सध्या दिवस कोर्टाचे आहेत.

कोर्ट सरकार चालवते. कोर्ट प्रशासकीय निर्णय देते. कशावर बंदी घालते, कशावरची उठवते. ऊठसूट सरकारला झापते. आमच्या पत्रकारूनारूंना तर याची इतकी सवय झाली आहे, की परवा ‘कोर्ट’ या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाली, तर एका उपसंपादकूने चक्क ‘ऑस्करला कोर्टाचा दणका’ असा मथळा दिला!

एक खरे, की ‘कोर्ट’ ऑस्करला चालला- ही बातमी दणकेबाजच होती. तिने आमची मराठी छाती तब्बल ५६ इंचांची झाली! आम्ही मराठी चित्रपटांना भलेही तिकीट काढून जाणार नाही, पण त्यांच्या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, हे येथे नमूद करावयासच हवे.

परंतु या निवडीच्या वृत्ताने सारे जन आनंदी आनंद गडे करताहेत तोच वादाच्याही बातम्या आल्या. निवड समितीचे अध्यक्ष अमोल पालेकर यांच्यावर काही लर्नेड ज्युरी मेंबरांनी आरोप केले. सर्व मौज किरकिरी झाली. त्याचा सोक्षमोक्ष लावणे आम्हांस भागच होते. (आता यास काही नतद्रष्ट माध्यमद्वेष्टे ‘मीडिया ट्रायल’ असे म्हणतात. म्हणू देत! आपले पोट आहे त्यावर!) आम्ही थेट ज्युरी समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते अमोलजी पालेकरजी यांचे निवासस्थानी पातलो.

फाटकाची कडी उघडून आत प्रवेश करून पुन्हा फाटक लावून घेतले. (पुण्यात हे असे करणे हुकूमावरून मस्टच! पाटीच असते तशी!)

आत एक माळी कुठल्याशा झुडपाखालची माती उगाचच खाली-वर करीत होता. त्यास शुकशूक केले.

‘माली, अंदर पालेकरसाहेब हय क्या?’

पुण्यात हिंदीत बोलले की हल्ली चांगले इम्प्रेशन पडते!

‘क्या काम है सर?’

माळीबुवाने नाकाखालची मिशी नीट चाचपून अदबीने विचारले. तो पुण्याचा नसावा!

‘तुमको क्या करने का हय? खाली इतना बताव- अंदर साब हय क्या?’

‘नहीं सर. हमारे साहब हमेशा कहते हैं, की मेहमान देवतास्वरूप होता है. त्याची नीट विचारपूस करावी. म्हणून विचारलं.’

‘आत जाऊन साहेबांना सांग, कोर्टाचं म्याटर आहे. बोलायचंय.’

‘क्या बोलना हैं सर? हमारे साहब हमेशा कहते हैं, की किसी भी चीज की पुरी जानकारी लेनी चाहिये. क्यों

की आधाअधुरा ज्ञान अंतिमत: मनुष्य के लिये अहितकारक होता है.’

हा माळीबोवा कुठल्याशा च्यानेलवरचा एस्ट्रो अंकल तर नसावा? आम्ही नीट निरखून पाहिले- तर त्याने पुन्हा मिशी चाचपली. हा सारखा मिशीवर हात का फिरवतोय? मनी आले, याची पण मीडिया ट्रायल घ्यावी काय?

‘उसका क्या है माली, साहेबांना विचारायचंय, की कोर्टाची निवड नेमकी कशी झाली? कोणी म्हणतं, त्यांना ‘कोर्ट’ नापसंत होता. कोणी म्हणतं, पसंत होता. कोणी म्हणतं, आधी नापसंत, मग पसंत होता..’

‘सर, हमारे साहब हमेशा कहते हैं, कौन क्या कहता है उस पे ध्यान मत देना. आपण नेहमी आपलं काम करीत राहावं. कारण की कामातच ईश्वर असतो.’

‘वो सब अच्छा हय, माली. पण साहेबांवर आरोप आहेत.. हेकेखोरीचे.’

हे ऐकले आणि माळ्याचा चेहरा थेट पालेकरांच्या चेहऱ्यासारखा दिसू लागला. पडलेला!

‘छी.. छी. सर, हे मी काय ऐकतोय? हमारे साहब हमेशा कहते हैं, की शहाण्याने कधी कोर्टाची पायरी चढू नये! तेच खरं! एकदा ती पायरी चढली की माणसाची पायरीच उतरते!’

आम्हाला या माळीबोवाचाच संशय येऊ  लागला होता. हा एवढे फुटेज का बरे खात असावा?

‘तुझं पुराण बंद कर. आधी सांग, साहेब अंदर हय की नहीं हय?’

‘माफी दीजिये सर, लेकीन साहब तो बाहरगाव गये हैं. वो हमेशा कहते हैं, की..’

‘काय रे, तुझे साहेब हमेशा एवढे बोलत असतात? जमतं त्यांना.. घरात बाईसाहेब असताना?’

आमच्या या पुणेरी पृच्छेने माळीबोवा आपादमस्तक पालेकरच भासू लागले! चेहऱ्यावर तर डिट्टो तोच भाव.. पालेकरांसारखा! तेवढय़ात त्याने आतल्या बाजूला एक नजर टाकून तेथे कोणी नाही ना, हे पाहून घेतल्यासारखेही दिसले.

अखेर त्याला विचारलेच-

‘माली, तुम्हारा नाम क्या है, माली?’

त्याने पुन्हा एकदा मिशी चाचपली आणि विनयाने म्हणाला-

‘रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा, सर!’

ही फेरी वायाच गेली. कोर्टाचा निकाल कसा लागला, ते अन्य पत्रकारूनारूंप्रमाणेच आम्हांसही समजलं नाही.

बाहेर पडून पुन्हा फाटक लावून घेतलं आणि दचकलोच. बॅकग्राऊंडला दुरून कुठूनतरी गाणं वाजत होतं-

‘गोलमाल है भाई, सब गोलमाल है..’
-balwantappa@gmail,com