राजकीय नेते २४ तास फक्त राजकारणच करतात असा समज आहे. परंतु आपल्या विरंगुळ्याचं क्षण आवडत्या छंदात व्यतीत करणारे राजकारणीही आहेत. त्यांचे छंद.. त्यांच्याच शब्दांत..
कॅनडातली रक्त गोठवणारी थंडी.. तापमान उणे २० अंशाखालील.. आपल्याला सवय नसलेल्या अशा असह्य थंडीतही हिमअस्वलाची छायाचित्रं टिपण्यासाठी चाललेली माझी धडपड.. आणि अखेरीस तो माझ्या कॅमेऱ्यात बद्ध होण्याचा अतीव आनंदाचा क्षण..
छायाचित्रणाचा छंद हा माझ्यासाठी जणू प्राणवायूच आहे. व्यग्र राजकीय धकाधकीत हे क्षण मला ‘रिलॅक्स्ड’ करतात. छायाचित्रणातील असे अनेक क्षण मी मनात साठवले आहेत- जे मला माझ्या कामात नवी ऊर्जा देत असतात..
हिमअस्वलाची छायाचित्रं टिपण्यासाठी मी पाच-सहा वर्षांपूर्वी टोरांटोहून चर्चिल गावी गेलो होतो. जेमतेम ८०० लोकवस्तीचं हे गाव. चहुबाजूला बर्फच बर्फ. समुद्राचंही बर्फाच्छादित पठारात रूपांतर झालेलं. इथं छोटय़ा लाकडी खोल्या असलेल्या लॉजमध्ये आम्ही राहिलो होतो. हिमअस्वल जुलै ते नोव्हेंबरमध्ये उपाशीच असतं. समुद्रीमाशांच्या शोधात ते फिरत असतं. त्या काळात ते माणसावरही िहस्रपणे हल्ला करतं. या हिमअस्वलाची छायाचित्रं टिपण्यासाठी मी खुल्या छोटय़ा बसमधून निघालो होतो. अंगात पाच-सहा गरम कपडे घालूनही थंडीनं कुडकुडत होतो. छायाचित्र काढताना हातमोज्यांचा अडसर येत होता. त्यामुळे हातमोजे काढून फोटो काढायला सुरुवात केली आणि काही वेळातच बोटं लाकडासारखी कडक झाली. ती तुटतात की काय असं वाटू लागलं. सरतेशेवटी हिमअस्वलाचा ठावठिकाणा लागला आणि त्याची मनसोक्त छायाचित्रं टिपली. माझ्यासाठी हा खूप वेगळा, अविस्मरणीय अनुभव होता. राजकारण काय किंवा छायाचित्रण काय, नेमका क्षण टिपणं महत्त्वाचं! योग्य ‘टायमिंग’ साधत ‘क्लिक्’ करणं हे कौशल्यच असतं. त्यासाठी डोळे उघडे ठेवून भिरभिरत्या नजरेनं अचूक ‘लक्ष्य’ टिपावं लागतं. ते मला जमतं.
काहीतरी वेगळं करण्याची मला पूर्वीपासूनच आवड होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकला जोपासली व इतिहास घडवला. मला छायाचित्रणाची आवड होतीच. या छंदासाठी तसा बराच वेळ द्यावा लागतो. पण माझ्या घरातल्या मंडळींनीही मला चांगलंच सहकार्य केलं.
मी ‘एरियल फोटोग्राफी’ही केली आहे. ती छायाचित्रं ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ या पुस्तकांच्या रूपात प्रसिद्ध झालीत. मी वाइल्ड लाइफ फोटोग्राफीही केलीय. त्याकरता गीर, कान्हा अशी अनेक अभयारण्ये पालथी घातलीत. एकदा कान्हा अभयारण्यात वाघाची छायाचित्रं टिपण्यासाठी हत्तीवरून फिरत असता अचानकच वाघ समोर आला. त्यानं हल्ल्याचा पवित्रा घेतल्यानं हत्ती मागे फिरू लागला. पण त्याही परिस्थितीत मी त्याची अचूक छायाचित्रं टिपली. हा प्रसंगही अनोखा होता. माझ्या छायाचित्रांचं १९९८ मध्ये ‘वाइल्ड लाइफ’ आणि २००४ मध्ये ‘गडकिल्ल्यां’चं प्रदर्शन झालं. आता हिमअस्वलं, मूळ हिंदूू संस्कृती असलेली कंबोडियातील प्राचीन देवळं आणि काही मान्यवरांची पोट्र्रेट्स अशा विविध विषयांवरील छायाचित्रांचं प्रदर्शन पुढील आठवडय़ात होतंय. यातल्या काही छायाचित्रांमध्ये मी ‘इन्फ्रारेड’ पद्धतीनं छायाचित्रण केलंय. हे नवं तंत्र आत्मसात करण्यासाठी मी त्याचा अभ्यास केला. नेहमीची छायाचित्रं काढताना साधारण प्रकाश कॅमेराबद्ध होतो, तर ‘इन्फ्रारेड’ पद्धतीत नेहमीचा प्रकाश न येता इन्फ्रारेड लाइट कॅमेराबद्ध होतो. त्यामुळे या छायाचित्रांची रंगसंगती काहीशी वेगळी व सुंदर भासते. इन्फ्रारेड किरणं झुडपं अधिक परावर्तित करतात, तेवढं परावर्तन अन्य वस्तू करीत नाहीत. ढगाळ व शुभ्र वातावरणात या सगळ्याचा नीट मेळ साधत ‘अँगल’ घेऊन छायाचित्रण करावं लागतं. कॅमेऱ्याच्या लेन्सवर फिल्टर लावून छायाचित्रण करणं आव्हानात्मक असतं. त्यासाठी छायाचित्रकार म्हणून चिकाटी ठेवावी लागते.
पंढरपूरच्या वारीचं लोकांना वेगळंच आकर्षण असतं. त्यातला भक्तिभाव अनोखा असतो. त्यामुळं वाइल्ड लाइफ, पंढरीची वारी, देशभरातील वेगवेगळी मंदिरं व ठिकाणं पाहण्यासाठी मी बराच फिरलो. फोटोग्राफीसाठी फिरताना काही वेळा राजकीय नेता असल्याने गर्दीचा त्रासही होतो. गेल्या काही वर्षांत पक्षाच्या जबाबदारीमुळे छायाचित्रणासाठी फार वेळ देता येत नाही. तरीही जमेल तेव्हा माझा हा छंद मी जोपासतो.
कंबोडियातील अंगकोरवाट येथील प्राचीन हिंदू संस्कृती जपणाऱ्या मंदिरांचं एक वेगळेपण आहे. त्यामागे काही शतकांचा इतिहास आहे. इथली नंदी, विष्णूची मूर्ती पाहताना सुंदर शिल्पकलेचं प्रत्यंतर येतं. या मंदिरांना झाडांच्या फांद्या व पारंब्यांनी वेढलेलं आहे. त्याचं मला अनेक वर्षे आकर्षण होतं. ते विलोभनीय दृश्य कॅमेऱ्यात टिपणं हे माझ्यासाठी खासच होतं.
समुद्राकाठी खडकांवर लाटांचा मारा झेलत उभ्या असलेल्या एका भिख्खूचं छायाचित्रही मी टिपलं आहे. समुद्रात लाटेवर लाट उसळत असते. पण प्रत्येक लाट वेगळी असते. ते छायाचित्र काढत असताना एक प्रचंड, तरीही विलोभनीय लाट आली आणि तो ‘क्षण’ मी कॅमेऱ्यात टिपला. पुन्हा बराच वेळ मी समुद्राकाठी होतो, पण तशी लाट पुन्हा दिसली नाही.
राजकीय जीवनात छंदासाठी वेळ देता येत नाही. छायाचित्रण करतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लोकांचे अनेक प्रश्न व विचार मनात डोकावत असतात. तरीही अचूक ‘लक्ष्य’ साधत जेव्हा कॅमेऱ्यात ‘तो’ क्षण आपल्या मनासारखा टिपला जातो, तेव्हा मानसिकदृष्टय़ा ‘रिलॅक्स्ड’ व्हायला होतं. व्यग्र राजकीय जीवनात हे मोजके क्षणच मला नवी ऊर्जा देतात.
उद्धव ठाकरे