पायजमे सूटकेसमध्ये टाकायचं राहून गेल्यामुळे स्थानिक यजमान मला ‘ए फॉर अ‍ॅपलपासून झी (झेड कधीच बाद झालाय!) फॉर झिप’पर्यंतच्या सर्व जीवनोपयोगी वस्तू एकाच छपराखाली मिळणाऱ्या घराजवळच्या सुपरमार्केटमध्ये घेऊन गेला. अमेरिकेत घराजवळ काहीच नसतं. हे सुपरमार्केटसुद्धा अनेक मल दूर होतं. पायजम्यासारख्या क्षुल्लक वस्तूची खरेदी दोन मिनिटात आटोपावी, हा अंदाज इच्छित विभागाचा विस्तीर्ण आवाका नजरेत येताक्षणी बाद झाला. रात्री झोपताना कमरेवर चढवायच्या वस्त्रामध्ये मुळात ही इतकी व्हरायटी बनवण्याची गरजच काय? मी घोळात पडलो. तितक्यात शेजारून आवाज आला, ‘‘साऽरी!’’
‘साडी?’ मी वळून पाहिलं. पायजम्यांची संयुक्त चाचपणी करणारं एक अमेरिकन जोडपं माघार घेत होतं. बाईसाहेबांचा मूड बदललेला दिसला. तसं आश्चर्य वाटण्याजोगं काहीच नव्हतं. माझ्यासाठी दोन-तीन मामुली शर्ट वरवर पाहिल्यासारखे केले की माझ्या धर्मपत्नीलासुद्धा शर्टखरेदीचा इरादा रद्द करून साडीखरेदी करण्याची हुक्की येते. पण अमेरिकन गुलामाची जोरू अमेरिकन ड्रेसऐवजी साडीचा ध्यास का बरं धरेल?
तितक्यात जोरूमॅडम म्हणाल्या, ‘‘मेड इन् इंडिया आहे. साऽरी! अजिबात घ्यायचा नाही.’’
मी चमकलो. भारतीय बनावटीचा पायजमा आहे म्हणून चक्क सॉरी? घेणार नाही? मी माझ्यासमोरचा पायजमा पटकन् उचलला. लेबल वाचलं. मेड इन् इंडिया! वा! मन कसं भरून आलं! मी तरातरा त्या जोडप्याला ओव्हरटेक करून गर्रकन् वळलो आणि म्हटलं, ‘‘हा माझ्या देशाचा अपमान आहे. ही वस्तू केवळ भारतात बनवली गेलीय म्हणून तुम्ही ती विकत घेण्याचं नाकारताय, हा अन्याय आहे.’’
अमेरिकन जोडपं दचकलं. पण त्यातली बाई लगेच सावरली आणि माझ्यावर भुंकली, ‘‘तू भारतीय असशील तर तुझ्या देशातल्या लोकांना आधी चांगले कपडे बनवायला सांग. मग जरूर घेऊ. जॉर्ज, पलीकडच्या शेल्फवर चायनीज प्रॉडक्ट आहे का बघ!’’
मी परत चमकलो. भारतीय कपडे नकोत, पण चिनी पाहिजेत? माझ्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव पाहून जॉर्ज म्हणाला, ‘‘प्लीज, अपसेट होऊ नकोस. यापूर्वी दोनदा भारतीय पायजमे विकत घेऊन मी पस्तावलोय.’’
‘‘सुती पायजम्यात फसण्यासारखं काय असतं?’’
‘‘एका धुण्यात दोन इंच आटले. तरी वापरायला काढले. आठवडय़ात बटणं तुटली आणि कमरेचं इलॅस्टिक सल पडलं. हात वर केले की पायजमा खाली घसरायचा.’’
‘‘अरे देवा!’’ वैऱ्यावरही हा प्रसंग कधी येऊ नये.
‘‘त्याच किमतीतल्या चिनी कपडय़ांच्या बाबतीत असं कधी होत नाही.’’
स्वदेशाची खणखणीत बदनामी ऐकून कानफटात बसल्यासारखा मी मुकाटय़ानं मागे वळलो.
विश्वास बसणार नाही इतक्या कमी किमतीत वस्तू बनवून विकणं, ही चिनी यशाची गुरुकिल्ली आहे. याच जोरावर चीननं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मुसंडी मारलीय. पण या वैश्विक श्रद्धेला जॉर्ज हादरा देत होता. त्याची खरेदी किमतीच्या नव्हे, तर गुणवत्तेच्या निकषावर होत होती. आणि त्या निकषावर भारतीय उत्पादन चिन्यांकडून चीतपट होत होतं. खरं तर सुती वस्त्रं ही भारताची परंपरागत मक्तेदारी आहे. आता तिथंही चीनकडून असा अपमानास्पद पराभव होत असेल तर प्रलयच झाला की!
मग आठवलं, की तब्बल वीस वर्षांपूर्वी असाच जोरकस फटका बसला होता. स्थळ वेगळं. काळ वेगळा. संदर्भ वेगळा. पण शेवटी सार तेच. साम्यवादाच्या काळात दैनंदिन गरजेच्या वस्तू रशियन सरकारी संस्था मुख्यत: भारतातूनच आयात करत होत्या. सोविएत युनियनची शकलं झाल्यानंतर अनेक रशियन व्यापारी त्या वस्तू आयात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाले. त्यांना कोणत्या भारतीय वस्तू पुरवता येतील, याची चाचपणी आमच्या कंपनीतर्फे मी सुरू केली.
‘‘टूथपेस्ट, साबण, शांपू, शिकेकाई, इसबगोल?’’
‘‘नको. आमचे लोक घेणार नाहीत.’’
‘‘ऑरेंज ज्यूस, मँगो पल्प, फणसपोळी, कोकम सरबत?’’
‘‘नको. आमचे लोक घेणार नाहीत.’’
‘‘स्वेटर, मफलर, हातरुमाल, पायमोजे, माकडटोपी, लुंगी?’’
‘‘नको. आमचे लोक घेणार नाहीत.’’
नन्नाचा पाढा ऐकून मी चक्रावून गेलो. शेवटी ओळखीच्या एका माजी सोविएत अंमलदारानं फोड केली- ‘‘भारतीय निर्यातदार द्विपक्षीय कराराचा गरफायदा घेऊन हलक्या प्रतीचा माल रशियात पाठवायचे. त्यामुळे भारतीय जिन्नस म्हणजे खराब दर्जा- हे समीकरण त्यांच्या डोक्यात फिट्ट बसलंय.’’
माझा काळवंडलेला चेहरा पाहून त्यानं सहानुभूतीनं पुरवणी जोडली- ‘‘डोंट वरी. तुम्ही लोकांनी चांगला माल पुरवायला सुरुवात केलीत तर हळूहळू हे चित्र पालटेल.’’
पण ते चित्र फारसं पालटलेलं नसावं असा आता संशय आला. रात्री यजमानाच्या मित्रमत्रिणींशी गप्पा मारताना विषय निघाला. मी म्हणालो, ‘‘आपल्या एव्हरेडीची एक बॅटरी सात रुपयांना मिळत होती तेव्हा रस्त्यावर चिनी बॅटऱ्या दहा रुपयांना चार मिळत होत्या. सुरुवातीला लोकांच्या उडय़ा पडल्या. पण त्या चार दिवसांत धारातीर्थी पडतात हे कळल्यावर त्यांना कोणी विचारेनासं झालं. म्हणूनच आपण ‘मेड इन् चायना’ या लेबलची चेष्टा करतो ना?’’
‘‘ते पूर्वी. पण गेल्या काही वर्षांत चिनी वस्तूंच्या दर्जात खूपच सुधारणा झालीय. िहदुस्थानात तुम्हाला ते जाणवत नसेल कदाचित. कारण उत्तम दर्जाचा माल ते यूरोप-अमेरिकेत पाठवतात. इथे क्वालिटीला महत्त्व असतं. चिनी उत्पादक क्वालिटी सांभाळायला लागले आहेत. आता तर चिनी विमानं येताहेत म्हटल्यावर बोइंग आणि एअरबस कंपन्यांचं धाबं दणाणलंय.’’
‘‘पायजम्याचा संदर्भ आला म्हणून सांगतो. भारतातून येतात त्याच्या दसपट तयार कपडे चीनमधून अमेरिकेत येतात. चीनचा नंबर पहिला. शंभरातल्या फक्त चार कपडय़ांवर ‘मेड इन् इंडिया’ लेबल असतं.’’
‘‘आणि तेच लेबल वाचून जॉर्जची जोरू मागे वळली. म्हणजे आपला टक्का आणखी खाली घसरणार.’’
भारतात परतल्यावर हाच विषय मनात घोळत होता. भाची म्हणाली, ‘‘हल्ली आम्ही मुली स्लिप, स्टॉकिंग, सॉक्स आणि इन्नरवेअर घेतो ते तर सगळं चायनीजच असतं. प्रत्येक स्टाईलमध्ये चिक्कार कलर आणि साइझ मिळतात. शेप टिकून राहतो. रंग उडत नाही. मग..?’’
म्हणजे आता भारतातही चांगल्या दर्जाचा चिनी कापडमाल यायला सुरुवात झालीय तर! खेळणी आणि शोभेच्या वस्तूंची बाजारपेठ आपण कधीच चिन्यांच्या पदरात टाकलीय. पुढची पाळी तयार कपडय़ांची! चिनी बनियन, शर्ट, शेरवानी आणि पठण्या येऊ घातल्या आहेत.
टू बी ऑन द सेफ साइड- मी चिनी मेतकूट, पापड आणि लोणच्यांची एजन्सी घ्यायचं ठरवलंय!