रविवारी सकाळी मस्त निवांत पेपर वाचत असताना विश्वनाथन आनंदच्या बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या लढतीची बातमी वाचून अचानक मला आज बुद्धिबळ खेळायची लहर आली. मला बुद्धिबळाची तशी फार आवड. पण गेल्या काही वर्षांत बहुतेक सगळ्या मित्रांची लग्न होऊन ते आपापल्या सांसारिक प्रपंचाचे दळण lr14दळण्यात व्यग्र असल्यामुळे आजकाल ३-४ तासांसाठी पडीक मित्र सापडणं ही तशी दुर्मीळ गोष्ट झालेली आहे. बुद्धिबळ खेळायला घरातच कोणी बकरा शोधायचा म्हटला तर आईवर आधीच टीव्ही सीरिअल मधल्या एका सुनेच्या घटस्फोटाचे टेन्शन, दुसऱ्या सुनेवर असलेला चोरीचा आळ, गुंतागुंतीची लफडी, सासू-नणंदेची छळवादी कटकारस्थाने अशा जागतिक दर्जाच्या प्रश्नांचा खूपच बोजा असल्यामुळे तिला अजून उगाच बुद्धिबळाचा भार द्यायला नको. मुलगा तसा लहान आहे आणि त्यातही त्याची प्रश्नांची तोफ अखंड धडाडत असते. त्यामुळे त्याला बुद्धिबळाबद्दल सांगायचे म्हणजे खेळ बाजूला आणि ‘घोडा घोडय़ासारखा दिसतो, पण उंट उंटासारखा का दिसत नाहीये?’ ‘राजा आकाराने हत्तीपेक्षा मोठा कसा काय?’ अशा निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देता देता माझी बुद्धी आणि बळ दोन्हीही बुद्धिबळ खेळायच्या आधीच संपून जायचे. त्यामुळे त्याच्या नादाला मी लागलो नाही. शेवटी सर्व शक्यतांची पडताळणी केल्यावर आमच्या सौ.लाच बुद्धिबळ खेळायला राजी करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. दिवाणखान्यात बसून तांदूळ निवडणाऱ्या सौ.समोर मी बुद्धिबळ खेळण्याचा प्रस्ताव ठेवला. तिने तो तांदळातल्या खडय़ासारखा सहजपणे उचलून बाजूला टाकला. पण मीही साधाlr16सुधा खडा नसल्याने पाच र्वष सांसारिक उन्हाळे, पावसाळे, पूर, वादळं झेलून निगरगट्ट झालेल्या नर्मदेच्या गोटय़ाप्रमाणे तिथून हटलो नाही. शेवटी बुद्धिबळ म्हणजे फारच बोिरग. काय ते २-४ तास एका जागी पुतळ्यासारखे बसून राहतात माणसं असं नाक मुरडतच, पण सौ.ने खेळायला होकार दिला आणि मग एकदाचे बरेच वर्षांनी आमच्या माळ्यावरून हत्ती, घोडे, उंट आपापल्या अंगावरची धूळ झटकत खाली उतरू लागले.
आमच्या सौ.ला तशी बुद्धिबळाची थोडीफार माहिती आहे, पण त्याची आवड वगरे तशी अजिबात नाही. आमच्या सौ.चे बुद्धिबळातील प्रावीण्य थोडक्यात सांगायचे म्हणजे, आपण आपला नॉर्मल खेळ केल्यास १० मिनिटांत बुद्धिबळाचे २-३ डाव सहजपणे उरकून घेऊ शकतो. असो. विसर पडला असल्यास म्हणून मी तिला घोडा अडीच, हत्ती सरळ आणि आडवा, उंट तिरका अशी पात्रांची जुजबी पुन:ओळख करून दिली. राजाचे कॅसिलग वगरेसारखे बाकी प्रकार सांगितले नाही. नाही तर हे फारच किचकट आहे असे म्हणून ती राजाचे कॅसिलगऐवजी बुद्धिबळ खेळायच्या प्रोग्रामचे कॅन्सेिलग करण्याची शक्यता जास्त होती.आमच्या बुद्धिबळाच्या डावाची दणक्यात सुरुवात झाली. पहिल्याच डावात तिने पहिल्या २-३ चालीतच चक्क शह दिला. मला नव्हे, तर बुद्धिबळ खेळताना फार विचार वगरे करावा लागतो या जगमान्य नियमालाच तिने पहिला शह दिला. गुराढोरांना माळरानावरून हाकतात तसं ती उंट, घोडे, हत्तींना मस्तपकी गप्पा मारत मारत पटावरून इथे-तिथे फिरवत होती. घोडे गाढवासारखे वागत होते. उंट वाळवंटातल्या मृगजळाच्या शोधात इतस्तत: धावत होते. हत्ती कोपऱ्यात खांबासारखे मख्ख उभे होते. त्यांचे अजून आयुष्यात पहिले पाऊल पडले नव्हते आणि प्यादी रस्त्यावरच्या अनाथ मुलांसारखी कुठे तरी चौकातल्या सिग्नलवर उभी राहून आपलं पुढे कसं होणार, अशा हताश मुद्रेने आजूबाजूच्या गंभीर परिस्थितीकडे पाहात होती. वजिराला बुद्धिबळात दिशेची आणि गतीची असलेली सूट आणि बायकांना संसारात बोलायची आ
णि नवऱ्यावर हुकूमत गाजवायची (स्वत:च करून घेतलेली) सूट ह्य़ा सामायिक गुणधर्मामुळे की काय, पण तिचे वजिराबरोबर चांगलेच जमले होते. लालबागच्या राजाचा व्हीआयपी पास असलेल्या मंडळींसारखा तो तोऱ्यात कुठलेही अडथळे आणि थांबे न पाळता थेट माझ्या गोटात शिरला होता. ‘आ बल मुझे मार’ ह्या अवस्थेत तो माझ्या मोहऱ्यांसमोर उभा होता. पण बुद्धिबळात बल नसल्याने माझा घोडा त्या उर्मट वजिराच्या पाश्र्वभागावर आपल्या नालेचा ठसा उमटवण्यास आतुर झाला होता. पण सौं.चा वजीर असल्याने आणि वजीरच मेला तर खेळ लगेच संपून जाईल म्हणून मी सासरच्या पाहुण्यासारखे निमूटपणे त्याचे सगळे चोचले पुरवत होतो. ह्या सगळ्याच्या सोबतीला बॅकग्राऊंडमध्ये सौं.च्या ऑफिसमधल्या गमती, मत्रिणीने घेतलेल्या नवीन नेकलेसचे सूचक वर्णन, ‘अहो कुकरच्या किती शिटय़ा झाल्या जरा खेळता खेळता लक्ष ठेवा हं,’ अशा सूचना इत्यादी गोष्टीही चालूच होत्या. तिच्या मोहऱ्यांप्रती तिच्या अशा प्रचंड अनास्थेमुळे तिचे ४-५ मोहरे आतापर्यंत धारातीर्थी पडलेले होते आणि बाकीचे मोहरे होणारे हाल न सहन होऊन आत्महत्या करण्यासाठी व्याकूळ झाले होते.
शेवटी मलाच काही करणे भाग होते. फक्त आपलेच मोहरे मरतायत, सामना फारच एकतर्फी होतोय असं सौ.ला वाटू नये म्हणून मी हळूच माझ्याच घोडय़ाने माझा एक उंट आणि दोन प्यादी मारली. पण त्या वेळी एका माजुरडय़ा रिक्षावाल्याची काल माझ्या मत्रिणीने कशी चांगलीच जिरवली, ह्या चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन पूर्ण भरात असल्यामुळे माझ्या अशा छोटय़ा-मोठय़ा घातपाती कारवायांकडे तिचे लक्ष नव्हते. आपल्याच माणसाने पाठीत सुरा खुपसून विश्वासघात करण्याच्या घटना मानवी इतिहासात बऱ्याचदा घडलेल्या आहेत, पण बुद्धिबळाच्या इतिहासात असा आपल्याच मोहऱ्यांनी दगाफटका करण्याच्या पहिल्या घटनेची नोंद आमच्या घरी झालेली आहे. ह्या घटनेने हादरलेल्या पटावरच्या माझ्या बाकीच्या काळ्या मोहऱ्यांचे चेहरेही पांढरे पडले.
माझ्या घोडय़ाने केलेल्या ह्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्यातून ते मोहरे सावरतात न सावरतात तोच आमच्या सौ.ने दुसरा बॉम्ब टाकला. ती म्हणाली की, ‘‘मला वरणाला फोडणी द्यायला जायचं आहे. असं एक एक चाली करत राहिल्याने अडकून पडायला होतं. म्हणून आपण असं करूया का? मी माझ्या पुढच्या ४-५ चाली एकदमच खेळून वरणाला फोडणी द्यायला जाते आणि मग त्या वेळेत तुम्ही तुमच्या पुढच्या ४-५ चाली खेळून ठेवा.’’ हा प्रस्ताव ऐकताच सर्वप्रथम माझा धष्टपुष्ट हत्ती भोवळ येऊन बाजूच्या उंटावर कोसळला. मला तिच्या या बोलण्यावर काय बोलावे तेच कळेनासे झाले. या बुद्धिबळाच्या चाली आहेत की बुद्धिबळ या खेळाचे या जगातून समूळ उच्चाटन करायच्या हालचाली आहेत, हे मला कळेनासे व्हायला लागले होते. ह्य़ा तिच्या चळवळींना वेळीच लगाम न घातल्यास मीही बुद्धिबळाचे नियम विसरून जायचा धोकाही होताच. शेवटी, बुद्धिबळाव्यतिरिक्त सर्व विषयांवर गप्पा मारत रंगलेला, स्वत:पेक्षा दुसऱ्याच्या मोहऱ्यांची जास्त काळजी घेत प्रसंगी स्वत:च्या मोहऱ्यांचा बळी देत प्रचंड आत्मीयतेने आणि काळ्या पांढऱ्या मोहऱ्यांच्या परस्पर आदर आणि आपुलकीने खेळला गेलेला हा बुद्धिबळाचा डाव आम्ही बुद्धिबळ खेळाच्या हितार्थ बरोबरीत सोडून देण्याचा निर्णय घेतला.                                                   

 -मंदार प्रभूपरुळेकर

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Story img Loader