विद्यार्थिनीच्या मागून दुसऱ्या शिक्षिकेचा आवाज ऐकू येत होता. तिला वाटलं की, पाचवीतली आपली विद्यार्थिनी एकाच वेळी दोन वर्गाना उपस्थिती लावते आहे; पण मग बाकीच्या मुलांनीच शिक्षिकेला सांगितलं की, त्या मुलीच्या घरात, त्याच खोलीत, त्याच वेळी तिच्या बहिणीचाही वर्ग सुरू आहे म्हणून तुम्हाला वेगळा आवाज ऐकू येतो आहे. तात्पर्य, या सगळ्या प्रक्रियेत अगदी लहान मुलंही डिजिटल माध्यमाला कमालीची सरावली आहेत. ग्रामीण भागात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या मुलांमुळे त्यांचे पालकही अधिक वेगाने डिजिटल साक्षर झाले आहेत. काही वर्षांपूर्वी अभिषेक बच्चनने एका मोबाइल नेटवर्कची जाहिरात केली होती. तेव्हा गावखेडय़ामधली मुलं शाळेत येऊ शकत नसतील तर मोबाइलच्या माध्यमातून शाळाच त्यांच्यापर्यंत पोहोचते असं दाखवलं होतं. ती जाहिरात शहरं- गावं सगळ्यांच्याच बाबतीत खरी ठरली आणि घरबसल्या शाळा होऊ शकते, हा शोध सगळ्यांनाच नव्याने लागला, असं म्हणायला हरकत नाही.
शाळेच्या बाबतीत जे झालं तेच कार्यालयीन कामांबाबतीतही झालं. वर्क फ्रॉम होम ही संकल्पना याआधीही होतीच; पण करोना महासाथीमुळे ती गतिमान झाली. काही जणांपुरती न उरता अनेकांना तिचा अवलंब करावा लागला आणि अनेक कामं प्रत्यक्ष कार्यालयात न जाता, शहराबाहेर अनेक तासांचा प्रवास करून, दौरे करून न करता घरबसल्या एका व्हिडीओवरून होऊ शकतात याचा अनेकांना अनुभव आला. त्यामुळे यापुढच्या काळात अनेक आस्थापनांच्या कामाचं स्वरूपच बदललं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्मचारी कार्यालयात न येता घरून काम करत असल्यामुळे आस्थापनांचे अनेक गोष्टींवरचे पैसे वाचून फायदा झाला. शिवाय बहुतेकांना नोकरी टिकवायची असल्यामुळे जास्त कामदेखील व्हायला लागलं. भारतातल्या आयटी आस्थापनांना टाळेबंदीच्या काळात अनेक नवीन प्रकल्प मिळाले आहेत. त्यांनी नेहमीच्याच कर्मचाऱ्यांकडून ते करून घेऊन त्यांना दिवाळीत पाच ग्रॅम सोन्याचं नाणं किंवा बऱ्यापैकी रक्कम बोनसरूपात दिल्याचं सांगितलं जात आहे. प्रकल्प वाढल्यामुळे आपल्याकडच्या आयटी कंपन्यांमध्ये सतत नोकरभरतीही होते आहे. त्यामुळे टाळेबंदीनंतर आयटी क्षेत्रातला रोजगार वाढल्याची चर्चा आहे. दुसरीकडे टाळेबंदीच्या काळात इतर क्षेत्रांतल्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्या; पण अशा लोकांनी घरच्या घरी करता येतील असे छोटेमोठे व्यवसाय सुरू केल्याचंही दिसतं. केटरिंगवर अनेकांनी प्रामुख्याने भर दिला आहे. टाळेबंदीनंतर व्यवसायवृद्धीसाठी लगेचच सुरू करण्यात आलेल्या एका फेसबुक ग्रुपवर मध्यंतरी टाळेबंदीच्या काळात संबंधित ग्रुपमुळे सभासदांचा व्यवसाय झाला का, त्यांना फायदा झाला का, याचा लेखाजोखा घेण्यात आला. तेव्हा वेगवेगळी पिठं, चटण्या-मसाले, लाडू-चिवडा-चकल्या असे खाद्यपदार्थ, साडय़ा, तयार कपडे, बेडशीट्स, जेवणाचे डबे पुरवणं अशा लहानलहान व्यावसायिकांनी टाळेबंदीच्या काळातही त्यांचा चांगला व्यवसाय झाला हे आवर्जून कबूल केलं. एरवी निरनिराळ्या प्रकारचे व्यवसाय करणाऱ्यांनी या काळात भाज्या-फळं-धान्यधुन्यं आणून घरपोच पुरवणं असे व्यवसायही केले आणि व्यवस्थित पैसे कमावले.
टाळेबंदीच्या सामाजिक परिणामांकडे बघितलं तर वेगवेगळे पैलू लक्षात येतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत याची लोकांना जाणीव झाली. आपण उंचच उंच सोसायटय़ांमध्ये राहात असलो तरी आपलं जगण सुसह्य़ करण्यासाठी तळच्या वर्गातले कष्टकरी मोठा हातभार लावत असतात. त्यांच्याशिवाय आपण आरामदायी जीवन जगू शकत नाही याची करोना महासाथीने करून दिलेली जाणीव ही खूप मोलाची सामाजिक गोष्ट आहे. मुख्य म्हणजे आपल्याला ही जाणीव पहिल्यांदाच झाल्याचं अनेक जण समाजमाध्यमांमधून प्रामाणिकपणे मान्यही करताना दिसले. अलीकडच्या काळात शहरांची मनोरंजन केंद्रे ठरलेले मॉल या काळात बंद होते. ब्रॅण्डेड वस्तूंची खरेदी करता येत नव्हती आणि रोजच्या जगण्यासाठी त्या सगळ्यापेक्षा अन्नधान्य, भाज्या, फळफळावळ यांची गरज होती. त्यामुळे जगण्यामधल्या मूलभूत गोष्टीचा म्हणजे अन्न पिकवणारा शेतकरी हा समाजामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे याची जाणीव करोना महासाथीने नव्याने करून दिली. दुसरीकडे सिनेस्टार्स, क्रिकेटर्स यांना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांना समाजामधले खरे सुपरहिरो कोण आहेत ते समजलं, कारण जगाला वेठीला धरणाऱ्या या सूक्ष्म विषाणूचा सामना करण्यासाठी कुणी सुपरस्टार आला नाही की एका विकेटमध्ये सहा सिक्स मारणारा किंवा सहा बळी घेणारा फलंदाज वा गोलंदाज आला नाही. करोनाच्या विषाणूचा सामना करत लोकांचा जीव वाचवण्यासाठी पुढे आले ते वैद्यकीय क्षेत्रामधले कर्मचारी. डॉक्टर्स, नर्सेस, इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रसंगी आपला जीव पणाला लावला. लोकांनी घरात बसावं यासाठी पोलीस सुरुवातीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरले. अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीच्या काळात गरीब वस्त्यांमध्ये फिरून रोजावर काम करणारे उपाशी राहू नयेत म्हणून अन्नधान्याचं वाटप केलं. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीत काम करणारे लोक या काळात अव्याहत काम करत राहिले. हे सगळे खरोखरचे सुपरहिरो आहेत याची समाजाला जाणीव झाली ती याच काळात.
आपल्या भारतीय समाजाच्या बाबतीत आवर्जून दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अगदी कमी खर्चात, कमी गर्दीत, कमी ध्वनिप्रदूषण करत लागलेली लग्नं. जेमतेम ५० माणसांच्याच उपस्थितीला परवानगी असल्यामुळे अनेकांना लग्नाशी संबंधित अनेक गोष्टींना फाटा द्यावा लागला. लग्न इतक्या स्वस्तात गाजावाजा न करता होऊ शकतं हे अनेक भारतीय लोकांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवलं असेल.
टाळेबंदीच्याच काळात कुणी तरी समाजमाध्यमांमधून एक छायाचित्र प्रसिद्ध केलं होतं. ते होतं पंजाब, हरियाणामधून घराच्या गच्चीतून दिसणाऱ्या हिमालयाच्या पर्वतरांगांचं. उत्तर प्रदेशातूनही कुणी तरी असं छायाचित्र प्रसिद्ध केलं होतं. असं घडू शकतं यावर आधी कुणाचा विश्वासच बसू शकत नव्हता; पण वाहतूक थांबली, हवेमधलं कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे प्रदूषण घटून तिथल्या लोकांना घरबसल्या हिमालय पाहता आला. आपल्या आसपासचं जग इतकं सुंदर असू शकतं ही जाणीव त्यामुळेच लोकांना झाली. दुसरीकडे टाळेबंदीमुळे माणसाची चाहूल कमी झाल्यामुळे ठिकठिकाणच्या जंगलांमधले प्राणी शहरांच्या, गावांच्या परिघावर मुक्तपणे फिरताना दिसायला लागले. पिसारा फुलवून रस्त्यावर निर्धास्तपणे नाचणारे मोर हे त्यातलं सगळ्यात सुंदर दृश्य होतं. जगभरात अनेक ठिकाणी थोडय़ाफार फरकाने वेगवेगळ्या प्राण्यांच्या बाबतीत ही दृश्यं बघायला मिळाली.
करोना साथीमुळे लादल्या गेलेल्या टाळेबंदीचे जसे गंभीर दुष्परिणाम आहेत तशा काही सकारात्मक म्हणता येतील अशा या गोष्टीही आहेत. वाईटामधलं चांगलं म्हणता येईल अशा या गोष्टींची यादी आणखी कितीही वाढवता येईल. हा पॉझ म्हणता येईल किंवा ब्रेक म्हणता येईल. त्याने आपल्याला थोडं थांबायला लावलं, विचार करायला लावला. आपल्यासमोर असतात त्यापेक्षा वेगळे पर्याय असतात, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने जगता येतं हे दाखवलं. यापुढच्या काळात आपण हळूहळू नेहमीच्या जगण्याला सरावत जाऊ तेव्हा या दिवसांची आठवण ठेवू का आणि शहाणपण शिकू का, हा खरा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे.