‘मेटल’ हे रॉक संगीताचं अपत्य आहे. हट्टी, कणखर, चढत्या सुरातलं आणि बापाचं न ऐकणारं. रॉकदेखील काही कमी बंडखोर नाही, पण ‘मेटल’ हे बंडखोरीच्याही पुढचं आहे. हिंसा ही रॉकमध्येही आहे. रॉकच्या बंडखोर स्वरूपात ती अनुस्यूतच आहे. मात्र ‘मेटल’मधली हिंसा ही नक्की कशासाठी आहे, असा प्रश्न पडू शकतो. ‘मेटलहेड्स’ या पुस्तकात जेफ्री अर्नेटनं ‘मेटल’ संगीताला ‘सेन्सरी इक्विव्हॅलंट ऑफ वॉर’ (युद्धाचं श्रवण-रूप) असं म्हटलं आहे, ते चपखल वर्णन आहे! ‘मेटल’ हे युद्धाचा नाद निर्मिणारं. लांब केस, काळाकुट्ट टी-शर्ट, निळी जीन्स, दणकट लेदरचे बूट, चेन्स आणि मेटल स्टड्स धारण केलेले ते पाहा ‘मेटल’ बँडचे गायक-वादक! व्यासपीठावर कवटय़ा आणि क्रूस दिसला तर दचकू नका. खेरीज, एखाद्याचा चेहरा लिप-स्टिक, आयलायनर, रंग यांच्या साहाय्याने भेसूर दिसत असेल तरी बावरू नका. ‘मेटल’च्या राज्यात हे सारं पुष्कळदा असतं. आपण श्रोत्यांनीही त्या गदारोळात आपला हातभार लावायचा आहे. ‘हेडबँगिंग’ करूया का? हेडबँगिंग म्हणजे तालात डोकं खटाखट पुढे आपटवायचं- म्हणजे तसा अभिनय करायचा. कधीकधी उत्साही प्रेक्षक आणि कलाकार खरंही डोकं आपटवतात. आणि तिकडची ती मंडळी हाताची दोनच बोटं उंचावून कसलीशी खूण करीत आहेत. ती खूण नेहमी असते तशी ‘व्ही’ची. ‘व्हिक्टरी’ची नव्हे, ते आहे सैतानाचं चित्र. सैतानाचा जोर ‘मेटल’ संगीतामध्ये विशेषच आहे. खूप वेळा ख्रिस्ती मूल्यांच्या अलीकडच्या ‘पेगन’ संस्कृतीकडे ‘मेटल’ वळतं. ‘व्हीपलॅश’ या गाण्यामध्ये जणू साक्षात सैतान अवतरतो आणि संचार करत गातो :
“Bang your head, Make it rain,
Make it bleed, Make it really Sore;
We are gathered here to maim and kill for this is what we choose…”
(आपटा तुमची टाळकी, सडा पडूदे रक्ताचा
खरोखर सुजूदेत.. येऊदेत टेंगळं
अवतरलो आहोत आम्ही कापायला अन् मारायला
निवडलंय आम्ही हे काम; मानवतं आमच्या पिंडाला!)
मेटल कंपूंची नावंही कसली ‘डेंजर’ असतात! ‘मेगाडेथ’, ‘अँथ्रॅक्स’, ‘सुसाइडल् टेंडन्सीज्’, ‘ब्लॅक सॅबाथ.’ मेटल संगीताचे काव्यविषय हेदेखील वैशिष्टय़पूर्ण असतात. राजकीय, सामाजिक विषयावरचं तिरकस भाष्य पुष्कळदा त्यामध्ये असतं. ‘डेथ मेटल’सारख्या उपपंथात मृत्यूचं गुणगान गायलेलं आढळतं. ‘पॉवर मेटल’ हा थोडा वेगळा घाट. त्यात पुष्कळदा मिथकांची रेलचेल आढळते. ‘मेटल’मधलं मरण हे खूपदा साधं-सुधं आणि बिनबुडाचं असतं. कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार’सारख्या कवितेमध्ये जी मृत्यूची भव्य, उदात्त छाया पसरलेली असते, तशी ‘मेटल’मध्ये मला तरी आढळलेली नाही. ‘मेटल’मधला मृत्यू जसा अनासक्तीचा, तसं प्रेम आणि प्रणयही निर्मोही, अलिप्त, शारीरिक गाभ्यापुरतं. आणि म्हणूनच ‘मेटल’ संगीताला ठाम शत्रू आहेत आणि ठाम मित्रही आहेत, अधेमधे काही नाहीच.
अमेरिकेमध्ये कुमारवयीन मुलांचं काही वर्तन बिघडलं की पुष्कळदा मीडिया रॉकला-त्यातही मेटलला अंतिमत: कारणीभूत ठरवते. कोलॅरॅडोमध्ये शाळेतल्या दोन पोरटय़ांनी बंदुकीच्या फैरी झाडून शाळेतल्या सहाध्यायांचे मुडदे पाडले आणि मग स्वत:लाही संपवलं. अमेरिकेच्या विचारी विश्वानं त्याचा सांधा हिंसाचार आणि लैंगिकता प्रदर्शित करणाऱ्या रॉकशी जोडला. मला आठवतं, अमेरिकेच्या सिनेट कमिटीसमोर रॉक संगीताच्या हिंसाचारावर झालेली चर्चा. टिप्पर गोर यांनी ‘The Parents Music Resource Centerl’ या संस्थेद्वारे अमेरिकेचं लक्ष कुमारवयीन मुलांवर होणाऱ्या अनिष्ट सांगीतिक परिणामांकडे वेधलेलं होतं. ती सिनेट कमिटीची हिअरिंग मी मुळातून वाचली; तेव्हा मला वाटला तो अचंबा. एखाद्या विषयावर उलटसुलट चर्चा, खोल खोल उतरत, राजकारणाच्या कक्षेत कशी होऊ शकते याचा तो आदर्श नमुना आहे. शिवाय विषयही ‘संगीत’ हा. (आपल्याला संसदेत कलेवरच्या चर्चा ऐकण्याची सवय नाही; मिरपूड, स्प्रे वगैरे आपल्या जास्त परिचयाचे आहेत!) प्रथमच साक्ष देताना टिप्पर गोर यांनी संगीत क्षेत्रावर सेन्सॉरशिप आणण्याचा आपला हेतू नसल्याचं स्पष्ट केलं. रेकॉर्ड कंपन्यांनी आपणहून अल्बमसाठी स्वेच्छेनं ‘लेबलिंग’ करावं, (जसं पिक्चरला ‘U’, ‘U/A’ किंवा ‘A’ असतं तसं.) अशी त्यांची मागणी होती. अजून एक धडाडीचे कार्यकर्ते श्री. लिंग् यांची साक्ष गाजली. त्यांनी एकामागोमाग एक रॉक आणि मेटल संगीताच्या हिंसात्मक रूपाची उदाहरणं पिसलेले पत्ते त्वेषानं भिरकवावेत तशी फेकली. ‘वास्प’ (WASP) या बँडनं व्यासपीठावर कच्चं मांस कापलं आणि त्याचे तुकडे श्रोत्यांच्या अंगावर फेकले, मग त्यांनी कवटीतून रक्त पिण्याचा अभिनय केला, तसंच एका डमी अर्धअनावृत स्त्री-प्रतिमेचा विनयभंग त्याच व्यासपीठावर सादर केला आणि अशा कंपूनं नुकतंच दीड मिलियन डॉलर्सचं काँट्रॅक्ट मिळवलं आहे, असं श्री. लिंग् यांनी पुराव्यासकट सभागृहाला दाखवल्यावर सर्वत्र शांतता पसरली.
अर्थात, सगळं मेटलसंगीत असं नाही हे उघडच आहे. कुठलाच विवक्षित संगीतप्रकार बरा, वाईट, चांगला नसतो. तो ‘असतो’ आणि त्यामधले कलाकार हे बरे, वाईट, चांगले असतात. ‘मेटल’चं हे हिंसापुराण ऐकल्यावर त्याला जगभर चाहतावर्ग मिळाला तरी कसा, हा प्रश्न पडू शकतो. पण तसा तो आहे. जगभरच काय, भारतात आहे. आपल्या आसपास मराठी बोलणारी पुष्कळ शहरी आणि ग्रामीण तरुण मंडळीही ‘मेटल’ची चाहती आहेत. का आवडतं त्यांना हे गाणं? पहिलं म्हणजे, त्या संगीतामध्ये अपार ऊर्जा आहे. टणाटण् नावाला जागत ‘मेटल’मधले ड्रम्स द्रुतलयीत वाजत असतात, भरजरी ‘बेस’ त्या गाण्याला स्थैर्य प्राप्त करून देतो. सांगीतिकदृष्टय़ा ‘मेटल’ हे अतिशय अवघड असं संगीत आहे. त्यात अतिशय उत्कटपणे, वेगाने गिटार, ड्रम्स वाजतात आणि तसं करणं हे वादकांसाठी अवघड असतं. ही ऊर्जा जगभरातील तरुणांवर मोहिनी टाकते. ‘मेटल’चा विशिष्ट नाद-‘साउंड’ असा आहे आणि कानांना त्याची एकदा सवय झाली की तो ‘साउंड’ पुन्हा पुन्हा श्रोत्याला आपल्याकडे खेचतो. दुसरं म्हणजे, बाजारू तकलादू अशा पुष्कळ ‘पॉप’ अॅक्ट्सच्या तुलनेत मेटल संगीत हे अधिक सच्चं आहे. बहुतांशी मेटल कंपू हे स्वत:च काव्य लिहितात, गातात, संगीतरचना करतात. त्या त्या कंपूचा एक विश्वासार्ह (भला-बुरा का असेना) ठसा त्यांच्या निर्मितीवर आढळतो. खरं तर त्यातले दचकवणारे संदर्भ हे पुष्कळ रसिक फार मनावर न घेता अंतरावर ठेवू शकतात आणि त्या संगीताचा विचार पटला नाही तरी त्याचं संवेदन आस्वादू शकतात.
मुळात संगीत ही सामाजिक घटना आहे, हे म्हणणं इथेही लागू होतं. ‘मेटल’ संगीत हे काही मॅनहॅटनच्या श्रीमंती इमारतींमध्ये तयार झालं नाही; ते कामगारांचं आणि कष्टकऱ्यांचं गाणं आहे. त्यांच्या भंगलेल्या स्वप्नांचं आणि त्यांच्यासमोर छद्मी हसणाऱ्या, त्यांची सदा परीक्षा घेणाऱ्या नियतीचं ते गाणं आहे. म्हणूनच त्यात सैतान असू शकतो. ते विकट असू शकतं.
भारतामध्ये जुडास प्रीस्ट, लेड झेपेलिन्, ब्लॅक सब्बाश या कंपूंचं ‘पोस्टमॉडर्न’ मेटल संगीत चांगलंच बस्तान बांधत आहे, याची नोंद घ्यायला हवी. तो बदल काही केवळ सांगीतिक अभिरुचीचा नाही, तर सामाजिक स्वरूपाचाही आहे. पोस्टमॉडर्न जगामधली अर्थविहीनता (निर्थकता नव्हे) रॉकमध्ये, मेटलमध्ये आहेच. आणि ती आपल्या देशातल्या तरुणांनाही भुरळ घालू लागली आहे.
रॉक (आणि मेटल) हे अस्वस्थ गाणं आहे, बंडखोर आहे, विद्रोही आहे हे सारं खरं, पण मला रॉक हे अल्बर्ट कामूच्या ‘मेसरे’ या नाटकासारखं ‘आउटसायडर’ वाटतं! समुद्रकिनारी भर मध्यान्ही तो गायक अरबाच्या अंगावर गोळी झाडतो. आणि मग पुन्हा चार वेळा त्या अचेतन शरीरावर गोळ्या झाडतो तेव्हा कामू लिहितो, “…it was like giving four sharp knocks at the door of unhappiness” रॉक संगीतदेखील असंतोषाच्या त्या दारावर चार दणकट ठोसे लगावणारं अर्थविहीन संगीत आहे, नाही का?
                  

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Story img Loader