‘‘डॉक्टर, गेली तीन वर्षे मी आय.टी. क्षेत्रात काम करतोय. माझ्याबरोबर नोकरीला लागलेला मित्र जास्त चांगली नोकरी मिळाली म्हणून ही नोकरी सोडून गेला. मी मात्र इथेच राहिलो. आता काम करावेसेच वाटत नाही. पुढे काही भविष्यच नाही असे वाटते. कुठल्याही गोष्टीत रस राहिला नाही. रात्र रात्र झोप येत नाही. आपण पाहिलेली करिअरबद्दलची स्वप्ने कशी पूर्ण होणार असा विचार सतत मनात असतो. त्यामुळे माझे सिगरेट पिणे खूप वाढले आहे. सकाळी उठल्या उठल्या पहिली सिगरेट लागते.’’ सुहास त्याची व्यथा मांडत होता.
‘‘लग्नाला दोन वर्षे झाली. माझी नोकरी मार्केटिंग कंपनीत आहे. खूप मिटिंग्स, प्रवास असतो. गेल्या सहा महिन्यांत आमचे एकमेकांशी पटेनासे झाले आहे. वेगळे राहतो. घटस्फोट घेणे हा एकच पर्याय समोर आहे. याचा मला प्रचंड मानसिक त्रास होतो. सारखे रडू येते. एकटे वाटते. कुठेतरी निघून जावे असे वाटते. भूक लागत नाही. पण कामाच्या निमित्ताने असलेल्या सर्व पाटर्य़ाना मी जातेच जाते. पितेही नियमितपणे. माझे चुकते आहे. काय करू कळत नाही.’’ सोनाली सांगता सांगता रडू लागली.
उत्तम शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या युवकांमध्ये नोकरी, तिथली स्पर्धा, स्वत:च्या महत्त्वाकांक्षा, आपल्या आणि आपल्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा अशा विविध कारणांनी ताणतणाव मोठय़ा प्रमाणावर आढळून येतो. त्यातून निराशा निर्माण होताना दिसते. त्या त्या क्षेत्रातील वातावरणामुळे आणि समाजमान्यतेमुळे सिगरेट, मद्यपान, अशा व्यसनांकडे वळणारे तरुण-तरुणीही मोठय़ा प्रमाणावर दिसतात.
‘गेले वर्षभर नोकरी मिळत नाही आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतले, पण मनासारखी नोकरी नसल्यामुळे घरातच असतो. मग घरचेही सारखे बोलतात. गेल्या दोन महिन्यांपासून घराबाहेर पडावेसेच वाटत नाही. आपल्या जगण्यात काही अर्थ नाही असे वाटत राहते. म्हणून शेवटी काल रात्री उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. वाटले मरण आले तर बरे.’
‘लग्नानंतर सासरी छळच सहन करते आहे. शेवटी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नसते वाचले तर बरे झाले असते.’
आपल्या देशात होणाऱ्या आत्महत्यांपैकी ४० टक्के आत्महत्या ३० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या युवकांनी केलेल्या असतात. तरुणींमध्ये हे प्रमाण तरुणांपेक्षा जास्त असते. युवकांमध्ये मुख्यत्वेकरून उदासपणा, अतिचिंता, व्यसनाधीनता असे मानसिक विकार दिसतात. सर्वसाधारणपणे युवकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असते. तरीही अनुवांशिकता, मेंदूतील रसायनांमधील बदल अशा जैविक आणि अनेक मनोसामाजिक कारणांमुळे १५-२० टक्के युवकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
समाजातल्या वाढत्या स्पर्धेला तोंड देताना मानसिक बल कमी पडते. नातेसंबंधामध्ये दुरावा, मित्रपरिवाराशी सुसंवाद नसेल तर एकटेपणा येतो. समाजातील कठीण परिस्थिती उदा. गरिबी, बेकारी, स्त्री-पुरुष असमानता, स्त्रियांवरील अत्याचार, भ्रष्टाचार तरुणांना निराश करू शकते. लहानपणापासून प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले तर तरुणपणी मानसिक विकार होण्याची शक्यता बळावते. शहरामध्ये गर्दी, लोकसंख्या, नोकरी-व्यवसायातील स्पर्धा तसेच कामातील नीरसता, दैनंदिन जीवनातील संघर्ष अशांचा सामना करावा लागतो. ग्रामीण युवकांसमोरील आव्हाने वेगळ्या प्रकारची आहेत. अवघड बनत चाललेला शेती व्यवसाय, शिक्षणानंतर संधी उपलब्ध नसणे, सामाजिक विषमता, शहराकडे स्थलांतर आणि आर्थिक चणचण या सगळ्यामुळे गावातला तरुण निराश होताना दिसतो.
युवकांमधील मानसिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांचे लवकर निदान होणे आणि उपचार सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी मानसिक विकारांबद्दल जागृती असणे तसेच विकाराशी जोडलेला कलंक नाहीसा होणे हेही गरजेचे आहे. परंतु मानसिक स्वास्थ्य म्हणजे केवळ मानसिक आजारांवर उपचार नव्हे तर मानसिक विकारांना प्रतिबंध आणि मानसिक स्थिती सुदृढ करण्याचा प्रयत्न करणे.
युवकांनी आपले मानसिक बळ वाढवण्यासाठी आपणहून प्रयत्न केले पाहिजेत. वास्तववादी महत्त्वाकांक्षा ठेवणे, त्या पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्याने ध्येय गाठणे, त्यासाठी कष्टांची तयारी असणे आवश्यक! कामातील तोचतोचपणा घालवण्यासाठी अनेक जण वर्षभराची सुट्टी घेऊन ग्रामीण भागात सामाजिक आणि विकासाच्या कामात हातभार लावताना दिसतात. फोटोग्राफी, गाणे, वाद्यसंगीत, निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती असे अनेक उपक्रम करून आज अनेक युवक आपल्या ताणतणावांचा सामना करतात.
शाळा-महविद्यालयीन शिक्षणापासून पुढील पिढीचे मानसिक स्वास्थ्य टिकवावे आणि वाढावे म्हणून प्रयत्न केले जाऊ शकतात. शिक्षकांची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांसमोर योग्य आदर्श उभे करणे, आपल्या संस्कृती इतिहासाबद्दलची माहिती देऊन स्वाभिमानाची भावना मनात निर्माण करणे, शालेय उपक्रम-प्रकल्पांमधून मुलांमधील विविध गुणांना वाव देणे व त्यातून त्यांस स्वत:ची ओळख पटवून देणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, खेळांच्या व कलांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच ताणतणावाशी सामना करण्याचे साधन मिळवून देणे अशा विविध पद्धतींने शिक्षक तरुण पिढीचे मनोसामथ्र्य वाढवू शकतात.
कुटुंबातील सदस्य सुदृढ नातेसंबंधांमधून युवकांना मानसिक व भावनिक आधार देतात. आपल्या संकटकाळी आपण आपल्या कुटुंबाची मदत घेऊ शकतो असा विश्वास ज्या तरुणांमध्ये असतो त्यांना लवकर निराशा येत नाही. केवळ शैक्षणिक गुणवत्तेचे नाही तर इतर गुणांचेही तेवढेच कौतुक कुटुंबात असेल तर आत्मविश्वास वाढीस लागतो आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. वैवाहिक समस्या, आर्थिक समस्या, व्यावसायिक समस्या अशा कोणत्याही समस्येला सामोरे जाताना आपण एकटे नाही, आपले कुटुंबीय आपल्या पाठीशी आहेत ही भावना मनात सुरक्षितता निर्माण करते आणि अपयशाचा सामना करणे शक्य होते.
आधीच्या पिढीमध्ये पुढच्या पिढीला गुरू (mentor) म्हणजे मार्गदर्शक, सल्लागार असे कोणी मिळाले तर मोठ्ठा आधार मिळतो. निर्णय प्रक्रियेला मदत होते आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते.
डॉ. जान्हवी केदारे – response.lokprabha@expressindia.com