कुठल्या कोनातून पाहिले असता एखादी गोष्ट छान दिसते हे आपल्याला माहिती असते. म्हणजे एखादी स्त्री अगर पुरुष एखाद्या कोनातून जास्त छान दिसतात, तर एखाद्या कोनातून विशेष छान दिसत नाहीत. फोटोग्राफरना हे छान समजते. हीच गोष्ट आपण आयुष्याबाबत केली की त्याला म्हणायचे-दृष्टिकोन! म्हणजे पाण्याने अर्धा भरलेला ग्लास आहे, ही वस्तुस्थिती आहे. ‘‘शी! माझ्या नशिबात अर्धाच ग्लास!’ किंवा ‘आ२हा! मस्त अर्धा ग्लास थंड पाणी मिळाले!’ हे म्हणणे याला म्हणतात- दृष्टिकोन. अर्थातच वस्तुस्थिती सारखी असताना फक्त पाहणे तेवढे वेगळे झाले आहे. म्हणजे आपण सिग्नलच्या जवळ आलो आणि सिग्नल गेला, की ‘च्यायला! नेमका मी आलो की सिग्नल तांबडा होतो!’ असे न म्हणता ‘आता उन्हात उभे राहून छान व्हिटॅमिन डी मिळेल!’ असे मनापासून समजणे.
हा दृष्टिकोन घडवावा लागतो. त्याकरता काही सार्वकालिक सत्ये ठाऊक असणे गरजेचे असते. सार्वकालिक म्हणजे कोणत्याही कालखंडात त्यात बदल होत नाही. सर्व जग बदलते, पण या संकल्पना बदलत नाहीत. त्या अशा :
१) कोणालाही झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. फार तर पैसे मिळतात.
२) कर्माचे फळ आपण ठरवू शकत नाही.
३) मृत्यूसमोर सर्व समान असतात.
४) भविष्य हे वर्तमान म्हणून येते.
५) बदल हीच एक परिस्थिती आहे.
६) निर्णय योग्य की अयोग्य, हे नेहमी नंतरच कळते.
७) कार्यकारणभाव नसतो.
८) जगात काहीही सुरक्षित नसते.
९) शंभर टक्के असे काहीही नसते.
१०) काहीही वाया जात नाही.
११) आपल्या आयुष्याची जबाबदारी आपलीच.
वरील सर्वच्या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्याची जरुरी नाही. यातली कोणतीही एक गोष्ट मनात आणली की परिस्थितीचे आकलन वेगळ्या प्रकारे होऊ लागते. समजा- तुमचा बॉस तुमची चूक नसताना आरडाओरड करून ऑफिस डोक्यावर घेतो आहे. वरीलपैकी ‘कर्माचे फळ आपण ठरवू शकत नाही’ हे तुम्ही मनात आणले की तुमच्या लक्षात येते की, आपण चांगले काम केले म्हणून चांगलेच फळ मिळते असे नाही. आज शिव्या खाण्याचा योग दिसतो आहे. हेही दिवस जातील. कारण ‘बदल हाच जीवनाचा स्थायीभाव’ आहे. आपण चांगले काम करत राहायचे.
आनंदी दृष्टिकोन आपल्याला सतत ऊर्जेचा संचय करून देतो. कधीही ऊर्जा वाया जात नाही. जेव्हा ऊर्जेची जरूर भासते तेव्हा ती आपल्याकडे भरपूर असते. हे अर्थातच आपल्या मन:स्थितीवर अवलंबून असते. आता मन:स्थिती म्हटल्यावर- मन म्हणजे काय? आणि स्थिती म्हणजे काय? हे आलेच! मनाला स्थिती नसते. कारण ते चल असते. जसे हे ब्रह्मांड चल आहे आणि म्हणूनच चालू आहे. आपण आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी स्थिर नसतो. असूच शकत नाही. सारेच चल आहे. मन त्याचे प्रतीक आहे. मन ही शरीराची एक रासायनिक स्थिती आहे हे आपण सर्वजण अनुभवू शकतो. चहा-कॉफी प्यायलो की तरतरी येते. दारू प्यायली की वेगळे वाटते. पोट साफ झाले की वेगळे वाटते. नाही झाले, तरी वेगळे वाटते. व्यायाम केला की वेगळे वाटते. अफू, गांजा इत्यादी अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांना ते घेतले की शांत वाटते. नाही घेतले तर अस्वस्थ वाटते. चांगली बातमी ऐकली की छान वाटते. वाईट बातमी ऐकली की वाईट वाटते. त्याशिवाय षड्रिपू आणि अनाकलनीय भीतीही आहेच छळायला. नीट श्वास घेतला की छान वाटते, चुकीचा घेतला तर बिघडते. हे सर्व विशिष्ट रसायनांद्वारे होत राहते. अगदी आनंदी माणसाच्या शरीरातही अॅड्रिनॅलिन टोचले की तो भयग्रस्त होऊ लागतो. बाह्य़ परिस्थिती तशीच असते; फक्त शरीरात अॅड्रिनॅलिनने प्रवेश केलेला असतो. व्यायाम केल्यावर अफूसारखा एक पदार्थ शरीरात तयार होतो आणि छान वाटते. चहा-कॉफीतल्या कॅफिनने छान वाटते. अमली पदार्थाच्या आहारी लोक का जातात, तर- त्यांना छान वाटते. फक्त त्यामुळे त्यांच्या शरीराचे नुकसानही होते. पण त्या छान वाटण्यापुढे त्यांना त्याची पर्वा नसते.
आणखीन एक उपमा द्यायची म्हटले तर एखाडे भांडे असते. त्यात पोकळी असते. पोकळी आणि भांडय़ाचे स्टील हे दोन्ही मिळून तो ‘भांडेपणा’ असतो. त्यात एखादा पदार्थ आपण ठेवतो. तसे सगळी रसायने एका पोकळीभोवती मिळून जे काहीएक तयार होते त्याला मन म्हणावे. त्यात सामान्यपणे विचार येत राहतात. विचार करणारे जगात फार थोडे असतात. हे विचार मनाची शांती बिघडवतात अगर घडवतात. विचार आलेच नाही तर..? तर मग हे घडणे आणि बिघडवणे होणार नाही. हे कसे घडावे?
मनाचे नेहमी दोन भाग असतात. एक म्हणजे जन्मजात असलेला आणि दुसरा- आपण ज्या जाती-जमातीत, देशात वाढतो, तेथील समाजाने दिलेला. एकाला आपण मूळ मन म्हणू, तर दुसऱ्याला सामाजिक मन म्हणू. मूळ मन पूर्णपणे स्वार्थी असते. ते फक्त व्यक्ती म्हणून आपला फायदा पाहते. प्रत्येकाच्या मूळ मनाची क्षमता वेगवेगळी असते. त्यानुसार त्याच्या सामाजिक मनाची जडणघडण होते. मूळ मन वेगवेगळे असले तरी सामाजिक मन एकसारखे असते. सामाजिक मन नेहमी समाजाचा फायदा पाहते.
मूळ मनाची क्षमता म्हणजे logic, intuition, analysis, synthesis, memory, spontaneity, creativity, survival ego. तर सामाजिक मनाची क्षमता म्हणजे language, conscince, etiquettes, manners, morality, social codes, laws, social ego, etc. या दोनही मनांचे एकत्रीकरण होऊन आपले ‘मन’ बनते. हे मन अर्थातच सतत दुग्ध्यात असते. म्हणजे हे करू की ते करू? दोन्ही मनांनी एकमेकांवर अंकुश ठेवायचा असतो. तरच मन:स्थिती त्यातल्या त्यात स्थिर राहते. मूळ मनाची क्षमता कमी असेल तर सामाजिक मन विशेष उन्नत होत नाही. मग असे लोक स्वार्थापोटी समाजाचे कितीही नुकसान करू शकतात. सामाजिक मन फार उन्नत झाले तर ती व्यक्ती समाजासाठी बलिदान करायला मागेपुढे पाहत नाही. अशा प्रकारे चतुर लोक इतरांना स्वत:चा बळी द्यायला प्रवृत्त करून आपण सिंहासनावर बसतात.
ही दोन्ही ‘मने’ एकमेकांशी संतुलित राहावीत म्हणून आपल्याला आपल्या अंतरंगात आणि बहिरंगात काय चालले आहे, हे एकाच वेळी, सतत, निर्लेपपणे आणि जमल्यास पूर्णपणे समजत राहिले की विचारधारा तुटू लागते. फक्त विचार राहतात. मग तेही तुरळक होतात. मग दोन विचारांमध्ये बराच काळ जातो. मग पहिल्यांदाच विचार ‘करता’ येऊ लागतो. इतके दिवस नुसते विचार येताहेत आणि सगळे काही बिघडवून टाकताहेत, अशी अगतिक अवस्था असते त्यापासून मुक्तता होते. कोणतीही गोष्ट करण्याआधी हालचाल एकदम थांबवणे हेदेखील विचारस्रोत थांबवते. पाणी प्यावेसे वाटले की भांडय़ात पाणी ओतण्याआधी एकदम नुसते थांबा. निर्विचारावस्था अनुभवा. मग पाणी ओता. परत प्यायच्या आधी एक क्षण थांबा. अनुभवा निर्विचारावस्था. असे दिवसात कितीही वेळा करा. त्याने मनाचे व्यापार आवरायला मदत होते.
झेन कोअनच्या साहाय्याने आपण ही निर्विचारावस्था पाहिजे तेव्हा, पाहिजे तितक्या वेळ अनुभवू शकतो. ती अशी : समजा, एक निमुळत्या तोंडाची, पण खूप मोठी बाटली आहे. त्यात एक अंडे ठेवून तुम्ही ते उबवलेत आणि एक पिल्लू बाहेर आले. त्याला खायला प्यायला दिल्यावर ते खूप मोठे झाले. बाटलीत मावेना. आता कोअन असा : बाटली न फोडता आणि पिल्लू न मारता ते बाहेर काढायचे. मन स्तब्ध होते. त्याला सुरुवातच करता येत नाही. ऊर्जेचा संचय चालू होतो. एकदा ऊर्जासंचय झाला, की दृष्टिकोन नीट ठेवता येतो. तो नीट राहिला की परिस्थिती आपल्याला अनुकूल कशी आहे आणि किती आहे, हे स्पष्टपणे समजते. ग्लासमधील रिकामी जागा दिसण्याऐवजी अर्धा ग्लास थंडगार पाणी दिसते. पिताना आनंद होतो.
आनंदी दृष्टिकोन
कु ठल्या कोनातून पाहिले असता एखादी गोष्ट छान दिसते हे आपल्याला माहिती असते. म्हणजे एखादी स्त्री अगर पुरुष एखाद्या कोनातून जास्त छान दिसतात, तर एखाद्या कोनातून विशेष छान दिसत नाहीत. फोटोग्राफरना हे छान समजते. हीच गोष्ट आपण आयुष्याबाबत केली की त्याला म्हणायचे-दृष्टिकोन!
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
आणखी वाचा
First published on: 19-05-2013 at 12:37 IST
मराठीतील सर्व आयुष्य मजेत जाईल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keep your mind happy