मी प्रॅक्टिस सुरू केली त्या काळात मुलांना ‘वाढविण्याची’ प्रथा नव्हती. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागल्या की मुले आपोआप वाढत. कधी खूपच आजारी झाली, घरगुती औषधे करून संपली की आई बाळाला घेऊन दवाखान्यात येत असे. बाप हा प्राणी क्वचितच दिसे. आता मात्र चित्र बदलले आहे. बहुतेक वेळा अगदी दोन-तीन दिवसांच्या बाळालाही त्याचे शर्ट-पॅण्ट घातलेले वडीलच हातात घेऊन येतात. आई दोन पावले मागेच उभी असते. सासू बरोबर असलीच तर न बोलता ऐकत असते. हा बदल मला छान वाटतो. वाटते, मुले आता स्वातंत्र्य अनुभवू लागलीत.. पेलायलाही शिकू लागलीत.
असाच एकदा एक तरतरीत तरुण आपल्या एक महिन्याच्या बाळाला घेऊन आला. बाळाला टेबलवर ठेवले आणि बायकोकडे वळून म्हणाला, ‘‘तुला सांगत होतो ना, त्या या मॅडम. यांच्यामुळे वाचलो. नाहीतर आमच्या तीर्थरूपांनी आमची पार वाट लावली असती.’’ आणि माझ्याकडे हसून पाहत म्हणाला, ‘‘ओळखलंत ना मॅडम?’’ हल्ली हा ‘ओळखा पाहू’ खेळ मला रोज खेळावा लागतो. होते काय, की या मुलांचे चेहरे आणि आकारमान १०-१५ वर्षांत इतके बदलते, की ती मला अनोळखीच होतात. आज हा जो बाप्या बायकोला आणि मुलाला घेऊन आला होता, तो मला सर्वस्वी अपरिचित वाटत होता. माझा हरलेला चेहरा पाहून तो म्हणाला, ‘‘अहो, मी समीर. समीर साहेबराव साळुंखे.’’
हा साहेबरावांचा मुलगा? साहेबरावांना विसरणे शक्यच नव्हते. मला त्यांची पहिली भेट आठवली. साहेबराव समीरला घेऊन माझ्याकडे प्रथम आले तेव्हा ते अगदी याच्याच वयाचे होते. टेबलवर समीरला ठेवून ते म्हणाले होते, ‘‘मॅडम, मी तुम्हाला पोतंभर पैसे देतो. या कॅलेंडरमधल्या बाळासारखं माझं बाळ करून द्या.’’ काशीनाथ घाणेकर जसे एंट्रीलाच टाळ्या घ्यायचे, तसे साहेबरावांनी एंट्रीलाच माझी दाद घेतली होती. ते गावचे सरपंच होते. मोठा वाडा. मोठी शेती. मोठी स्वप्ने. समीर हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. ‘वाटेल तेवढा पैसा खर्च करीन’ हे त्यांचे ध्रुवपद होते. मी म्हणे, ‘‘सगळ्याच गोष्टी विकत घेता येतात का?’’ त्यावर त्यांचे उत्तर असे, ‘‘माझी प्रयत्नांनाही तयारी आहे. त्याच्यासाठी मी हाडाची काडे करीन, पण त्याला कोणीतरी मोठा बनवीन.’’
समीर निरोगीच होता; पण साहेबराव त्याला वरचेवर घेऊन येत. ‘‘भूक लागायचे औषध द्या, मॅडम. चांगला गुटगुटीत झाला पाहिजे.’’ या वाक्यानेच सुरुवात करीत. त्याला काय काय खायला द्यायचे, किती बदाम उगाळून द्यायचे, सगळे विचारून घेत. समीर थोडा मोठा झाल्यावर तो चांगला सहा फूट उंच झाला पाहिजे, असे त्यांच्या मनाने घेतले. ‘उंची वाढायचे औषध नसते. उंची आनुवंशिक असते,’ या माझ्या बोलण्याकडे ते दुर्लक्ष करीत. उंची वाढण्यासाठी कोणते विशेष व्यायाम केले पाहिजेत, उंची वाढण्यासाठी न्यूट्रामूल द्यावे की बोर्नव्हिटा, यावर चर्चा करीत.
समीर शाळेत जाऊ लागला आणि साहेबरावांची बुद्धीच्या वाढीसाठीच्या औषधांची मागणी सुरू झाली. मी म्हणे, ‘‘अहो, बुद्धी वाढायचे औषध असते तर मीच नसते का ते सगळ्यात आधी घेतले?’’ यावर ते खळखळून हसत. पण त्यांचे प्रश्न संपत नसत. कोणकोणत्या जाहिराती त्यांनी आधीच वाचलेल्या असत. ‘रोज मासा खायला देऊ का?’, ‘शंखपुष्पी देऊ का?’ असले माझ्याकडे उत्तर नसलेले प्रश्न ते विचारीत. त्यांची धडपड पाहून मी हैराण होत असे. तरीही मला त्यांचे कौतुक वाटे. ज्या काळात आसपासची मुले रस्त्याशेजारी आपोआप वाढणाऱ्या गवतासारखी वाढत होती, त्या काळात कुशल माळ्याने बगिच्यातील दुर्मीळ झाडाची निगराणी करावी, तसे साहेबराव समीरची काळजी घेत होते.
पण मला आता साहेबरावांचीच काळजी वाटू लागली. त्यांच्या अपेक्षाच इतक्या होत्या, की अपेक्षाभंग अटळच होता. समीर मोठा होऊ लागला, स्वतंत्र होऊ लागला, तसे त्याला साहेबरावांच्या अपेक्षांचा, काळजी घेण्याचा काच वाटू लागला. नंतर तर त्याने बंडखोरीचाच पवित्रा घेतला. ‘अरे’ला ‘कारे’ सुरू झाले. साहेबरावांना त्याचे ऐकताही येईना आणि त्याला दुखावताही येईना. त्यांची सारखी भांडणे होत. माझ्याकडे मध्यस्थाची भूमिका येई. मी दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न करी. दहावी झाल्यावर साहेबरावांनी त्याला पुण्याला वसतिगृहात शिकायला पाठवले. त्यानंतर त्याची- माझी भेट झाली नाही.
आज १५ वर्षांनंतर समीर बापाच्या भूमिकेत आला होता. माझ्या मनात खूप प्रश्न होते. साहेबराव कसे आहेत? तू काय करतोस? पण मी ते मनातच ठेवले. समीर आपल्या छोटय़ाकडे पाहत म्हणाला, ‘मॅडम, तुमच्या ज्या काही लसी असतील त्या द्या. भारीतले टॉनिक द्या. छान बाळसे आले पाहिजे बाळाला. मी एका मुलावर ऑपरेशन करून घेतले आहे. आता माझे आयुष्य या बाळासाठी. रक्ताचे पाणी करीन, पण त्याला काही कमी पडू देणार नाही.’
मी एकदम चमकले. पुन्हा सारे तेच. सगळे अगदी तसेच! तीच स्वप्ने, तेच अपेक्षांचे ओझे! तीच अपेक्षापूर्तीसाठी धडपड! ‘हाडाची काडे करीन, रक्ताचे पाणी करीन.’ शब्द वेगळे, पण अर्थ तोच! काळ सरकला तशा फक्त भूमिका बदलल्या; पण नाटय़ तेच! मी समीरकडे पाहिले. तो बाळाकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात स्वप्ने दिसत होती. नवीन युद्धाची वाद्ये वाजू लागली होती. मला पुन्हा लढण्यासाठी कुमक गोळा करणे आवश्यक होते.

औषधे लिहिण्यासाठी मी खाली बसले. अचानक एक लहानपणचा प्रसंग आठवला. मी आजीबरोबर कार्तिक महिन्यात पहाटे पंचगंगा नदीच्या काठावर जाई. आमच्यासारखी अनेक माणसे त्यावेळी तेथे येत. प्रत्येकजण एक द्रोणाचा दिवा नदीच्या प्रवाहात सोडी. पहाटेच्या नि:शब्द वेळी वाहत्या पाण्यात इवलुसा दिवा सोडताना मनात विलक्षण काहुर दाटे. कितीतरी लांब जाईपर्यंत मी डोळ्यांत प्राण आणून ‘माझ्या’ दिव्याकडे पाहत असे. त्याची ज्योत नुसती थरथरली तरी मनाची घालमेल होई. तो किती लांब जातोय, कसा छान तेवतोय, आसपासच्या लाटांना तोंड देतोय ना? अशी मनात हुरहूर असे. आणि एका क्षणी तो इतर दिव्यांत मिसळून जाई. अनोळखी होऊन जाई. मग नजर जाई लांब लांब जाणाऱ्या दिव्यांच्या जथ्थ्याकडे! गोठविणाऱ्या अंधारात एकमेकांच्या साथीने अज्ञाताच्या प्रवासाला निघालेला तो दिव्यांचा कारवाँ! मनात भावनांचा कल्लोळ होई.
आता वाटते, हा कारवाँ पाहण्यासाठी आपला दिवा अनोळखी होणे जितके अटळ आहे, तितकेच दिसतो आहे तोपर्यंत त्याच्यावरून नजर न काढता येणेही अटळच नाही का?

Story img Loader