अश्विनी भिडे- देशपांडे – ashwinibdesh@gmail.com

आज गुरुपौर्णिमा. या दिवशी संगीत क्षेत्रात गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहोळा दरवर्षी होत असतो. परंतु यंदा करोनासाथीमुळे ते शक्य नाहीए. मात्र, गुरू-शिष्य नाते आणि कालानुरूप झालेली त्यातील स्थित्यंतरे यांचा रोखठोक परामर्श घेणारा  लेख..

गुरुपौर्णिमा.. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातला महत्त्वाचा सण. परंतु जसे यंदाचे सारे सण करोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर संयतपणे साजरे करण्याचा संदेश सतत दिला जातो आहे, तशीच ही गुरुपौर्णिमादेखील आपण ‘सुरक्षित अंतरावरून’ साजरी करू.

खरं तर गुरू-शिष्य नातं संगीत क्षेत्रात जसं जपलं जातं, तसं अन्यत्र कमी सापडतं. एका गुरूचे अनेक शिष्य जरी असले आणि गुरू सर्वाना सारखंच वागवीत, शिकवीत असले तरी प्रत्येक नातं ‘एकमेवाद्वितीय’च असतं.. गुरूसाठी आणि शिष्यासाठीदेखील! या नात्याला ‘सुरक्षित अंतर’ वगैरे काही नसतं. पूर्वीच्या काळी गुरुगृही राहून विद्याग्रहण करण्याची पद्धत होती. या पद्धतीत शिष्य गुरूकडून फक्त गायनकला/ विद्या आणि गुरूची गायनशैली, कौशल्यं, बलस्थानं इत्यादी शिकत असे असं नाही, तर रात्रंदिवस गुरुगृही राहण्यामुळे तो गुरूची विचारप्रणाली, सौंदर्यदृष्टी, फार काय- जीवनविषयक तत्त्वज्ञानही जवळून अनुभवू शकत असे. संगीतशिक्षणाच्या बरोबरीनेच या सगळ्याचे संस्कार शिष्यावर होत असत. म्हणूनच गुरूची ‘र्सवकष जीवनदृष्टी’ तो आत्मसात करू शकत असे. यात पुन्हा ‘कलेच्या क्षेत्रात शिकवण्यासारखं कमीच, पण शिकण्यासारखं मात्र खूप’ असं ज्येष्ठ कविवर्य विंदा करंदीकर एका मुलाखतीत म्हणाले होते, त्याचा मला वारंवार प्रत्यय येतो. गुरू जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवीत असतात, तेव्हा खरं तर ते स्वत:चीच साधना करीत असतात. त्या प्रक्रियेचा साक्षीदार होण्यातून शिष्य शिकत जातो- म्हणण्यापेक्षा आत्मसात करीत जातो असं म्हणा ना! शिष्याची जितकी कुवत असेल, तितके त्याचे शिक्षण होते. यात शारीरिक (तंत्रावर आधारित) कौशल्यं शिकणंही आलं (आवाज लावण्याची खुबी, गळा फिरवण्याची तरकीब किंवा वाद्यावर हात टाकण्याची शैली) आणि गुरूंमधल्या ज्या संगीतेतर गोष्टींचा शिष्यावर संस्कार होईल (बौद्धिक/ भावनिक/ वैचारिक इ.) त्याही टिपत जाणं आलं. यातही पुन्हा शिष्याने हे संस्कार ‘करून घेणं’ महत्त्वाचं ठरतं. अन्यथा १०-१२ वर्षे गुरुगृही राहून, पाणीबिणी भरून गाणं न आलेल्या शिष्यांची उदाहरणंही सापडतील.

काळ बदलला.. शिष्यांनी गुरुघरी राहून शिकण्याची सोय राहिली नाही. तरीदेखील शिकण्यात सातत्य राखून, संस्कार ‘करून घेण्या’ची आस बाळगून शिष्य शिकत राहिले, संगीतविद्या/ कला आत्मसात करीत राहिले. अर्थात त्यावेळी अशा ‘डे स्कॉलर’ शिक्षणपद्धतीवर सडकून टीका झाली. शिष्याला गुरूंची ‘kholistic तालीम’ जशी मिळायला पाहिजे तशी, जेव्हा मिळायला हवी तेव्हा मिळत नाही.. अशा काही गोष्टी ‘तोटय़ाच्या’ म्हणून गणल्या गेल्या. पण या पद्धतीचे छुपे फायदेही होते. शिष्याचे गुरूवरचे अवलंबन कमी झाले. कुठे काही अडलं तर गुरूवर न टेकता स्वत: धडपड करण्याची सवय लागली, गुरूच्या गायनशैलीखेरीज अन्य शैलींचा मागोवा घेण्याचा मार्ग मोकळा झाला, संगीतशिक्षणाव्यतिरिक्त लौकिक शिक्षण व पोटापाण्यासाठी नोकरीधंदा करण्याची सोय झाली. अशा तऱ्हेने सध्याच्या अनेक आघाडीच्या कलाकारांनी गुरुगृही न राहता संगीतशिक्षण घेतले व नंतर स्वत:च्या चिंतन, मनन व व्यासंगाची भर घालून स्वत:ची विद्या/ कला समृद्ध केली.

आता जमाना आणखी बदलला आहे. गेल्या काही वर्षांपासून (इंटरनेटच्या उपलब्धतेपासून) ‘दूरस्थ शिक्षणा’चे मार्ग खुले झाले आहेत. गुरू अन् शिष्य जरी एकमेकांपासून खूप दूर अंतरावर स्थित असले तरी ‘स्काइप’ वगैरेच्या माध्यमातून त्यांना एकमेकांच्या सततच्या संपर्कात राहणे शक्य झाले आहे. आज आघाडीवर असलेल्या अनेक कलाकारांच्या अशा ‘दूरस्थ’ शिकवण्या अनेक दिवसांपासून चालू आहेत. मी मात्र या पद्धतीचा अवलंब कधी करू शकले नाही. शिकवणीच्या वेळी गुरू-शिष्य या दोघांत जे घडतं, ते इतकं ‘इंटिमेट’, ‘इंटेन्स’ आणि  ‘subtle’ असतं, की ते  band width च्या मर्यादेत सामावू शकत नाही असाच अनुभव मला आला. गुरू व शिष्य या दोघांच्यात समोरासमोर जे घडतं, त्याला आमच्या क्षेत्रात ‘सीना-बसीना तालीम’ असा शब्द आहे आणि ते पकडायला इंटरनेटचं माध्यम कमी पडतं असं माझं मत आहे. (इथे हेही नमूद करणं आवश्यक आहे की, असा केवळ दूरस्थ माध्यमातून शिकलेला एकही पट्टीचा गायक आज तरी माझ्या पाहण्यात नाही.) अर्थात हा माझा व्यक्तिगत अनुभव कालांतराने बदलूही शकेल. या क्षेत्रातल्या रोज घडणाऱ्या प्रगतीतून एक दिवस असाही उजाडेल, की मला अभिप्रेत असलेले सारे बारकावे (स्वरस्थाने, श्रुतिस्थाने, लघुलयभेद, संवेदना वगैरे) जर मला माझ्या शिष्यापर्यंत पोहोचवता आले आणि माझी व शिष्याची ‘comfort level’ जमली तर कदाचित मीही या पद्धतीचा स्वीकार करू शकेन. पण हा ‘सोयीचा मार्ग’ म्हणावा लागेल. इलेक्ट्रॉनिक तंबोरा जसा प्रवासात न्यायला ‘सोयीचा’ म्हणून आम्ही वापरतो, तसा! अर्थात ज्याला रागातल्या स्वरांची अनुरणने अनुभवायची असतील, त्याला ती acoustic तंबोऱ्यातूनच ऐकू येऊ शकतील.. इलेक्ट्रॉनिक तंबोऱ्यातून नाही. तसंच गुरूची ‘जिवंत तालीम’ जशी समोर बसून मिळेल तशी इंटरनेटवरून नाहीच मिळणार!

हीच बात ‘लाइव्ह’ संगीत मैफलींची!

मार्च महिन्यापासून करोना बळावला आणि आम्हा सर्व कलाकारांच्या संगीत मैफली रद्द झाल्या, किंवा अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या. ‘पाच-दहापेक्षा जास्त  लोकांनी एका ठिकाणी जमायचं नाही’ असा सरकारी आदेश निघाल्यावर शास्त्रीय संगीताच्या मैफली- ज्या हजारो नाही, तरी काहीशे माणसांच्या उपस्थितीत घडतात- बंद झाल्या. पुन्हा ही काही ‘अति आवश्यक’ गणली गेलेली सेवा नाही. ‘आधी आपापले जीव वाचवा, गायनाच्या मैफली नंतरही ऐकता येतील’ या विचाराने सारे श्रोते आपापल्या घरी बसले. साहजिकच कलाकार स्वत:च्या घरात लॉकडाऊन होऊन, नंतर घरी मैफली गाऊन त्या सोशल मीडियावरून दुनियेला ऐकवू  लागले..  virtual music!!  हौशी कलाकारांप्रमाणेच काही प्रथितयश कलाकारांनीसुद्धा आपल्या मैफली विनामूल्य सादर केल्या, हे विशेष.

करोनामुळे लादल्या गेलेल्या लॉकडाऊनच्या आधीपासूनच शास्त्रीय संगीताच्या मैफलींना इंटरनेटचा पर्याय उपलब्ध व्हायला सुरुवात झाली होती. प्रसिद्ध कलाकारांच्या गाजलेल्या मैफली काही दिवसांतच व्हिडीओ रेकॉर्डिगच्या स्वरूपात यूटय़ूबवर अपलोड होऊ लागल्या होत्याच. साहजिकच श्रोत्यांसाठी आणि रसिकांसाठी ही सुसंधीच होती. मैफलीतली हजेरी चुकली तरी नंतर कधीतरी (स्वत:च्या सोयीच्या वेळी) ती ऐकण्याची, तिचा आस्वाद घेण्याची सुसंधी. माझ्या मताने हीदेखील सोयच.. ‘अस्सल’ नव्हे! एकतर ‘हा कार्यक्रम फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून stream केला जातोय, तर घरूनच पाहू’ किंवा ‘लवकरच यूटय़ूबवर अपलोड होणारच आहे, तेव्हा पाहता येईल म्हणून मी आज कार्यक्रमाला प्रत्यक्ष जात नाही’ असा सोयीचा (आळसाचा) पर्याय श्रोता निवडू शकतो. त्यानंतर यूटय़ूबवर तो कार्यक्रम आल्यानंतरही ‘दीड-दोन तास निवांत मिळाले की ऐकू या’ या विचारातून कित्येकदा तो ऐकणं राहून जातं. कारण ‘निवांत दीड-दोन तास’ मिळतच नाहीत. मिळाले तरी दुसरं काहीतरी जास्त ‘महत्त्वाचं’ (आकर्षक?) करायचा पर्याय उपलब्ध असतो. बरं, निवांत दीड-दोन तास मिळून, त्यात हा कार्यक्रम शोधून काढून, लावून ऐकायला बसलं तरी श्रोत्याची ‘कमिटमेंट’ अपुरी पडते. कारण नाही आवडलं तर बंद करायला किंवा बदलायला एक क्लिक् पुरेसा असतो! परिणामी श्रोता या संगीतनिर्मिती प्रक्रियेत पूर्णत्वाने सहभागी होऊ शकत नाही. आणि श्रोता जरी कलाकार आणि संगीतासोबत एकरूप झाला, तरी त्याची एकतानता कलाकारापर्यंत पोहोचू शकत नाही.

स्वत:च्या घरी रियाझ करताना कलाकार रागाचे- आणि स्वत:चेदेखील- अंतरंग धुंडाळीत असतो. त्याला ना वेळेचे बंधन असते, ना आपले संगीत श्रोत्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी! तो आत्ममग्न होऊन आपल्या शोधातून सापडलेले निरामय आनंदाचे कण वेचीत असतो. पण तो जेव्हा मंचावर स्थानापन्न होतो तेव्हा त्याची श्रोत्यांप्रति पण एक वेगळी बांधिलकी असते. रियाझाच्या वेळी सापडलेले आनंदाचे कण आज पुन्हा सापडतील अन् ते आपण समोरच्या श्रोत्यांत विखरून देऊ व त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेऊ, अशा आशेने तो गायनाला सुरुवात करतो. श्रोत्यांच्याही कलाकाराकडून काही अपेक्षा असतात, त्या पुऱ्या करण्याची जबाबदारीही त्याच्यावर असते. अगदी काही नाही तरी या कलाकाराचे गायन अमुक एका दर्जाचे झाले पाहिजे, ही अपेक्षा तरी कलाकाराला पुरवावी लागतेच! एका बाजूला आपल्या अंतरंगात बुडी मारून रागाचा शोध घ्यायचा ही ‘अंतर्गामी’ प्रक्रिया आणि त्यातून सापडलेली सौंदर्यस्थळे दुसरीकडे श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची ही ‘बहिर्गामी’ प्रक्रिया अशा दोन विरुद्ध दिशेच्या प्रक्रियांचा वेध घेण्याची आणि त्यात आपला तोल सांभाळण्याची जिकिरीची कामगिरी कलाकार करीत असतो. एका तऱ्हेने तो मंचावर संगीतसाधनाच करीत असतो; पण रसिकांच्या साक्षीने अन् सहभागाने! ज्या दिवशी हा तोल साधतो, त्या दिवशी ‘मैफल जमते’!

ही परिस्थिती- जी ‘लाइव्ह मैफली’त शक्य होते, ती मला मनापासून भावते. तंबोरे लावण्याच्या क्रियेपासून कलाकार व त्याने निवडलेला राग या दोघांच्यात एकरूपता व्हायला सुरुवात होते. कलाकाराची त्याने निवडलेल्या- समजा, यमन रागाशी नाळ जुळली की यमनाचं भव्य रूपडं साकारायला लागतं. ते हळूहळू विस्तारू लागतं. हा सोहळा अनुभवायला श्रोते साक्ष असतात. तेदेखील एकटय़ाने नव्हे, तर सामूहिकरीत्या या सोहळ्यात सहभागी होत असतात! (घरी बसून ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ ऐकणं आणि सभागृहात इतर श्रोत्यांच्यात बसून समूहाने दाद देत-घेत संगीताचा आस्वाद घेणं या अनुभवांत जमीन-अस्मानाचा फरक असतो.) या सगळ्याचा मिळून एक ‘माहोल’ बनतो. सभागृहात जणू ‘यमना’चे छत उभे राहते. कलाकार, श्रोता, सभागृहाच्या भिंती.. सारे जणू ‘यमन’ झालेले असतात. ‘सुरक्षित अंतर’ तर सोडाच, इथे  कलाकार आणि श्रोता यांच्यातील दुजाभावही काही काळ नाहीसा होतो. मैफल संपल्यानंतर मागे उरते ती या ‘माहोला’ची.. त्यातल्या आपल्या सहभागाची स्मृती! कलाकाराने केलेलं ‘मनोरंजन’ आणि ‘जनरंजन’ (म्हणजेच दाखवलेली तयारी, तानबाजी, सरगमबाजी वा अन्य क्षणिक आनंदाच्या प्रेक्षकशरण करामती) कधीच विस्मृतीत जातं. तीन-तीन दिवस न उतरणारा रागगायनाचा ‘असर’ हा शाश्वत व उच्च प्रतीच्या आनंदाचा ठेवा ‘लाइव्ह मैफली’खेरीज मिळवता येत नाही. फार काय, एखादी ‘जमलेली मैफल’ आपण प्रत्यक्ष हजर राहून ऐकलेली असते आणि यमनाच्या छताखालच्या मैफलीत डोळ्यांतून पाझरलेले अश्रू आणि अंगावर उभे राहिलेले रोमांच अनुभवलेले असतात. पण या मैफलीचं ध्वनिचित्रमुद्रण (कितीही उत्तम प्रतीचं असलं तरीही) बघून/ ऐकून तो अनुभव पुनश्च घेण्याचा आपला प्रयत्न यशस्वी होत नाही, हे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं असेलच!

उद्या ‘लॉकडाऊन’चे र्निबध शिथिल होतील, करोनाचं सावट हळूहळू दूर होईल, ‘एकत्र येण्या’तलं लोकांना आज वाटणारं भय कमी होईल, गायनाचे कार्यक्रम पुन्हा जाहीरपणे व्हायला सुरुवात होईल.. आणखी चार-सहा महिने, फार तर वर्ष- दोन र्वष! पण यमनाचा तोच सशक्त, जिवंत आणि चिवट धागा- जो आज शेकडो वर्षे संगीतरसिकांना बांधून ठेवतो आहे- पुन्हा गायक आणि श्रोते यांच्यात विणला जाऊ लागेल. रसिकहो, या प्रक्रियेत तुम्हाला आणि मला दोघांनाही लवकरच सहभागी व्हायचं आहे- या प्रार्थनेबरोबरच स्वल्पविराम!