मागील काही लेखांमधून आपण आजच्या युगात चराचर सृष्टीला व्यापून पुन्हा दशांगुळे उरलेल्या ‘स्पर्धा’ या संकल्पनेचे विविध पैलू समजावून घेत आहोत. स्पर्धेचा अतिरेक व त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचाही आपण मागोवा घेत आहोत. स्पर्धेविषयी असणाऱ्या चुकीच्या समजुती आणि अतिरेक यातून व्यक्तीची प्रतिष्ठा, आत्मसन्मान अक्षरश: धुळीस मिळतो, असा  डॉ. एडवर्ड डेमिंग यांचा दावा होता. त्यांनी आपल्या हयातीत अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे शेवटचे पुस्तक होते- ‘द न्यू इकॉनॉमिक्स.’ त्यात त्यांनी आजच्या स्पर्धेवर आधारित समाजव्यवस्थेत व्यक्तीची प्रतिष्ठा कशी पुनर्प्रस्थापित करता येईल याबद्दलची आपली भूमिका सविस्तर मांडली आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असून, स्पर्धा हीच आता समाजाच्या केंद्रस्थानी अढळपद पटकावून बसली आहे आणि हाच कोणत्याही राष्ट्राच्या विकासातला सर्वात मोठा अडथळा आहे असे त्यांचे प्रतिपादन आहे.
प्रथमदर्शनी हे विवेचन वाचून कोणाचाही गैरसमज होण्याची शक्यता आहे. डॉ. डेमिंगना स्पर्धा मान्यच नाही का? स्पर्धाविरहित समाजाचे चित्र ते रंगवीत आहेत का? असल्यास असे कधीतरी शक्य आहे का? स्पर्धा विसरा म्हणजे सर्वानी संत व्हा, असा त्यांचा सल्ला आहे का? एक ना दोन.. नाना शंका आपल्या मनात निर्माण होणे अगदी स्वाभाविक आहे.
या ठिकाणी एक मुद्दा अगदी नि:संदिग्धपणे लक्षात घ्यायला हवा की, डॉ. डेमिंगना असे काहीही अभिप्रेत नाही. ते आदर्शाचे चित्र रंगवीत नाहीत, तर निखळ व्यवहारवाद सांगतात. जपानची आर्थिक प्रगती हे त्याच्या व्यवहारवादाचे प्रत्यक्ष वास्तवातले फलित आहे.
डॉ. डेमिंग स्पर्धेचे दोन प्रकार मानतात. कोणाबरोबर तरी करायची स्पर्धा आणि कोणाच्यातरी विरोधात करायची स्पर्धा. आज कोणाच्यातरी विरोधात करायची स्पर्धा या एकाच प्रकारावर आपले लक्ष एकवटले आहे. यामुळेच की काय कोणतीही संकल्पना समजावून घेताना आपण ‘विरोधातील स्पर्धा’ या चष्म्यातूनच पाहतो. परिणामी आपल्या आकलनात घोटाळे सुरू होतात. म्हणजे नेमके काय घडते? हे समजावून घेण्याकरता आपण सर्वात मोठय़ा गैरसमजाचे लोकप्रिय उदाहरण पाहू.
अवघ्या जगावर परिणाम करणारा लोकोत्तर संशोधक चार्लस् डार्विन याचे हे उदाहरण आहे. डार्विनविषयी, त्यांच्या उत्क्रांतीवादाच्या संशोधनाविषयी आपल्याला सखोल, तपशीलवार माहिती असतेच असे नाही. पण सर्वसाधारण सामान्यज्ञान असणाऱ्या कोणालाही चार्लस् डार्विन हे नाव उच्चारताच त्याचा सिद्धान्त आठवतो- ‘सव्‍‌र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट.’ याचा अर्थ विचारा- कोणीही सांगेल.. ‘या जीवनसंघर्षांत जो बलवान असेल तोच टिकणार.’ जणू काही ‘बळी तो कान पिळी’ हेच डार्विन नव्याने सांगतो आहे.
खरे तर डार्विनला असे अजिबात म्हणायचे नाहीए. डार्विनचे प्रतिपादन असे आहे की, जे सजीव सातत्याने बदलणाऱ्या भोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता दाखवू शकतात तेच टिकतात. इथे बलवान असण्याचा काहीही संबंध नाही. तसा असता तर महाकाय डायनॉसॉर्स नष्ट झाले नसते आणि सूक्ष्म जीवजंतू टिकून राहिले नसते.
स्पर्धेचा चष्मा एकदा का डोळ्यावर चढला की घोटाळे होतात ते हे असे! यातूनच मग बरोबरीच्या सर्वाना मागे सारेन, वजा करेन आणि मी एकटाच काय तो शिल्लक उरेन, अशा प्रकारची मानसिकता तयार होते. कोणत्याही खेळात किंवा सौंदर्यस्पर्धेत एकच विजेता असणार, हे आपण गृहीत धरलेलेच असते. त्यात काही वावगेही नाही. (खरे तर खेळातही एकापेक्षा अधिक विजेते असू शकतात. तुम्ही ‘विजय’ कशाला मानता, यावर ते अवलंबून आहे. त्याविषयी आपण नंतर जाणून घेऊच.) पण शिक्षण व व्यवसायात एकच एक विजेता हवा, हा काय प्रकार आहे? यांत एकापेक्षा अधिक विजेते असायला काय हरकत आहे? ‘कोणाबरोबर स्पर्धा’ आणि ‘कोणाविरोधात स्पर्धा’ या संकल्पना याच संदर्भात महत्त्वाच्या ठरतात. उदाहरणातून या नव्या पैलूची निदान तोंडओळख तरी करून घेऊ या.
टेनिस या खेळाचे नाव उच्चारले की प्रमुख भारतीय खेळाडू म्हणून नाव आठवते ते विजय अमृतराजचे. आपल्या काळातला तो अतिशय मान्यताप्राप्त खेळाडू होता. बोर्ग आणि कॉनर्ससारख्या त्याच्या काळातील जगज्जेत्यांनादेखील त्याच्या गुणवत्तेची जाणीव होती. विजय अमृतराज आपल्या कारकीर्दीत जे अनेक सामने खेळला त्यातला सर्वात संस्मरणीय सामना होता डेव्हिस कप स्पर्धेमधला! या स्पर्धेतला हा पाचवा सामना होता. २-२ अशी बरोबरी झाली होती. विजय अमृतराजला हा सामना जिंकणे भागच होते. विजय अमृतराजचा प्रतिस्पर्धी अगदी तरुण (त्याच्या निम्म्या वयाचा) होता. अर्थातच ताकद, जोश, चपळता अशा सर्वच बाबतीत तो विजयपेक्षा सरस होता. विजय दोन सेट हरला होता. तिसऱ्या सेटमध्ये १-५ अशा गेम्सने मागे पडला होता. आणि पाचव्या गेममध्ये सíव्हस करताना स्कोअर होता.. ७५-४०! आणखी एक गुण गमावला की सामना हरणार. मात्र, हा सामना विजयने इतक्या शेवटच्या टप्प्यावरून फिरवला आणि विजयश्री अक्षरश: खेचून आणली. आणि अखेरीस त्याने ३-२ असा हा सामना जिंकला.
टेनिसच्या जगतातली ही एक अलौकिक खेळी होती. साहजिकच विजय अमृतराजला या सामन्याविषयी अनेकदा विचारले जाई. एक प्रश्न अनेकांच्या मनात होता- जो एका पत्रकाराने त्याला सामन्यानंतर विचारला. ‘एक गुण गमावला की सामना जाणार अशी अवस्था आली त्यावेळी तुझ्या मनात नेमके काय आले होते?’ विजय अमृतराजचे उत्तर अतिशय सोपे, पण कमालीचे नमुनेदार होते. ‘प्रतिस्पध्र्याला हरवण्याकरता मी जिवाचा आटापिटा करत होतो. आणि एका क्षणी मला लख्खकन् जाणवले की, माझी खरी स्पर्धा माझ्याशीच आहे. मला माझ्या खेळात सुधारणा करणे आवश्यक आहे. प्रतिस्पध्र्याला हरवणे या संकल्पनेच्या मी इतका आहारी गेलो होतो, की मी माझ्या खेळापेक्षा त्याच्याच खेळाचा विचार करत होतो. ही चूक माझ्या लक्षात आली आणि मी सारे लक्ष माझ्या खेळावर एकाग्र केले. आणि मग माझ्या खेळाचा दर्जा उंचावू लागला आणि मी हा सामना जिंकला.’ कोणाच्यातरी विरोधात स्पर्धा करण्याचा विचार त्याने सोडला आणि सामना जिंकला.
डेमिंग यांनी नेमके हेच तत्त्व जपानी उद्योजकांना शिकविले.. ‘प्रतिस्पर्धी कंपनीवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ग्राहकावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुम्ही अधिकाधिक उत्तम सेवा आणि उत्तम दर्जाचा माल ग्राहकांना देऊ शकाल. प्रतिस्पध्र्याला मागे टाकणे इतकाच संकुचित विचार कराल तर नामशेष व्हाल.’