0005जीवन त्यांना कळले हो..
‘जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे
पक्व फळापरि
सहजपणाने गळले हो..’
बा. भ. बोरकरांची ही कविता. प्रतिभावंतांच्या प्रत्येक शब्दात, सुरात प्रतिभा जाणवते. ‘पक्व फळापरि’ म्हणताना मुळात प्रगल्भ होत जाण्याचा किती नेमका उल्लेख आला आहे. मीपण.. अहंकार गळून जायला हवा, कोणीतरी ठेचून जायला नको. आणि सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे ‘सहजपणाने’!
जगण्यामधली म्हटलं तर सर्वात सोपी आणि तरीही सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे ‘सहजपणा’! अगदी अडीच-तीन वर्षांच्या लहानग्याच्या चेहऱ्यावरचं हसू जितकं सहज आणि निर्हेतूक असतं, तसा ‘सहजपणा!’
ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात-
‘बाप रखुमादेवीवरु सहज नीटु झाला
हृदयी नटावला ब्रह्माकारे..’
इतकं सहज असेल जगणं.. स्वाभाविक असेल, तरच मग ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ असं म्हणता येतं.
कवींच्या, संगीतकारांच्या, गायकांच्या आविष्कारात हा ‘सहजपणा’ आला की मग सिद्ध करायची धडपड राहत नाही. एकदा बोलता बोलता यशवंत देव सर म्हणाले होते की, ठिपके काढून रांगोळी काढणारी काही कलाकार मंडळी असतात.. आणि काहीजण रांगोळी आणि रंग इतके ‘सहज’ फेकून पुढं जातात- आणि मागे पाहावं तर तिथं सुंदर चित्र उमटलेलं असतं. त्याची चर्चा करावी ती इतरांनी. पण तो कलाकार तेव्हा पुढच्या गावात पोहोचलेला असतो. याला म्हणायचं ‘सहजपणा’!
लतादीदींचं गाणं, सचिनची बॅटिंग, नसिरुद्दीन शाह यांचा अभिनय, पु.लं.चा विनोद हा तो ‘सहजपणा’! अपार कष्ट आणि खोल अभ्यासानंतरही हा येतो, किंवा तो असतोच काहीजणांमध्ये. जणू कुमारजींचं गाणं किंवा दीनानाथांची एखादी स्वराकृती!
आज या सहजपणाची आठवण आली ती या प्रतिभावंतांमुळे. दहा-दहाजणांची टीम बसवून मालिकेला, चित्रपटाला शीर्षक शोधत बसणाऱ्यांचा आजचा काळ! पण थोडं शांतपणे याकडे बघितलं तर सुभाषितं, म्हणी, सुंदर उद्गार हे सगळं सहज बोलता बोलता आलंय. अर्थात् तितक्याच प्रतिभावंतांकडून! केवळ  मराठी कविता-गीतांमधल्या अशा ओळी आठवायच्या म्हटल्या तरी त्यांचं एक वेगळं पुस्तक होऊ शकेल. ‘दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव’पासून सुरू होणाऱ्या या ओळी.. ज्यांत एका अखंड ग्रंथाचं तत्त्वज्ञान सामावलंय. गदिमांच्या अशा ओळींना तर अभ्यासक्रमात स्थान द्यायला हवं असं मला मनापासून वाटतं.. ‘लळा, जिव्हाळा शब्दच खोटे’, ‘जग हे बंदिशाळा’, ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे’, ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’, ‘जिथे राबती हात तेथे हरी..’ प्रत्येक ओळीत एक कथा, एक विचार आणि चिरंतन तत्त्वज्ञान! काहीतरी खूप मोठं लिहायचंय असा अभिनिवेश न ठेवताच ‘मोठं’ काहीतरी लिहिलं जातं, याचा हा वस्तुपाठ.
चटपटीत दोन- दोन ओळी सुचण्यासाठी डोकं खाजवत बसणारे वेगळे, आणि मी सहज म्हणून लिहिलंय, त्यातल्या तुम्हाला हव्या त्या ओळी वाचा आणि आनंद घ्या, असं म्हणणारे वेगळे. हा सहजपणा आला तो संतकवींकडून. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, समर्थ रामदास, एकनाथ महाराज, संत चोखामेळा, संत गाडगेबाबा यांच्या विचारमंथनातून आलेलं लिखाण इतकं सहज आहे, की त्याची कळ्यांची फुलं व्हावीत इतकी सहज ‘सुभाषितं’ झाली.. ‘विचार’ झाले. ओळींचे ‘विचार’ होणं हे तर कवीचं सर्वोत्तम लक्षण!
ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील प्रत्येक ओळ म्हणजे जणू एकेक शिलालेख.. चिरकाल टिकणारा विचार!
‘जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात’
‘तया सत्कर्मी रती वाढो’
‘भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे’
‘दुरितांचे तिमिर जावो..’

अख्खं पसायदान म्हणत जावं आणि प्रत्येक ओळीशी थांबावं, तर तिथे एक स्वतंत्र ग्रंथ असावा असा विचार.
तुकाराम महाराजांचं ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी’पासून ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ प्रत्येक ठिकाणी सहजोद्गारातून दिव्य विचार. समर्थाचं लिखाण वाचतानाही हा कालातीत स्पर्श जाणवतो. मूर्खाची लक्षणं किंवा ‘मनाचे श्लोक’ हा तर अभ्यासाचाच विषय- आणि तोही आयुष्यभर पुरेल असा.
आपण ‘ग्लोबलायझेशन’विषयी आता बोलतो; पण चोखोबांनी ‘अवघा रंग एकचि झाला’ असं फार पूर्वीच म्हटलं होतं.
कोणत्याही स्वार्थी, ऐहिक उद्देशापलीकडे स्वत:ला वाटलं म्हणून, आतूनच काहीतरी उसळून आलं म्हणून जेव्हा लिहिलं जातं, गायलं जातं, तेव्हा ते ‘अभंग’ होतं. कधीच पुसलं न जाणारं. त्याला कसल्या जाहिराती, प्रमोशनची गरजच राहत नाही.
राजकारण, समाजकारण यातसुद्धा एक गट असा- जो मोठे फलक लावून लोकांना सतत सांगत राहतो की, आम्ही रक्तदान शिबीर घेतलं, आम्ही असं केलं.. तसं करतो.. असं असं करणार आहोत. आणि दुसरीकडे आमटे कुटुंबीय, अभय बंग- राणी बंग आणि अशी अनेक माणसं केवळ आतून ऊर्मी आहे म्हणून आपलं आयुष्य समाजासाठी वाहून टाकतात.. अगदी सहजपणे. कारण त्यांचं ‘मीपण’ इतकं सहजपणाने गळून जातं, की-
‘जळापरि मन निर्मळ ज्यांचे
गेले तेथे मिळाले हो
चराचराचे होऊन जीवन
स्नेहासम पाजळले हो..’
असं त्यांचं आयुष्य होऊन जातं.
अचाट पैसा, अपार जमिनीवर सत्ता या सगळ्यापेक्षा मला हात जोडावेसे वाटतात ते अशा आयुष्य ‘सहज’ साध्य होणाऱ्या विभूतींपुढे!
सुंदर गाणं कुठलं? जे हसता हसता आणि रडता रडताही सहज ओठी येतं..
सुंदर फोटो कुठला? ..एखादं बाळ त्याच्या त्याच्या नादात एकटंच हसतं तो.
सुंदर लिखाण? ..जे सहजोद्गारातून प्रसवतं ते.
आणि सुंदर आयुष्य? जे सहजपणानं जगलं जातं आणि योग्य वेळी संपतं ते..!!
सलील कुलकर्णी – saleel_kulkarni@yahoo.co.in

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader