होळीनिमित्ताने मराठीतील गाजलेल्या गीतांवर आधारित विडंबनगीते ‘लोकसत्ता’ने मागविली होती. या आवाहनास कवीमंडळींकडून उदंड प्रतिसाद मिळाला. विडंबनगीतांचा अक्षरश: पाऊसच पडला. त्यातील निवडक विडंबनगीते गेल्या पुरवणीत आम्ही प्रसिद्ध केली होती. यावेळी उर्वरित निवडक विडंबनगीते येथे सादर करीत आहोत..

मूळ गीत- ‘बहु असोत सुंदर संपन्न की महान..’

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

पुरस्कार

बहु असोत सुंदर पुरस्कार हे महान
किती मिळवले, किती मिळाले, नाही याचं भान..

ऐकावे गुणगान किती
धुंद होत गेली मती
झाले हो मोठमोठे सन्मान॥ १॥

खचाखच स्मृतिचिन्हे
भिंतीवरी मानपत्रे
हरखुनि गेले ध्यान॥ २॥

‘शाली’नतेचे दिवस
श्रीफळ आणि गुच्छ
घेताना वाटे अभिमान ॥ ३॥

किती गमविला काळ
व्यर्थ अनमोल वेळ
खऱ्या प्रतिभेचे गेले भान ॥ ४॥

कला राहिली बाजूला
प्रतिभा गेली वायला
पदरी पडला अपमान॥ ५॥

– निर्मला मठपती, सोलापूर.

मूळ गीत- ‘मराठी पाऊल पडते पुढे..’

मराठी पाऊल हे अडखळे

महाराष्ट्र राज्य जाहले
झडती मग वादांचे चौघडे
मराठी पाऊल हे अडखळे॥ धृ ॥

भ्रष्टाचारी सर्व जाहले
निर्मळ नाही कुणी राहिले
कसे मग पाऊल पुढती पडे?
मराठी पाऊल हे अडखळे॥ १॥

इथे शाश्वती नाही कशाची
नियम कायदे रोज बदलती
उद्योजकास अडथळेचि ठरती
कसे मग पाऊल पुढती पडे?
मराठी पाऊल हे अडखळे॥ २॥

वीज करारही आम्ही बुडविले
सारे राज्य अंधारी बुडाले
भार नियमन नित्याचे झाले
शेतकरी मग रडे..
मराठी पाऊल हे अडखळे॥ ३॥

राडा संस्कृती इथे रुजविली
नेतृत्वाचे गुण ही ठरली
त्याची फिकीर कुणा ना पडे
मराठी पाऊल हे अडखळे॥ ४॥

आदर नाही मनी राहिला
सान-थोर हा भेद न केला
चिखल सदा ही उडे
मराठी पाऊल हे अडखळे ॥ ५॥

पक्ष- युतींचे राज्य जाहले
मनी आशेचे दीप उजळले
परी स्वार्थाने तेही विझविले
कसे मग पाऊल पुढती पडे?
मराठी पाऊल हे अडखळे॥ ६॥

– शशिकांत काळे, डहाणू रोड.

मूळ गीत- ‘पप्पा सांगा कुणाचे’

मोबाइल सांगा कुणाचा?

lr08मोबाइल सांगा कुणाचा?
मोबाइल माझ्या पप्पांचा
टी. व्ही. सांगा कुणाचा?
टी. व्ही. माझ्या मम्मीचा

इवल्या इवल्या यंत्रामध्ये
बाबा हे काय शोधितसे
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, हाईकवरती
ट्विटरही मधेच टिवटिवती..
मोबाइल सांगा कुणाचा?

बाबांची बोटे ही मोबाइलवरती
आईचे जग हे टी.व्ही.भोवती
नेटाने ‘नेट’चा ध्यास घेता
बाळांसही आपुल्या थोडा वेळ द्यावा..
मोबाइल सांगा कुणाचा?

आईला टी. व्ही. हा प्रिय भारी
पप्पांची मोबाइलची दुनिया ही न्यारी
स्पर्शाला स्पर्शाने सारखी
बाळांना आई-बाबांची माया ही पारखी
टी. व्ही. सांगा कुणाचा?

लॅपटॉपशी सूत हे जुळताना
अभ्यासही परका पुस्तकांना
रुसते झुरते घर सारे
घरातही पोरके मम्मी-पप्पांचे तारे
मोबाइल सांगा कुणाचा?

– योगेश तागड, पाचोरा, जि. जळगाव.

मूळ गीत- ‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार’
पुढाऱ्या, तू वेडा कुंभार

lr09फिरत्या खुर्चीवरती देशी, सत्तेला आकार
पुढाऱ्या, तू वेडा कुंभार॥ धृ॥
रस्ते, पूल नि समुद्रकिनारा
तूच पचवसी सर्व पसारा
काळे धन मग ये आकारा
तुझ्या पापाच्या उतरंडीला
नसे अंत, ना पार
पुढाऱ्या, तू वेडा कुंभार॥ १॥

खुच्र्या खुच्र्याचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
श्रेष्ठीविणा ते कोणा न कळे
पदी कुणाच्या पडते महसूल
कुणा गृहाचा भार
पुढाऱ्या, तू वेडा कुंभार॥ २॥

पक्ष घडविसी, पक्ष फोडसी
कुरवाळिसी तू, तूच तोडिसी
पैसे यातून जरी निर्मिती
तुझ्या पुढे अंधार
पुढाऱ्या, तू वेडा कुंभार॥ ३॥

– राज अहेरराव, पुणे.

मूळ गीत- ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला..’
आता कुठं कुठं जायाचं पाण्याला

lr11आता कुठं कुठं जायाचं पाण्याला
इचारा महापालिकेच्या शहाण्याला॥

येत होते पाणी चार दिवसाआड
तेसुद्धा बंद केले, कुठं त्याला चाड
वैतागुनी गेलो रोजच्या बहाण्याला॥

जलवाहिन्यांना बारमाही गळती
मधल्या मध्ये सगळा निधी गिळती
पोट मोठाले, नाही हिशेब खाण्याला॥

बैठकांवर बैठकांना जातोय तडा
नाही भरत आमचा पाण्याचा घडा
नाहीच सुटका रातीच्या जागण्याला॥

कुठं झालाय गायब टँकरवाला
नाही ऐकत आमचं तो चावीवाला
ऐन उन्हाळी पाणी मिळेना पिण्याला॥

सरकारनं केलं पाण्याचं नाटक
लोकांना खेळविण्याची त्यांना चटक
कधी बसेल खीळ दुटप्पी वागण्याला॥

– मुबारक शेख, सोलापूर

मूळ गीत- ‘रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी’
हात नका लावू ह्यच्या गालाला..

रेशमाच्या दादानी, लाल-काळ्या जोडय़ानी
कोल्हापुरी कशिदा हा काढिला
हात नका लावू ह्यच्या गालाला॥ १॥

नवी कोरी गाडी दहा लाखाची.. लाखाची
ऐटीत बसली राणी रूपाची.. रूपाची
खरं सांगा गेले होते
कुण्या कुण्या गावाला..
हात नका लावू ह्यच्या गालाला॥ २॥

जात होता गाडीनं तो तोऱ्यात.. तोऱ्यात
वाट अडवून उभा दादा पुढय़ात.. पुढय़ात
तुम्ही माझ्या ताईचा हात का धरिला
हात नका लावू ह्यच्या गालाला॥ ३॥

लाज काही राखा जनाची.. जनाची
उगीचच होईल शोभा गावाची.. गावाची
काय काय म्हणावं तुमच्या ह्य लीलेला
हात नका लावू ह्यच्या गालाला॥ ४॥

रेशमाच्या दादानी, लाल-काळ्या जोडय़ानी
कोल्हापुरी कशिदा हा काढिला
हात नका लावू ह्यच्या गालाला॥ ५॥

– अनिल तरारे, नागपूर</strong>

मूळ गीत- ‘अरे संसार संसार। जसा तवा चुलीवर’
अरे दुष्काळ दुष्काळ..

अरे दुष्काळ दुष्काळ। जनतेला लागे झळ।
नाही पुरेसे अन्न पोटा। पिण्या नाही शुद्ध जल ॥ १॥

अरे दुष्काळ दुष्काळ। महाग झाल्या भाज्या किती॥
काय द्यावे डब्यांत। चिंता गृहिणीला दिन-राती॥ २॥

अरे दुष्काळ दुष्काळ। राहिल्या नाही डाळी स्वस्त।
पिझ्झा, बर्गर, नुडल्स। मुले करिताति फस्त॥ ३॥
अरे दुष्काळ दुष्काळ। खतावरची धान्यं तांदुळ।
इंजेक्शनने पिकवलेली। बाजारात येती फळं॥ ४॥

अरे दुष्काळ दुष्काळ। सिलेंडर ना मिळे लवकर।
आधी भरा जादा पैसे। सबसिडी मिळे नंतर॥ ५॥

अरे दुष्काळ दुष्काळ। नाही मिळत केरोसिन।
जंगलं झाली जमीनदोस्त। कसे मिळेल सरपन॥ ६॥

अरे दुष्काळ दुष्काळ। सर्वत्र प्रदूषण।
ना मिळे शुद्ध हवा। कठीण झालं रे जगणं॥ ७॥

अरे दुष्काळ दुष्काळ। कधी येतील अच्छे दिन।
रक्षण करी देव बाप्पा। तुज पुढे आम्ही दीन॥ ८॥
– शोभा व्यं. लाठकर (नाईक), गारखेडा, औरंगाबाद.

मूळ गीत- ‘संथ वाहते कृष्णामाई..’
तरुणाई

सतत धावते ही तरुणाई
माय-पित्याच्या परिश्रमांची जाणीव त्यांना नाही॥ धृ॥

तरुण असो वा असो तरुणी। समजाविता ना ऐके कोणी
कुटुंबातल्या नात्यांना ती। झिडकारून देई॥ १॥

दोन चाकीवर सदैव स्वार। कर्जाचा डोईवरी भार
व्यसनाधीनता अंगी भिनवुन। रस्ता चुकत राही॥ २॥

पालक सारे सावध ऐका। पुरवू नका तुम्ही तयांचा हेका
मुलांमध्ये पाहू नका हो। आपुली तरुणाई॥ ३॥

संस्कारी बीज घरात रुजवा। सर्वधर्मसमभाव जागवा
प्रथम स्वत:मध्ये बदल करुनिया। मग व्हा बाबा-आई॥ ४॥

– विजया देशपांडे, सातारा.

मूळ गीत- ‘फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार..’
शिक्षका होसी तू बेजार..

नवी धोरणे, नव्या पद्धती
ज्ञानाचा बाजार..
शिक्षका, होसी तू बेजार..॥ धृ ॥

हजेरी, नोंदी, पाठटाचणे
पोषण आहार रोज वाटणे
जनगणनेला वणवण फिरणे
अधिकाऱ्यांचे खात टोमणे, हससि तू लाचार॥ १॥

विद्यार्थ्यांची संख्या मोठी
हातामध्ये नसते काठी
घसेफोड ही त्यांच्यासाठी
अफाट त्यांच्या बाललीलांना
नसे अंत, ना पार॥ २॥

पालक आणि मीडियावाले
तुजवर खिळले तयांचे डोळे
चूक जराशी मुळी न चाले
या साऱ्यावर कळस म्हणुनि का
नियमित नाही पगार..॥ ३॥
– चारुता प्रभुदेसाई, पुणे.

मूळ गीत- ‘नेहमीच राया तुमची घाई, नका लावू गठुडं बांधायला..’

येऊ नको नको तू भांडायला..

lr10तो- येऊ नको नको तू भांडायला..
पूर्वी होतीस गरीब गाय तू
भांडखोर भारी झालीस आता तू
लागतेस लगेच फिस्कारायला हो..
येऊ नको नको तू भांडायला॥ १॥

आई बाबा गेले बाजाराला
मुलं तर आता गेली शाळेला
गरीब बिचारा राहिलो एकला
कसा येऊ तुझ्याशी बोलायला हो..
येऊ नको नको तू भांडायला॥ २॥

पूर्वी होतीस कोवळी काकडी
आता तू झालीयस लाल भोपळा
कसा सांग घेऊ मी कवेत तुला गं..
येऊ नको नको तू भांडायला॥ ३॥

ती- तुम्हा सांगते ऐका धनी
बाईल तुमची मी गरीब हरिणी
प्रेम करीन मी तुम्हावरी हो
घरात कोणी नसताना
नका लावू आता मला भांडायला..॥ ४॥
– नेहा सोमण, रत्नागिरी.

मूळ गीत- ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’

या जन्मावर, या जगण्यावर..

या जन्मावर, या जगण्यावर
कसे गाऽऽऽ प्रेम करावे॥ धृ॥

घोंघावे वादळ रुसल्या धारा
चिडली काळी माती
ओसाड- वसाड राने तशी ही
करपून गेली पाती
फुले वचकली बघून माळातून
वज्र ओठ स्मरावे॥ १॥

रंगांचा अख्खा चोरूनी डबा
सांज कुणी ही नेली
काळोखाच्या दारावरती भुते-खेतेही मेली
लबाड पक्ष्यांचे हजार सोहळे
येथे जीवा गुदमरावे॥ २॥

पोराच्या फताडय़ा नरडय़ातूनी
शिवी कडवी येते
बोरी-बाभळी वरी प्रेम तिचे
अडकुनी तसेच हे बसते
आटले नदी-नाले काठ सजण्यासाठी
दगड-गोटे चणे खात फिरावे॥ ३॥

या जिभांनी चाटून खावी
अधाशागत ही माती
सातही जगणे कोळून प्यावी
इथल्या कौतुकी मरणासाठी
इथल्या प्लास्टिक पानांखाली
अवघे जग हे कीर्ती उरावे॥ ४॥
म्हणुनि या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..
– रवींद्र गुरव, चिपळूण.