आटोपशीर सभागृहामध्ये प्राण कानात घेऊन बसलेल्या श्रोत्यांपुढे तो गिटारची साधीशी धून छेडतो आणि टाळ्यांचा कडकडाट होतो. आपण यु-टय़ुबवर ते चित्र पुष्कळ वर्षांनंतर बघत असतो; पण त्या टाळ्यांमुळे आपणही थरारून उठतो. डोळ्यांवर मोठ्ठा, गोलसर, आजीबाईसारखा दिसणारा गॉगल; शर्टावरचं फुलाफुलांचं डिझाइन, बेलबॉटम पँट असा थाट धारण केलेला तो शिडशिडीत बांध्याचा प्रज्ञावान गायक-कवी-संगीतकार मग त्याचीच कहाणी गाण्यामधून सांगू लागतो. ‘रॉकी माऊंटन हाय..’ गाणं सुरू होतं. रॉकी पर्वतावर भटकणारा तो सत्तावीस वर्षांचा तरुण. त्या पर्वतामध्ये त्याला गवसलेला निसर्ग आणि त्या निसर्गानं त्याला दिलेली- स्वत:लाच ओळखण्याची जादुई शक्ती! तो गात राहतो. म्हणतो, ‘‘त्या तरुणानं भूतकाळ मागे टाकला. त्याचा रॉकी पर्वताच्या सान्निध्यात पुनर्जन्म झाला म्हणा ना. किंवा असं समजा, की त्याला साऱ्या बंद दरवाजांची किल्ली प्राप्त झाली! मग तो उंच उंच पर्वत चढू लागला आणि चंदेरी चमचमते ढग त्याला खाली दिसू लागले. अन् काहीजण असेही सांगतात की, एकदा तर त्याने सूर्यालाच स्पर्शायचा यत्न केला. त्याने सोबती गमावला, पण स्मरण कायम ठेवलं.’’ आपण चकित होऊन ती आत्मानुभूती ऐकत असतो. काय देखणा आवाज! आपल्याला जागच्या जागीही हलू न देणारा. आणि मागे ती कंट्री संगीताची मधाळ गिटार. बस्स. बाकी काही नाही. पण ते गाणं सावकाश लयीत फिरत फिरत शेवटाकडे येतं आणि म्हणतं, ‘‘अजून किती पर्वत कापला जाणार आहे! अजून किती माणसं इथे वस्तीला येऊन या अनाघ्रात भूमीला लंछित करणार आहेत!’’ शेजारी बसलेला, सदोदित ट्रेकिंग करणारा पर्यावरणवादी मित्र तितक्यात कुजबुजतो, ‘‘बघितलंस- हा जॉन डेन्व्हर पर्यावरणवादी आहे-आमच्यासारखा.’’ पण तितक्यात त्या ओळी कानावर पडतात :
“Now he walks in quiet solitude,
the forest and the streams…
…His sight is turned inside himself,
to try and understand.”
या ओळी काही फक्त कार्यकर्त्यांच्या नसतात. हा जॉन डेन्व्हर नावाचा बाबा ‘अ‍ॅक्टिव्हिस्ट’ असला, राजकारणात भाग घेणारा असला, तरी त्याचा आतला गाभा मात्र फकिराचा असला पाहिजे. म्हणूनच तो म्हणतोय-
‘‘आता चाले एकटा एकटा वनांमधून, झऱ्यांमधून
नजर वळे आत आत, घेई स्वत: स्वत:स समजून..’’
आणि मला ऐकता ऐकताच कळून चुकतंय, की जॉन डेन्व्हरला समजून घेणं म्हणजेच कंट्री संगीताला समजून घेणं. अ‍ॅपलेशन पर्वतरांगांमध्ये जन्मलेलं ते संगीत अनेक धारांनी वाहत वाहत जॉन डेन्व्हरपाशी येऊन पोचलं. आणि जॉननं मग ते रसायन हाती घेऊन नुसता लखलखाट केला! त्याचं गाणं हे सत्तरीच्या रॉकच्या झंझावातापुढेही टिकलं.. टिकलं नव्हे, गाजलं, वाढलं- ही एक बाबही सारं सांगून जाते. ना त्याच्यापासच्या सुरांमध्ये आक्रमकता होती, ना इलेक्ट्रिक गिटारची झिंग. पण त्या सुरांमध्ये सच्चेपण होतं. भावना होत्या- त्या साध्यासुध्या, गमतीशीर, रोजच्या जगण्यातल्या, निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या होत्या. आणि जोडीला साधी गिटार होती. मागे व्हॉयोलिन्स होती. ड्रम मशीन नव्हतं, सिक्वेन्सर नव्हता, डी.जे. कडे असतं तसलं टर्नटेबल नव्हतं. पण ते गाणंच मुळी इतकं सहज, हृदयाला भिडणारं होतं, की ते गाजलं नसतं तर नवल! आणि ते गाजलंच. आजही गाजतं आहे. जॉन डेन्व्हरचं अपघाती निधन होऊनही आता पंधराहून जास्त वर्षे झालीत; पण त्याच्या गाण्याची जादू ओसरलेली नाही. त्याचं ते गमतीशीर गाणं- ‘Thank God, I’m a country boy’ – आजही अनेकांना मुखोद्गत असतं. ‘‘बरं का राव, I got me a fine wife, अन् जुनी गिटारही आहे. सक्काळी सक्काळी नाश्त्याला भरपेट गरम खायला आहे. अन् हे जगणं सालं गमतीशीर कोडय़ासारखं आहे..’’ असं जॉननं म्हटलं तरी खऱ्या जॉन डेन्व्हरचं जगणं मात्र तसं गमतीशीर कोडं-  ‘funny funny riddle’ नव्हतं. लोकांना नेहमी दिसत राहिला चतुरस्र कलाकार. विशेषत: १९७५ साली कंट्री म्युझिक असोसिएशनचा मानाचा ‘बेस्ट एन्टरटेनर’ पुरस्कार त्याला मिळाला तसं त्याचं यश आणि गाणंही दूर दूर पोचलं. मग टी.व्ही. माध्यमाचा उत्तम उपयोग करीत त्यानं मुलाखती दिल्या-घेतल्या. सूत्रसंचालन केलं. देशभर, देशाबाहेर तो आधी पोचला, आणि मग त्याचं गाणंही पोचलं. गावोगावी, देशोदेशी दौरे सुरू झाले. स्वत:च विमान चालवत तो हे दौरे करायचा. चांगला पायलट होताच तो! मी सांगितलं की नाही, त्याचा जन्मच मुळी सैनिकी घरात झाला होता. तेव्हा त्याचं नाव जॉन डेन्व्हर नव्हतं. ‘हेन्री जॉन डय़ुसेनडॉर्फ’ हे लांबलचक नाव त्या हरहुन्नरी मुलाचं होतं. वडिलांच्या एअर फोर्सच्या बदल्यांमुळे त्याला स्थैर्य असं नव्हतंच. आणि पुढेही त्याचं आयुष्य प्रवाहीच राहिलं. दोन संसार मांडून झाले. घरगुती वाद वाढत वाढत शारीरिक हाणामारीवर आले. हशीश-गांजा आदी व्यसनं अधेमधे होतीच. जुने मित्र दुरावले. (‘रॉकी माऊंटन’ गाण्यातही एकाएकी मधेच जुना सोबती गमावल्याचा उल्लेख येतो तो उगा नव्हे!) मूळचं नावही कधीतरी गळालं आणि कॉलॅरॅडो राज्याची राजधानी असलेल्या डेन्व्हर शहराचं नाव जॉननं उचललं. सारं जुनं सुटलं, पण कोवळय़ा वयात त्याच्या आजीनं हातात दिलेली अ‍ॅकॉस्टिक गिटार काही सुटली नाही! आणि त्या गिटारसोबत जे पिढय़ान् पिढय़ा वाहत आलेले सर्वस्वी आशादायी कंट्री-सूर होते, तेही निसटले नाहीत.
आजही जॉन डेन्व्हरचं गाणं ऐकताना तुम्ही दु:खी- आणि मग फिरून सुखी होता. त्याचं गाणं ऐकलं आणि मग माणसं फिरून हसत-खेळत गप्पा मारायला लागली, असं होणार नाही. माणसाला स्वत:च्या आत डोकवायला लावणारं ते गाणं आहे. त्या गाण्यामध्ये केवळ जॉन डेन्व्हर या कवी, गायक, संगीतकार, पायलट, छायाचित्रकार माणसाचं आत्मकथन नसतं, तर तुम्हा-आम्हा साऱ्यांचं असतं. जन्म, वाढ, प्रेम, दुरावा, प्रगल्भता आणि मृत्यू हे सारं त्याच्या गाण्यात त्याच्या आयुष्याचे संदर्भ घेऊन उभं आहे. आणि म्हणूनच ते गाणं जिवंत आहे, अर्थपूर्ण आहे! केव्हा केव्हा तर ते गाणं भविष्यवेधीही होतं. ‘लिव्हीन ऑन अ जेट् प्लेन’ हे त्याचं निरोपाचं गाणं- एक प्रियकर प्रेयसीचा निरोप घेतो आहे. तिला सांगतो आहे की, त्याला तिचा अपरिहार्य निरोप घ्यावा लागणार, त्याला त्याचं जेट विमान चालवायला लागणार, आणि तो कधी परतेल त्याचा नेम नाही. आता खरं तर हे शब्द साधेच.. फारसा काव्यात्मक आशय असलेले नव्हते. पण जॉन डेन्व्हरचा स्वत: विमान चालवत असताना मृत्यू झाला आणि त्या गाण्याच्या आत गूढपणे.. ‘आयरनिक्ली’ लपलेला अर्थ कसा सण्दिशी बाहेर आला!
“All my bags are paked, ready to go
I’m Standing here outside the door.
I hate to wake you up to say goodbye”
नियती तरी काय चमत्कारिक असते ना! त्याच्याच मुखातून त्याचंच मृत्युगान गाऊन घेतलं! तसं सामानसुमान भरून अंतिम प्रवासाला आपण सारेच कधी ना कधी जाणार असतो. पण त्या गाण्याचे आर्त सूर ती शक्यता साक्षात् डोळय़ांसमोर उभी करतात. ती साधीशी गिटार मग बघता बघता अंतिम सत्यासारखी बनते- जिथे जगण्याचे सारे अर्थ निरस होऊन जातात आणि नात्यांची गुंतावळ सुटता सुटत नाही!
पण मग तो जॉन डेन्व्हरच मदतीला येतो. जणू म्हणतो, घाबरायचं काय गडय़ा! त्याची गिटार अजूनही गंभीर असते; पण आशेचं फूल तिथे उमलू लागतं. तो गाऊ लागतो स्वच्छ सूर्यप्रकाशाचं गाणं. ‘‘माझ्या अंगाखांद्यावर पडलेले हे किरण मला आनंदी करतात. डोळय़ांत शिरणारे हे किरण नकळत आसवं आणतात. पाण्याच्या वर चमचमणारे हे.. हे सूर्यकिरण किती गोंडस दिसतात! सूर्यकिरण मला नेहमीच आनंदी करतात.’’
कंट्री संगीताची किल्ली हवी असेल तर हे ‘सनशाइन ऑन माय शोल्डर्स’ गाणं ऐकावं. गिटारची अगदी हलकी फिरत जिवापाड जपत कानामध्ये साठवावी. मधेच जॉनचा आणि आपलाही जीवनप्रवास आठवावा. हातात छानशी गरम वाफाळणारी कॉफी असावी. खिडकीबाहेर सौम्य पाऊस! आणि मग ‘उत्खनन’ कादंबरीमध्ये गौरी देशपांडेनं म्हटलेलं यथार्थ वाक्य आठवावं- ‘दिमे, अकासो नो बास्तान?’
– ‘सांग, पुरेसं नाही हे सारं?’

Story img Loader