प्रत्येक देशामध्ये अनेक चळवळी होऊन जातात. परंतु अशाकाही चळवळी असतात, की ज्यामुळे सर्व समाज त्या चळवळीची मुख्य घोषणा आणि मागण्या यांचा विचार करायला सुरुवात करतो. त्याचे दीर्घकालीन परिणाम होतात. त्यापैकी ‘दलित पॅंथर’ ही एक थरारक व झंझावाती चळवळ! १९७२ मध्ये ‘नवाकाळ’मध्ये छोटीशी बातमी आली. दलितांमधील महत्त्वाचे लेखक एकत्र येऊन एका क्लासरूममधील मीटिंगमध्ये रिपब्लिकन पक्षामध्ये असलेले नाकर्ते नेतृत्व आणि त्याला पर्याय कोणता, याचा विचार करण्यासाठी जमणार होते. राजा ढाले, ज. वि. पवार, नामदेव ढसाळ, अविनाश महातेकर, लतिफ खाटिक आदी साहित्यिक मंडळी, तसेच बाबूराव बागूल, भाई संगारे इत्यादी मंडळी चर्चेला बसणार होती. तिथे त्यावेळच्या रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाने दलितांच्या प्रश्नांवर घेतलेली बोटचेपी भूमिका आणि त्याच्याकडून कॉंग्रेस पक्षाचे केले जाणारे लांगुलचालन याविरोधात ठराव मंजूर करण्यात आला. राजा ढाले उत्तम साहित्यिक, कवी आणि नव्या पद्धतीने भित्तीपत्रिका चालवीत होता. ‘विद्रोह’ त्याचे नाव. ‘विद्रोह’मध्ये त्याच्या उत्तम हस्ताक्षरात असलेले लेख, कविता आणि  विचार करायला लावणारी धक्कादायक रेखाचित्रे नियमित वा अनियमितपणे प्रसिद्ध होत होती. नामदेव कवी म्हणून हळूहळू प्रसिद्ध व्हायला लागला होता. या सर्वाच्या खळबळीमागे त्यावेळेस संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात दलितांवर होणारे अत्याचार हे मुख्य कारण होते. त्याविरोधात आरपीआय, काँग्रेस किंवा कुठलाच विरोधी पक्ष ठोस पावले उचलण्यास तयार नव्हता. म्हणून जमलेल्या या बंडखोर मंडळींनी ‘ब्लॅक पॅंथर’च्या धर्तीवर गोऱ्यांच्या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या चळवळीसारखी महाराष्ट्रात स्वसंरक्षणासाठी आणि ब्राह्मणवादाला शह देण्यासाठी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तिचे नाव- ‘दलित पॅंथर.’ योगायोगाची गोष्ट म्हणजे पूर्वीसुद्धा शूद्रांचा काही अंशी ‘दलित’ असाच उल्लेख केला जात होता. पण यावेळी ‘दलित’ हा शब्द व्यापक अर्थाने वापरला गेला. संघटना स्थापन झाल्याची नोंद प्रत्येकाने घेतली आणि हीच दलित पॅंथरची पहिली झेप होती.
या संघटनेचे संस्थापक सामान्य परिस्थितीतून तसेच अतिशय गरीब वर्गातून आलेले, जगण्याची धडपड करणारे असे होते. सर्वामध्ये बंडखोरी ठासून होती. त्यांनी ती कृतीत उतरवून दाखवली. भारतीय स्वातंत्र्याला २५ वर्षे झाली तेव्हा १९७२ मध्ये राजा ढाले यांनी ‘साधना’ साप्ताहिकात एक दाहक लेख लिहिला. या देशात गरीबांना जगता येत नाही. किलवेनमनी (तामिळनाडू) येथे ४२ दलित, भूमिहीन शेतकऱ्यांची जमीनदारांकडून हत्या करण्यात आली. महाराष्ट्रात अनेक गावांत दलित स्त्रियांची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. याबद्दलचा उद्रेक म्हणून खळबळजनक शीर्षकानिशी तो लेख प्रसिद्ध झाला होता. ज्या देशात दलित स्त्रियांची अब्रू झाकली जात नाही, तिथे तिरंग्याचा काय उपयोग, अशा अर्थाचा  तो लेख होता. ढालेंच्या त्या लेखामुळे दलित समाजात, विशेषत: तरुणवर्गात आणि पुरोगामी समाजातही अक्षरश: भूकंप झाला. नामदेव ढसाळ तेव्हा मुंबईतील रेड लाइट एरियात राहत होता. दलितांना नाइलाजाने  वेशीबाहेरच्या वस्त्यांमध्ये राहावे लागे. तसेच त्यालाही गोलपिठय़ाला राहावे लागत होते. वडील पेशाने खाटिक. दिवसाची तुटपुंजी मजुरी आणि मटण कापताना उरलेले मटण व खिमा घेऊन ते घरी यायचे. नामदेवचा ‘गोलपिठा’ असा जन्मला. बहुतेक दलित साहित्यिक, लेखक, कवी हे उपेक्षित,झोपडपट्टीत, माटुंगा लेबर कॅम्पपासून ते माझगाव खड्डा, सातरस्ता, बीडीडी चाळी इत्यादी वस्त्यांमध्ये राहत होते. २५ वर्षांच्या स्वातंत्र्याचा अभिमान बाळगणाऱ्यांना ढालेंची तिरंगा झेंडय़ाविषयीची ही प्रतिक्रिया धक्का देणारी होती. कोणते खरे स्वातंत्र्य, हा प्रश्न दलित पॅंथरने सर्वासमोर ठेवला आणि तिथून वेताळ पंचविशीची कथा सुरू झाली. या प्रश्नाला राजा विक्रमाला उत्तर देणे अशक्य होते, तसेच सामान्य माणसांना आजही त्याचे उत्तर मिळणे अशक्य आहे.
पॅंथरच्या झंझावाती काळातील पहिला मोर्चा आव्हानात्मक होता. वरळीतील राजा ढालेंच्या एका ख़ळबळजनक भाषणाला पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या पाशवी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तो उग्र मोर्चा भोईवाडा-परळ भागात काढण्यात आला होता. त्यावेळी निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. हा मोर्चा अगदी वेगळ्या प्रकारे काढलेला होता. सभाबंदी आणि जमावबंदी लागू होती. त्याही परिस्थितीत पोलिसांचा निषेध करण्यासाठी सुमारे २० हजार दलित स्त्री-पुरुष आणि तरणीबांड पोरे प्रचंड संख्यने बिळातून उंदीर यावेत तसे चाळींच्या घळीतून तसेच दोन इमारतींच्या मधल्या जागेतून अचानक एकत्रित झाले. सणसणीत घोषणा देत संचारबंदी मोडून मोर्चा निघाला. मोर्चावर लाठीचार्ज झाला. मोर्चावरच्या या लाठय़ांचे वळ मात्र सर्व दलित समाजावर बसले. पुढे वरळीत अनेकदा काही उपद्रवी शक्तींनी मुद्दाम दंगली घडवून आणल्या. वरळीच्या चाळींत दोन जमातींमध्ये दंगल पेटवली गेली. त्यावेळी प्रथमच जाहीररीत्या लोकन्यायालय स्थापन केले गेले आणि अ‍ॅड्. निलोफर भागवत यांनी वरळीच्या दंगलीत ११ दलित गोळीबारात का मारले गेले, याबद्दलचा अहवाल तयार केला.
दलित पॅंथरने ‘दलित’ या शब्दाला व्यापक अर्थ दिला. त्याचे तरंग महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या अनेक प्रांतांतील तळागाळातील समाजांत उठले. पॅंथर त्यावेळी आणि आजही तरुणांना नुसते आकर्षित करीत नाही, तर विचार करायला लावते. पॅंथरच्या मोर्चातील घोषणांमुळे मूळ प्रश्नाला हात घालण्याची एक सवय लागली. ‘तस्करी अर्थरचनेवरील दलित पॅंथरचा घणाघाती घाव’ ही अविनाश महातेकरांनी लिहिलेली पुस्तिका अत्यंत गाजली. पॅंथरने भुकेकंगाल दलितांना रस्त्यावर आवाज देऊन राहण्याचा हक्क व जगण्याचा हक्क झगडून मिळवण्यास आणि ताठ मानेने उभे राहण्यास शिकवले. १९६७ मध्ये सर्वत्र पडलेला दुष्काळ तसेच पंचवार्षिक योजना अपयशी ठरल्याने मोठय़ा प्रमाणात वाढलेली बेकारी,  लोकसभेने नेमलेल्या इलाया पेरुमल कमिटीचा दलितांवरील अत्याचारांबद्दलचा धक्कादायक रिपोर्ट आणि शासकीय उदासीनता यामुळे प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. ७२ मध्ये महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला होता. ज्यामुळे असंतोषाचे रूपांतर उद्रेकात होऊ नये म्हणून जगातील पहिले सामाजिक औषध- रोजगार हमी योजना आणली गेली. गावा-गावांमध्ये दलितांचा रस्त्यावरची खडी फोडण्याच्या कामासाठी वापर करून घेतला गेला. ग्रामीण भागातून मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या मोठय़ा शहरांमध्ये दलितांचे लोंढे आले. त्यातल्या बहुतेकांनी पॅंथरचे झेंडे रोवून आपला निवारा तयार केला आणि जगण्याचा हक्क मिळवला. पॅंथर चळवळीचा हा फार मोठा परिणाम होता.
पॅंथरचा जाहीरनामा जसा गाजला, तशाच या लहान लहान चळवळीही गाजल्या. सिद्धार्थ होस्टेलच्या एका खोलीमध्ये दोन दिवस कोंडून घेऊन राजा ढाले, नामदेव व मी असा तिघांनी चर्चा करून तो जाहीरनामा तयार केला होता. पॅंथरच्या पहिल्याच उद्रेकाच्या काळात सर्व डाव्या संघटना आणि दिल्लीतून विचारणा करण्यात आली की, आता त्यांना नेमके पाहिजे आहे तरी काय? तेव्हा आपोआप उत्तर गेले की, दलित समाज सर्व ठिकाणी, अगदी सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्येसुद्धा एक टक्क्य़ापेक्षाही कमी आहे. दलितांसाठी राखीव जागा पाहिजेत आणि त्या निश्चित करायला पाहिजेत. या मागणीचा परिणाम होण्यास थोडा कालावधी गेला, परंतु शंभर बिंदू नामावलीचे रोस्टर आले. सुरुवातीला रोस्टरच्या जागा कशा भरायच्या, हा प्रश्न होता. प्रस्थापित उच्चवर्णीयांनी आरंभीच्या काळात रोस्टरचा चलाखपणे उपयोग करून दलितांना राखीव जागा मिळणार नाहीत अशी खबरदारी घेतली. नंतर थोडीफार परिस्थिती बदलली. आज जागोजागी खासगी क्षेत्रामुळे आणि सार्वजनिक क्षेत्र जवळजवळ नामशेष होत चालल्याने राखीव जागा अदृश्य झाल्या आहेत. मधल्या काळात नोकरशाहीने रोस्टरचे प्रमाण आणि जागा खाऊन टाकल्या. दलित समाजातून रोस्टरचा फायदा मिळवलेले खूप तरुण होते. परंतु राखीव जागांचा व्यापक उपयोग करण्याचे आणि अभ्यास करण्याचे धाडस त्यांनी दाखविले नाही.
दलित पॅंथर चळवळीचा केवळ दलित पुरुषांवरच नाही, तर महिलांवर आणि सभोवताली असलेल्या इतर जातीजमातींवरही प्रचंड प्रभाव पडला. दलित पॅंथरला केवळ तीन वर्षांचा काळ जाहीरपणे चळवळ करण्यासाठी मिळाला. नंतर आणीबाणी आली. आणीबाणीला पॅंथरनेच प्रथम विरोध केला. सर्वच समाजांतील युवक आणीबाणीच्या विरोधात एकवटले होते. पॅंथरच्या मोठय़ा नेतृत्वाच्या एका गटाने जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीस पाठिंबा दिला. आधीच गिरणी कामगारांच्या एका मोर्चातील सहभागामुळे हाडाचा कम्युनिस्ट कोण, यावरून वादंग निर्माण झाला होताच. तिथूनच पॅंथरचे नेतृत्व दुभंगण्यास सुरुवात झाली. वास्तविक समाजाला आपले प्रश्न बेधडकपणे सोडवणारे नेतृत्व, संघटना पाहिजे  होती. पण नंतरच्या काळात त्याला उतरती कळा लागली. दलित चळवळीमध्ये प्रामुख्याने गरीब वस्तीतील, चाळींमधील आणि झोपडपट्टय़ांतील नेतृत्व आपोआप तयार झाले होते. प्रत्येक शाखेला ‘छावणी’ हा पर्यायी शब्द दिला गेला होता. वस्त्यांमध्यल्या सभेत दहा माणसे असोत की दहा हजार असोत- पोटतिडकीची, बोधप्रद आणि समाजाने आंदोलनात सहभाग घ्यावा याकरता त्वेषाने भाषणे होत. भाषणाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, शाहूमहाराज आणि इतर सामाजिक क्रांतिकारकांना अभिवादन केले जाई.  सर्वानाच- अगदी डाव्या पक्षांनादेखील चकित करणारे, कोणताही पक्ष न फोडता आणि कुणाच्या नेतृत्वाखाली न जाता स्वयंभू पद्धतीने ही चळवळ उभी राहिली. या चळवळीवर त्यावेळची जागतिक परिस्थिती, पॅरिसमधील विद्यार्थ्यांचा उठाव, व्हिएतनामचे युद्ध, चीनमधील सांस्कृतिक क्रांती यांचा जसा परिणाम झाला होता, तसाच विद्रोही साहित्याचाही खोलवर परिणाम झालेला होता. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर महिला दलित पॅंथरमध्ये सामील झाल्या. याचे मुख्य कारण दलित स्त्रियांवर अत्याचार होत होते. हातात सायकलची चेन आणि काठय़ा घेऊन त्यांचे संरक्षण करण्यासाठी दलित तरुण उभे ठाकले. गावातील नरबळी अथवा स्त्रियांची नग्न धिंड काढणे अशा अमानुष अत्याचारांच्या विरोधात त्यांनी केवळ भाषणेच केली नाहीत, तर संबंधित गावांत जाऊन अत्याचार करणाऱ्या लोकांना त्यांनी जाबही विचारला. अत्याचारास याप्रकारे तात्काळ उत्तर देण्याचा हा प्रकार तेव्हाच्या जुन्या पद्धतीने मोर्चे काढणे आणि बंदच्या राजकारणापेक्षा वेगळा मार्ग दाखवणारा होता.
पुढे निवडणुकीच्या राजकारणात पॅंथरसारखी चळवळ संकुचित पावली. वरळीतील लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर दलितांवरील अत्याचारांचा निषेध म्हणून २० हजार मतदारांनी बहिष्कार टाकण्याचा पहिला प्रयत्न झाला. आणि त्याचा राजकीय अर्थ सत्ताधाऱ्यांनी समजून घेतला. जरी पॅंथर संघटना पुढे सक्रीय स्वरूपात राहिली नाही तरी मराठवाडय़ातील दंगलीच्या वेळी दलितांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पॅंथर चळवळ तसेच सर्वच समाजांतील जागृत झालेल्या तरुणांनी आणीबाणीला केलेला प्रखर विरोध हा सगळा प्रकार सत्ताधाऱ्यांचा थरकाप उडवणारा होता. म्हणूनच मुद्दाम मराठवाडय़ातील दंगली घडवून आणल्या गेल्या. दलित वस्त्या बेचिराख केल्या गेल्या त्या याच कारणामुळे. यातूनच पुढे संपूर्ण महाराष्ट्रात भूमिहीनांचे सत्याग्रह आणि नामांतरासाठी झालेला लढा, महाराष्ट्रातील रस्त्यांवर नाकेबंदी करणारी चळवळ मोठय़ा प्रमाणात घडून आली. हा जसा काळाचा परिणाम होता, तसाच पॅंथरच्या विचारांचाही. ही आंदोलने शांततेच्या मार्गाने झाली. दलितांनी कधीही अतिरेक केला नाही किंवा ती अतिरेकी चळवळही नव्हती. म्हणूनच आजही सर्वसामान्यांना पॅंथरसारखा दरारा असणारी संघटना मनापासून हवी आहे. आजही दलित तरुण आखीव पद्धतीने लिहिलेल्या पॅंथरच्या जाहीरनाम्याकडे अभ्यासू वृत्तीने पाहतात. त्यातली धनदांडग्यांच्या वर्चस्ववादाला व ब्राह्मणवादाला आव्हान देणारी भूमिका त्यांना पटते. कारण ते वास्तव आहे. आजही दलित समाजातील बहुसंख्य लोक म्हणतात की, बाबासाहेब आंबेडकरांनी राखीव जागांची घटनात्मक तरतूद केली, पण त्याचा आटणारा प्रवाह पॅंथरने रोखला आणि त्याला रोस्टर स्वरूपात प्रत्यक्षरूप दिले. आम्ही हे केले, हे लोकांनी सांगितले, हेच या चळवळीचे यश म्हणता येईल.
मात्र, फक्त शहरी वस्तीमधून निर्माण होणारे नेतृत्व फार काळ टिकत नाही, हे सत्यही उमगले. डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाच्या शैलीत हा महत्त्वाचा भाग होता. त्यांनी शहरी आणि गावकुसाबाहेरच्या, वेशीबाहेरच्या लोकांना उठवले, जागृत केले आणि संघर्ष करायला शिकवले. भारतीय स्वातंत्र्यानंतर सामान्य लोकांनी काय काय कमावले आणि काय गमावले, याचे प्रतिबिंब पॅंथर चळवळीत कमी-अधिक प्रमाणात दिसते. पॅंथरने दलितांना राजकीय लाचारी सोडून स्वाभिमान शिकवला. वास्तविक पाहता १९७० ते ८० च्या दशकात झालेल्या चळवळींमध्ये खूप मोठे धक्के बसले. त्यात अपयश आले तरी त्यावेळच्या नेतृत्वाला संपूर्ण दोष देता येत नाही. जहाल प्रश्नांविरुद्ध तत्काळ लढणे आवश्यक होते. जागतिक पातळीवर सर्व राष्ट्रांमध्ये हेच दिसते. पण त्यातून नेतृत्वाने धडे घेतले पाहिजेत. चिरेबंदी संघटना आणि लवचिक, सर्वव्यापी विचारांची बैठक ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. सरतशेवटी जेव्हा मूर्ख म्हातारा डोंगर हलवतो आणि खणतो, तेव्हा डोंगर वाढत नाही, पण समाज मात्र हलतो.
शब्दांकन- मधु कांबळे