मतदानाची तारीख जवळ यायला लागल्यावर राजकीय पक्ष विविध माध्यमांतून आपल्या पक्षाचा प्रचार करायला लागतात. त्यांनी लोकहितार्थ केलेली निरनिराळी कामे, राबवलेले विविध उपक्रम यांच्याबद्दल आपल्याला जाणीव करून देतात. निवडणुकांना उभे राहिलेल्या अशा राजकीय पक्षांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे, येणाऱ्या काळात कोणाकडून अपेक्षा करायची यासारखे बरेच प्रश्न आपल्याला पडतात. त्यातून जर मतदार पहिल्यांदाच मत देणार असेल तर प्रश्नांची गुंतागुंत जास्तच वाढते. अशाच प्रथम मतदारांना काय वाटते हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊ..

मागच्या मतदानाच्या वेळेला मत द्यायला राजकीय पक्षामध्ये निवड करायला पर्याय कमी होते. या वेळी मात्र तिसरा नवीन पक्ष आल्यामुळे पर्याय वाढलेले आहेत. या नवीन पक्षाला आपण संधी द्यायला हावी. पुढे असेही वाटते की कुठलाही पक्ष असो, आपण त्याला सिद्ध करायला थोडा वेळ द्यायला हवा. थोडा विश्वास दाखवायला हवा. मत देऊनच हा विश्वास दाखवता येईल.
– अनंत राजे, इंदोर

माझ्या मते, आपण जर सरकारकडून काही अपेक्षा करत असू तर त्यांना निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे. खरं सांगायच्ां तर जेव्हा मत देण्याचा अधिकार आपल्याला मिळतो ना, तेव्हा राजकारणात आपोआप आपण थोडं तरी लक्ष घालायला लागतो. म्हणून मत द्यायला तर हवंच.
– आसावरी फडके, पुणे.

मी ठाण्यात राहतो. माझ्या आठवणीत तरी आमच्या भागातले नगरसेवक वेळोवेळी विकासाची कामे हातात घेतात व ती पूर्ण करतात. त्यामुळे मत देऊ नये असे मला कधी वाटण्याचा प्रश्नच येत नाही.
– निनाद जोशी, ठाणे.

मी गेल्या निवडणुकीमध्ये मतदान केले होते. त्या वेळी मनासारखा बदल किंवा अपेक्षांची पूर्तता झाली नाही, तरी या वेळी मी मत देणार आहे. जे तरुण उमेदवार मनात काही उद्देश घेऊन राजकारणात उतरले आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. नाही तर बऱ्याचदा होते असे की आजूबाजूची परिस्थिती अशी असते की ठरवलेले उद्देश सफल होत नाहीत.
– कल्याणी खुपेरकर, सातारा

मतदान करणे हे सर्वाचे कर्तव्य आहे. त्यामुळे मतदान करायचं की नाही हा प्रश्न माझ्याकरता येतच नाही. उमेदवारांनी त्या त्या भागात जाऊन जनतेशी व्यक्तिगत संपर्क साधला तर कोणाला मत द्यायचे हे आपल्याला कदाचित स्पष्ट होईल.
– अक्षता नामजोशी, भोपाळ.

मला असं वाटतं की तरुण उमेदवारांचा सहभाग राजकारणात वाढला तर एखादा निर्णय घ्यायला जी दिरंगाई होते ती कदाचित होणार नाही. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मिळाले तर तरुणांना योग्य ती दिशा मिळेल. त्यांनी आपल्याकरता काम करावं असं जर वाटत असेल तर आपल्याला मत तर द्यायलाच हवं.
– सजल सावंत, कुडाळ.

मी मागच्या निवडणुकीला मतदान केले होते, यावेळीदेखील करणार आहे. मतदान केल्याशिवाय आपण सरकारकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे असे मला वाटते. मी ज्या भागात राहते, तिथे तरी कामाची काही तक्रार नाही. जास्तीत जास्तं तरुण राजकारणात आले तर आजच्यापेक्षा वेगळे चित्र कदाचित असेल
– चैत्राली साळवी, मुंबई</strong>

आपण प्रत्येक वर्षी एकाच पक्षाला मत दिलं तर दुसरा पक्ष काय करेल किंवा दिलेली आश्वासने पूर्ण करेल का नाही हे आपल्याला कळणारच नाही. त्यामुळे दुसऱ्या पक्षाला पण स्वत:ला सिद्ध करायला संधी द्यायला हवी. आणि हे योग्य त्या पक्षाला निवडून दिले तरच शक्य हाईल. त्यामुळे मतदानाला पर्याय नाही.
– अश्विनी दामले, मुंबई.

पंतप्रधानपदी कोण उमेदवार आहे, यावरून एखाद्या पक्षाला मत देण्याऐवजी आपल्या भागात कोण व कसे काम करत आहे त्यावरून जर पक्षाला मत द्यायचे प्रत्येकाने ठरवले तर त्यात सगळ्यांचे भले होईल असे मला वाटते.
शेफाली मोरे, मुंबई.

Story img Loader