डॉ. नीलम गोऱ्हे

lokrang@expressindia.com

स्त्रीमुक्ती चळवळीच्या बिनीच्या कार्यकर्त्यां विद्या बाळ यांनी स्त्रियांना केवळ आत्मभान दिलं असं नाही, तर त्यांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याचं बळही दिलं. त्यांच्या सुहृद व एकेकाळच्या सहकारी कार्यकर्तीनं रेखाटलेलं त्यांचं प्रांजळ शब्दचित्र..

१९७०-८० च्या दशकांत जे बरंचसं सामाजिक अभिसरण झालं, त्यात विद्या बाळ आणि मी सहप्रवासी असल्याने आम्हा दोघींच्या नौका जवळजवळ एकत्र आल्या असं म्हणायला हरकत नाही. संवेदनशील भावपूर्ण मैत्री आणि सातत्याने माणसांना समजून घेण्याची आवड ही विद्याताईंच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े होती. मी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असतानाच सामाजिक संघटनेत कृतिशील राहून स्त्री-अत्याचारांच्या विरोधात आपण एखादी यंत्रणा उभी करायला हवी असा माझा विचार होता. विचारांच्या या समान धाग्यातूनच आमच्यात मैत्री आणि समाधानाचं नातं निर्माण झालं. विद्या बाळ या ‘मिळून साऱ्याजणी’च्या संपादक म्हणून जशा महत्त्वाच्या पदी होत्या, त्याचबरोबर स्त्रियांच्या प्रश्नांना वैचारिक दिशा देण्याचा प्रयत्नही त्यांनी त्याद्वारे केला. आपल्याला कल्पना आहे की, स्त्रियांच्या अस्तित्वाचा शोध घेणारी चळवळ म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळ. परंतु बराच काळ ‘स्त्रीमुक्ती’ या शब्दालाच विरोध झाला. त्यावेळी अनेक जणांकडून अशा प्रतिक्रिया आल्या की, ‘स्त्रीमुक्ती’ हा शब्द नको, तर ‘स्त्रीशक्ती’ हा शब्द हवा.

पाच-सहा वर्षांनंतर या वादात न पडता या शब्दावरून जो गैरसमज निर्माण झाला होता, तो दूर करण्याचा प्रयत्न केला. स्त्रीमुक्ती म्हणजे नेमकी कशापासून मुक्तता? कुटुंबापासून की विवाहापासून मुक्तता? अशा मर्यादित अर्थाने ‘स्त्रीमुक्ती’ हा विचार नाहीए, तर ‘स्त्रियांचं समाजात जे दुय्यम स्थान आहे, त्यापासून स्त्रियांची मुक्तता’ असा त्याचा अर्थ आहे.  कुठलीही स्त्री एकेकटी मुक्त होऊ शकत नाही. हा एक सामूहिक प्रवास आहे. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अशा प्रत्येक पलूपर्यंत आणि पदापर्यंत पोहोचण्याचा अधिकार सर्व जाती-धर्मातल्या स्त्रियांना आहे.. सर्व वयांच्या स्त्रियांना आहे, ही संकल्पना यात अभिप्रेत आहे.

याविषयी चर्चा करताना विद्या बाळ यांनी अनेक कल्पना मांडल्या. मात्र, त्या काही लोकांच्या पचनी पडल्या नाहीत. ‘हळदीकुंकू’ नाही, तर मग ‘तीळगूळ समारंभ’ करा. हळदीकुंकू करताना आपपरभाव केला जातो- सवाष्ण, विधवा! समोर एखादी विधवा स्त्री असेल तर तिला हळद-कुंकू न लावता बायका निघून जातात. जर एखादीला मुलगा नसेल तर त्यावरूनही टोमणे ऐकवले जातात.

समाजातल्या या परिस्थितीतही एखाद्या स्त्रीमुळे जेव्हा घर उभं राहतं, तेव्हा ज्या स्त्रीने घर उभं राहण्यासाठी स्वत:च्या नोकरीचा, करिअरचा त्याग केलेला असतो; किंबहुना ती आनंदाने घर सांभाळण्याचा पर्याय  स्वीकारते- एक होममेकर किंवा गृहिणीचा पर्याय निवडते- तेव्हा घर उभं राहण्यासाठी एक महत्त्वाचं माणूस म्हणून तिचा विचार व्हायला हवा. त्याकाळी मध्यमवयीन स्त्रियांना जे प्रश्न पडत होते, त्या प्रश्नांना प्रातिनिधिक स्वरूप विद्या बाळ यांनी दिलं आणि त्यानुरूप नवीन विचारांची मांडणी करायला सुरुवात केली. त्याकरता अनेक स्त्रीवादी महिलांच्या लेखनाचं वाचन त्यांनी केलं.

खरं तर मैत्रीमध्ये अशी टक्केवारीची विभागणी होऊ शकत नाही. आम्हा दोघींमधली तीस ते चाळीस टक्के चर्चा ही वैयक्तिक आणि पन्नास-साठ टक्के ही स्त्रियांभोवतीच्या विचाराबद्दलची असायची.

प्रत्येक स्त्रीचा स्वत:च्या शरीरावर अधिकार आहे, त्याचबरोबर सर्व निर्णयप्रक्रियेत स्त्रियांना बरोबरीचं स्थान हवं आणि या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी कृतिशील व्हायचं आम्ही दोघींनी ठरवलं. त्यासाठी  ‘स्त्री-आधार केंद्रा’बरोबरच ‘नारी समता मंचा’चीही स्थापना विद्याताईंच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांनी ‘साथ-साथ’, ‘अक्षरस्पर्श’सारखे उपक्रमही राबवले.

आम्ही दोघींनी एकत्रित खूप प्रवास केला. त्यातले दोन प्रसंग मला इथे आवर्जून नमूद करावेसे वाटतात. एका कार्यक्रमानिमित्त आम्ही सोलापूरला एसटीने जात होतो. तिथे खूप मोठा पूर आला होता. आमची बस पुरामध्ये अडकली ती पुढेही जाईना आणि मागेही फिरेना. असं वाटायला लागलं की, पुरात बस वाहून जाते की काय! तेव्हा त्या पुराच्या पाण्यातून कसेबसे बाहेर पडल्यावर विद्याताई मला म्हणाल्या, ‘‘आता आपण दोघींनी एकत्रित प्रवास करणं कमी करायला हवं. कारण आपल्या दोघींना काही झालं तर स्त्री-चळवळीचं काय होईल?’’ मग आम्ही ठरवलं की, दोघींनी वेगवेगळा विचार करणंही गरजेचं आहे.

असाच एक दुसरा प्रसंग घडला.. आम्ही दोघी स्कूटरवरून जात होतो. विद्याताई स्कूटर चालवीत होत्या आणि मी मागे बसले होते. का कुणास ठाऊक, पण मी अचानक रस्त्यावर उडी मारली आणि आम्ही दोघीही रस्त्यावर पडलो. नशिबाने रस्त्यावर वाहनं नव्हती आणि आम्ही त्या अपघातातनं बचावलो. तेव्हाही विद्याताई म्हणाल्या, ‘आपण दोघींनी एकत्र प्रवास करण्याचा धोका पत्करता कामा नये. स्त्री-चळवळीच्या भविष्याचा विचार करता आपल्यातली एक जण तरी ही चळवळ भक्कम करण्यासाठी मागे राहिली पाहिजे.’

विद्याताई बुद्धिवादी दृष्टिकोनातून विचार करायच्या. त्यांचा माझ्यावर खूप भरवसा होता. माझ्या जीवनातील अनेक टप्पे, अनेक पैलू यांची आमच्यात मोकळेपणाने चर्चा होत असे. लिखाणाबरोबरच त्यांनी काही अन्य धाडसी निर्णयही घेतले. जसे- मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याच्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या. त्या मोच्र्यामध्ये सहभागी होत. पुण्यातल्या काही घटकांना त्यांची ही कृतिशीलता तेव्हा रुचली नाही. आम्ही जेव्हा कुटुंबातील हुंडाबळींच्या विरोधात आवाज उठवायला लागलो त्या वेळेस आम्हाला बरेच जण म्हणाले की, समाजातील इतर वर्गामध्ये हा प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे तथाकथित सुधारलेल्या, पांढरपेशा समाजातील स्त्रियांच्याच केसेसमध्ये तुम्ही आणि विद्याताई का लक्ष घालता? त्यांचं असं म्हणणं होतं की, तुम्ही समाजातील एका ठरावीक घटकासाठीच काम करावं.

महत्त्वाचं म्हणजे हुंडाबळीच्या निमित्ताने किंवा बलात्काराच्या निमित्ताने स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांशी काही मुद्दय़ांचा संबंध आहे. हिंसा स्त्रियांनाच का सहन करावी लागते? किंवा या अन्यायांविरोधातील लढय़ाचा अत्यंत चुकीचा अर्थ काढून गैरसमज पसरवला जातो. या दोन्ही गोष्टींचा संबंध पितृसत्ताक धारणा बळकट करण्याशी आहे. या दोन बाबी एकमेकांशी कशा प्रकारे जोडलेल्या आहेत, हे लोकांना समजत नव्हतं. स्त्रीवर बलात्कार झाला की तिला अपवित्र मानायचं, ती खराब झाली आहे असं मानायचं. हा जो स्त्रियांनाच कलंकित करण्याचा मुद्दा होता, त्याविरोधात विद्या बाळ यांनी रोखठोक भूमिका घेतली. रस्त्यावरून जाताना अपघात झाला तर त्यानंतर माणूस जसं स्वत:ला सावरतो, तसंच अशा घटनांनंतर महिलांनी स्वत:ला सावरायला हवं. बलात्कारासारखी घटना घडल्यानंतर एखादीने स्वत:ला जाळून घेणं, आत्महत्या करून जीवन संपवणं म्हणजे असे गुन्हे करणाऱ्यांच्या वृत्तीला, उद्देशांना दुजोराच मिळतो. यातून स्त्रियांनाच अपराधगंड देण्याच्या त्यांच्या सापळ्यात आपण अडकतो. म्हणून अशा घटनांकडे आपण केवळ अपघात म्हणून पाहिलं पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. दुसरं म्हणजे विद्या बाळांनी जातिभेदाच्या पलीकडे जाण्यासाठी आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलं, स्वेच्छाविवाहाचं समर्थन केलं.

आमचा प्रवास म्हटलं तर त्यांनी ‘मिळून साऱ्याजणी’ काढल्यानंतर मी ‘स्त्री आधार केंद्र’ आणि त्या ‘नारी समता मंचा’चं काम करत असू. आम्ही वेगवेगळं काम करायला लागलो. परंतु १९९० च्या सुमारास मंजुश्री प्रकरणानंतर आम्ही एक याचिका दाखल केली. त्यासाठी अनेकांनी लोकांच्या लक्षावधी सह्य़ा मिळवून दिल्या. त्या लढय़ात विद्या बाळ महाराष्ट्रातल्या गावोगावी गेल्या. अनेक ठिकाणी अनेक कार्यकर्त्यां त्यातून उभ्या राहिल्या. आज त्या स्त्रिया आपापल्या जिल्ह्य़ात स्त्रियांच्या संघटना चालवत आहेत. त्याचबरोबर १९९१ च्या सुमारास यशवंतराव चव्हाण व्यासपीठावर आम्ही दोघींनी काम सुरू केलं. त्यावेळी संयोजक म्हणून काम करत असताना विद्याताई सोबत असतील तर बरं पडेल असं मला खूप वाटत होतं. त्यामुळेच मी या कामासाठी त्यांना अगदी गळ घातली आणि त्याही महिलांसाठीच्या त्या व्यासपीठाच्या कामात चांगली दोन-तीन वर्ष सहभागी झाल्या होत्या.

पुढे मी काही राजकीय निर्णय घेतले त्यावरून माझ्या आणि त्यांच्या भावनिक नात्यामध्ये जे चढउतार आले, त्यावरून माझी किती तगमग होतेय याची त्यांना चांगलीच जाणीव होती. परंतु १९९४ ला जेव्हा स्त्रियांसाठी आरक्षण आलं आणि आरक्षण आल्यानंतर मला हा प्रश्न पडायला लागला, की स्त्रिया जर राजकारणात गेल्याच नाहीत तर निर्णयप्रक्रियेपर्यंत त्या पोहोचणार कशा? यासाठी त्या वेळेला मी सगळ्या संघटनांची एक बैठक घेतली. त्या बैठकीला आज आघाडीवर असणाऱ्या, मोठी नावं असणाऱ्या जवळपास सर्व महिला कार्यकर्त्यां तीत सहभागी झाल्या होत्या. आम्ही जवळपास ८०-९० जणी त्यावेळी जमलो होतो. त्यात अंजली मायदेव, साधना दधिच, गीताली वि. म. होती. पुण्यातल्या त्यावेळच्या बऱ्याच महिला कार्यकर्त्यां त्या सभेला हजर होत्या. आणि तिथे मी म्हटलं की, ‘‘तुम्ही स्वत: काही राजकीय निर्णय घेणार आहात की नाही? केवळ सामाजिक काम करण्याचाच तुमचा मानस असेल तर आपण कसं काय निर्णयप्रक्रियेपर्यंत पोहोचणार?’’ त्यावेळी विद्या बाळ म्हणाल्या, ‘‘नीलम, माझा पिंड राजकीय नाही. मी संसदीय राजकारणासंबंधी काही भूमिका घेऊ शकत नाही.’’ त्यानंतर माझा वेगळा राजकीय प्रवास सुरू झाला. १९९८ नंतर मी शिवसेनेत गेले याचं त्यांना खूप वाईट वाटलं; परंतु त्यानंतरही त्यांनी माझ्याशी कधीही संवाद तोडला नाही किंवा मीही त्यांच्याशी वादविवाद, भांडण केलं नाही. मतभेदांचं असंस्कृत प्रदर्शन आमच्या दोघींकडून कधीही झालं नाही, ही मला खूप चांगली गोष्ट वाटते. मतभेदांसह एकमेकींना स्वीकारणं- हे त्यांनी केलं. आमचा संवाद थोडा कमी झाला; परंतु कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात अनेक मुद्दय़ांवर बोलणं, चर्चा सातत्याने होतच होती. अगदी कोठेवाडीची घटना घडली आणि त्यानंतर त्या घटनेत जेव्हा न्याय मिळाला तेव्हा त्यांनी मला फोन करून माझं खास अभिनंदन केलं होतं. मी आमदार झाल्यानंतरही मला एकदा त्यांनी घरी बोलावलं होतं. तेव्हाही आम्ही खास चर्चा केली होती. कुठेही भेटलो तरी अतिशय सहृदयतेने आमचा संवाद व्हायचा.

अगदी काही महिन्यांपूर्वी- १० सप्टेंबरला नारी समता मंचाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मला त्यांनी बोलावलं होतं. खरं तर त्यादरम्यान मी खूप व्यापात होते. विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती; पण तरीही त्या कार्यक्रमाला मी गेले. तिथे गेल्यावर नारी समता मंचाच्या सगळ्या मैत्रिणींची पुनर्भेट झाली. त्यावेळी अत्यंत प्रांजळपणे, रोखठोक आणि सडेतोड संवाद तिथे झाला. पण आम्ही सातत्याने या गोष्टीची काळजी घेत आलो की, ज्या वेळी आपण एकमेकींशी बोलू तेव्हा जे काही कमी-जास्त बोलू तेव्हा ते संवादाचं नातं हरवणार नाही. आमची चर्चा वस्तुस्थितीला धरून होती. एकमेकींबद्दलच्या सगळ्या परिस्थितीची समज त्यात होती. त्यामुळेच विद्या बाळांना मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले तेव्हाही त्यांच्या मनातली चलबिचल, विचार मला कळत होते. परंतु पुन्हा तो विषय काढणं मी टाळलं. त्यांची लेक विनीही तेव्हा तिथे होती. आणि त्यावेळी (आम्ही कितीही जवळच्या मैत्रिणी असलो तरी) कुटुंबीय म्हणून ती तिथल्या काही गोष्टी बघत असताना आपण त्यात जास्त हस्तक्षेप करावा असं मला वाटलं नाही. एका अर्थाने ज्या लेकीला त्यांनी जिवापाड जपलं, ज्या मुलांसाठी त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं तो विषयही सातत्याने त्यांच्या मनामध्ये होता. त्याच लेकीच्या आणि मैत्रिणींच्या निगराणीत त्यांचा हा संपूर्ण आजारपणाचा प्रवास सुरू होता. लेक आणि मैत्रिणी त्यांची काळजी घेत होत्याच. अखेरच्या काळात शारीरिकदृष्टय़ा त्या खूप व्यथित झाल्या होत्या; परंतु डगमगणं, आजारपणातून येणाऱ्या चिडचिडेपणातून कुणाला तरी काही वाईट बोलणं किंवा कुणाबद्दल काही वाईट मनात येणं असा त्यांचा मुळातच स्वभाव नव्हता. त्या कविता करत असत. त्या कविता फार तरल आणि अतिशय वेगळ्या पद्धतीच्या होत्या. त्यांना सुंदर पत्रं लिहायची सवय होती. प्रचंड संवेदनशीलता त्यांच्या ठायी होती. त्यातूनच एका बाजूला भरपूर सहनशक्ती, पण त्याच वेळी वैचारिक दृढता असं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं एक समीकरणच बनलं.

त्यांचं नि माझं एक आगळंवेगळं नातं तयार झालं होतं. गुरुवारी सकाळी जेव्हा विद्या बाळ गेल्या असं समजलं तेव्हा त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी मी पुण्याला गेले तेव्हा नमस्कार करण्यापेक्षा मी विद्या बाळांच्या गालांना स्पर्श केला. माझ्याकडून आपसूकच ते घडलं. तो स्पर्श अनुभवून मी खूप भावुक झाले. मला असं वाटलं की, त्यांचं माझं जे नातं आहे, ते अशा उबदार स्पर्शातून कायम टिकून राहिलं आहे. आज त्या नसतील, तरी त्यांच्या मनाचा स्पर्श आणि हे उबदार नातं कायम माझ्या आयुष्यात मला सामर्थ्य देत राहणार आहे. त्यामुळे स्त्रीमुक्तीकडे जात असताना स्त्रीशक्तीचा प्रवास विद्या बाळांच्या मनातून माझ्या मनापर्यंत पोहोचतो आहे, हे मात्र शाश्वत सत्य आहे.

Story img Loader