चिं. त्र्यं. खानोलकर हे मराठी साहित्यातले एक महान प्रतिभावंत. साहित्यावकाशातलं स्वयंतेजानं लखलखणारं नक्षत्र. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिभावंत सुहृदानं- संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली म्हणजे मराठी रंगमंचावर ‘न भूतो- न भविष्यति’ असा घडलेला शब्दस्वरांचा दृक्श्राव्य रंगानुभव- ‘नक्षत्रांचे देणे’! आरती प्रभू (चिं. त्र्यं. खानोलकर) या प्रतिभावंत कवीच्या कवितांचा वाचिक- कायिक अभिनयातून, नव्यानं संगीतबद्ध गीतांतून आणि दृक्श्राव्य माध्यमातून साकारलेला हा रंगानुभव ही एक नव्या युगप्रवर्तक आविष्काराची खूण ठरली. ‘नक्षत्रांचे देणे’ची संकल्पना- संहिता मीना चंदावरकर यांची होती. आणि दिग्दर्शनही!
पाण्यात ओंजळीच्या यावा चुकून मीन।
चमकूनही तसाच गाण्यात अर्थ जावा
तारांवरी पडावा केंव्हा चुकून हात।
विस्तीर्ण पोकळीचा गांधार सापडावा।।
अशी अद्भुत शब्दकळा असलेल्या आरती प्रभूंच्या पन्नासहून अधिक कवितांची सुंदर गुंफण करून त्यांनी संहिता सिद्ध केली. त्यातल्या अध्र्याहून अधिक कवितांना संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी स्वरांकित करून एकल, युगुल अगर समूहगानातून कुशल वाद्यवृंदाच्या साथीनं ‘नक्षत्रांचे देणे’मधून सादर केल्या. गायला नामवंत आणि नव्या दमाच्या २० गायक-गायिकांची मांदियाळी होती. तर वाचिक-कायिक अभिनयातून कवितांची प्रत्ययकारी पेशकश करायला अमोल आणि अनुया पालेकर, मोहन गोखले, चंद्रकांत काळे आणि श्रीराम पेंडसे अशी संवेदनशील विख्यात रंगकर्मीची टीम होती.
सोळा वादकांचा वाद्यवृंद गाण्यांच्या साथीला आणि गद्यकवितांच्या सादरीकरणाला पाश्र्वसंगीत देण्यासाठी योजला होता. पुण्यातला कल्पक प्रकाशयोजनाकार बाळ मोघे आणि नेपथ्यकार मीना चंदावरकर, माधुरी पुरंदरे, दत्ता आपटे यांच्या सहभागानं या सादरीकरणाला अर्थपूर्ण दृश्यात्मक परिमाण लाभलं होतं. काही कवितांच्या सादरीकरणाच्या वेळी रंगमंचावरील पांढऱ्या पडद्यावर कवितेच्या आशयाला अधोरेखित करणाऱ्या चित्रपारदर्शिकांचाही (स्लाइड्स) प्रयोग केला गेला होता. कलाकारांच्या वेशभूषेतील रंगसंगतीही कवितेचा आशय, भावना आणि वातावरण यांच्या अनुषंगानं साधण्याचा प्रयत्न केला गेला होता.
पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर येथे २६ एप्रिल १९७६ रोजी रात्री साडेनऊ वाजता तिसऱ्या घंटेनंतर पडद्यामागून वीस गायक-गायिकांच्या वृंदानं तीन-चार संवादी सुरावटीतून पाश्चात्त्य वृंदगायनाच्या शैलीत..
गेले द्यायचे राहून। तुझे नक्षत्रांचे देणे।
माझ्यापास आता कळ्या।
आणि थोडी ओली पाने..!
ही शीर्षकधून गायली तेव्हा प्रेक्षागृहातल्या तमाम रसिकांच्याच नव्हे, तर सादरकर्त्यां आम्हा सर्व कलाकारांच्याही काळजात आरती प्रभूंच्या स्मरणानं हुरहूर दाटून आली.
या ओळी यापूर्वीही भावगीताच्या स्वरूपात ध्वनिमुद्रिकेतून जनमानसात ठसल्या होत्या. पण कवितेला लावलेली कुठलीही चाल कधी अखेरचा शब्द असत नाही. खरं तर हे कुठल्याही कलाविष्काराला लागू पडतं. एक संगीतकार म्हणून मला चंदावरकर सरांच्या प्रतिभेला दाद द्यावीशी वाटते. कारण प्रस्थापित आणि लोकप्रिय चालींपेक्षा त्याच शब्दामधून वेगळा आणि नवा अर्थ मांडणारी मनभावन चाल रचायला फार मोठी प्रतिभा लागते. चंदावरकरांच्या चालींत साक्षात् आरती प्रभूंप्रती साऱ्या रसिकांना वाटणारी खंत फार सुंदर अंदाजानं व्यक्त झालीय. आणि अशी ही शीर्षकधून ‘नक्षत्रांचे देणे’ या संपूर्ण रंगानुभावाला गुंफून राहिली.
या शीर्षकधूनीपाठोपाठ पडदा उघडताना रंगमंचावर तीन प्रतीकांवर प्रकाशझोत होता. ही संकल्पना संगीतकार चंदावरकरांची. पहिलं प्रतीक म्हणजे दोन पोपटी-हिरवी पानं- ज्यातून आरती प्रभूंच्या कवितेत प्रतिबिंबित होणाऱ्या निखळ निसर्गप्रेमाचं, त्याविषयीच्या निरागस कुतूहलाचं सूचन.. तर दुसऱ्या प्रतीकातून म्हणजे काटे नसलेल्या-म्हणजे बिनहातांच्या घडय़ाळातून सामान्य माणसाच्या जगण्याच्या धडपडीचं, हताश फरफटीचं, त्यातून येणाऱ्या वैतागाचं, वैफल्याचं दर्शन.. तर मानवी कवटी या तिसऱ्या प्रतीकातून मृत्यूविषयी त्यांना वाटणारं गूढ आकर्षण, त्यात विलीन होण्याची ओढ तसेच माणूस आणि मृत्यू याचे अटळ बंध या साऱ्यांचं सूचन.. हे या तीन प्रतीकांच्या अतिवास्तववादी मांडणीतून खुद्द चंदावरकरांना अभिप्रेत होतं. पांढराशुभ्र लेंगा-झब्बा ल्यालेल्या पोशाखात प्रकाशझोतात प्रवेशत अभिनेता मोहन गोखलेनं ‘नक्षत्रांचे देणे’ या प्रयोगाची संकल्पना आणि स्वरूप थोडक्यात विशद करून यापुढे रंगमंचावर फक्त आरती प्रभूंचेच शब्द असतील अशी ग्वाही दिली.
..आणि सुरू झाला या अभूतपूर्व प्रयोगाचा पूर्वार्ध- ‘ऐल.’ (आणि उत्तरार्ध ‘पैल’ असं मोहननं प्रास्ताविकात सांगितलं होतंच.)
एक फाटका कवी.. त्याला वाहवा हवी
फाटकी तुटकी वहाण.. वाटेकडे ठेवून गहाण
त्याने धाव घ्यावी.. नेसण सुटून माळावर
त्याची वाऱ्यावरील धुळीने शाल भगवी व्हावी..
या चंद्रकांत काळय़ांनी आपल्या प्रत्ययकारी वाणीतून मांडलेल्या आरती प्रभूंच्या स्वगतातून प्रयोगाचं वेगळेपण आरंभीच रसिकमनावर ठसलं. त्यापाठोपाठ गायकवृंदाच्या शीर्षकधूनीच्या स्वरावकाशातून प्रकटत मोहन गोखलेचा लखलखता उत्कट स्वर रसिकांना प्रश्न विचारत आला-
.. प्रेम हवंय का या कवितेचं?
मग ते मागून मिळणार आहे का तुम्हाला?
खूप काही द्यावं लागेल त्यासाठी
काय काय द्याल?
पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मा
तुमच्याच तळहातावर
एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल
पण त्यासाठी तुमचे हात तुम्हाला
चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील
कराल?
संपूर्ण प्रयोगात कवितांच्या सादरीकरणाला गुंफणारी शीर्षकधून सादर करताना गायकवृंद दोन्ही विंगेमधून रंगमंचावर प्रवेशून गात गात समोरच्या विंगेत हलकेच निघून जात. वाचिक-कायिक अभिनय आणि मंचावरील अर्थपूर्ण वावरातून मोहन गोखले, अमोल पालेकर, अनुया पालेकर, चंद्रकांत काळे आणि श्रीराम पेंडसे यांनी आरती प्रभूंच्या कवितांना अर्थाचे नवे परिमाण देत रसिकांपर्यंत ती अत्यंत प्रभावीपणे पोहोचवली. अमोल व अनुया या दोघांनी मिळून सादर केलेल्या ‘दोन पोक्त पानं’ आणि ‘एकमेकांसमोर बसून रहा’ या कवितांचं सादरीकरण म्हणजे गद्यस्वरातून आणि देहबोलीतून साकारलेली युगुलगीतंच होती. अनुयानं एकटीनं ‘ऐल’मध्ये तीन आणि ‘पैल’मध्ये सहा अशा नऊ कविता सादर करताना प्रत्येक कवितेच्या आशयाचं आणि छंदाचं नेमकं भान ठेवत वाचिक अभिनयाला कायिकतेची जोड देऊन कविता रसिकांपर्यंत पोहोचवली. चंद्रकांत काळे या गायक अभिनेत्यानं आरंभीची ‘एक फाटका कवी’ या कवितेसह मोहन गोखलेसोबत ‘तू कुणी छे छे छे रे’ ही स्वत:च्या प्रतिबिंबाशी संवाद करत व्यक्त होणाऱ्या कुणा एकाचं चिंतन मांडणारी कविता आणि ‘संसारात राहून काय झालो’ ही उपहासिका ज्या अनोख्या अंदाजानं.. पद्धतीनं मांडली, त्यात मोहन गोखलेबरोबरची त्याची जुगलबंदी बेमिसालच!
अमोल पालेकर या अभिनेत्यानं पाच कविता सादर करताना आपल्या सर्व अनुभवांचा आणि शक्तीचा अतिशय प्रभावी प्रयोग करत त्या जिवंत केल्या. त्यातली ‘ही दोन बकरीची पोरे आहेत’ ही दीर्घकविता म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय एकल वाद्यसंगीतातल्या रागाविष्कारातला जोड-झाला-आलापच होता. दिवाकरांच्या नाटय़छटेच्या अंगानं आविष्कृत झालेल्या या सादरीकरणाला रसिकांची प्रचंड दाद न मिळती तरच नवल! तशीच सुंदर पेशकश त्यानं ‘या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका’ या कवितेची केली.
कवितांच्या या गद्य पेशकारीतला सर्वागसुंदर भाग म्हणजे मोहन गोखलेचा अतिशय उत्कट आविष्कार! ‘मूलभूत तत्त्वांची पाळेमुळे..’ अथवा ‘अशाही रस्त्याने जाता येते’ अगर ‘वेळी-अवेळीही आपले नव्हे.. लाख रंध्रांचे हे उसने शरीर..’ त्याचबरोबर- ‘चार डोळे, दोन काचा, दोन खाचा। यात कोठे प्रश्न येतो आसवांचा? का त्वचेच्या वल्कलांची घाण व्हावी? ही शिसारी पुण्यवंतांनाच यावी..’ किंवा ‘तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे’ अशा दहा कविता त्याच्या भावोत्कट वाणीतून थेट रसिकांच्या हृदयात उतरल्या.. तसेच-
तुझ्या पायवाटा कुठे वाळवंटी..।
उरे फक्त मागे तुझी सावली रे
कुणी पाहिलेला तुला सर्वसाक्षी।
तुवा पेरलेले दिशा.. व्योम.. तारे
या कवितेच्या त्यानं केलेल्या बेमिसाल पेशकारीतून उमलून येणारी, माधुरी पुरंदरेनं आर्त स्वरात आळवलेली ‘रे घन रे सजण’ ही नितांतसुंदर विराणी आणि त्यातून पसरत जाणारी ‘गेले द्यायचे राहून’ची संवादी स्वरावलीतली शीर्षकधून हा एक विलक्षण अनुभव होता.. जो शब्दांतून मांडणं केवळ अशक्य..!