पहिला प्रश्न- इथून म्हणजे कुठून? तर आत्ता मी जिथे आणि ज्या परिस्थितीत आहे तिथून. मी आत्ता ज्या कोणत्या परिस्थितीत आहे ते कशामुळे? तर मी आत्ताच्या क्षणापर्यंत जसे आयुष्य काढले किंवा घालवले त्याचा परिपाक म्हणून मी आत्ता या स्थितीत आहे. त्यामुळे आत्ता जे सुख अगर दु:ख होते आहे, ते आजवरच्या आयुष्याचा परिपाक आहे. त्याबाबत, विशेषत: दु:खकारक गोष्टीबाबत, मी असे करायला नको होते, मी असे का केले वगैरे प्रश्न विचारून आपल्या ऊर्जेचे निष्कारण व्यय करणे उपयोगी पडत नाही, पण पुढे आताच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी असे वाटत असेल स्थिर बुद्धीने निर्णय घेणे या पलीकडे काहीही करण्यासारखे नसते.
आपण झोपल्यावर स्वप्ने पाहतो, स्वप्नात तर्कशुद्ध अशा काहीही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडत असतात. आपण त्या सर्वच्या सर्व मान्य करतो. आपल्या मनात शंकासुद्धा येत नाही, हे काय चालले आहे म्हणून. कारण आपण स्वप्नात तर्कशक्ती वापरू शकत नाही. जागे झाल्यावर आपण हसतो. म्हणतो, ‘अरे, काय कमाल  स्वप्न पडले होते!’ आणि विसरून जातो, पण याहून  मजेदार गोष्ट अशी की जागेपणीच्या आयुष्यातदेखील किंचितदेखील तर्कसुसंगत अशा गोष्टी होत नसतात, पण आपल्याला त्याचे काही वाटत नाही. आपण ओढून ताणून त्या तर्कसुसंगत आहेत, असे स्वत:लाच भासवायचा केविलवाणा प्रयत्नदेखील करतो. बहुतांशवेळा आपण आपले आयुष्यदेखील स्वप्नासारखे पाहात असतो आणि ज्याप्रमाणे आपल्याला कोणते स्वप्न पडते यावर आपले काडीमात्र नियंत्रण नसते; त्याप्रमाणे आपले आयुष्य इच्छेने जात असताना आयुष्यात काय प्रसंग घडावे यावर आपले नियंत्रण नसते. आपल्या आयुष्यात माणसे येतात, जातात, प्रसंग घडतात, हे सारे का चालले आहे आणि कशासाठी चालले आहे हे प्रश्न फिजूल असतात. खरी गोष्ट एवढीच असते. ..इथून पुढे..!
हे जर लक्षात आले नाही तर एखादी अप्रिय गोष्ट घडल्यावर हे असं का झालं, यावर माणसे खल करीत बसतात. पुन्हा असे होऊ नये म्हणून थोडीफार चर्चा केली तर ते ठीक असते, कारण त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात काही बदल करू शकतो, पण त्यापुढे तेच तेच बोलत बसून आपली ऊर्जा उधळल्याने काहीच साध्य होणार नसते. नुसते हळहळणे कधीही उपयोगी  नसते. हे म्हणजे भांडय़ाला भोक पाडून पाणी वाहून चालले की असे कसे भोक पडले, म्हणून रडत बसण्यासारखे असते. पटकन ते भोक बुजवून आणखीन पाणी वाहून जाणार नाही याची तजवीज करणे ते अत्यावश्यक असते.
यासाठी वैयक्तिक ऊर्जा ही संकल्पना लक्षात घेणे आवश्यक असते. आपल्याला रोज सकाळी उठल्यावर आपले व्होल्टेज काय आहे, हे समजते. त्यालाच आपण वैयक्तिक ऊर्जा म्हणूयात. ही वैयक्तिक ऊर्जा गमावणे हे फारच सोपे असते. म्हणजे शारीरिकदृष्टय़ा आपण सर्व वृद्ध होत असतो. वृद्ध होताना बेशुद्धावस्थेत असलो तरी शरीर गलितगात्र होते, म्हणजेच शरीरातील ताकद निघून जाते. एक पायरी चढणे एव्हरेस्ट चढण्यासारखे असते. थोडक्यात, शारीरिक ऊर्जा  कमीकमी होत जाते. मानसिक ऊर्जा कमी व्हावयास षडरिपू आणि आजच्या काळातला नवीन रिपू ‘भीती’ हे असतेच. कोणत्याही प्रकारे मनाचा ताबा काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आणि भीती यांनी घेतला की, मानसिक ऊर्जेचा ऱ्हास व्हावयास सुरुवात होते. मनात केवळ ऊर्जा गमावणारे विचार सदासर्वकाळ येऊ लागतात. मनाची उभारी जाते. या दोन प्रकारे ऊर्जेचा ऱ्हासाला सुरुवात झाली की, आत्मिक ऊर्जेचा ऱ्हास त्वरित होऊ लागतो. आयुष्याला अर्थ नाही, पण ते निर्थकही नाही हे न वाटता ते पूर्णपणे अर्थहीन वाटू लागते. यातच आजारपण अगर अपघात झाला तर आयुष्याचे सारे रंग विटून जातात. त्या आजारपणाला तोंड देण्यासाठी काहीही ऊर्जा राखीव नसते. परिणामी, आणखी खोल गर्तेत पडल्यासारखे वाटते.
हे एकदा समजले म्हणजे ‘इथून पुढे’ याचे महत्त्व लक्षात येऊ लागते. सर्व प्रथम आपल्या शारीरिक स्थितीचा आढावा निर्लेपपणे घ्यायचा असतो. म्हणजे शरीराची स्थिती जी आहे ती आहे.. ती का झाली? त्याला कोण जबाबदार? असले निर्थक प्रश्न न विचारता वैराग्यपूर्वक जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही असे नीट समजून घ्यायचे. मग त्यात जे कमी सापडेल ते सुधारण्याचे मार्ग शोधायचे आणि त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात करायची. शरीरात बदल सावकाश होतात, त्यामुळे पहिल्या दिवशी अतिरेक न करणे आवश्यक असते. एकदा शरीराचे व्होल्टेज वाढायला लागले की शरीरात सुखकारक संवेदना २४ बाय ७ अशा सतत येत राहतात.
मनाची अवस्था ही सतत दोलायमानच असते म्हणूनच ते ‘मन’ असते. हे डोलणे नेहमी मूळ मन आणि सामाजिक मनातले द्वंद्व असते. हे डोलणे कमीतकमी करणे हे श्वास करू शकतो, म्हणून स्वतंत्र वेळ देऊन आपला श्वास पोटाकडून कसा घ्यायचा ते शिकायचे. पाठीवर झोपून पोटावर एक जडसे पुस्तक ठेवायचे आणि श्वास घेऊन ते उचलायचे आणि श्वास सोडताना खाली आलेले बघायचे. असे अर्धा तास केल्यावर हे करण्याआधी असलेली मनस्थिती आणि नंतर असलेली मनस्थिती यातला जमीन- अस्मानचा फरक लक्षात घ्यायचा. मग सतत त्याच श्वासात राहायचे. श्वासाचे अनुसंधान जमले की मनस्थिती स्थिर होऊ लागते. मनात आनंददायक विचार येऊ लागतात. आयुष्याला उभारी येते. क्षुद्र विचार आपले आपण नाहीसे होतात. त्यांना घालवायला लागत नाही. मनस्थिती किंचितदेखील हलली की श्वास बिघडलेला असतो हे लक्षात आले की लक्षपूर्वक श्वासाची दिशा बदलणे आपले आपण होऊ लागते.
शरीर-मनाची ऊर्जा वाया जाणे थांबले की, आत्मिक ऊर्जेचा साठा आपोआप होऊ लागतो. तो आणखी जलद व्हावा, यासाठी एकाच वेळी सतत अलिप्तपणे आणि जमल्यास संपूर्णपणे अंतरंगात आणि बहिरंगात काय चालले आहे हे पाहता आले तर उत्तमच. हे जितके चांगले जमेल तितके आपण तुर्यावस्थेतून समाधी अवस्थेत खोल खोल जात राहतो.
अशा प्रकारे शरीरमनाची एकजूट झाली की, आत्मिक सामर्थ्यांचा प्रत्यय येऊ लागतो आणि आयुष्यातल्या लढाया लढायला एखाद्या सैनिकाप्रमाणे आपण सज्ज होतो. ‘इथून पुढे’ याचा खरा अर्थ समजल्यावर जे झाले ते झाले. आता संपूर्ण ताकदीने आल्या प्रसंगाला तोंड द्यायचे एवढेच उरते. आपण जिंकणार का हरणार हे डोक्यात येतदेखील नाही. आताच्या स्थितीत ऊर्जा पूर्णपणे नियंत्रित करीत लढत राहणे हेच आणि एवढेच डोक्यात असते ते शेवटपर्यंत.
एकदा एक सामुराई आपल्या नवपरिणित पत्नीला घेऊन एका बेटावरून दुसऱ्या बेटावर चाललेला असतो. ज्या बोटीने तो चाललेला असतो, ती दोनशे-तीनशे माणसे बसतील अशी छोटीशी बोट असते. सकाळी निघतात तेव्हा हवा छान असते. लोक मजेत गप्पा छाटत असतात. कुणी गाणी म्हणत असते. दुपारनंतर हवा बिघडायला सुरुवात होते आणि पाहता पाहता वादळाला सुरुवात होते. अचानक शांतता पसरते. वादळ आणखीनच भीषण रूप धारण करते आहे पाहिल्यावर लोकांचा धीर सुटतो. कुणी आपल्या बायका-मुलांना जवळ घेऊन रडायला लागतो, कुणी परमेश्वराची प्रार्थना करू लागतो तर कुणी आणखीन काय काय करू लागते. सामुराई ढिम्म बसलेला असतो. काही वेळाने त्याच्या बायकोचा धीर सुटतो. ती त्याला म्हणते, ‘अहो, काहीतरी करा. नुसते काय बसला आहात?’ सामुराई थंड नजरेने तिच्याकडे पाहतो. ती गप्प बसते. वादळ आणखीनच वाढते. बोट वाट्टेल तशी हेलकावे खाऊ लागते. बोटीवर एकच हल्लकल्लोळ माजतो. सामुराई तसाच बसलेला असतो. त्याची बायको त्याला परत सांगते तर तो आपली तलवार उपसून तिच्या गळ्यावर टेकवतो. तशा परिस्थितीतदेखील तिला हसू येते. ती म्हणजे ‘हे काय करता आहात तुम्ही?’ तर तो म्हणतो, ‘तुला भीती नाही वाटली?’ ती म्हणाली- ‘नाही वाटली. का नाही वाटली?’ ती म्हणते, ‘तुमचे माझ्यावर प्रेम आहे हे मला माहिती आहे. तुम्ही काहीही वेडेवाकडे करणार नाही.’ त्यावर सामुराई म्हणतो, ‘तुला इतके समजते आहे तर शांत बस की जरा.’ बायको गोंधळून म्हणते, ‘मला नाही समजले.’ सामुराई  म्हणतो, ‘हे बघ, आपली बोट इतकी लहान आहे आणि हे वादळ इतके भयानक आहे की ही जर बुडायची असेलतर बुडेलच पण बुडायची नसेल तर नाहीच बुडणार. इथे मूर्खासारखी धावपळ करून, रडूनभेकून काय होणार आहे? प्रार्थना केल्याने जर अपघात टळले असते तर जगात एक अपघात झाला नसता. हे लोक इथे गोंधळ घालून आपली ऊर्जा व्यर्थ घालवत आहेत. जर बोट बुडाली तर आपल्याला वाचविण्यासाठी त्यांच्याकडे काहीच शिल्लक नसेल. दुसऱ्याला वाचविणे तर सोडाच, मी  फक्त समोरच्या फळकुटाकडे लक्ष ठेवून आहे. जर ही बुडालीच तर त्याच्या साहाय्याने तुझा आणि माझा जीव मी वाचवू शकेन.’
ही अशी लढाई आणि हा असा सामुराई लक्षात ठेवा. बघा कसे अंगी बळ येते ते!

expert answer on career advice questions career advice tips from expert
करीअर मंत्र
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
Apple new Share Item Location feature
Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
Daughter Gifted Her Father Little Ring
‘हे माझं स्वप्न होतं…’ लेकीनं दिवाळीनिमित्त दिलं खास, महागडं गिफ्ट; VIDEO तून पाहा बाबांची पहिली रिअ‍ॅक्शन
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती