0017‘‘शा म, निघायची वेळ झाली.’’ राधा एक प्रफुल्लित कटाक्ष टाकत म्हणाली, ‘‘मजा आली ना खूप?’’ ‘‘हो.’’ तोही आनंदाने म्हणाला. अपेक्षेपेक्षाही हेलिओफ्लॉवर्स ट्रिप छान झाली होती. प्राटिनावरचं सौम्य, आल्हाददायक हवामान, रोजची तऱ्हेतऱ्हेची खवय्येगिरी, सोबतच्या हाय नेटवर्थ सहप्रवाशांशी गप्पा.. आठवडा कसा पटकन् निघून गेला होता. त्याला आठवला वर्षभरापूर्वीचा प्रसंग..
‘‘शाम, शाम, आपल्याला हेलिओफ्लॉवर्स ट्रिप मिळाली!’’ राधा नाचत नाचत सांगत होती.
‘‘बरं!’’ त्याचं नीट लक्षच नव्हतं.
‘‘अरे, कोणी कोणी बोली लावली होती म्हणून सांगू! आपले आधीचे शेजारी शहा होते आणि शोमा बॅनर्जीपण केवढी फुरफुरत होती! पण आपली बोली..’’
‘‘बोली? म्हणजे कितीला पडली ही ट्रिप?’’ तो खाडकन् जागा झाला होता.
‘‘अरे, पैशाचं काय घेऊन बसलायस? ही ट्रिप म्हणजे आपलं स्टेटस वाढवण्याची केवढी मोठी संधी आहे. एक-एक वर्ष आधीपासून बुकिंग होतं. फक्त शंभरजणांना घेतात. त्यातपण इंडियन्स किती कमी असतात माहिताय? आपण लकी.. म्हणजे मोहिनीच्या आधी आपल्याला चान्स मिळाला म्हणून.’’
‘‘मोहिनी?’’
‘‘तुझी बहीण मोहिनी!’’ नाक उडवत राधा म्हणाली होती.
आणि मग त्याने काही बोलायच्या आत तिने रसभरीत वर्णन सुरू केलं होतं.
‘‘ही फुलं असतात ना शाम, ती खूप मोठी असतात. आपल्या तळहाताएवढं एकेक फूल. आणि त्यांचा सुगंधपण असा गोड आणि फ्रेश असतो ना! किती मजा येईल ना ही फुलं खुडायला?’’
‘‘खुडायला? एवढे पैसे खर्च करून आपण जातोय ती ही हेलीफ्लॉवर्स खुडायला?’’
‘‘हो. आणि शाम, ती हेलीफ्लॉवर्स नाहीत काही, हेलिओफ्लॉवर्स.. हेलिओ- कारण त्यांच्या सूर्याकडे ती सतत तोंड करून असतात आणि दिवसभर सूर्याच्या दिशेने वळत असतात.’’
‘‘ती तर काय आपली सूर्यफुलंपण करतात. त्यासाठी एवढय़ा लांबच्या ग्रहावर कशाला जायचं? आणि तेदेखील ही सूर्यफुलं खुडायला?’’
‘‘अरे, ही हेलिओफ्लॉवर्स खुडायची तर खरी मजा आहे! माहीत आहे का, तिथे प्राटिना ग्रहावर त्यांचा सूर्य फक्त सहा तास आकाशात असतो. आणि अगदी वेगाने तो या टोकापासून त्या टोकापर्यंत जातो. त्यामुळे हेलिओफ्लॉवर्स एका परीने स्वत:भोवती गिरकीच घेतात म्हण ना!’’
‘‘अगं पण..’’
‘‘आणि खुडल्यानंतरही काही काळ ती जिवंत असतात. आपल्या हातात गिरकी घेत राहतात. म्हणून तर ती खुडायची मजा. त्याशिवाय का मोजक्या लोकांना तो चान्स मिळतो!’’
तिच्या फणकाऱ्यावर तो काही बोलायच्या आत परत तिची बडबड सुरू झाली होती.
‘‘आणि शाम, ती फुलं काही आपल्या सूर्यफुलांसारखी नसतात. मोठ्ठी असतात केवढी! आणि गर्द निळ्या रंगाची. त्यांचा सुवासपण अगदी वेगळाच, अवर्णनीय असा असतो. त्यांचं अत्तर किती फेमस आहे म्हणून सांगू! आणि ना..’’
मग ट्रिपच्या खर्चाबद्दल बोलायला त्याला अवसरच मिळाला नाही. कसाबसा शेवटी तो तयार झाला होता. ऑफिसचं काम टाकून जायला तसं त्याला जिवावर आलं होतं; पण मग राधाची भुणभुण सुरू झाली होती. प्रवास धरून एकच तर महिना आहे! तेवढी सुट्टी तर घ्यायलाच हवी. तेवढा ब्रेक हवाच.
जाऊ  दे. राधा खूश असेल तर ठीक, म्हणत तो नाइलाजानेच ट्रिपवर निघाला होता.
प्रवासातला काळ पूर्ण निद्रिस्त अवस्थेत गेल्यावर प्राटिनावर उतरताना मात्र तो ताजातवाना झाला होता. त्या देखण्या, निळ्या, लांबच लांब पसरलेल्या बागा बघून सुखावून गेला होता. मऊशार मातीत हलकासा स्पेशल पोशाख घालून फिरताना हर्षभरित झाला होता. एकंदरीत ठीक झालं सगळं- या निर्णयाला आला होता.
‘‘कशी काय वाटली ही ट्रिप? असं मळ्यांमध्ये जाऊन फुलं खुडेन असं मला तरी कधी जन्मात वाटलं नव्हतं! गंमत आहे नाही?’’ बाजूचा वयस्कर एरिकसन बोलत होता. शामने त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचा प्रयत्न केला.
‘‘म्हणजे तरुण असताना खास स्पेनमध्ये ला टोमाटिनाला गेलो होतो. वाइन सीझनमध्ये द्राक्षं तुडवायलाही जायचो अधूनमधून..’’ एरिकसन रंगात येऊन जुन्या आठवणी काढत होता- ‘‘पण फुलं? नो वे!’’
शामने मान डोलवली. ‘‘मीपण लहानपणी करवंदं, बोरं तोडून खाल्लीत. नेम धरून कैऱ्या पाडल्यात. स्ट्रॉबेरीच्या मळ्यातदेखील दिवसभर भरपूर हुंदडलोय. पण लहानग्या मुलींसारखी फुलं खुडायची..? नेव्हर!’’
दोघे हसत हसत यानात चढले.
‘‘शाम, शाम, ते माळी लोक बघ टाटा करतायत!’’ राधा त्याला लगटून उत्साहात सांगत होती.
यान उड्डाणाच्या तयारीत असताना ते स्थानिक शेतकरी निरोपादाखल हात हलवत होते.
‘‘किती चांगले होते ना? त्या भाषांतराच्या यंत्रामधून बोलायचे ते कानाला काय गोड लागायचं ना?’’
‘‘हो.’’
‘‘आणि खुडलेल्या फुलांचीपण किती काळजी घ्यायचे! अगदी चिमुकल्या मुलांना जपावं ना, तश्शी!’’
‘‘हो.’’
‘‘मला इतकी मजा आली म्हणून सांगू!’’ आपल्या प्रवासी क्युबिकलमध्ये प्रवेश करतानासुद्धा राधाची टकळी थांबत नव्हती.
शामने पुन्हा एकदा मान डोलवली आणि उड्डाणाच्या सूचना ऐकत तोही त्याच्या क्युबिकलमध्ये शिरला.
यान निघून गेलं तसे तिथले काही शेतकरी निवांत गप्पा मारायला जमले.
‘‘चला, यावेळचे पृथ्वीवाले आपापले व्हिडीओ घेण्यातच जास्त रमले होते.’’ तक्रारीच्या सुरात बोलता बोलता टूरोनोने आपले चारही हात चपटय़ा कपाळापाशी नेले.
‘‘असेना का! ते एवढी भलीमोठी रक्कम खर्च करून येतात. घेऊ दे की त्यांना फोटो नि व्हिडीओ.’’ बोलिओ आनंदाने आपल्या शेताकडे बघत म्हणाला. त्याचे लांब कान वाऱ्यावर अलगद डुलत होते. ‘‘जवळजवळ सगळी फुलं खुडून, नीट रचून ठेवलीत त्यांनी.’’
‘‘बरोबर! आपल्याला त्या मातीत नको पाय घालायला. आता फक्त ती फुलं अत्तराच्या कारखान्यात न्यायचं काम तेवढं राहिलंय!’’ चेहऱ्याच्या मधला मोठा आडवा डोळा मिचकावत प्रोबोसो म्हणाला.
आपले सहाच्या सहा पाय लांबवत आळस देत विहोलोने आपलं भलंथोरलं बोळकं फाकवलं.
‘‘हूं. फुलं खुडायचं कंटाळवाणं काम तर झालं! बाकीची कामं यंत्रांनी होतात, पण फुलं मात्र हातानीच खुडायला लागतात ना? हूं. ठीक होते म्हणा यावेळचे. पण निदान पुढच्या वेळी तरी हे पृथ्वीवरचे कामगार जरा कमी बकबक करणारे असू देत!’’
meghashri_dalvi@hotmail.com

Story img Loader