गणेश विसपुते bhasha.karm@gmail.com
सतीश काळसेकर हे डाव्या चळवळीतील लेखक- कवी, लघु-अनियतकालिकांचे एक प्रवर्तक, लोकवाङ्मयगृहाचे आधारस्तंभ, पट्टीचे वाचक, भ्रमंतीचे भोक्ते अशा अनेक रूपांत सर्वपरिचित होते. साठ-सत्तरच्या दशकांतील सांस्कृतिक-राजकीय पुनरुत्थानात काहीएक भूमिका बजावणाऱ्या काळसेकरांत आजकाल दुर्मीळ झालेलं भलेपण होतं..  

सतीश काळसेकरांचं असणं आम्ही असंख्य मित्रांनी इतकं गृहीत धरलेलं होतं, की त्यांच्या जाण्याची अशी अनपेक्षित बातमी येईल असं वाटलंच नव्हतं. जवळजवळ अर्धशतकाहूनही अधिक काळ मराठी वाङ्मय व्यवहारात सक्रिय असलेल्या या कवीचं जाणं त्यामुळे उदास करणारं आहे. त्याहूनही अधिक खंत ही, की काळसेकरांबरोबर सहा दशकांचा इतिहास- जो कधीतरी चित्रित करून घ्यायला हवा होता, ते राहून गेल्याची खंत आहे.

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध

एकोणिसशे साठ आणि सत्तरचं दशक ही मुंबईसाठीच नव्हे, तर जगभरच्या अनेक सांस्कृतिक महानगरांमधली विस्मयचकित करणारी दशकं होती. निव्वळ सांस्कृतिकच नव्हे, तर नव्या राजकीय जाणिवांसाठीही ही प्रेरक असलेली दशकं होती. मुंबईत एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर सुरू झालेल्या गिरण्यांची धुराडी अद्यापि धूर ओकीत होती. संघटनांच्या सभांमधून शाहिरीतलं काव्य आणि विषमतेची जाणीव आणि प्रेरणा मिळत होत्या. कम्युनिस्ट पक्षाची सांस्कृतिक संघटना- ‘इप्टा’ होती. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या आंदोलनात शाहीर अमरशेखांचा बुलंद आवाज होता.

त्याच काळात साहित्यावर प्रेम करणारी, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेली, नवं काही शोधू पाहणारी पिढी पुढे येत होती. पण हे तरुण आधुनिकतेच्या मूल्यांची आस बाळगणारे होते. कुतूहलानं नवं जग समजून घेणारे होते. त्यांना नव्यानं लॅटिन अमेरिकन साहित्याची ओळख होत होती. ऑक्टेवियो पास, नेरुदा, मायकोवस्की, मांदेलस्ताम, आख्मातोवा, कार्डेनाल, फर्गेन्हेटी यांच्या कविता, रशियन साहित्य, बॉब डिलन, पॉल रॉबसन, द बीटल्स, बॉब मार्ली यांच्या संगीताशी परिचय होत होता. फिडेल आणि चे गव्हेरा हे काहींसाठी हिरो होते. अ‍ॅलन गिन्सबर्ग मुंबईत येऊन जाणं ही ‘घटना’ होती. ‘हंगर मूव्हमेन्ट’ किंवा त्याच्या बंगाली ‘भूख’ आंदोलनाचे पडसाद या तरुणांपर्यंत पोहोचत होते. १९६८ च्या पॅरिसच्या विद्यार्थी आंदोलनानं जगभरच्या लोकशाहीवादी लोकांना उत्साह दिला होता. एका मुंबईत अनेक मुंबई शहरं एकाच वेळी नांदत होती. जॅझ आणि हिंदुस्थानी संगीत, इराणी हॉटेलं आणि आन्टय़ांचे अड्डे, समोवार- फोर्टातली चित्रदालनं, ऱ्हिदम हाऊस आणि कामगारांची कलापथकंही होती. स्ट्रॅण्ड बुक हाऊस होतं आणि रस्त्यावरची पुस्तकांची दुकानंही होती.  गुरुदत्त- ख्वाजा अहमद- राज कपूर- अब्बासचे सिनेमे होते आणि फेलिनी-गोदार- तारकोव्स्कीचे सिनेमेही पाहता येत होते.

या पार्श्वभूमीवर कुठून कुठून एका समान धाग्यानं एकत्र आलेल्या तरुणांना आयुष्याला समग्र कुतूहलानं समजून घेताना जगाच्या संदर्भात आपापल्या अस्तित्वाचे अर्थसुद्धा अतोनात आवेगानं उलगडायची इच्छा होती. पुस्तकं, साहित्य, लिहिण्याच्या धडपडी हे समान सूत्र होतं. मार्क्‍सच्या विचारांचं आकर्षण होतं. कविता तर होत्याच. एशियाटिक सोसायटीत दुर्गा भागवत, अरुण कोलटकर, दमानिया, वीरचंद धरमसी, नंदू मित्तल, रघु दंडवते, अशोक शहाणे, विश्वास पाटील, सतीश काळसेकर आणि बरेच लोक नियमित भेटत असत तेव्हा ‘नवं काय वाचलंय?’ हाच विषय असे.

सतीश काळसेकर यांची कवी, कार्यकर्ता, पुस्तकांवर निस्सीम प्रेम करणारा वाचक म्हणून जी काही घडण झाली, ती या अशा नेपथ्यात झाली होती. हे सगळेच पैलू लिहिण्याशी जोडलेलेच होते. लघुअनियतकालिकांची चळवळ सुरू होण्यासाठीही ही तत्कालीन सांस्कृतिक-राजकीय परिस्थिती कारण होतीच. नव्या दृष्टीनं मिळालेल्या जाणिवांनी प्रस्थापित साहित्यविश्व अपुरं आणि कृतक वाटत होतं. दलित पॅंथरची चळवळ आणि दलित कवितेचा ठळक आविष्कार प्रथमच होत होता. आपल्याला आपल्या शर्तीवर व्यक्त होण्याच्या तळमळीतून मराठीत अनेक अनियतकालिकं सुरू झाली. त्यातून अनेक नवे कवी, लेखक मराठीला लाभले. त्यात काळसेकर हे एक होते. काळसेकरांनी भाषांतरं, संपादन, सांस्कृतिक कार्यकर्तेपण अशी कामं केली असली तरी मुख्यत: ते कवीच होते. नवी कविता लिहून झाल्यावर फोन करून वा भेट झाल्यावर प्रत्यक्ष ती त्यांना ऐकवावीशी वाटे. ‘काय रे, बरी वाटते ना?’ असं ते विचारीत. १९७१ साली त्यांचा ‘इंद्रियोपनिषद’ हा संग्रह प्रकाशित झाल्यानंतर ‘साक्षात’ यायला दहा वर्ष गेली. आणि ‘विलंबित’ तर त्यानंतर पंधरा वर्षांनी प्रकाशित झाला. म्हणूनच त्याचं नाव ‘विलंबित’ ठेवलं होतं. कविता लिहीत असले तरी त्या प्रकाशित कराव्यात, त्यांचे संग्रह यावेत याविषयी ते फारसे उत्सुक नसत. अलीकडे काही महिने त्यांच्या मागे लागून त्यांच्या अप्रकाशित कविता एकत्र करून नव्या संग्रहाची जुळवाजुळव पूर्ण झाली होती. त्यांच्या हयातीत तो प्रकाशित होऊ शकला नाही.

पन्नास वर्षांच्या त्यांच्या कवितेतले टप्पे ठळकपणे दिसू शकतात. प्रखर आदिम कामप्रेरणा आणि स्त्री-पुरुष नात्यातील देहोत्सवांतून त्यापलीकडले अस्तित्वाचे बंध शोधणारी त्यांची सुरुवातीची कविता भोवतालचे ध्वनी आणि नाद टिपता टिपता मानवी संबंधांच्या व्यापक परिमाणांकडे वळली. आणि नंतरच्या काळात ती उदात्त मानवी भलेपणाच्या प्रार्थनेसारखी झाली. व्यवस्थेतली कारस्थानं ती ओळखत होती आणि माणसावरच्या ओतप्रोत प्रेमामुळे विद्रोहाचं बळही जाणणारी होती. एकदा मी त्यांना मंगलेश डबराल यांची ‘अच्छाई का पाठ’ ही कविता पाठवली होती. ‘भलेपणाइतकं भलं काहीही नसतं, त्यामुळे तुम्ही सतत भलेपणानं वागत गेलात आणि एखादं महास्वप्न पाहता पाहता इतिहासात दाखल होऊन गेलात..’ अशी त्या कवितेची सुरुवात होती. ती कविता मला काळसेकरांचं यथार्थ वर्णन करणारीच वाटली. त्यांचं कुतूहल विलक्षण कोटीतलं होतं. त्यामुळे पुस्तकांविषयीचं त्यांचं प्रेम हे त्यांनीच सांगितल्याप्रमाणे ‘व्यसनाच्या पातळीवर’ गेलं होतं. हिमालयात आणि इतरत्र भ्रमंती करणं, त्यासाठी अ‍ॅडव्हेन्चर्स, पायपिट यांत त्यांना थरार वाटायचा. त्यांनी असंख्य भाषांतरं केली, स्तंभलेखन केलं, गद्य लिहिलं.. पण ते अगदी पाठपुरावा व्हायचा म्हणून! अन्यथा लिहायला आणि ते नंतर प्रकाशित करायला त्यांना उत्साह वाटत नसे.

लोकवाङ्मयगृह आणि काळसेकर हे अतूट असं नातं होतं. ‘पीपल्स बुक हाऊस’ हे नाव लोकवाङ्मयनं अक्षरश: सार्थ केलं. तिथं लेखक-कवींचा सतत राबता होता. लोकवाङ्मयचा तेव्हाचा माहौल रसिक, कलापूर्ण असा होता. एम. एफ. हुसेन हे सुर्व्याच्या कवितांवर लोकवाङ्मयच्या कॅलेंडरसाठी ड्रॉइंग्ज करत होते. ‘विकल्प’सारखे समांतर चित्रपटांचे उत्सव तिथं आयोजित केल्यावर चित्र आणि नाटय़सृष्टीतले कलावंत सहज येऊन जात असत. वर्ल्ड सोशल फोरम असो की सज्जाद जम्हीर शताब्दी समारोह असो; लोकवाङ्मयगृह हे त्यातलं एक केंद्र असे. अनेक भाषांमधले इथं येणारे लेखक आणि ही वास्तू यांत काळसेकर हा प्रेमळ दुवा होते. प्रगतीशील लेखक संघाच्या देशभरातल्या परिषदा, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनं यांमुळे काळसेकरांचा संचार भोपाळ ते बार्शी असा सर्वत्र होता. त्यातून भारतीय भाषांमधल्या आणि महाराष्ट्रातील लहान लहान गावांतील लेखक-वाचकांशी त्यांचा जिवंत संपर्क असे.

ते पट्टीचे वाचक होते. म्हणजे पुस्तक वाचायला सुरू केल्यावर सलग वाचायचं- असे. त्यात खाणाखुणा, नोंदी, टीपा व्हायच्या. मुंबईत नोकरीत असताना चांगलं पुस्तक हातात पडलं की ते रजा टाकायचे आणि विद्यावहिनी ऑफिसला जाताना घराला बाहेरून कुलूप घालून जायच्या. आत यांचं वाचन सुरू.

पण  मुंबईच्या धकाधकीला ते कंटाळले होते. केवळ वाचनासाठी आणि पुस्तकासाठी एक घर असावं अशी त्यांची इच्छा होती. पेणच्या चित्रकुटीर कलाग्रामातल्या त्यांच्या घरानं ही इच्छा पूर्ण झाली. कबीर त्यांचा आवडता कवी. म्हणून घराचं नाव ‘कबीरा’ ठेवलं होतं. वास्तुप्रवेशाच्या वेळी काही मोजकी मित्रमंडळी गेलो होतो, तेव्हा नीला भागवतांनी त्या दिवशी या मित्रासाठी म्हणून खास कबीराची आणि तुकोबाची पदं गायिली होती. ‘कबीरा’सुद्धा पुस्तकांनी ओसंडून वाहायला लागलं. डॉमिन्गेझच्या ‘हाउस ऑफ पेपर’सारखं झालं. तिथं खूपदा जाणं झालं. उदय प्रकाश, जयंत पवार, निखिलेश चित्रे, रणधीर शिंदे, नीतीन रिंढे, प्रफुल्ल शिलेदार आणि मित्रांबरोबरचे तिथले मुक्काम आणि पुस्तकांवरच्या मॅराथॉन गप्पांच्या खूप आठवणी आहेत. एकदा अशा कोसळत्या पावसात त्यांनी निमंत्रण दिलं होतं. जयप्रकाश सावंत मुंबईहून कसेबसे पेणच्या बसस्टॅण्डवर पोहोचले. पुण्याहून आम्ही निघालो तेही पावसात. खोपोलीच्या पुढे आल्यावर पुलावरून गाडी घातल्यावर पाण्याच्या वेगानं ती अक्षरश: वाहायला लागली आणि काळसेकरांचे फोन इकडून- की, ‘काही होत नाही रे, या तुम्ही.’ पेणला आम्ही त्या दिवशी कसे पोहोचलो ते माझं मलाच माहीत. पोहोचलो तेव्हा काळसेकर मस्त हसत होते. त्यांना अशा अ‍ॅडव्हेंचरमध्ये थरार वाटे. आणि अशी धाडसं करायला ते मित्रांना भाग पाडत.

बुद्धाच्या मैत्तभावाचं मूल्य त्यांनी मनोमन स्वीकारलेलं होतं. चांगलं काही पाहिलं/ वाचलं की ते मित्रांपर्यंत पोहोचवावं हा त्यांचा स्वभाव होता. मध्येच त्यांचा फोन येई.. ‘स्ट्रॅंडमध्ये अमुकचं हार्डबाऊंड आलंय स्वस्तात. तुझ्यासाठी घेऊन ठेवतो.’ किंवा काही पुस्तकांच्या छायाप्रती काढून, बाइंड करून देणं, ‘पॅरिस रिव्ह्य़ू’ूमधल्या मिळालेल्या मुलाखतीची प्रत काढून पाठवणं, वेगवेगळ्या निमित्तानं पुस्तकं भेट देणं आणि त्यावर प्रेमानं लिहून देणं हे सगळं विलक्षण होतं. आणि हे अनेकांनी अनुभवलेलं असणार.

हा माणूस अंतर्बा उदार, अनौपचारिक आणि भूमिकेला पक्का होता. त्या भूमिकेत आयुष्यभर सातत्य राहिलं. ऐहिक उन्नतीसाठी त्यांनी मूल्यं बदलली नाहीत. कितीतरी लोक डावीकडून उजवीकडे सोयीप्रमाणे हेलकावे घेत असण्याच्या  आजच्या काळात काळसेकरांचं ठाम भूमिकेवर टिकून असणं आदर वाटावं असंच आहे. त्यांचा अनेकांनी गैरफायदा घेतला, त्यांच्याविषयी विखारी बोललं गेलं, तरी त्यांच्या बोलण्यात कधी कटुता आली नाही.

पेणचं घर आणि तिथला पुस्तकांचा वाढत गेलेला अवाढव्य वटवृक्ष सोडून जाण्याची कल्पनाही त्यांना करता येत नव्हती. प्रकृतीच्या थोडय़ाफार तक्रारींमुळे त्यांचं या आठवडाअखेरीसच मुंबईत यायचं ठरलं होतं. मनातून ते त्यांना कुठेतरी पटत नव्हतं. त्यामुळे आपल्याच मठीत पुस्तकांच्या सहवासात अखेपर्यंत राहावं, ही आपली इच्छाच त्यांनी पुरी केली असं म्हणावं लागेल.

डबरालांची ‘अच्छाई का पाठ’ ही भल्या माणसाच्या धडपडीची कविता आहे. तिच्या शेवटी ते म्हणतात की, यात काय विशेष? हे तर कोणत्याही सामान्य माणसाचं वर्णन आहे. पण सामान्य गोष्टीही आजच्या काळात किती दुर्मीळ होत चालल्या आहेत.

काळसेकर सामान्य माणसांमधलं दुर्मीळ होत जाणारं भलेपण टिकवू पाहणारे कवी होते.