आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहणाऱ्या, मराठवाडय़ातील खेडय़ातून पुढे आलेल्या आणि औरंगाबादसारख्या शहरात प्राचार्यपदापर्यंत पोहचलेल्या व्यक्तीचे हे आत्मकथन. रूढार्थाने या आत्मकथनाबद्दल आकर्षण वाटावे असे काही नाही. पण तरीही १९५३ ते १९९१ या काळात नोकरीच्या निमित्ताने २०-२५ गावी राहिलेल्या लेखकाने त्या त्या ठिकाणचे आपले अनुभव यात सांगितले आहेत. पाहिलेली गावे, भेटलेली माणसे असे या आत्मकथनाचे स्वरूप आहे. ज्यांचं स्वत:चं शिक्षण थांबलेलं नसतं, अशा शिक्षकांकडून इतरांना शिकण्यासारखं बरंच काही असतं. एका चांगल्या शिक्षकाच्या या आत्मकथनातही त्याचा प्रत्यय येतो. आरोप-प्रत्यारोप आणि स्वत: डिंडिम न वाजवता आहे हे, घडलं तसं सांगितल्याने या पुस्तकातून निर्मळपणाचा सुखद प्रत्यय येतो.
‘परडी आठवणींची’ – प्रल्हाद खेर्डेकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद, पृष्ठे – ३८४, मूल्य – ३०० रुपये.
अल्पपरिचय : दहा साहित्यिकांचा!
हे पुस्तक मराठीतील दहा साहित्यिकांचा परिचय करून देणारे आहे. स्वा. विनायक दामोदर सावरकर, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत, गो. नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, प्राचार्य राम शेवाळकर, द. मा. मिरासदार आणि मारुती चितमपल्ली या मान्यवरांचा त्यात समावेश आहे. हे सर्वच साहित्यिक मराठीतील महत्त्वाचे आणि उल्लेखनीय लेखक आहेत. त्यांच्या लेखनाचा मराठी जनमानसावर मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी वाचायला वाचकांना नक्की आवडेल. हे पुस्तक या साहित्यिकांच्या लेखनाची समीक्षा करणारे नसून त्याचा केवळ परिचय करून देणारे आहे. या सर्वच साहित्यिकांवर लेखकाने वेळप्रसंगी व्याख्याने दिलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनातही भाषणाचा प्रभाव उतरून ती जास्त मनोरंजक करण्याचा प्रयत्न केला आहे.
‘साहित्य दरबारातील दशरत्ने’ – प्रा. श्याम भुर्के, स्नेहल प्रकाशन, पुणे, पृष्ठे- ३०४, मूल्य- ३०० रुपये.
रंगभूमीच्या आठवणी
हे पुस्तकही व्यक्तींविषयीचेच आहे, पण या व्यक्ती मराठी नाटकाच्या क्षेत्रातील आहे. यात नाटककार, नाटय़कर्मी, नाटय़दिग्दर्शक यांच्याविषयीचे वीस लेख आहेत. यातील सर्वच रंगकर्मी हे आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार म्हणता येतील असे आहेत. त्यांच्याविषयी रंगभूमीचे ज्येष्ठ अभ्यासक वि. भा. देशपांडे यांनी जाणकारीने लिहिले आहे. रंगभूमीसाठी या मान्यवरांनी दिलेले योगदान त्यांनी नेमकेपणाने सांगितले आहे. तसेच त्यांच्या व्यक्तिगत जीवनातल्या आणि कलात्मक जीवनातल्या अनेक आठवणी-प्रसंग त्यांनी दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यायोगे त्या त्या काळातील मराठी रंगभूमीच्या इतिहासाचे काही तुकडे समजायलाही मदत होते. अत्रे, शिरवाडकर, पु.ल., खानोलकर, दळवी यांची नाटकं, त्याविषयीचे निळू फुले, दामू केंकरे, दुबे यांच्या आठवणी, त्यांनी रंगवलेल्या त्या त्या नाटकातील भूमिका, असा एक कोलाज या पुस्तकांतून उभा राहतो.
‘वारसा रंगभूमीचा’ – वि. भा. देशपांडे, उन्मेष प्रकाशन, पुणे, पृष्ठे- २१३, मूल्य- २०० रुपये.
स्त्रीशक्तीचे विलोभनीय दर्शन
‘मिळून साऱ्याजणी’ या महिलाविषयक मासिकाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने या मासिकात आजवर प्रकाशित झालेल्या कथांपैकी निवडक कथांचा हा संग्रह. या पुस्तकाच्या सुरुवातीच्याच मनोगतात म्हटल्याप्रमाणे ‘हे निव्वळ मासिक नाही, तर सहकार, बांधीलकी आणि मैत्रभाव जपणारी ती एक जगण्याची रीत आहे.’ तर या मासिकाच्या मुखपृष्ठावर कायम ‘स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वत:शी आणि परस्परांशी संवाद साधावा यासाठी..’ असे बोधवाक्य छापलेले असते. म्हणजे या मासिकात स्त्रियांबरोबरच पुरुषांचेही लेखन छापले जाते. प्रस्तुत संग्रहात एकंदर पंधरा कथा आहेत. दहा कथा या स्त्री लेखिकांच्या तर पाच कथा या पुरुष लेखकांच्या आहेत. या कथा रूढार्थाने स्त्री-पुरुष यांच्यातील नात्याचा वेध घेणाऱ्या आहेत. स्त्रीविश्वाच्या वेगवेगळ्या पैलूंचे, बाजूंचे दर्शन या कथांतून होते, तसेच आनुषंगिक असलेल्या प्रश्नांनाही या कथा भिडतात.
‘गोष्टी साऱ्याजणींच्या’ – संपादन- डॉ. गीताली, उत्पल, मानसी, मेनका प्रकाशन, पुणे, पृष्ठे- २४६, मूल्य- २५० रुपये.