हृषीकेश गुप्ते

‘लोकरंग’मध्ये (३० डिसेंबर) प्रतीक पुरी यांचा ‘उजळ माथ्यानं मिरवणारं वाङ्मयचौर्य’ हा आजचे आघाडीचे कथा-कादंबरीकार हृषीकेश गुप्ते यांच्या लेखनाबद्दल काही प्रश्न उपस्थित करणारा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखावरील खुलासा..

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

‘लोकरंग’मध्ये (३० डिसेंबर) माझ्या लेखनावर वाङ्मयचौर्याचे आरोप करणारा ‘उजळ माथ्यानं मिरवणारं वाङ्मयचौर्य’ हा प्रतीक पुरी यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या संदर्भातला माझा हा खुलासा..

पुरी यांनी त्यांचे टिपण प्रसिद्ध करताना विविध व्यक्ती वा संस्थांकडे जो पाठपुरावा केला त्याबद्दलच्या तपशिलाविषयी मी बोलणे शक्य नाही, कारण त्याचा मी भाग नाही. त्यातील केवळ त्यांच्या नि माझ्या संवादाबद्दलच मी बोलू शकतो.

साधारण तीन आठवडय़ांपूर्वी रोहन प्रकाशनाच्या रोहन चंपानेरकरांनी मला भेटून प्रतीक पुरी यांनी त्यांना माझ्या ‘घनगर्द’ या कथेचे कथानक मी स्टीव्हन किंग यांच्या ‘द गर्ल व्हू लव्ह्ड टॉम गॉर्डन’ या कथेवरून चोरले असल्याचे कळवल्याचे सांगितले. ज्या दिवशी पुरी यांनी त्यांच्याशी सदरहू विषयाला धरून संपर्क केला, त्याच दिवशी रोहन चंपानेरकरांनी माझी भेट घेतली. पुरी यांच्याशी माझी ओळख असल्याने मीही यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क करून ‘घनगर्द’ या कथेवर असा आरोप का करावासा वाटला, हे विचारले. त्याचवेळी या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी माझ्या ‘काळ्याकपारी’ या कथेवर काही व्यक्तींनी फेसबुकवर केलेल्या आरोपांबाबत विचारणा केली आणि मी याबाबत खुलासा कधी करणार, असे विचारले. गेले काही महिने मी फेसबुकवर क्रियाशील नसल्यामुळे मी हा खुलासा लवकरच देईन, असे त्यांना सांगितले. यामागचे कारण असे की, संस्थळ वा तत्सम समाजमाध्यमांवर निव्वळ नोंद लिहून पुरेसे नसते. ते माध्यम संवादी आहे. तिथे नोंद लिहिल्यानंतर त्यावर चर्चा होते. नवे प्रश्न वा आक्षेपही येऊ शकतात. त्यांना प्रतिसाद देण्यासाठी तिथे थोडा वेळ द्यावा लागतो. फेब्रुवारीपर्यंत मी माझ्या कौटुंबिक, व्यावसायिक आणि इतर लेखनबा व्यवधानांत अडकलेला असल्याने हा खुलासा मी फेब्रुवारीनंतरच करेन असे त्यांना म्हटले होते. माझ्या या विधानाचा ‘हृषीकेश गुप्ते यांनी माझ्याकडे मुदत मागितली’ असा विपर्यास झालेला पाहून गंमत वाटली.

मुळात पुरी यांनी काय बोलावे, काय लिहावे याचे स्वातंत्र्य त्यांना आहेच. तेव्हा त्यांना मुदत बांधून देणारा मी कोण? त्याचबरोबर मला मुदत देऊ करणारेही ते कोण? माझा खोटारडेपणा उघड झाला, मी अप्रामाणिक आहे, मी उचलेगिरी करणारा लेखक आहे.. असे अद्वातद्वा आरोप करण्याचे स्वातंत्र्य जर त्यांना आहे, तर माझा खुलासा कुठे आणि केव्हा द्यावा (माझी इतर व्यवधाने सांभाळून) याचे स्वातंत्र्य मलाही आहेच. पुरी आणि माझ्यात घडलेल्या संवादाबद्दल मला हे एवढेच सांगायचे आहे.

पुरी यांनी माझ्या ‘काळ्याकपारी’ व ‘घनगर्द’ या दोन कथांवर आक्षेप नोंदवले आहेत. पकी ‘काळ्याकपारी’ या कथेवरील आक्षेपाबाबत प्रथम बोलतो. एका संस्थळावर प्रसिद्ध झालेल्या नोंदीबाबत त्यात उल्लेख आहे. (हीच नोंद नंतर एकाच व्यक्तीने फेसबुकवर काही महिन्यांच्या अंतराने दोन वेळा शेअर केली आहे.) सदर आक्षेपांबाबत तिथे उपस्थित असलेल्या काही मित्रांनी माझे मित्र ‘रमताराम’ यांना कळवले. त्यांनी त्याबाबत मला फोन करून विचारणा केली आणि मी दिलेला खुलासा- त्यांच्या शब्दांत- तिथे नोंदवला. (आक्षेप घेताना लेखकाने याचा उल्लेखही केलेला आहे.) त्यात ती कथा स्टीव्हन किंग यांच्या कथेवर आधारित आहे, हे मान्य केलेले आहे. ते अमान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता राहिला मुद्दा पुढील आवृत्तीमध्ये (जी या चच्रेनंतर तीन वर्षांनी प्रकाशित झाली-) तरी तसा उल्लेख नसल्याचा. इथे मी काळजी घेऊन तो उल्लेख समाविष्ट करायला हवा होता, हे मी नमूद करतो.

आता ‘घनगर्द’ या कथेबद्दल. या कथेबाबत पुरींनी नोंदवलेले आक्षेप बिनबुडाचे आहेत. ही कथा मुळात माझ्या स्वानुभवावरून प्रेरित असल्याने तिचा आणि ‘टॉम गॉर्डन’ या कथेचा काहीही संबंध नाही. अर्थात, दोन्ही कथांमधील जंगलाची पाश्र्वभूमी आणि क्रीडापटू हे साम्य धरून आपण कोणत्याही गोष्टींचा बादरायण संबंध इतर गोष्टींशी जोडूच शकतो.

परकीय भाषांत प्रामुख्याने लोकप्रिय आणि प्रसार पावलेला ‘भय/ गूढकथा’ हा जो प्रकार मी सुरुवातीच्या काळात विशेषत्वाने हाताळला, तो परंपरांचा कथाप्रकार आहे. एच. पी. लव्हक्राफ्ट या लेखकाने निर्माण केलेल्या कल्पित सृष्टीची लव्हक्राफ्टियन परंपरा असो वा ब्राम स्टोकरचा ‘ड्रॅक्युला’ किंवा मेरी शेलीचा ‘फ्रँकेस्टाइन’ असो; या परंपरांच्या प्रभावापासून या कथाप्रकाराचे आकर्षण असणारे लेखक सुटू शकलेले नाहीत. त्या परंपरांचा व त्या लेखकांचा माझ्यावर असलेला प्रभाव मी नाकारत नाही. माझ्या सुरुवातीच्या काळातल्या काही कथांवर हा प्रभाव नक्कीच आहे आणि हे मी कधीही नाकारलेले नाही. ते एक सार्वजनिक सत्य असून मित्रमंडळींतल्या चर्चामध्ये मी ते नेहमीच सांगितले आहे. तो प्रभाव नसता तर मी लिखाणास सुरुवातही करू शकलो नसतो. आणि या अनुषंगाने मला हा प्रभाव उजळ माथ्याने मिरवण्याएवढाच अभिमानास्पद वाटतो!

अनेकदा कथानकाचे प्रीमाइस, कथाबीज समान असते; पण मांडणी वेगळी असते. अनेकदा जुन्या एखाद्या कथानकाचे आपले व्हर्शन आपल्या दृष्टिकोनासह लेखक लिहून पाहत असतो. लेखक जेव्हा उमेदवारी करत असतो तेव्हा आपल्यावर प्रभाव असणाऱ्या लेखकांच्या आवडलेल्या लेखनाबद्दल हा प्रयोग करत असतो. त्यातून तो आपला दृष्टिकोन विकसित करत असतो. हे लेखन त्या – त्या लेखकाच्या प्रभावाखाली असतेच. परंतु एखाद्या लेखनाचे दुसरे एक लेखन हे ‘तंतोतंत कॉपी’ हा निवाडा प्रत्येकाचा वेगळा असतो. दोन कथांमध्ये गुंतलेले जे काही धागे असतात, ते किती बळकट असल्यावर त्याला ‘वाङ्मयचौर्य’ म्हणावे नि त्यांची टक्केवारी किती खाली आल्यावर फक्त ‘आधारित’ म्हणावे नि आणखी किती कमी झाल्यावर त्यांना ‘स्वतंत्र’ म्हणून मान्यता द्यावी, हा सापेक्ष मुद्दा आहे.

‘घनगर्द’ आणि ‘टॉम गॉर्डन’बद्दल पुरी असे म्हणतात की, ‘कोणीही या दोन्ही कथा वाचाव्यात नि आम्हाला खोटं ठरवावं; आम्ही जाहीर माफी मागायला तयार आहोत.’ तर त्यांना खोटं ठरवण्यासाठी नव्हे, त्यांच्याकडून माफी मिळवण्यासाठीही नव्हे किंवा ‘छान पकडलंत हो!’ म्हणून त्यांना शाबासकी देण्यासाठीही नव्हे; पण आरोपांची स्वत:पुरती का होईना, शहानिशा करण्यासाठी शक्य असेल त्या साऱ्या वाचकांनी या दोन्ही कथा नक्की वाचून पाहाव्यात. पुरींच्या या सल्ल्याला माझे मनापासून अनुमोदन आहे. मी इथे पुन्हा एकदा हे ठामपणे नमूद करतो की, ‘टॉम गॉर्डन’ आणि ‘घनगर्द’ या कथांचे आशय पूर्णत: भिन्न आहेत. ‘घनगर्द’ला कुठल्या कथापरंपरेत बसवायचेच असेल तर ‘रेड रायडिंग हूड’च्या परीकथासूत्रात बसवावे; ‘टॉम गॉर्डन’च्या नव्हे!

या दोन आक्षेपांच्या आधारे – ‘गुप्ते यांच्या कथा हा उचलेगिरीचा प्रकार आहे’, ‘गुप्ते प्रत्यक्षात इतर लेखकांच्या कथांची उचलेगिरी करून आपल्या नावावर खपवणारे अप्रामाणिक लेखक आहेत’, ‘त्यांचा खोटारडेपणा उघड झाला’ अशी सरधोपट विधाने केली गेली आहेत, हे मात्र धक्कादायक आहे. माझ्या लेखनाची जंत्री खुद्द पुरी यांनीच दिलेली आहे. त्या तुलनेत असे सरसकटीकरण योग्य आहे की नाही, याचा निर्णय वाचकांनी आपल्यापुरता करावा एवढीच विनंती मी करू शकतो. माझ्या लेखक म्हणून विकसित होण्याच्या काळात मी केलेले सर्वच लिखाण-‘दंशकाल’ ही तब्बल चारशे पानी कादंबरी, ‘चौरंग’ ही लघुकादंबरी, ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ ही कथा, तसेच २०१८ मध्ये प्रथितयश दिवाळी अंकांतून प्रकाशित झालेल्या माझ्या कथा यांसह मी निर्माण केलेले सारेच साहित्य हे प्रभाव किंवा वाङ्मयचौर्याच्या आरोपाखाली दडपून टाकावे, हे कितपत योग्य आहे?

परदेशी लेखनावर आधारित वाङ्मयचौर्य सहज खपून जाईल, हा समज निव्वळ भाबडेपणाचा आहे. केवळ मी किंवा माझी पुढची- नुकतेच लेखन करू लागलेली नवोदितांची पिढी तर सोडाच; पण माझ्यामागच्या दोन पिढय़ाही परदेशी साहित्याशी उत्तम संपर्क असलेल्या आहेत. माझ्या परिचयातले बहुसंख्य लेखक आणि वाचकही दर्जेदार नि समकालीन परदेशी (इंग्रजीच नव्हे, तर अन्य भाषिकदेखील!) लेखन नियमित वाचणारे आहेत. डिजिटल माध्यमांच्या स्फोटानंतर कोणतेही परदेशी लेखन चुटकीसरशी उपलब्ध होऊ शकते. आणि याचा फायदा केवळ मलाच नाही, तर इतरांनाही होत असतो याचे भान कुणाला नसेल तर ते नवल! अशा स्थितीत मी एखादे लेखन स्वत:च्या नावावर खपवणे म्हणजे स्वत:हून पायावर धोंडा मारून घेणे आहे, हे न समजण्याइतका भाबडा किंवा इतरांना मूर्ख समजणारा मी नक्कीच नाही. सुदैवाने माझे अनेक परिचित, वाचक यांना जर दोन लेखनांत साम्य दिसले तर ‘चोरले, चोरले’ म्हणून धावत सुटण्याआधी त्यावर थोडा विचार, थोडे मूल्यमापन करण्याची सवय आहे. त्यामुळे निर्गल आरोप करण्यापेक्षा ते तुलनात्मक मूल्यमापनावर माझ्याशी संवाद करणे अधिक पसंत करतात.

फेसबुक वा एखादे संस्थळ हे काही निवाडय़ाचे, न्यायदानाचे अधिकृत ठिकाण नव्हे, की जिथे कुणीही हवे तेव्हा लेखकाला ‘समन’ करू शकेल आणि तिथे जाऊन लेखकाने हजर न होणे हा दखलपात्र गुन्हा ठरू शकेल. अशी अनेक समाजमाध्यमे आहेत- जिथे साहित्य, चित्रपट, संगीतादी कलांबद्दल बोलले/ लिहिले जाते. त्यात अनेक संगीतकारांवर, लेखकांवर, कलाकारांवर उलटसुलट प्रतिक्रिया, आरोप होत असतात. त्या प्रत्येक ठिकाणी लेखक वा कलाकार उपस्थित राहून भाग घेईल, ही अपेक्षा अवाजवी आहे. परंतु तोच मुद्दा पुन:पुन्हा उपस्थित केला जात असेल आणि संपादन प्रक्रियेतून जाणाऱ्या प्रथितयश मुद्रित माध्यमांतून तो उचलला गेला असेल, तर व्यवधानांतून वेळ काढून त्यावर खुलासा देणे मी आवश्यक समजतो. आणि त्यामुळेच मी माझे हे उत्तर लिहीत आहे. हे उत्तर अर्थात पुरींना नसून ‘लोकसत्ता’ या व्यापक व्यासपीठाद्वारे उपलब्ध असणाऱ्या वाचकांना आहे. या वादंगात माझे संपादक, प्रकाशक आणि माझ्या लेखनाची वाखाणणी करणारे काही रसिक वाचक, मित्र, समीक्षक यांच्या कुवतीवरही पुरी यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, त्यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले आहेत. हे खचितच दुर्दैवी आहे.

या खुलाशानंतर मी या वादाला माझ्याकडून विराम देतो आहे. आरोपांना अंत नसतो, त्यांना ऊर्जा नि झुंड सहज उपलब्ध होते. लेखनासारख्या रचनात्मक कामाला अधिक ऊर्जा लागते आणि ती वैयक्तिकच असते. माझी ऊर्जा मी तिथेच खर्च करणे अधिक सयुक्तिक आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

rushikesh.gupte@gmail.com

Story img Loader