मायकेल जॅक्सनच्या इलेक्ट्रॉनिक ढोलपथकानं किमान दोन दशकं जगभर धिंगाणा घातला. तो पूर्वी मुंबईमध्ये ‘विझक्राफ्ट’तर्फे गायला-नाचायला आलेला तेव्हा काही दिवस वृत्तपत्रांचे रकाने त्याच्या बातम्यांनी भरून जात होते. त्याच्या मैफिलीमध्ये दणादणा वाजलेली वाद्यं, स्पीकर्सच्या भिंती हे सारं चवीनं चर्चिलं जात होतं. बाळासाहेब ठाकरे आणि मायकेल जॅक्सनचा एकत्र फोटो काढला गेला आणि छापला गेला. मैफिलीची महागडी तिकिटं हातोहात खपली गेली. विमानतळावर उतरल्यावर त्यानं झांजा-टिपऱ्यांच्या तालावर अंग हलवलं. प्रत्यक्ष मैफिलीमध्ये शक्तिशाली स्पीकर्सनी जागतिकीकरणाच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या भारतालाच जणू हलवलं! त्या अवाढव्य स्पीकर्सचीही पुष्कळ चर्चा झाली. मला वाटतं, ते काही फार शक्तिशाली नसणार. साधारणत: पॉप कॉन्स्र्टस्मध्ये ज्या तऱ्हेचे माइक्स, स्पीकर्स वापरतात तशीच ती यंत्रणा असणार. पण तेव्हाच्या भारतामधल्या श्रोत्यांना त्याची सवय सोडाच; तोंडओळखही नसणार. आता गल्लोगल्लीत डी. जे.च्या स्पीकर्स-भिंती किंचाळताना आपण गणपतीभर पाहिलं. आणि त्या आवाजानं साताऱ्यातल्या एका वाडय़ाची भिंत कोसळून तीनजण बळी गेल्याची बातमीही काही जुनी नाही! आज मायकेल जॅक्सन सादरीकरण करायला आला तर त्याच्या त्या त्यावेळेला गाजलेल्या स्पीकर्सचं कौतुक करायला कुणीही सरसावणार नाही, इतकं ते सारं कर्कश्श, आक्रमक नादब्रह्म आपल्या सरावाचं झालेलं आहे! पण मायकेल जॅक्सन नावाच्या शापित गंधर्वानं जगाला अशा आणि अशासारख्या अनेक ‘पॉप-अ‍ॅक्ट्स’ची ओळख करून दिली, हे नाकारता येणार नाही.
गरगर फिरत असे तो. कधी मेक्सिको, कधी जपान, कधी आफ्रिका, कधी लंडन आणि मग अमेरिकेभर त्याचे दौरे होत असत. रोज पेपरात बातम्या. काही सच्च्या, काही पेरलेल्या. काही भलत्याच खमंग. रोज मैफिलीचा किल्ला लढवण्यासाठी एखादी निराळी युक्ती. कधी ‘मूनवॉक’- म्हणजे चंद्रावर चालण्यासारखं नर्तन.. आणि ते इतकं प्रसिद्ध होतं, की हमखास असेच कॉन्सर्टमध्ये. कधी हिऱ्यांनी झगमगता हातमोजा मायकेल घालत असे. कधी कधी तर तो चालताना खूप खूप खाली झुके आणि तरी न पडता गाणं म्हणे. गुरुत्वाकर्षणाचे सारे नियम जणू त्याच्यासाठी पृथ्वी शिथिल करीत असे. त्यानं खास त्यासाठी वेगळे बूट बनवून घेतले आहेत, हे चाहत्यांना माहीत असलं तरी त्यांना ते खरं वाटत नसे. मायकेल जॅक्सन ऊर्फ एम. जे.च्या लाखो चाहत्यांना न्यूटनचा नियम आपल्या लाडक्या एम. जे.ला लागू होत नाही असंच वाटत असणार! मोटाऊन रेकॉर्ड्सच्या बेरी गोर्डीनं मायकेलला पहिल्यांदा ‘मूनवॉक’ सादर करताना बघितल्यावर लिहिलं, ‘I was shocked. It was magic. Micheal Jackson went into orbit, and never came down.’ बेरी गॉर्डीला आपण भविष्यवेधी असं काही लिहून बसलो आहोत याची कल्पना होती का? मायकेल अंतराळात गेला आणि पुन्हा परतला नाही, हे खरंच. पण मुदलात तो या पृथ्वीतलावर कधी होता? कुठले पॉप आयकॉन्स असतात? त्यांचे चाहते, त्यांचा पैसा, त्यांच्या खासगी बोटी, त्यांचे खूशमस्करे, विमानतळांवर उभी असलेली त्यांची खासगी जेट्स.. आणि सोबत त्यांची प्रतिभा. या साऱ्या निर्बुद्धपणावरही वारंवार मात करणारी ती अवाढव्य प्रतिभा! आणि मग नाना कचाटय़ांमधून मुक्ती देणारा त्या पॉपस्टारचा आतला, जिवंत, लसलसता, स्थैर्याची हवी मागणारा सूर! नसतातच मुळी हे पॉपस्टार्स आपण राहतो त्या पृथ्वीवर. ते वसतात गंधर्वाच्या-यक्षांच्या अद्भुत नगरीत; जिथे तुम्हा-आम्हाला मज्जाव असतो! मायकेल जॅक्सन हा त्या साऱ्या गंधर्वाचा गंधर्व! त्याला नाचता आलं, गाता आलं, उत्तमोत्तम व्हिडीओ अल्बम्सची निर्मिती त्याला करायला जमली. एम टी. व्ही.नं त्याचे व्हिडीओ झपाटय़ानं पसरवले. खेरीज कृष्णवर्णीय कलाकाराचा म्युझिक व्हिडीओ दाखवण्याचं श्रेयही घेतलं. (आणि मुळात या दुजाभावाला आपणही कारणीभूत होतो, हे एम टी. व्ही. विसरलं.) मायकेल जॅक्सननं पॉप गाणं ‘श्रवणीय’ नव्हे, तर ‘प्रेक्षणीय’ केलं! त्याचे म्युझिक व्हिडीओ आठ-आठ, दहा-दहा मिनिटांचे आहेत. त्यामध्ये सहसा एक कथा गुंफलेली असते. नायक अर्थातच मायकेल असतो. तो नायक आणि ते गाणं ऐंशीच्या दशकातल्या बॉलीवूड पिक्चरइतकंच ढोबळ असतं. कधी कधी तर त्या गाण्याच्या काव्याचा, सुरावटीचा आणि अल्बम व्हिडीओचा संबंधच राहत नाही.
‘Do you remember when we fell in love
we were young and innocent then
Do you remember how it all began
It just seemed like heaven, so why did it end?’
(‘आठवतं का कधी, कसे पडलो आपण प्रेमात?
तरुण होतो तेव्हा आणि मनं कोवळ्या वयात
आठवतं ना कशी गोष्ट सुरू झाली होती?
स्वर्गामधे होतो! – केव्हा आलं सारं संपुष्टात?’)
हे त्याच्या ‘रिमेम्बर दी टाइम’ या गाण्याचे शब्द आहेत. पण त्या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसतो इजिप्तमधला प्राचीन काळ, तिथला राजवाडा, लहरी राजा, राणी आणि नृत्यसामर्थ्यांनं गायब होणारा जादूगार मायकेल. काही संबंधच राहत नाही आशय आणि अभिव्यक्तीचा! अर्थात त्याची सारी गाणी अशी नाहीत. त्याचा ‘अर्थ साँग’ हा सांगीतिक डीस्कोर्स मला स्वत:ला एकसंध वाटतो. पृथ्वीवरचं वाढतं प्रदूषण, प्राण्यांची कत्तल, युद्ध आणि निसर्गाचा संहार हे सूत्र असलेलं ते गाणं आहे. त्याची चाल चांगली आहेच- मधला आलाप श्रोत्यांना कुठल्या कुठे उंचावत नेतो! पण त्याचा व्हिडीओ सुदैवानं त्या संगीताशी सुसंगत आहे. जंगलात झाडं तोडली जात आहेत.. हत्ती हस्तिदंतासाठी मारले गेले आहेत.. आदिवासी मुलाच्या डोळ्यांपाशी आता कॅमेरा जातोय. मग दिसू लागतं युरोपातलं युद्धात उद्ध्वस्त झालेलं खेडं. एक बाप सायकलकडे टक लावून बघतोय आणि युद्धात मारली गेलेली छोटी मुलगी त्या छोटय़ा सायकलवर बसलेली त्याला स्मरते आहे! आणि मग ते सारेच आलापानिशी जमिनीवर गुडघे टेकवून बसतात आणि हात मातीमध्ये त्वेषानं रुतवून मागेपुढे हलवतात. (ही आफ्रिकन रिच्युअल आहे.) जणू धरणीमातेपाशी विनवणी करण्याखेरीज त्यांना गत्यंतर नाही.
तो व्हिडीओ पाहिला आणि त्या छोटय़ा मुलांचे चेहरे कित्येक दिवस माझ्या डोळ्यांपुढे तरळत राहिले. मायकेलला लहान मुलांविषयी विशेष आस्था असली पाहिजे असं मला तेव्हा वाटून गेलेलं. होतीच ती तशी; पण मला वाटली तशी निरागस स्वरूपाची नव्हे! जॉर्डन नावाच्या तेरा वर्षांच्या मुलाचं लैंगिक शोषण मायकेलनं केल्याचं जेव्हा जगाला बातमीद्वारे कळलं, तेव्हा माझ्यासारखाच धक्का कित्येकांना बसला असला पाहिजे. बावीस मिलियन डॉलर्सना ही ‘केस’ सेटल होतेय ना होतेय तोच पुन्हा २००३ साली सात मुलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली मायकेलला अटक करण्यात आली. त्याचे कित्येक चाहते त्याच्या समर्थनार्थ सरसावले; पण कित्येकांचा त्याच्यावरचा प्रगाढ विश्वासही उडाला! पुढे त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या ‘नेव्हरलंॅड’ नावाच्या शेतघराचे तपशील बाहेर आले ते या आरोपांशी सुसंगत होते. या घरात लहान मुलांची खेळणी होती. डिस्नेलँडसारख्या राइड्स होत्या. कँडी मिळणारी मशिन्स होती. तिथेच मायकेल मुलांना घेऊन जात असे आणि स्वत:ही ती खेळणी खेळत असे, असं तिथल्या नोकरांनी सांगितलं. का वागत होता असा तो? काय होतं त्यामागे? त्यामागे होतं- त्याचं हरवलेलं बालपण. ज्या वयात पोरांसोबत दंगा करायचा आणि रात्री आईच्या कुशीत झोपायचं, त्या वयात त्याचे करडे वडील भावंडांसह त्याला क्लबमध्ये गायला पाठवत. त्या मद्यधुंद वातावरणात कधी छोटय़ा मायकेलला कपडे उतरवत ‘स्ट्रीप्टीज’ही करावी लागे! (पुढे त्याच्या नर्तनशैलीत अनेकदा त्याचे हात कमरेखाली झेपावतात; त्याचा उगम इथे तर नसेल?) त्या सुरेल गंधर्वाला केवढा मोठा शाप जन्मभर जडलेला होता!
२५ जून २००९ रोजी तो औषधांच्या चुकीच्या मात्रेमुळे मेला; तरी त्याचं मन पुष्कळच आधी मेलं असणार! त्या भकास आणि विषयासक्त मृत्यूची सांगड मला मायकेलच्या तितक्याच भकास बालपणाशी जोडता येते! (अशा वेळेला लहान मुलांच्या निकोप वाढीसाठी निरंतर झटणाऱ्या कोल्हापूरच्या लीला पाटील यांची किंवा पुण्याच्या शोभा भागवतांची किंवा मुंबईच्या डॉ. लता काटदरे यांची विशेष प्रकर्षांने किंमत जाणवते.)
अशा या एम. जे.नं पॉपसंगीताचा नव्या युगाच्या तंत्रानिशी भरभक्कम पाया घातला, हे त्याचं खरं श्रेय आहे. आजचा कुठलाही पॉपस्टार कधीतरी, कुठेतरी मायकेलकडे वळतोच. त्याचं मला सगळ्यात आवडणारं गाणं आहे-  They dont realy care about us! ब्राझिलच्या त्या निम्न-आर्थिक स्तराच्या ‘फवेला’ वस्त्या, त्यामध्ये वाजणारे ढोल, ‘ओलोडम्’ हे ड्रमपथक, मधे नाचणारा मायकेल.. हे सारं चित्र खरं वाटतं. वाटतं, की मायकेलनं हा विद्रोही रस्ता पकडला असता तर तो प्रसिद्ध कदाचित झाला नसता; पण इतक्या लवकर हरवलाही नसता! पन्नास-शंभर जण ते ढोल वाजवत आहेत; तुम्ही आमची पर्वा करीत नाही असं प्रस्थापितांना निक्षून सांगत आहेत. आणि हा मायकेल नाचतो आहे. त्याला खरं तर सांगायची होती एक गोष्ट. साधीसुधी. एका मुलाखतीत त्यानंच म्हटलं होतं, ‘अशी गोष्ट- जी काही काळापुरतं ऐकणाऱ्याला परक्या सृष्टीत नेईल. अशी गोष्ट- जिथे फक्त सांगणाऱ्याचा आवाज असेल आणि ऐकणाऱ्याचा कान.’ मायकेलला ते साधलं का? त्यानं सजवली त्याची गोष्ट. आणि इतकी सजवली, की गोष्टच हरवून गेली. पण या गाण्यात मात्र एका हातावर ढोल उचलत तो तगडा ब्राझिलीयन् वाजवतो आहे आणि कुठेतरी मायकेलला त्याची ती हरवून गेलेली जुनी गोष्ट पुन्हा गवसते आहे; स्मरते आहे!

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Story img Loader