तुकोबा विमानात बसून सदेह गेले असे आपण म्हणतो. ते विमानातून जाऊ शकतात तसे विमानातून येऊही शकतात ना.. तुकोबा आपल्या अवतीभवती असतातच. आहेतच. काळ कोणताही असो. त्यांचे नाव वेगळे असेल. रूप वेगळे असेल. त्यामुळे केवळ त्यांच्या नामा-रूपात अडकू नये. तुकोबा संत असून काठी हाणतात. पण कोणाचे डोके फोडा म्हणत नाही. ही काठी शब्दांची, विवेकाची, ज्ञानाची, विचारांची.. जिच्यामुळे डोक्याला झिणझिण्या येऊन जाग येईल. आणि आधुनिकतेचे म्हणाल तर ती काळाशी नाही, विचारांशी संबंधित असते. शब्दाच्या मागेपुढे एक इतिहास असतो .. एक चरित्र असते.. विचारव्यूह असतो..

परवा ‘तुकाराम बीज’ होती. त्यानिमित्ताने एका संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेलो. ‘संत तुकाराम’ या विषयावर पाऊण तास बोललो. परत आलो. काहीतरी गफलत झालेली आहे असे वाटायला लागले. भाषणात काही चुकले का? नंतरचे अध्यक्षांचे भाषण आवडले नाही का? संयोजकांच्या वागण्यात कोरडेपणा होता का? आपल्याकडे दुर्लक्ष झाले असे वाटतेय का? नक्की कळेना. पण अस्वस्थपणा वाढत होती. आपण जेवणासाठी थांबलो नाही म्हणून निमंत्रकांना हायसे वाटले का? विचार करत मुख्य रस्त्यावरून घराकडे वळलो तर कोपऱ्यावरील पिंपळाच्या झाडाखाली ओळखीचे गृहस्थ दिसले.. तसेच पागोटे, बाराबंदी घातलेली, जाड मिशा, कपाळाला टिळा.. जवळ गेलो.. तर साक्षात तुकोबा.. थकल्यासारखे दिसले.. पिंपळाच्या बुंध्याला पाठ टेकून बसले होते. मी पायावर डोके टेकवले आणि काही बोलणार एवढय़ात तुकोबाच किंचित हसत म्हणाले, ‘‘कसं झालं भाषण?’’ मी चपापलोच.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

 ‘‘भाषण बरे झाले. पण..?’’

‘‘मग मानधन कमी दिले का?’’

‘‘तुकोबा, तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, एक पैसा घेतला नाही हो.. ओळखीचे लोक होते..’’

 ‘‘माहीत आहे मला. पण माझी शपथ घेऊ नको. माझे नाव ऐकून ऐकून मीच कावलो आहे अलीकडे.. पण जेवला नाहीस हे बरे केले. मधुमेहाचा त्रास..’’

‘‘तुकोबा, अहो तुम्ही माझे आबा. लेकरू नाठाळ आहे कबूल. पण आता किती काठय़ा हाणणार?’’

‘‘अरे नारभटा, इतकी भाषणं देतोस पण तुला कळलेच नाही, की शब्द, अर्थ, पाठांतर यात काय फरक आहे.’’

‘‘पण तुकोबा, तुम्ही इतके कडक कसे? इतर संत पाहा बरं. एकदम शांतरसाचे मूर्तिमंत रूप..’’

तुकोबांनी एक हलकासा धपाटा माझ्या पाठीत घातला आणि अतीव प्रेमळ स्वरात म्हणाले, ‘‘मला हौस आहे का कठोर शब्द उच्चारण्याची. माझ्या आवडीचा विठ्ठल हा शब्दच फक्त मी आवडीने आयुष्यभर उच्चारत बसलो असतो. पण काय झालं, मी थोडा अभ्यास केला. काही पाठ केली, संतांची उत्तरे; विश्वास आदरे धरूनिया. माझ्या असे लक्षात आले की, ज्ञानोबा माउलीपासून नामदेवमहाराज, एकनाथ, चोखोबा, निळोबा, सावतामहाराज, गोरोबाकाका – या सगळ्या पिता आणि बंधूंनी तुम्हाला किती किती परींनी आणि प्रेमाने समजावून सांगितले रे.. तीनशे वर्षे वाणीचे अमृत प्रवाहित झाले. पण तुम्ही आपले झोपेचे सोंग घेऊन निपचित.. म्हणून मला आवाज चढवावा लागला.. आणि काठी हाणण्याचे म्हणशील तर तू वेड पांघरून पेडगावला चालला आहेस.. म्हणून तुझ्या पाठीत हा एक गुद्दा.. अरे आजकालच्या कवितेत नसलेला अर्थ शोधून काढणारे प्राध्यापक तुम्ही.. आणि मला विचारता, की तुकारामा, तू संत असून काठी हाणतोस? अरे मूढा, मी कोणाचे डोके फोडा म्हणत नाही. ही काठी शब्दांची, विवेकाची, ज्ञानाची, विचारांची.. जिच्यामुळे डोक्याला झिणझिण्या येऊन जाग येईल. अरे बाळा, मी तर लोहगावच्या कासाराच्या बायकोने आधणाचे उकळते पाणी माझ्या अंगावर फेकले तरी तिला अपशब्दाने दुखावले नाही; तर मी माझ्या बापाकडे तक्रार केली फक्त – जळे माझी काया, लागला वोणवा; धाव रे केशवा मायबापा..’’

तुकोबांचा आवाज कातर झाला होता. मलाच अपराध्यासाखे वाटू लागले. मी नम्रपणे म्हणालो, ‘‘तुकोबा, मला माफ करा.. मी जरा अस्वस्थ असल्यामुळे चुकीचे बोललो असेन. पण खरे सांगू का.. तुम्ही रागावू नका.. एक रट्टा आणखी हाणा वाटल्यास.. माझ्यासाठी तो प्रसादच असेल.. पण मी.. मला सांगणे अवघड जातेय..’’

‘‘मग मी सांगतो ना.. सत्य असत्याशी, मन केले ग्वाही; मानियले नाही, बहुमता.. हा माझा अभंग सांगत हिंडतोस मास्तरा अन् माझ्याशीच खरे बोलायला कचरतोस.. तू अस्वस्थ झालास कार्यक्रमाच्या स्वरूपामुळे आणि एका वक्त्याच्या भाषणामुळे.. तुला असे वाटले की मला म्हणजे तुकारामाला ज्ञानदेवापासून तोडत आहेत. ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका अशी विभागणी करत आहेत. काही जणांनी तर ‘ज्ञानदेव तुकाराम’ असा गजर करण्याऐवजी ‘नामदेव तुकाराम’ असा गजर ठसवायला सुरुवात केली आहे.. म्हणजे ज्ञानदेव-एकनाथ एकीकडे आणि नामदेव शिंपी-तुकाराम कुणबी ही जोडी दुसरीकडे अशी ब्राह्मण आणि ओबीसी अशी विभागणी करताहेत काही जण.. पण बावळटा, पाण्यावर काठी मारल्याने पाणी विभागले जात नाही रे..’’

मी धीर धरून म्हणालो, ‘‘पण बोवा, तुम्हीच तर जातीचा उल्लेख केला आहे की.. बरे झाले देवा कुणबी ठेलो; नाहीतर दंभे असतो मेलो..’’ तुकोबा रोखून पाहत म्हणाले, ‘‘नाश केला शब्द- ज्ञाने.. अरे सोन्या.. तुला फक्त माझे अभंग पाठच आहेत.. अर्थ माहीत नाही.. शेवटी मराठीचा प्राध्यापक ना तू.. तो अभंग जातीविषयीचा नाही, अहंकाराविषयीचा आहे. अहंकार वर्णाचा असतो, ज्ञानाचा असतो, संपत्तीचा असतो.. त्यातून दंभ निर्माण होतो. तो माणसाच्या संतत्वाकडे आणि देवत्वाकडे जाणाऱ्या मार्गावर बाधक ठरतो.. शब्दाच्या मागेपुढे एक इतिहास असतो रे बाबा.. एक चरित्र असते.. विचारव्यूह असतो.. आता मी काय अभंगांबरोबरच टिपा आणि अर्थही लिहून ठेवायला पाहिजे होते का राजा?’’

आता तुकोबा बोलण्यात रमले हे पाहून माझी भीड चेपली. मी म्हणालो, ‘‘तुकोबा, तुम्हाला हे आधुनिक म्हणजे अलीकडचं.. म्हणजे ओबीसी प्रकरण.. प्राध्यापकांचं शिकवणं हे सारं कसं काय माहीत..’’

तुकोबा हसून बोलले, ‘‘हे अज्ञानी, सुशिक्षिता, मी मेलोच कुठे.. तुम्हीच सांगता ना.. मी विमानात बसून सदेह गेलो म्हणून.. जर मी विमानातून जाऊ शकतो तर मी विमानातून येऊही शकतो ना.. बाळा, तुकाराम असतोच. तो आहेच. काळ कोणताही असो. माझे नाव वेगळे असेल. रूप वेगळे असेल. बाळा नामा-रूपात अडकू नकोस. आणि आधुनिकता म्हणशील तर ती काळाशी नाही, विचारांशी संबंधित असते. म्हणजे काळाच्या पुढचा विचार तो आधुनिक. मी नाही त्या काळात म्हणालो- नवसे कन्यापुत्र होती; तर का करणे लागे पती.. आता तू माझ्याविषयी बोलून आलास.. म्हणजे मी आहे की नाही.. जे गेले, संपले, हरवले – त्यांच्यासाठी कोणी वाणी शिणवते का? अरे, केव्हापासून उभा आहेस? मी आपला बोलतच बसलो. तेवढंच येतं ना मला.. लोक त्यालाच नामस्मरण, भजन, कीर्तन, संकीर्तन असं काय काय म्हणतात.. ये बैस.. तू अज्ञानी असलास तरी मनानं निर्मळ आहेस.. मला आवडतात अशी माणसं!’’

तुकोबा हाताने पिंपळाभोवती बांधलेल्या सिमेंटच्या ओटय़ावरील कचरा, मला बसण्यासाठी हलक्या हाताने साफ करू लागले.. मी ओशाळलोच.. पटकन् म्हणालो- ‘‘क्षमा करा तुकोबाराया, तुम्ही ज्ञानदेवाविषयी जे म्हटलं त्याची आठवण होते.. तुम्हापुढे आम्ही कैचे मोठेपण, पायीची वहाण पायी बरी.. मीसुद्धा खालीच बसतो.. पण तुकोबा, आता आम्हाला काही जण सांगतात की तुकोबांनी ज्ञानेश्वरांना असं कधीच म्हटलं नव्हतं.. आणि इतके ते मोठे नव्हते आणि इतके हे लहान नाहीत.. तो अभंग तुकोबांच्या गाथेत नंतर कोणीतरी घुसडला.. तो प्रतिक्षिप्त आहे वगैरे..’’

तुकोबांनी हात धरून जवळ बसवले आणि पाठीवर हात ठेवून म्हणाले, ‘‘बाळा, तू पुन्हा गोंधळलास. तू मनाचेही ऐकत नाहीस आणि जनाचेही! गोरोबांनी तुला पाहिलं तर म्हणतील, हेदेखील मडकं कच्चं आहे. आम्ही सांगतो की भेदाभेद भ्रम, अमंगळ. आणि लोक एका झाडाच्या दोन पानांमध्ये भेद आहे असे सांगतात. काय करावे? सगळं एकच आहे. एक हा शब्द आणि एक ही संख्या हेच सत्य आहे. माझेही मन कधी निराश होते, कधी उदास होते. ज्ञानोबांही रुसले, तेव्हा मुक्ताई म्हणाली होती- ताटी उघडा ज्ञानेश्वरा. वत्सा, मीच एकदा म्हणालो होतो की, बुडती हे जन, न देखवे डोळां, येतो कळवळा, म्हणोनिया. इथपासून सुरुवात करून मी कुठपर्यंत पोचलो.. असे म्हणू लागलो- घातकचि आहे, लोकांचा तो संग, म्हणौनि नि:संग, तुका राहे. बाळा, माझ्यावर श्रद्धेच्या पातळीवरील प्रेम करतोस. पण कधी विचार केलास की माझ्यावर ही वेळ कोणी आणली; कशामुळे आली? कठीण वज्रास भेदणारा तुकाच पाहिला तू; मेणाहून मऊ तुक्याचा विचार केलास कधी..’’

मी थिजलोच. तुकोबा माझ्याशी बोलत होते की, स्वत:शी संवाद करीत होते हे कळेना. तुकाराम बोल्होबा आंबिले नावाचे सज्जन सांसारिक गृहस्थ बोलताहेत असे वाटू लागले. मी गलबलून गेलो होतो. आणिकांची स्तुती, आम्हा ब्रह्महत्या, एकावाचूनि त्या, पांडुरंगा – असे म्हणणाऱ्या तुकोबांच्या अभंगातील एक हे अक्षर आणि आकडा यांची सरमिसळ होऊन गोल निळसर एकाकार तयार झाला होता. तुकोबा बोलायचे थांबले आणि पिंपळाच्या पानांची चलबिचलही. तुकोबा आवरासावर केल्यासारखी जाण्यासाठी उठू लागले.

मी कळवळून म्हणालो, ‘‘तुकोबा, कुठे चाललात?’’ आता तुकोबांच्या चेहऱ्यावर सुशांत मिस्किलपणा होता. म्हणाले, ‘‘कुठे जाणार? जाऊन बसण्यासाठी तुम्ही लोकांनी डोंगर तर ठेवलेच नाहीत. सपाट केले. मग वृक्षवल्ली तरी कोठून असणार. अन् मग पक्षी कोठून असणार आणि त्यांचे सुस्वर तरी?’’

जाता जाता तुकोबा माझा शब्दांनी कान पिरगाळत होते. ‘‘पण तू भेटलास. आनंद झाला. आता थोडा पुढे जातो. चारशे र्वष झाली वयाला. पण वाटचाल सुरूच आहे. माझिया जातीचे। मज भेटो कोणी.. असे म्हणतो मी आणि तुझ्यासारखे कोणीतरी भेटतेच.. माणसांची कमतरता नाही. आवडीने गुण गाईन, अशी माणसे भेटतील तोपर्यंत मी आहेच..’’

तुकोबा उठले. मी पायावर डोके ठेवणार तेवढय़ात म्हणाले, ‘‘तू माझ्यावर मनापासून प्रेम करत असशील तर एक मला वचन दे..’’ तुकोबांच्या चेहऱ्यावर मिस्किल भाव आहेत की गंभीर हे कळेना. मी गडबडीने म्हणालो- ‘‘दिले.’’ तुकोबा हसून म्हणाले, ‘‘तू कधीही तुकारामाला ‘भारतरत्न’ मिळावे अशी मागणी करणार नाहीस,’’ – असा दणका देऊन ते वळले अन् दिसेनासे झाले..

एक अजब गोष्ट मला जाणवू लागली.. जिथे जिथे माझ्या अंगाला तुकोबांचा स्पर्श झाला होता.. माझे तेवढे अंग सोन्याचे झाले होते.. मी विस्मयाने व आनंदाने चीत्कारलो.. आणि मला जाग आली.. मी हसलो आणि विचार करू लागलो.. मला जाग आली खरी, पण मी खरंच जागा झालो का?  ल्ल

Story img Loader