अलीकडच्या काळात तुकाराम-अभ्यास अशी स्वतंत्र शाखा करता येईल इतकं लेखन संत तुकाराम महाराजांविषयी सातत्याने होत आलं आहे, होत आहे. त्याच मालेतील हे एक पुस्तक. प्रस्तुत लेखकाचे हे तुकोबाविषयीचे दुसरे पुस्तक. यातले सर्व म्हणजे नऊही लेख वेळोवेळी लिहिले गेलेले आहेत. चर्चासत्रांसाठी शोधनिबंध आणि लघुशोध प्रकल्प या निमित्ताने हे लेखन झालेले आहे. पण तुकोबा हे यातील समानसूत्र आहे. त्यांच्या अभंगातील समजादर्शन, समाजजीवन, समाजविचार, सामाजिकता, सत्यविषयक जाणीव, राजकीय विचार व अर्थविचार, पर्यावरण विचार यांविषयी प्रत्येक प्रकरणात सविस्तर विवेचन केले आहे. तुकोबांच्या अभंगातील सामाजिक दृष्टी हा या सर्व लेखनाचा मूलाधार आहे. विद्यापीठीय संशोधनाच्या पद्धतीने केलेला हा अभ्यास जाणकारांसाठी उपयुक्त ठरू शकेल.
‘लोकोत्तर तुकाराम’ – डॉ. तानाजी पाटील, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २१६, मूल्य – २१० रुपये.
जगण्याच्या व्यामिश्रतेची उकल
या पुस्तकाच्या मलपृष्ठावर हा ‘वास्तववादी कथां’चा संग्रह असल्याचं म्हटलं आहे. पण नीट विचार केला तर हा शब्दप्रयोगच मुळात भोंगळ आहे. वास्तव आहे तसं सांगायचं म्हटलं, विशेषत: माणसांविषयी सांगायचं म्हटलं की, त्या कथा होत नाहीत. तर ते लिखाण व्यक्तिचित्रणाच्या आणि प्रसंगांच्या अंगानं जातं. यातील चौदा वास्तववादी कथांचं तसंच झालं आहे. ‘बिळाशीचे दिवस’ आणि ‘निसर्गाच्या कुशीत’ हे दोन्ही तर लेखकानेच म्हटल्याप्रमाणे त्यांचे जीवनानुभव आहेत. अर्थात कसेही असले तरी हे पुस्तक वाचनीय आहे हे नक्की. मानवी मनाच्या, मानवी वृत्ती-प्रवृत्तींच्या वेगवेगळ्या, काहीशा गूढ आणि अनाकलनीय पैलूंचं दर्शन या पुस्तकातून होतं. शेवटचे दोन लेख तर चांगले ललितलेखच म्हणावे लागतील.
‘धुक्यातली झाडं’ – लक्ष्मण हसमनीस, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २०७, मूल्य – २१० रुपये.
माणसांच्या अनाकलनीयकथा
या कथासंग्रहात एकंदर सात कथा आहेत. त्यातील पहिलीच कथा ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ ही मुंबईतल्या जागेटंचाईच्या प्रश्नाचं भयावह रूप मांडणारी आहे. दादरमध्ये राहणाऱ्या एका सामान्य कुटुंबाला आपला राहता फ्लॅट नाइलाजास्तव कसा विकणं भाग पडतं, याविषयीची ही कथा अंगावर काटा आणते. या कथेला दिल्लीच्या ‘कथा’ या संस्थेचा १९९९ साली सवरेत्कृष्ट मराठी कथेचा पुरस्कारही मिळाला आहे. ही संस्था दरवर्षी भारतीय भाषांतील सवरेत्कृष्ट कथांना पुरस्कार देऊन गौरवते आणि नंतरचे त्यांचे इंग्रजी अनुवाद करून पुस्तकरूपाने प्रकाशित करते. त्यात या कथेचा समावेश झाला आहे. बाकीच्या कथांमध्ये मानवी वृत्ती-प्रवृत्ती यांचे वेगवेगळे नमुने पाहायला मिळतात. माणूस हा अनपेक्षितपणे वागणारा आणि जगणारा प्राणी कसा आहे, याची चुणूक या कथांमधून पाहायला मिळते.
‘माणसं आणि माणसं’ – जयंत बेंद्रे, अक्षर मानव प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १२०, मूल्य – १०० रुपये.