01youthआज सहज खिडकीत बसून बाहेरचे दृश्य बघत होते. तेव्हा मनात विचार आले की, अरे हे जग किती बदलले आहे! इथली सगळी माणसे मोबाइलमय झाली आहेत. या जगातील लोकसंख्येपेक्षा मोबाइलची संख्या जास्त असेल. आपण आपले सगळे संदेश मोबाइलद्वारे देत असतो. त्यावरून एक किस्सा आठवला. मी कॉलेजमध्ये मोबाइल घेऊन जायची विसरले. मग आईने तो निरोप एका चिठ्ठीत लिहिला. मला दिसेल अशा ठिकाणी ती चिठ्ठी ठेवली. खरंच त्या वेळी मला मनापासून आनंद झाला आणि वाटलं बरं झालं मोबाइल विसरला तो! त्यावरून मला माझ्या शाळेतल्या दिवसांची आठवण झाली. त्यावेळी आम्ही असेच एकमेकांना चिठ्ठी लिहून द्यायचो. खेळायचो. आई आम्हाला शाळेच्या डब्यामध्ये चिठ्ठी लिहून पाठवायची. त्यात कधी-कधी कविता असायच्या. पत्र असायची आणि ते वाचून खूप आनंद व्हायचा. खूप खूप मज्जा वाटायाची. मी आणि माझी बहीण पण असेच एकमेकींना चिडवायचो. चुकले असेल तर ‘सॉरी’चे पत्र लिहायचो. धन्यवाद द्यायचे असेल तर ‘थँक्यू’चे पत्र. परत आम्ही एकमेकींना एकमेकींबद्दल काय वाटते याबद्दल लिहायचो. प्रत्येकाच्या वाढदिवसाला घरभर शुभेच्छा पत्रे सापडायची. आम्ही निरोप पण चिठ्ठीतून द्यायचे. उदा. मी रात्री उशिरा झोपले आहे. झोपायला एक वाजला. मला लवकर उठवू नको. मी नऊ वाजता उठणार आहे. ओके बरं. गुड मॉर्निग. ‘तू पटापट आवर लेट नको करू’ अशा पद्धतीच्या चिठ्ठय़ा आम्ही घालून ठेवायचो. खूप छान वाटायचं. हे झालं घरचं. पण शाळेतसुद्धा आम्ही ‘सॉरी’च्या चिठ्ठय़ा पाठवायचो. फ्रेंडशिप डे, दिवाळी, संक्रांत अशा सणांना तर सगळय़ात आधी कोण कशाला शुभेच्छा पत्र देतंय यात स्पर्धा असायची. मग त्यासाठी लवकर जायचं शाळेत! खूप मस्त वाटायचं. या सगळय़ा चिठ्ठय़ा मी माझ्या कपाटाच्या लॉकरमध्ये जपून ठेवल्यात. कोणी त्या लॉकरकडे बघून विचारते, ‘यात दागिने आहेत का?’ खरंच या सगळय़ा आठवणी सोन्याच्या दागिन्यांपेक्षा अनमोल आहेत. त्या मी खूप वेळा वाचते. पुन्हा-पुन्हा काढून! खूप आनंद मिळतो. जुन्या आठवणी जाग्या होतात. 

पण आत्ताच्या काळात सगळे बदलले आहे. कोण कुणाला असे पत्र, चिठ्ठी लिहिली की सगळे त्यालाच हसतात. चिडवतात. किती जुनाट विचारांची आहेस असं म्हणतात. आता सगळे जग ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर चालते. आठवण आली, काही वाटले तर लगेच ‘अपडेट व्हायचं’ सगळय़ांसोबत गप्पा मारायच्या. आपल्या फीलिंग त्या फायलीतून दाखवायच्या. आपला प्रोफाइल पिक्चर स्टेट्स रोज बदलायचा. आपण ज्या काही गप्पा मारतो त्या थोडय़ा वेळाने डिलिट होऊन जातात. आपण कुणाला तर काहीतरी आपल्या भावना सांगतो ते तेवढय़ापुरते लक्षात राहते, नंतर त्यांना काही अर्थच उरत नाही. शुभेच्छा सगळय़ा त्या दिवसापुरत्या आठवतात, नंतर त्यासुद्धा पुसल्या जातात. त्या आपल्यासोबत कायम राहत नाहीत. त्या निघून जातात. फक्त काही तासांपुरतेच आपल्यासोबत असतात. काही वाटले तर तेवढय़ापुरते? यायचे-बोलायचे संपले! माणूस कळत नकळत आपला स्वार्थ बघत चालला आहे. त्याचा आनंद छोटा झाला आहे व आनंदसुद्धा काही तासांपुरता असतो. पण त्यातल्या गप्पा मात्र वेळखाऊ असतात. चिठ्ठीतील मजा त्यात नाही. आपली कल्पनाशक्ती मरते. आपला आनंद छोटा होतो, पण चिठ्ठीतून आनंद आपल्यासोबत राहतो. आठवणी सोबत राहतात. चिठ्ठीतून आपल्या भावना मनाला जाऊन भिडतात. तसे व्हॉटस्अ‍ॅपवर होत नाही. बघा तुम्हीच विचार करून…
तन्मयी उमेश कुलकर्णी

Story img Loader