‘गेले द्यायचे राहून’ नंतर एक सुंदर दिवस माझ्या आयुष्यात उगवला.. ज्यांना मी दैवत मानत आलो, ज्यांच्या संगीताने आणि गाण्यांनीही अवघ्या मराठी रसिकांना मंत्रमुग्ध केले त्या अत्यंत आदरणीय सुधीर फडके ऊर्फ बाबूजींची त्यांच्या शिवाजी पार्कवरल्या १२, शंकर निवास या मुक्कामी माझा मितवा रवींद्र साठे यानं भेट घडवली.. आदरणीय बाबुजींनी  ‘गेले द्यायचे राहून’ मधली गाणी ऐकली होती आणि त्यांना ती फार आवडल्याबद्दल सुंदर शाबासकी मला दिली.. त्यानंतर असेच काही दिवस गेले.. १९८१ साली पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे निर्मित (आकाशवाणीच्या सर्व मराठी केंद्रांवर सादर होणारं) संस्कृत नाटककार भवभूतीच्या ‘उत्तर रामचरितम’ या नाटकाच्या पहिल्या अंकावर आधारित संगीतक (भावकाव्यानुवाद : तेव्हाचे महाराष्ट्र बँकेचे चेअरमन अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव पटवर्धन) संगीतबद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली. पुणे आकाशवाणी केंद्रावरील संगीत विभागाच्या निर्मात्या  सुहासिनी कोरटकर यांनी संहिता माझ्या हाती मोठय़ा विश्वासानं सोपवली. रावणवधानंतर अयोध्येला परतून राज्याचा भार पुन्हा स्वीकारणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या चरित्रातल्या सीतात्यागापर्यन्तचा भाग ‘उत्तर रामचरितम’च्या पहिल्या अंकात मांडला गेलाय. प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि प्रतिहारी अशा चार व्यक्तिरेखांभोवती पहिल्या अंकातील कथानक फिरते. त्यांच्यातील सर्व संवाद पद्यात्मक असल्यामुळे खऱ्या अर्थाने एक सुंदर, सुरेल संगीतक स्वरबद्ध करण्याचं आव्हान मी मोठय़ा आनंदानं स्वीकारलं. या सर्वावर कळस म्हणजे सुहासिनी कोरटकरांनी आदरणीय बाबुजींना या संगीतकात प्रभू रामचंद्राची प्रमुख व्यक्तिरेखा आपल्या अलौकिक गळ्यातून साकार करण्याची विनंती केली आणि माझ्यासारख्या छोटय़ाशा संगीतकाराला दाद देणारा प्रतिसाद, होकार जेव्हा मला बाबुजींकडून मिळाला तो माझ्या आयुष्यातला एक अत्यंत कृतार्थ क्षण होता. सीतेच्या व्यक्तिरेखेकरिता सुरेल, सुंदर वाणी असलेल्या गायिका उत्तरा केळकर तर लक्ष्मणाकरिता श्रीकांत पारगावकर आणि प्रतिहारीकरिता राजेंद्र कंदलगावकर यांची योजना झाली.
आणि मी मोठय़ा जोमानं साऱ्या व्यक्तिरेखांच्या गीतमय संवादांना स्वरांमध्ये गुंफायला आरंभ केला. प्रमुख व्यक्तिरेखांच्या काही भावना दोन-तीन अंतऱ्यांनी युक्त पूर्ण लांबीच्या गाण्यातून व्यक्त झाल्या होत्या तर काही ठिकाणी दोन-चार-सहा ओळींतून परस्परांशी होणारे पद्यात्मक संवाद होते. त्यातली भावानुकूलता जपत प्रवाही स्वरावलीतून पूर्ण लांबीच्या एकल अगर संवादी गीतांमध्ये अलगदपणे उतरणे, त्यात कुठेही झटका किंवा तुटकपणा न येऊ देता हे खूप नजाकतीनं करावं लागतं. शिवाय विशिष्ट काळात कथानक घडत असल्यानं त्यातली अभिजातता जपत भावतत्त्व संगीतबद्ध करणे आणि तेही केवळ चालीतूनच नव्हे तर वाद्यवृन्दातील वाद्यांचे पोत आणि त्याबद्दलची रसिकांची असोसिएशन्स या सगळ्यांचं समग्र भान ठेवत.. खरंच एक सुंदर अनुभव होता तो. अभिजन आणि बहुजन संगीतधारांनी समृद्ध अशा आपल्या मराठी संगीत रंगभूमीच्या परंपरेच्या बैठकीवर मी ते करू शकलो. संहितेवर विचार करताना माझ्या एक लक्षात आले की, आकाशवाणी हे केवळ ध्वनीप्रधान माध्यम आहे. त्यामुळे पहिला प्रवेश सुरू होताना तोवर घडलेल्या (म्हणजे रावणवध करून राम अयोध्येला परतला येथपर्यंतच्या) रामचरित्रातल्या प्रसंगांवर आधारित चित्रांच्या प्रदर्शनातली चित्रे पाहताना प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाई मनाने भूतकाळातल्या त्या स्मरणांमध्ये रमून जातात असा भाग आहे. तेव्हा या व्यक्तिरेखांचा परिचय आणि प्रस्तावना याकरिता मला संगीतकाच्या आरंभी संगीत रंगभूमीच्या नटी- सूत्रधार प्रवेशाची आवश्यकता वाटली आणि पहिल्या प्रसंगाची पाश्र्वभूमी मांडणारा नटी-सूत्रधाराचा छोटेखानी सुरेल पद्यसंवाद मी डॉ. वसंतराव पटवर्धनांकडून नव्यानं लिहून घेतला. नटी (अनुराधा मराठे) आणि सूत्रधार (प्रभाकर करंदीकर) यांच्या –
आपण जाऊ पडद्यामागे । रसिकांच्या पडू द्यावी कानी
भवभूतीचा लक्ष्मण करि जी । श्रीरामाला सौम्य विनवणी
अशा सुरेल प्रस्तावनेनंतर नाटकारंभाची
चाहूल देणाऱ्या घंटेपाठोपाठ लक्ष्मणाचा प्रभू रामचंद्रांशी संवाद सुरू होतो. लक्ष्मण (रावणधानंतर) सीतेनं केलेल्या अग्निदिव्यविषयक चित्राच्या अवलोकनानं उदास होतो.. आणि प्रभू रामचंद्र समजावतात..
‘का उदास होशी.. ऐक सांगतो तुते
शुद्धीची जरुरी तीर्थ, वन्हीला नसते..’
यावर-
‘पुरे विषय तो आता नाथा..
चला पाहू या तुमच्या चरिता..’
असे विषयांतर करत पुढच्या चित्राकडे वळणाऱ्या सीतेला लक्ष्मण राम-सीता विवाहप्रसंग चित्राकडे घेऊन जातो. श्रीराम प्रभू आणि सीतामाई
‘सावळे स्निग्ध जणू.. नीलकमल उमले
असे हे आर्यपुत्र चित्रिले..’
अशा सुंदर विवाहस्मृती (राग यमनमध्ये बांधलेल्या) त्यांच्या युगुलगानातून स्मरताना पुढच्या चित्रांमधल्या वनवासातल्या दिवसांमध्ये पुन्हा ते तिघे हरवून जातात.
आणि भवभूतीच्या या अप्रतिम नाटकातलं ‘अविदितगतयामा रात्रिरेव व्यरंसित’ या सुप्रसिद्ध ओळीवर आधारित सुंदर गाणं- पहाडी रागात बांधलेलं- बाबुजींच्या अमृतस्वरांतून साकारलं-
किती त्या सुखदा आठवणी ।।धृ।।
गालास लावूनी गाल, बिलगुनी बसलो
हळूहळू विनाक्रम गुजगोष्टी बोललो
घालता परस्पर मिठी एक हातांनी
सरली न कूजिते, सरली सारी रजनी..
या संगीतकाचं शीर्षक होतं- ‘सरली न कूजिते’!
चित्रप्रदर्शन बघताना सीतामाई आपले डोहाळे श्रीरामांना सांगते- ‘त्या प्रसन्न वनराईत, वाटते पुन्हा विहरावे..’(राग पहाडी). प्रदर्शन पाहता पाहता श्रमलेली सीता तिथेच प्रभू रामचंद्रांच्या स्कंधी विसावते. संगीतकाच्या अंती केवळ लोकोपावादास्तव श्रीराम प्रतिहारीला सीतेला पुन्हा वनात सोडून येण्याची आज्ञा देतो. निद्रिस्थ सीतेला स्वप्नात ‘नाथ गेले सोडुनी का, मजसी  येथे एकटे’ (राग शिवरंजनी) वाटणारे एकलेपण.. रामाज्ञेने प्रतिहारी तिला वनात नेऊ लागतो. तिला वाटतेय- वनविहाराचे डोहाळेच पुरवले जाताहेत. पण निरोप घेताना तिच्या मनात एक अनामिक हुरहूर लागलीय.. आर्त भैरवीतून कंपित होणारी..
कूजिते न सरली । जरी त्या सरल्या रात्री सदा
विरहार्ता सीता । आज पुन्हा एकदा..
माझा संगीत संयोजक परममित्र अजित सोमणच्या मदतीने मी संपूर्ण संगीतकाचं स्वरलेखन करून वाद्यवृंदरचना बांधल्या. सतार (डॉ. रवींद्र गाडगीळ), व्हायोलिन (उस्ताद फैयाज हुसेन), संतूर (सतीश गदगकर), स्पॅनिश गिटार (सलील भोळे), बासरी (अजित सोमण), हार्मोनियम (डॉ. माधव थत्ते), तबला/ ढोल/ ढोलकी (केशव बडगे), क्लरिओनेट / स्वरमंडळ (श्री. ओक) आणि तालवाद्ये (श्याम पोरे) अशा वाद्यवृन्दासह पहिल्या दिवशी आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओमध्ये जमलो..
सकाळी ठीक दहा वाजता आदरणीय बाबूजी अत्यंत प्रसन्न मुद्रेने आकाशवाणीच्या स्टुडिओत प्रवेशले.. मी त्यांच्या पावलांवर माझे मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला. मला म्हणाले, ‘‘मोडक, आता तुम्ही संगीतकार आहात आणि मी गायक. तुमचे संपूर्ण समाधान होईपर्यंत मी गाईन.. तुम्हीही मला वेळोवेळी तुमच्या अपेक्षा नि:संकोचपणे सांगा. तुमच्या मनातलं गाणं मला गायचंय.’’
माझा कंठ दाटून आला आणि मी पहिल्या गाण्याची चाल त्यांना शिकवायला सुरुवात केली. जोगकंस रागात बांधलेल्या-
का उदास होशी..? ऐक सांगतो तूते
शुद्धीची जरुरी तीर्थ वन्हीला नसते..
या ओळी ते मायक्रोफोनवर अतिशय भावपूर्ण आणि प्रत्ययकारी स्वरातून गात होते.. माझं मन एका क्षणात भूतकाळात गेलं. बालपणापासून ज्या स्वरांनी मला सतत गारुड घातलं, ज्या देहातून येणाऱ्या स्वरांना अकोल्यात १९७१ साली गीतरामायण गाताना हजारोंच्या जनसमुदायातला एक बनून सगुण- साकार रूपात मी मनोमन साठवून ठेवलं होतं, ते माझे श्रद्धेय बाबूजी माझ्यासारख्या एक नव्या तरुण संगीतकाराच्या रचना त्या दिवशी आणि पुढले दोन दिवस सकाळी दहा साडेदहापासून उत्तर रात्री १२-१ वाजेस्तोवर अत्यंत उत्कटतेने गात गेले. तू ठेव जानकी मम वक्षावर माथा (राग शहाणा), सुरयज्ञामध्ये संभवलेल्या सीते.. (राग परमेश्वरी) यांसारखी पाच पूर्ण लांबीची गाणी आणि काही संवादात्मक गाणुली.. १९८१ साली ‘सरली न कूजिते’ ही पुणे आकाशवाणी केंद्राची निर्मिती आकाशवाणीच्या सर्व मराठी केंद्रांवरून प्रसारित झाली. रसिकांची उत्तम दाद फोनद्वारा, पत्रांद्वारा मिळाली आणि मला माझ्या आयुष्यातला अत्यंत श्रेष्ठ पुरस्कार.. माझ्या संगीतरचनांना लाभलेला सुधीर फडके नामक अमृतस्पर्श.. आदरणीय बाबुजींचं प्रेम.. माया माझ्या त्यापुढल्या साऱ्या प्रवासात भरभरून वाटय़ाला आलं.
मुंबईतल्या मुक्कामी कुठल्याही स्टुडीओत मी माझ्या रेकॉर्डिगला जाताना शिवाजी पार्कवरील १२, शंकर निवासातल्या माझ्या या स्वर:ब्रह्माचे आशीर्वाद घेत राहिलो. त्यांना वाकून नमस्कार करताना त्यांचा पाठीवरला आशीर्वादाचा वत्सल हात मला सदैव नवी ऊर्जा देत राहिला..   

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader